अध्याय ६ अभिमंत्रीत तीर्थ व गोळ्या

ही साधना स्पर्शसंवेदनेपैकीच एक भाग आहे. स्पर्शसंवेदना देत असताना मध्यस्थाने जी मंत्र-प्रार्थना म्हणायची असते, त्यामुळे त्या मंत्राच्या उच्चाराने मध्यस्थाच्या शरीरात काही सूक्ष्म कंप निर्माण होतात. ते कंप रोगी माणसाच्या शरीरात स्पर्शसंवेदनेने पाठविले जातात. त्यामुळे ज्या कारणाने शारीरिक व्याधी निर्माण झाली आहे तिचे निर्मूलन होते. याचा फायदा जास्तीत जास्त लवकर मिळावा म्हणून हेच मंत्र पाण्यावर अभिमंत्रित केले जातात. त्यामुळे रोग निर्मूलन करण्याची शक्ती त्या पाण्यात निर्माण होते. असे तीर्थ रोज सकाळ-संध्याकाळ आरतीनंतर सर्व केंद्रांवर विनामूल्य दिले जाते. आजपर्यंत ज्या ज्या असाध्य अशा रोगांवर ज्या लोकांनी या तीर्थाचा इलाज भक्तिभावनेने केला, त्यांना कोणत्या प्रकारचे जीवदान मिळाले हे समितीने सांगणे म्हणजे आत्मस्तुती होईल. परंतु ज्यांनी ते अनुभवले त्यांनाच त्याचा उपयोग समजू शकेल. आजच्या आधुनिक जगात वैद्यकीय शास्त्राची जरी इतकी प्रगती झाली असली तरी काही रोगांबाबात हे शास्त्रसंशोधन निर्बल ठरले, हे कदाचित आजची शास्त्रवादी मंडळी कबूल करणार नाहीत. परंतु अशा प्रकारचे काही रोगी, की ज्यांचे बाह्य वैद्यकीय उपचार करून झालेले होते, अशांना आज उत्तम शरीरस्वास्थ्य लाभलेले आहे. प्रामुख्याने या तीर्थाचा गुण चोवीस तासात येतो, पण त्याच रोग्यांना बाह्य वैद्यकीय शास्त्रात काही महिन्यांचा कालावधी लागतो. रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या बाबतीत जे तीर्थ किंवा अभिमंत्रित गोळ्या दिल्या जातात, त्यांच्या इतका अचूक इलाज तोही विनामूल्य अन्य शास्त्रांत असेल असे वाटत नाही. तसेच स्त्रियांच्या विकाराबाबतीत आतापर्यंत ज्या ज्या निरनिराळ्या तक्रारींवर इलाज केले गेले, हे जगातील कोणत्याही बुद्धिवादी माणसाने अभ्यासण्यासारखे आहेत. व या अभ्यासाने हे निश्चित पटेल की, जास्तीत जास्तपणे रोगाची कारणे आपण आहोत. कारण ज्या काही स्त्रियांना या साधनपध्दतीचा इलाज दिला गेला, तत्पूर्वी शरीरप्रकृतीचे योग्य ते निदान न झाल्याने मूळ रोगापेक्षा कैक पटीने अन्य दोष निर्माण झाले. परंतु परमेश्वर कृपेने त्यांचेही निर्मूलन झाले. त्यापैकी काहींना वैद्यकीय शास्त्रदृष्ट्या ‘जीविताची हमी आम्ही देऊ शकत नाही‘ असेही सांगण्यात आले होते. परंतु अशांनाही सुख-समाधान लाभून त्यांचे अजूनही या मार्गाबद्दलचे अज्ञान गेलेले नाही. समाज परिपूर्ण तऱ्हेने या मार्गाकडे व या शास्त्राकडे अज्ञानाने पहातोच आहे. परंतु ज्यांना जीवदान मिळाले किंवा मिळते, तेही तितक्याच अज्ञानाने या मार्गाकडे पाहतात. जगातील कोणत्याही शास्त्राचा पदवीधर याला या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या शास्त्राचे संशोधन करावयाचे असेल किंवा अभ्यास करावयाचा असतो, व तोही चार किंवा सहा वर्षे. अशा अभ्यासाने तुम्ही जगातील एका शास्त्राचे पदवीधर होता. जगाचे नाही ! तुम्ही आत्मसात केलेले ज्ञान किंवा पदवी यांनी जगातील अन्य शास्त्रे मूर्खपणाची आहेत असे म्हणणे हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे काय ? उलट आजपर्यंत या शास्त्राचा अभ्यास केलेल्यांनी आपले आयुष्य त्यात घालविले आहे. परंतु ज्या शास्त्राचा अंतसुध्दा अजून कोणाला लागला नाही. त्यांनी त्याचा अभ्यास व अभ्यासातून प्रचीति आल्याशिवाय उगीच अंगारा-धुपाऱ्याचे शास्त्र आहे, असे उपहासाने म्हणणे सोपे नाही. वैद्यकीय शास्त्रात जेव्हा एखाद्या शास्त्राचे संशोधन होते, तेव्हा ते सृष्टीतील एखाद्या पदार्थाचे विचारानी संशोधलेले तत्व असते. ते त्याची रोगनिवारणार्थ जी क्रिया असते, तिलाच तुम्ही लोक संशोधन असे म्हणता. त्याची जास्तीत जास्त सूक्ष्म अवस्था म्हणजे भस्म ही होय. या पलीकडे त्याचे आणखी काही सूक्ष्मात रुपांतर असेल असे वाटत नाही. या विचारांनी निर्माण केलेले एखादे औषध जेव्हा एखादा रोगी घेतो, तरीसुध्दा त्याला लवकर बरे वाटण्यास भावनेची आवश्यकता असतेच. आता आधुनिक शास्त्रात जे अणू-परमाणूचे शास्त्र आहे, ते किंबहुना त्यांची शास्त्रीय प्रगतीतील शेवटची मर्यादा असेल. पण या शास्त्रात हा आरंभ आहे. भस्म, अंगारा किंवा उदी ही जरी सुधारकास राख वाटत असली, तरी ती निर्माण होण्यामागे हजारो वर्षांची भावना पणाला लागलेली असते. म्हणून हे शास्त्र फाजील विचारांवतापेक्षा भावनाशील माणसाच्या जास्त उपयोगाचे आहे.

