अध्याय ८ मासिक वर्गणी व अल्पबचत.

आतापर्यंत मानवी जीवनाच्या विचारानी मांडलेला हा सिध्दांत आपल्याला आपल्या जीवनात निश्चित करून बाह्य जगतातील दु:खी लोकांना सुखी करण्यासाठी आपल्या जीवनातील राहिलेला अमोल वेळ खर्च करावयाचा आहे. त्यासाठी जी पारमार्थिक उन्नती आपल्याला करावयाची आहे, तिजसाठी आज जगात असंख्य पुस्तके अस्तित्वात आहेत व हजारो वर्षांपासून रूढ झालेल्या साधना जरी अस्तित्वात असल्या तरी जोपर्यंत सहजगत्या समजणारा उन्नतीचा मार्ग निमार्ण होणार नाही, तोपर्यंत हा सर्व अभ्यास शास्त्रीय ग्रंथातील प्रमाण म्हणून राहणार आहे. आणि जोपर्यंत एकमेकांबद्दल काडीमात्रही प्रेम नसणारे आचार-विचार अस्तित्वात आहेत व तेसुध्दा पारमार्थिक उन्नतीच्या मार्गातील साधकाजवळ, तोपर्यंत पारमार्थिक विचाराने ‘समाज उध्दरेल’ हे म्हणणे खोटे आहे. यासाठी या भूमिकेने सहकार्य एकमेकांस लाभले पाहिजे. एकमेकांमध्ये प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावयास पाहिजेत. तो जिव्हाळा कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक स्वार्थ या स्वरुपाचा असून चालणार नाही. एकमेक बंधुभावाने एकाच गुरुचरणाशी, एकाच कार्याशी व एकाच विचाराशी लीन झाल्यावर एकमेकांतील अहंभाव विसरण्यास प्रथमतः शिकले पाहिजे. जोपर्यत मनुष्यास त्याच्यातील दोष स्पष्टपणे सांगितला जात नाही, तोपर्यंत त्याला एकमेकाबद्द्ल त्याला खूप जिव्हाळा आहे, प्रेम आहे, नि:स्वार्थता आहे, असे वाटते. पण काही कारणाने जर ही बाजू दहा लोकांच्या आचार-विचारास घातक असेल व ती स्पष्टपणे जर तोंडावर सांगितली तर ती तितक्याच नम्रतेने ऐकून तो दोष किंवा ती सवय बदलण्याची तयारी सहनशीलतेने निर्माण करण्यानेच खरी उन्नती होत असते. ’मी कोणत्याच दोषास पात्र नाही’ असे भासविणे योग्य नाही. अशा भक्तिभावनेचा विचार करणे व त्याची सवय निरंतरपणे कोणत्याही परिस्थितीत टिकविणे हाच ध्येयवाद समितीपुढे आहे. तो पूर्णत्वाला नेण्यास आपण आपला वाटा उचलला पाहिजे. व त्याचा फायदा बहुजन समाजाला देता यावा म्हणून स्वतःची भूमिका म्हणजेच समिती असे निश्चित ठरविले पाहिजे.

आजपर्यंत समितीबाबत पुष्कळ नव्या व जुन्या भक्तभाविकांचे गैरसमज असे आहेत की, ’ समिती अमुक एकाने स्थापन केली आहे’, ‘ ती अमुक एका करवी चालविली जात आहे’, ‘तिच्या कार्यपध्दती या कोणा व्यक्तिच्या वैयक्तिक विचाराच्या आहेत.’ पण यापैकी कोणतीही बाजू सत्य नाही. आपण जी समिती म्हणून ओळखता, ती एक गुरु आज्ञा आहे. व ती आज्ञा जगाच्या सुखासमाधानासाठी एका मध्यस्था करवी दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा प्रकारे त्या आज्ञेची पूज्यता प्रत्यक्ष आचरण्यात आणण्याने कार्य प्रामाणिकपणे करणे, या कर्तव्यासच ‘समिती’ असे नांव आहे. या विचारास उत्तम उदाहरण असे आहे की, एखादी राजाज्ञा प्रजेच्या हितासाठी जेंव्हा दिली जाते, तेव्हा प्रजेतील प्रत्येक घटक राजासमोर असणे यास महत्व नसून ज्याच्या हाती ही राजाज्ञा दिली गेली त्या आज्ञेची मान्यता त्या व्यक्तिपासून राज्यातील शेवटचा घटक जो कोणी शेतकरी वगैरे असेल, तेथपर्यंत सर्वाना करावी लागते. यासच सुव्यवस्थित राज्यपध्दत म्हणतात. ही राजाज्ञा खरी-खोटी ठरविण्यासाठी प्रत्येकाला राजासमोर जाण्याचे कारण नाही. ज्याच्यात आपले हित आहे, ती आज्ञा राजाज्ञाच होय. तद्वतच या समितीच्या कार्यपध्दतीचा पाया निर्माण करण्याची आज्ञा परमपूज्य बाबांनी दिली. ती प्रत्येकाने मानून आचरण्यात आणण्यानेच जीवनात सुखसमाधान निर्माण होऊन काहीतरी लोककल्याण होईल. तेव्हा सूज्ञ भक्तभाविकांनी व सेवकांनी आपल्याला दिलेल्या आज्ञा या कोणा व्यक्तिच्या वैयक्तिक विचाराच्या आहेत असा विचार निर्माण करू नये. या आज्ञांची निरंतर स्थिरता लोककल्याणार्थ व्हावी म्हणून जे आणखी मध्यस्थ या कार्यपध्दतीसाठी तयार केले गेले व जात आहेत, यासच समिती असे नांव आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यावर जी काही स्वतःची परोपकारार्थ भूमिका ठरवाल, ती कोणाच्या विचाराची असणार नाही. तेव्हा कोणाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आपली उपस्थिती येथे कदापिही ठेवू नका.