अभिमंत्रित गोळ्या या याच मंत्रांच्या प्रार्थनेने अभिमंत्रित केल्या जातात. साखरेच्या गोळ्यांवर या मंत्रांच्या संवेदनांची आवर्तने देऊन स्पर्श संवेदना किंवा तीर्थ यापेक्षा या जास्त प्रभावी केल्या जातात. कारण निरनिराळ्या रोगांच्या तीव्रतेप्रमाणे जर आवश्यक वाटले, तर तीर्थात या गोळ्या टाकण्यास सांगितले जाते. या शिवाय जी भक्तभाविक मंडळी परगावी असतात, अशांना स्पर्शसंवेदना व तीर्थ नेणे अशक्य असते. अशांना या गोळ्या एकेक आठवड्यापुरत्या दिल्या जातात. त्याचे मूल्य पांच आणे घेतले जाते. ते पैसे अल्पबचतीत जमा केले जातात. याशिवाय बाह्य उपचारासाठी तेलही दिले जाते, ते तेल प्रत्येकाने प्रत्येकाचे आणण्यास सांगून नियुक्त सेवकाकडून ते अभिमंत्रित करून दिले जाते. निरनिराळ्या त्वचारोगांवर या तेलाचा उपयोग अतिशय उत्तम तऱ्हेने होतो.

या अभिमंत्रित तीर्थाच्या या गुणाशिवाय जर त्याचे अन्य गुणधर्म आपणासमोर मांडले, तर आपला विश्वास यावर बसेल काय ?कारण आपल्या आचारविचारांची धारणा अशा प्रकाराने झालेली आहे की, नवीन शास्त्र संशोधनाचे मानकरी हे पाश्चिमात्य लोकच आहेत व आपल्याकडे काहीही शास्त्रीय वाद सिध्द झाला, तरी त्याचा विचार न करता त्या सिध्द पध्दतींना समाजकल्याणार्थ किंवा लोककल्याणार्थ स्थान न देणे यासाठी प्रयत्न चालू असतो. या तीर्थाचा उपयोग केवळ मनुष्याच्या शरीर प्रकृतीसाठीच होतो असे नसून त्याचा उपयोग चतुष्पाद प्राण्यांनाही, उदा. गाय, म्हैस, कुत्रा इ. यांनाही होतो. याशिवाय वनस्पतींनाही हे तीर्थ किती हितावह आहे, हेही सिध्द झाले आहे. त्याचा प्रयोग शेतकी विद्यालयातील पदवी परीक्षेच्या एका विद्यार्थ्याने केला होता. त्याच्या सहाध्यायाने अन्य तऱ्हेची खते वापरली होती व याने त्याऐवजी अभिमंत्रित तीर्थ घातले होते. एकाच वेळी एकाच जमिनीत थोड्या थोड्या अंतरावर प्रयोगादाखल लावलेल्या मिरच्या यांच्यात बऱ्याच प्रमाणामध्ये फरक जाणवला. त्याचप्रमाणे फळझाडांच्या बाबतीतही उत्तम प्रकारची फळे तयार झाल्याचे आढळून आले आहे. जो फरक बारा वर्षे आढळून आला नाही, तो या तीर्थामुळे आढळून आला. यावरून अभ्यासूला या शास्त्रात काय काय अभ्यासण्यासारखे आहे, हे अभ्यासण्यास मिळेल. ही अभिमंत्रित तीर्थसाधना ही केवळ मानवी जीवनोपयोगी आहे असे नसून प्राणी व वनस्पती यांनाही तितकीच उपयोगी आहे.

स्पर्शसंवेदना, ज्ञानसंवेदना, अभिमंत्रित तीर्थ, गोळ्या व तेल हे सर्व आपल्या लोकांसाठी विनामूल्य दिले जात आहे. तरी त्याचे मोल हे तुमच्या आचार-विचारावर अवलंबून आहे. कारण रोगाची परीक्षा जशी वैद्यकीय शास्त्राने होते व निवारण जसे औषधाने होते, तद्वतच तुमच्या रोगाचे निर्मूलन तुमच्या आचार-विचारांनी होणार आहे. आज जरी बाह्य उपचारास खर्च करावा लागणारा पैसा हा जास्त देण्याने रोग बरा होईल अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही, तरी त्या ठिकाणी तुम्ही मंडळी शास्त्रावर विश्वास ठेवून भावनेने औषधाच्या आहारी जाता. परंतु या सर्वाचा जो नियंता त्याच्यावर विश्वास ठेवून भावनेने वरील साधनेचा उपयोग जीवनात करून घेण्यास तयार नाही. बाह्य जगातील कोणत्याही शास्त्राबद्दल व त्याच्या उपयुक्ततेबद्दल समितीचे दुमत नाही. ज्याची ज्यावेळी आवश्यकता आहे, ते योग्य विचारानेच करावयास पाहिजे. आजच्या जगात धनिकाला झालेला रोग हा निरनिराळ्या औषधोपचारांनी बरा होऊ शकेल. त्याबरोबर गरीबाचाही रोग भावनेने बरा होऊ शकेल, यासाठी आपणासमोर मांडलेल्या या साधनपध्दतीच्या उपयुक्ततेमधून आज जर आपण एक रूपया वाचविलात, तर भावी काळात तुमच्या मुलाबाळांसाठी ते दहा रुपये होणार आहेत. समितीच्या कार्यपध्दतीत प्रचार करण्यास आज्ञा नसल्याने ज्या ज्या लोकांना वरील पध्दतीचे इलाज केले गेले त्यांची नांवे व निराकरण येथे देता येत नाही. प्रचाराबद्दल गुरुआज्ञा अशी की, आधी विचार, आचार व तो इतर बंधू-बांधवाच्या सुखसमाधानासाठी निर्माण झाला की तोच प्रचार !.

<< अध्याय  ५ स्पर्श संवेदना व ज्ञान संवेदना

>>अध्याय  ७ पारमार्थिक उन्नतीसाठी आयुर्वेदाची आवश्यकता