वर सांगितलेला कार्यपध्दतीचा पाया आज प्रत्यक्षात आपणा सर्वांसमोर आहे. तो चालविण्यासाठी जो काही मासिक खर्च लागतो, त्यासाठी पै-पैसा कोणी द्यावा अशी कोणावरही सक्ती नाही. प्रथमतः तुमची उपस्थिती जेव्हा कार्यकेंद्रावर दु:खनिवारणार्थ होते, तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून एक रुपया पाच आणे घेतले जातात. तो गुरुपीठाचा मान म्हणून घेतले जातात. आज आपण जन्मजन्मांतरातील दु:खाची ऋणमुक्तता करण्यासाठी येता व तत्प्रीत्यर्थ जी गुरुदक्षिणा आपल्याला सांगितली जाते, तेव्हा स्वाभाविक अविचाराने काहीतरी भ्रम आपण समितीबद्दल निर्माण करता. पण तीन तासाच्या मनोरंजनासाठी कुटुंबास चित्रपट पहाण्यास नेलेत, तर तोसुध्दा एक रुपया पाच आण्यात सर्वांना पहावयास मिळत नाही. मग येथे जन्मऋणानुबंधातून मुक्त होण्यासाठी येता, ते मुक्त का होता येत नाही हे तुम्हीच ठरवा. हे सांगणे समितीचे कर्तव्य नाही. आपल्याला या कार्यपध्दतीचा हेतू पूर्णपणे पटला व त्याचा अभ्यास काही काळ केलात व समितीच्या कार्यपध्दतीत कोणतीही स्वार्थीपणाची भूमिका नाही, जी आहे ती नाममात्र माझ्याचपाशी आहे हे जर खरोखर पटले, तरच मासिक वर्गणी म्हणून ऐच्छिक स्वरुपात देणे योग्य आहे. ती देण्यामागे आपण कदाचित वर्गणी देत आहोत इतकाच अर्थ लावता. परंतु कोणकोणत्या कार्यकारणाने तुम्हाला पुण्याचा लाभ होतो हे तुम्ही विचारात घेत का ? आपल्यासमोर अधिष्टित असलेले गुरुस्थान याची पूजा, अर्चा, अखंड नंदादीप यासाठी तो पैसा खर्च केला जातो. म्हणजे तुमच्या पै-पैशांतून रोजच्या रोज तुमच्या नावे देवधर्माप्रीत्यर्थ खर्च झाला. याशिवाय दुसऱ्या एका कर्तव्यामधून आपण विनासायास ऋणमुक्त होता. ते म्हणजे तुम्ही जगात ज्ञानी व्हावे या भावनेने तुमच्या मातापितरांनी तुमच्या शिक्षणासाठी कष्ट सहन केले, गुरूंनी विद्यादान केले. या त्यांच्या ऋणातून आपण ऋणमुक्त होत आहोत का ? मी ज्ञानी व्हावे म्हणून माझ्या माता-पितरांनी कदाचित एकवेळ जेवून मला ज्ञानी केले, अशी तुम्हाला आज चुकूनसुध्दा आठवण होत नाही. आणि हे ऋण तुम्ही मातापिता हयात असताना आपल्या प्राप्तीतील काही अंशतः भाग देऊन फेडणार किंवा कदाचित फेडणारही नाही. मग एक रुपयापासून हजारो रुपयांपर्यंत जरी मिळवित असाल, तरी ‘पैसा मिळून तो पुरत नाही किंवा पैशाला पैसा लागत नाही’ असा प्रश्न तुम्ही मांडता. अशा वेळी तुम्हाला जर असे मार्गदर्शन झाले की, ‘आज तुम्ही जे हजारो रुपये मिळवित आहात, त्यामागे काही ऋण आहे व ते देवदैविक मार्गाने किंवा देवधर्म करून तुम्ही फेडणे आवश्यक आहे’ तर ते तुम्हाला पटणार नाही. कारण ते सत्य आहे. पण त्याऐवजी जर असे सांगितले की, ‘ तुम्हाला तुमच्या कोणीतरी नातेवाईकाने तुमची परिस्थिती चांगली आहे हे न पाहवल्याने करणी केली आहे’, तर त्यावर ताबडतोब विश्वास तुम्ही ठेवून शेकडो रुपये खर्च करून बसाल किंवा बसता. पण ऋणानुबंधनाचे काही ऋण देवधर्म करून फेडण्यास तुम्ही तयार नाही.

या ऋणमुक्ततेसाठी मासिक वर्गणी घेण्याची योजना भक्तभाविकांना सूचित करण्यात आली. कदाचित इतका विशाल बुध्दिवाद तुम्हाला पटणार नाही. तुमची अशी कल्पना असेल की, समितीला आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काहीतरी सूचित करावयाचे आहे. या समितीचा पाया गुरुआज्ञेने इतका शुध्द स्वरुपाचा केला गेला आहे की, एक तांबडा पैसा आपण या ठिकाणी अंधश्रध्देने खर्च करू नका. फक्त येथील कार्याचे वैशिष्ट्य लक्षात घ्या की, ज्या सर्व सिद्धसिद्धांत पध्दती दु:खनिवारणार्थ सूचित केल्या जातात, त्यामागील साध्य नुसते दु:ख दूर व्हावे असे नसून, तुमच्या जन्मजन्मांच्या ऋणानुबंधनातून तुम्ही मुक्त व्हावे असे आहे. याचे परिपूर्ण ज्ञान घेऊन जर सभासद झालात, तर मासिक वर्गणी देण्यामागे काहीतरी जीवनाबद्दल निश्चितपणा निर्माण केलात हे सिध्द होईल. म्हणजे महिन्याकाठी सदिच्छेने करीत असलेले कर्तव्य व त्यासाठी खर्च केलेला पै-पैसा फुकट गेला नाही, याचे समाधान लाभेल.

अल्पबचत.
ही सिध्द पध्दत, या कार्यपध्दतीत विशिष्ट प्रकारचा हेतू साध्य व्हावा व आपले वैयक्तिक आचार-विचार हे प्रामाणिकपणाचे असावेत, यासाठी भक्तमंडळी व सेवकांच्या मार्गदर्शनार्थ गुरुआज्ञेने ठेवली आहे. याचा विनियोग प्रामुख्याने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व गरीबांस आवश्यक ते वैद्यकीय साहाय्य देण्यासाठी केला जातो. आजपर्यंत अनादिकालापासून देवधर्म, दानधर्म, प्रायःश्चित्त किंवा अन्य धार्मिक विधी हे करून पुण्यप्राप्ती होते, असे सांगितले जात आहे व तत्प्रीत्यर्थ मनुष्य शेकडो रुपये खर्च करून पुण्यप्राप्तीची अपेक्षा करीत आहे. परंतु खरा पुण्यप्राप्तीचा मार्ग म्हणजे दुसऱ्याला समाधान देऊन त्याच्या जन्मऋणानुबंधनाने तो जी दु:खे भोगित आहे, त्यात त्याला सुखसमाधान लाभण्यासाठी काही तरी मदत करणे हा होय. हे करीत असतां आपणसुध्दा आपल्या जन्मऋणानुबंधनातून मुक्त होत असतो. असे ऋणानुबंधनाचे संबंधसुध्दा जीवनात अनेक त-हेची दु:खे निर्माण करण्यास कारण झालेले असतात. यापैकी काही महत्वाच्या दोषांचा अभ्यास आपण करा. अनेक शास्त्राधाराप्रमाणे ‘परान्न घेऊ नये’ असे सांगितले आहे. परंतु आजच्या परिस्थितीत ते कोणासही शक्य नाही. त्याशिवाय परान्न घेण्याने जास्तीत जास्तपणे मन, बुध्दि,आणि विचार याचे कार्य अशुध्द स्वरुपाचे होते, यावर आजची नवमतवादी पिढी विश्वास ठेवणार नाही. परंतु शरीरातील अन्नमय कोश याच्या ठिकाणी निर्माण झालेले दोष शेकडो जन्मपर्यंत मनुष्याच्या शरीरात कायम राहतात. व अशामुळे आचार-विचारांची सात्विकता निर्माण होत नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की, आचार-विचारांच्या सात्विकतेची आवश्यकता काय ? तर तुम्हाला सद्गुरूकृपेने प्राप्त झालेले सुखसमाधान भोगण्याचे साधन हे आचार-विचार आहेत.

अशा परान्नाचे दोष ईश्वरी उपासकास जास्त जाणवतात असे नव्हे, तर प्रापंचिक माणसाससुध्दा त्यापासून त्रास होतो. शिवाय मुलाबाळांच्या बुध्दिवर त्याचा परिणाम होत असतो. आजच्या परिस्थितीत तुम्हाला आपले आचार-विचार परान्न न घेण्याचे जर निश्चित करावयाचे झाले, तर ते शक्य नाही. शिवाय तुमच्या सभोवार असलेले तुमचे इष्टमित्र, आप्त, स्वकीय यांच्या निंदा नालस्तीस कारण व्हावे लागेल व तेही काही कारण नसताना ! कारण आजच्या जगात धर्माचरण करणे हा मोठा गुन्हा आहे. अशा वेळी कोणाच्याही भावना न दुखावता धर्माचरण करण्यास शिकले पाहिजे. व ती शिकवण म्हणजेसमितीची ‘अल्पबचत’ ! वेळप्रसंगी ज्या कारणामुळे तुम्हाला परान्न घ्यावे लागेल, ते नि:संकोचपणे ग्रहण करा व तत्प्रीत्यर्थ अंशतः काही पैसे प. पू. बाबांचे चरणी ठेवून त्याची नोंद समितीच्या ‘अल्पबचत’ वहीत करा. म्हणजे अशा परान्नापासून, उपकारापासून ऋणमुक्त व्हाल.

याशिवाय या सिध्द पध्दतीतून दुसरा अभ्यास असा करावयाचा आहे की, ‘स्वतःप्रीत्यर्थ नित्य जीवनात होणाऱ्या फाजील खर्चातून (व्यसनापायी) मला काही सुखसमाधान, निरंतर स्वरुपाचे मिळू शकते काय ? आज परमेश्वरी कृपेने मी हे ऐहिक जीवन उपभोगीत आहे, असे जीवन या क्षणी किती लोकांना लाभत असेल ?’ असा प्रश्न जर प्रामाणिकपणे रोज मनाला विचारून बाह्य जगतातील परिस्थिती अवलोकन केलीत तर तुमच्या इतका कोणी सुखी नाही, असे वाटेल. या नित्य अभ्यासाच्या सवयीने जी निरासक्ती निर्माण होईल, तीसच उन्नती म्हणता येईल. या जीवनात तुम्हाला बराचसा खर्च हा ‘जग काय म्हणेल ‘ या विचाराने करावा लागतो. त्या वेळी आपण जो खर्च करीत असाल, त्यातून परोपकारार्थ काही अंश बाजूला ठेवणे आवश्यक आहे. अशाने तुम्हाला जे समाधान लाभेल, ते अन्य कोणत्याही मार्गांनी लाभणे शक्य नाही.

देवधर्माच्या बाबतीतसुध्दा आजच्या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. समाजाची विचारसरणी दिवसेंदविस बदलत चालली आहे. त्याप्रमाणेही आपल्या निश्चित आचार-विचारानी त्यातून चांगले काहीतरी निर्माण करण्यानेच सर्वांचे हित होणार आहे. जी मंडळी कुलाचार, कुलधर्म करतात, त्यांना यथायोग्य वेळी ब्राम्हण, सुवासिनी बोलवणे शक्य नसते. अशा वेळीसुध्दा तत्प्रीत्यर्थ काही भाग काढून देवाची प्रार्थना केली की, ‘तुझ्या या कुलधर्म, कुलाचाराप्रीत्यर्थ अमुक एक रक्कम काढली आहे व तिचा विनियोग गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी करणार आहे‘. तर हे करण्यासाठी देवाची आडकाठी असेल,असे वाटत नाही. पण वर्षानुवर्षाचा आमच्यावर बसलेला पगडा आम्हाला अशा पध्दतीने देवधर्म करून लोककल्याणार्थ काही हित साधावे, हे करू देत नाही. कित्येक घरी कुलदेवतांच्या नावे भरल्या जाणाऱ्या ओट्या त्यांच्याचसमोर पुन्हा देवळाबाहेर विक्रीला येतात. हे सत्य दिसत असतां तेच पैसे जर परोपकारार्थ, म्हणजे एखाद्याच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय साहाय्यासाठी किंवा अन्य अत्यावश्यक गोष्टीसाठी खर्च केलेत, तर कुलाचार किंवा कुलधर्म झाला नाही असे नाही. परंतु आजपर्यंत समाजाबद्दल चांगला विचार करण्याची सवय न लागल्याने वैयक्तिक उपासना म्हणजेच आपल्या आचार-विचारांची उन्नती, असा भास निर्माण झालेला आहे. परंतु सामाजिक उपासनेत ईश्वरी अंश आहे, ही भावना निर्माण होण्यानेच चांगले आचार-विचार निर्माण होणार आहेत. यापुढील काळात प्रत्येक व्यक्तिने आपल्या जीवनाची पारमार्थिक उन्नती अशाच प्रकारे करावयास पाहिजे की, देव न शोधता जो दु:खी आहे, त्याचा शोध करून त्याचे जीवन कोणत्या प्रकारे सुखी करता येईल ? तो प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यानेच वैयक्तिक उन्नती होऊन समाजापुढील अनेक समस्या एकमेकांच्या सहकार्याने सुटणार आहेत. यासाठी तुम्हाला देवधर्माप्रीत्यर्थ जो काही खर्च करावयाचा असेल, तो आपण समितीच्या अल्पबचतमध्ये द्या. किंवा बाहेर अन्यत्र ज्या ठिकाणी तुमची श्रध्दा असेल, त्या ठिकाणी द्या.

या व्यतिरिक्त दु:खमीमांसेत सांगितलेले पितऋणविमोचन व वैयक्तिक कर्मविपाक यातील दोष परिमार्जनार्थ ही साधना आवश्यक आहे. कारण पितृविमोचनात जे वाडवडिलांच्या हातून इच्छा, वासनेने झालेले दोष सांगितले आहेत, त्यांच्या त्या दोषांच्या ऋणानुबंधनांच्या संबंधित असणारा पै-पैसा, त्यावर आज तुम्ही वडिलोपार्जीत इस्टेट म्हणून उपभोगीत आहात, याशिवाय आज इच्छा, वासनेने आर्थिक प्राप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहात. त्यामागील तुमची भूमिका कशा स्वरूपाची आहे, हे सांगणे कठीण आहे. तरीपण अनुभवाने मनुष्यास तर्कशास्त्रापेक्षा जास्त ज्ञान मिळते. वडिलोपार्जित संचित केलेला पै-पैसा आज कोणत्या ना कोणत्या प्रकारे दु:ख देण्यास कारण झाला आहे, हे अनुभवाला येत असूनसुध्दा तुम्ही जर पुन्हा तेच करणार असाल, तर भावी पिढीसाठी तुम्ही संचित केलेला पै-पैसा हा त्यांच्या जीवनात ठेव म्हणन न राहता, तुमच्या पै-पैशांमुळे दु:ख व त्याने मिळविलेल्या पैशांवर तुमच्या ऋणानुबंधनाचे दोष, यामुळे त्याला तुमच्या पै-पैशांतून व स्वकष्टार्जित पै-पैशांपासून सुख लाभणार नाही. यासाठी सारासार सद्विवेक करून जी खऱ्या मार्गाने होणारी पै-पैशांची प्राप्ती आहे, त्यातच तुमच्या पिढ्यान् पिढ्यांचे सुख सामावलेले आहे. ते निरंतर स्वरूपात टिकविणे यासच, ‘सद्गुरुकृपा’ असे म्हणतात.

आजपर्यंत जगतात कोणालाही निरंतर जीवनाच्या ऐश्वर्याचा ठेवा लाभलेला नाही. देहधर्माला, निसर्गधर्माला श्रीमंत आणि गरीब हा भेदच जाणवत नाही. जीवनाच्या व्यावहारिक बाजूतून हा भेद मनुष्य एकमेकाला दाखविण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याच्या दु:ख परंपरा वाढत जाऊन सर्वस्वाचा नाश होण्यास तोच कारण होतो. तुमच्या जीवनातील दु:खपरंपरा ही तुमच्या वासनांना कशी वाढत जाते, हे न अभ्यासण्याने देवादिकांचे आशिर्वादसुध्दा अशांचा उध्दार करण्यास निर्बल ठरतात. तुम्ही आपल्या जीवनाची विचारसरणी ही तुमच्या आर्थिक प्राप्तीप्रमाणे निश्चित केलेली नसल्याने ज्याप्रमाणे आर्थिक लाभ वाढत जातो, त्याप्राणे तुम्ही गरजा वाढवित जाता. पण जीवनात आर्थिक प्राप्तीची वाढ ही वैयक्तिक स्वार्थी हेतूने, ‘ माझ्याच सुखासमाधानासाठी आहे’ या विचाराने जीवन जास्तीत जास्त परावलंबी व वासनारुप बनविण्याचा प्रयत्न करता. परंतु ही आर्थिक प्राप्तीची वाढ काहीतरी अन्य कर्तव्य कारणाने होत आहे हे समजून त्याकडे आपण दुर्लक्ष करता. कदाचित तुमच्यापैकी एखाद्याच्या जीवनात असा प्रसंग आला असेल, की तुमच्या शिक्षणाच्यावेळी तुम्हाला आर्थिक अडचण निर्माण झाली असेल व ती जाणून एखाद्याने तुमचे जीवन व्यर्थ जाऊ नये म्हणून त्या वेळी पाच रुपयासाठी अडलेली शिक्षणाची बाजू जर मोकळी केली असेल व त्या शिक्षणामुळे आज तुम्ही डॉक्टर, इंजिनीयर किंवा अन्य पदवीधर होऊन शेकडो रुपये कमवित असाल, तर त्याला कारण त्या वेळी पाच रूपयासाठी निर्माण झालेली अडचण किंवा आपत्ती ज्या हितचिंतकाच्या सद्भावनेने दूर झाली, ती त्याची भावना ! असा प्रसंग आज तुमच्या जीवनात आला व जर एखाद्याला मदत करण्याची वेळ आली, तर तुमच्या बाबतीत ज्यानी कर्तव्याची जबाबदारी पार पाडली, त्याची आठवण तुम्हाला येईल का ? अशाच अनेक प्रकारची कर्तव्ये या आर्थिक प्राप्तीत सामावलेली असतात. परंतु ती आज कोणीही विचारात घेण्यास तयार नाही. यामुळे हजारो रूपये मिळवून त्याचे समाधान तुमच्यामध्ये दिसू शकत नाही. दैवप्रारब्धाने जर परिस्थितीत काही उलाढाल झाली, तर तुम्ही वासनेने सुसज्ज केलेले जीवन टिकविणे परिस्थितीच्या अभावी कठीण होते. कारण ज्याप्रमाणे आर्थिक वाढ होत गेली, त्याप्रमाणे वाढत गेल्या व आर्थिक वाढ कमी झाली. तेव्हा वासना कमी न होता त्या आहेत तेथेच राहिल्या आणि अशा परिस्थितीस तोंड देण्यासाठी आज समाजातील बराचसा सूज्ञ वर्ग ईश्वरी मार्गाचा अवलंब करीत असतो. त्यावेळी ईश्वरी कृपेने त्या पूर्वीच्या वासनांतून कोणत्याप्रकारे निरासक्त झाले, हे न अनुभवता, त्या वासना पुऱ्या होण्यासाठी पैसा मिळाला म्हणून ‘मार्ग खोटा आहे‘ असे म्हणत असतो. तरी अशा वासनांची पूर्तता होण्यासाठी ईश्वरी कृपेचा मार्ग नाही. तुम्हाला जे काही मिळत आहे त्यात सुख, समाधान मानून तुमच्या जीवनाचे उतराई होण्यासाठी ज्यांनी ज्या प्रकारचे सहाय्य किंवा कष्ट केले असतील, त्या स्मरून तुम्ही पै-पैशाने आजच्या प्राप्त झालेल्या जीवनातून परोपकार केला पाहिजे.

या परोपकाराची दिशा तुमच्या विचारांनी तुम्ही ठरवा. परंतु मासिक प्राप्तीतून काही ना काही अंश हा दुसऱ्याचे जीवन निर्माण करण्यास गेलाच पाहिजे. कारण आजचे तुमचे जीवन निर्माण होण्यासही अशाच एखाद्याची भावना खर्ची पडलेली असते. याचा विचार जर केला नाहीत, तर प्रतिक्रिया तुमच्या मुलाबाळात दिसून येते. ती अशी की, आर्थिक दृष्ट्या तुमची बाजू खुप बळकट असूनसुध्दा विद्या-विद्यार्जनाच्या बाबतीत तुमची मुले तुमच्या त्यांच्या बद्दलच्या महत्वांकाक्षा मातीमोल करीत असतात किंवा कर्तीसवरती होऊन तुमचे व त्यांचे एक क्षण पटत नाही, असे विधान करून आशिर्वाद मागता. तो आशिर्वाद मिळाला तरी तो टिकण्यासाठी व त्यातून कुटुंबाचा उध्दार होण्यासाठी आपल्या प्राप्तीतून परोपकारार्थ काहीतरी खर्च केलाच पाहिजे. या शुध्द सात्विक हेतूने भक्तभाविकांच्या सुखासमाधानासाठी ही ‘अल्प बचत योजना ‘ सुरु केली आहे.

या योजनेत अत्यंत महत्वाच्या बाजू ज्या, लक्षात घेतल्या आहेत, त्यांचा विचार प्रत्येक भक्तभाविकाने करावा. या योजनेत जी रक्कम जमा होते, त्यासाठी कोणी खजिनदार किंवा वर्षानुवर्षे ती ठेव म्हणून ठेवायची नाही. ज्या वर्षी जी रक्कम जमा होईल ती पुढच्या वर्षी खर्ची टाकावयाची. कारण या कार्याच्या मुळाशी काही पै-पैशाचे साधन आहे असे निश्चित झाले की, उपासना मार्ग हा एकमेकांचे हेवेदावे शोधण्याचे साधन बनते व कालांतराने सबंध कार्यपध्दतीचा उद्देश हा वैरभाव करण्यास कारण होतो. आजपर्यंत जगात असे अनुभव पुष्कळांना पुष्कळ प्रकारांनी आलेले असतील त्यांची पुनरावृत्ती या कार्यामध्ये होऊ नये ही गुरुआज्ञेची जबाबदारी लक्षात घेऊन वरील योजना निश्चित केलेली आहे. कदाचित त्या वर्षी जर काही पै-पैसे शिल्लक राहिले तर त्याचाही विनियोग कोणत्या प्रकारानी करावा, हेही ठरविले आहे. अशी राहिलेली शिल्लक अन्यत्र अस्तित्वात असणाऱ्या संस्थेस शिक्षणार्थ किंवा वैद्यकीय साहाय्यासाठी दिली जाईल. ती देत असताना ज्या कारणपरत्वे ती रक्कम जमा झाली आहे तिची कारणमीमांसा संस्थेच्या चालकांना सांगून त्यापासून त्यांनाही काही बोध घ्यावा असे वाटले, तर ते समजणे आवश्यक आहे.

वरील तात्विकमीमांसा या आपल्या अभ्यासासाठी आपल्यापुढे मांडणे समितीचे कर्तव्य आहे. त्यात कोणावरही सक्ती नाही. ही भूमिका म्हणजे आपले दैनंदिन जीवन होय. ती पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक भक्तभाविकाची आहे. या सिध्दांतपध्दतीच्या अभ्यासाने आपण खर्च केलेला पै-पैसा हा कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. तुमचे व तुमच्या भावी पिढीचे हित कोणत्या मार्गाने होईल, हे सांगणे हा समितीचा हेतू आहे. तो हेतू म्हणजे तुमचे सुख-समाधान तुम्हाला मिळणे, तुमच्या आहार-विचारांच्या निश्चिततेवर अवलंबून आहे.

पूर्वी बऱ्याच भक्त-भाविकांना पितृविमोचन करून श्राध्द पक्ष विधीतून मुक्त केले आहे. याचा अर्थ आजपावेतो कोणाही भक्त-भाविकाला पूर्णपणे पटलेला नाही. कारण या विधीने तुम्हाला तुमच्या वाड-वडलांच्या इच्छावासनांपासून मुक्त केले असून त्यांच्या सद्गतीप्रीत्यर्थ वर्षाकाठी श्राध्दपक्ष न करता काहीतरी धर्म करावयास पाहिजे, या सद्हेतूकडे दुर्लक्ष करून काटकसरीचे धोरण स्वीकारले आहे. परंतु ‘पितृविमोचन’ याचा अर्थ ‘काटकसर’ असा नसून त्या मृतात्म्यांच्या वासनापूर्ततेसाठी श्राध्दपक्षाच्या निमित्ताने न बोलावता, त्यांना समाधान देणे असा आहे. ज्या लोकांचे पितृविमोचन गुरु आज्ञेने केले गेले आहे, त्यांनी वर्षाकाठी काही तरी रक्कम आपल्या स्वकष्टार्जीत पैशातून परोपकारार्थ खर्च केल्यानेच खरे पितृविमोचन होणार आहे. तेव्हा आजपर्यंत ज्या भक्तभाविकांनी या पितृविमोचनाच्या साध्य हेतूकडे दुर्लक्ष केले असेल, त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे वाड-वडिलांप्रीत्यर्थ काहीतरी सहाय्य अल्पबचतीतून करावे.

त्याचप्रमाणे ज्या भक्तभाविकांना त्यांच्या कुलधर्म, कुलाचार परंपरेतून शुद्ध सात्विक मार्गाकडे नेले आहे, त्यांनी याचा विचार करावा. जेव्हा परंपरेतून तुम्ही आपल्या घराण्यातील ओबडधोबड कुलधर्म कुलाचार करीत होता त्यात तुम्ही अनेक व्रते-वैकल्ये, उपवास वगैरे प्रकार करुन सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ऋणानुबंधनाचा भाग हा कर्तव्याने देण्यास तयार नव्हता. म्हणून हे सर्व प्रकार करुनसुध्दा दु:खे कमी होऊ शकली नाहीत, कारण या प्रकारातील तुमची भूमिका ही इतक्या संकुचित प्रकारची होती की ती मनुष्याच्या विचाराला सुध्दा पटत नव्हती, ती ईश्वराला कशी पटावी. उदा. ज्या भक्त-भाविकांच्या घरी नवरात्रात साडी, चोळीचे वाण देण्याची परंपरा होती, त्यांनी स्वतः देवीची ओटी भरत असताना घसघशीत पैसा खर्च करुन आणलेले पातळ, चोळी परिधान केलेली असेल. पण देवीसमोर ठेवलेले पातळ व खण “पाण्याची वाट पाहात आहे”, हे कदापिही विचारात घेतले जात नाही. कारण देवाच्या बाबतीत मनाची भावना सात्विक व हळूवारपणाची निर्माण होण्याचे कारण कधीच पूर्व जीवनात संस्काराने घडले नाही. तेव्हा देवधर्म हा जास्तीत जास्त स्वस्त करुन मोठ्या पुण्य प्राप्तीचा वाटा निर्माण करण्याचा प्रयत्न अशी भक्त-भाविक मंडळी करीत असतात. जोपर्यंत आपले विचार, आपण आणि ईश्वर, ईश्वर आणि इतरेजन हे वेगळे नाहीत याची प्रचीति निर्माण करु शकत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे कुलधर्म, कुलाचार, कुलपरंपरा हे घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे आहेत. आजच्या जगाच्या बदलत्या परिस्थितीत मनुष्याला आर्थिक दृष्ट्या बऱ्याचशा गोष्टी करण्याची इच्छा असूनही त्या करता येत नाहीत. म्हणून अजिबातच करु नयेत किंवा कर्ज काढून कराव्या व पुण्याचा लाभ होइल म्हणून वाट पहात रहावे हे योग्य नाही. यासाठी बऱ्याच वेळा मुलाखतीच्या द्वारे भक्त-भाविकांना असे मार्गदर्शन करण्यात आले की, जे फूल तुम्हाला देवाला वाहावयाचे आहे तेथपासून ते यज्ञ करण्यापर्यंत जे कर्म तुम्ही करणार असाल, ते आचार विचारांनी निश्चित करुन ज्याला ते अर्पण करावयाचे त्याच्या बद्दलची भावना प्रथमतः निर्माण करा तरच खरी उपासना होईल. यासाठी बऱ्याच भक्त-भाविकांची कुलधर्म, कुलाचार, व्रतवैकल्ये, उपवास यापासून सोडवणूक केली गेली की, त्यांनी खऱ्या अर्थाचा देवधर्म करण्यास शिकावे. त्याचाही अर्थ सूज्ञ भक्त-भाविकांनी “काटकसर योजना” असा केला तरी त्याचा अर्थ काटकसर करायची नसून आपल्या घराण्यातील कुलधर्म, कुलाचार, व्रतवैकल्ये, उपवास यापासून काहीतरी उपासना करावी असा होता. ती उपासना देवधर्माच्या नावे करुन त्याचा फायदा आपल्या बंधू-बांधवांना मिळावा, म्हणजेच तुम्ही खरा कुलधर्म, खरा कुलाचार, खरे व्रत, करण्याची सत्प्रवृत्ती निर्माण केलीत. पण या मार्गदर्शनाच्या कुलधर्म, कुलाचार, पध्दतीने जो दु:खी आहे तो तुमच्या सहाय्यतेला ईश्वरी कृपा समजूनच सुखी होणार आहे. यासाठी अशा कृपेचा लाभ जोडण्याची सवय लागावी म्हणून आजपर्यंत गुरुआज्ञेने तुम्हाला कुलधर्म, कुलाचार, व्रतवैकल्ये, उपवास यापासून सोडवणूक मिळाली असेल तत्प्रीत्यर्थ तुमच्या ऐपती प्रमाणे पै-पैसा तुम्ही तुमच्या आप्त, बंधू-बांधव यांच्या कल्याणासाठी द्यावयास पाहिजे. हे लोककल्याण ईश्वरी उपासनेतून व्हावे त्यात देवादिकांचे ऋण, पितृऋण किंवा गुरुऋण यापासून मुक्तता होत असता कोणताही वावगा खर्च करावा लागू नये म्हणून वरील योजना समितीच्या कार्यपध्दतीमध्ये जोडण्यात आलेली आहे. त्याचा फायदा घेणे हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. !

<< अध्याय  ७ पारमार्थिक उन्नतीसाठी आयुर्वेदाची आवश्यकता

>>  अध्याय  ९ जुन्या भक्तमंडळींचे हितसंबध, आठवण व ओळख