जुन्या भक्तमंडळीचे हितसंबंध, आठवण व ओळख.

या समितीसारख्या लोक-कल्याणार्थ कार्याची जोपासना बाह्य जगातील लोकांपासून करणे हे इतके कठीण आहे की, ते ईश्वरी प्राप्तीच्या मार्गापेक्षाही कठीण आहे. अशा कार्यपध्दतीच्या आश्रयार्थ येणारा मनुष्य स्वःताच्या जीवनातील आचार-विचाराचा, चारित्र्याचा कदापिही विचार करीत नाही. फक्त ‘मी दु:खी आहे व मला सुख प्राप्त व्हावे’ या एका स्वार्थी भूमिकेपलीकडे त्याची ईश्वराला मानण्याची भावना त्याने जोपासली असेल असे वाटत नाही. आजपर्यंत जी भक्त मंडळी म्ह्णून समितीच्या कार्यपध्दतीचा आश्रय घेण्यास आली, त्यांचे देवधर्माबद्दल, वैयक्तिक साधना उपासनेबद्दलचे विचार जर येथे मांडले तर त्यांची अपरोक्ष निंदा केल्यासारखे होईल. म्हणून त्यांच्याबद्दलचे आलेले अनुभव सांगणे योग्य होणार नाही. परंतु गुरुआज्ञेची शिकवण म्हणून काही शब्द येथे लिहिल्यास वावगे होणार नाही. कारण जी अशी मंडळी या ठिकाणी आली त्यांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या लाभलेला गुरुप्रसाद, आरतीच्या वेळी भावनावश होऊन रडणे, समितीच्या कार्याबद्दल ज्योतिष वर्तविणे, यासारखे प्रकार पाहिले. याशिवाय आपापसात येथे आल्यावर झालेल्या स्नेहबंधनातून पै-पैशाची उधार उसनवारी करून ते देण्यास लागू नयेत म्हणून येथून निघून जाणे, या सर्व प्रकारास ईश्वरी उपासक कोणीही म्हणणार नाही. परंतु अशा माणसांचे उपकार समितीवर फार झालेले आहेत. कारण दु:ख कारणमिमांसेचा अभ्यास करण्याची संधी जशी आलेल्या भक्त-भाविकांमुळे मिळते, तशी लुंगेसुंगे ईश्वरी उपासक स्वतःच्या स्वार्थाने ‘देवा, देवा ‘ म्हणून कसे रडतात, बाहेरच्या उधार-उसनवाऱ्या फेडण्याचे सामर्थ्य नसल्यावर आशिर्वादाची याचना करण्यासाठी येऊन कार्यपध्दतीतसुध्दा आपल्या घातक सवयी विसरू शकत नाहीत. पै-पैसा मागण्यासाठी येणाऱ्या माणसासमोर देवाधर्माच्या साक्षात्काराच्या प्रचीति पुढे करून पैसे मागणाऱ्यास निराश करतात, तेही तोंडाने सद्गुरु नामस्मरण करीत ! अशा अनुभवाचा अनुमोल ठेवा अशा स्वधर्म घातकी लोकांकडून समितीला वारंवार मिळाला व मिळत आहे, याबद्दल अशा लोकांचे उपकार समिती विसरू शकत नाही.

अशा भक्त-भाविकांच्या बाबतीत एक दु:ख वाटते ते असे की, मंडळी येथे जेव्हा आली, तेव्हा त्यांनी, ‘प्रत्येक कार्यपध्दतीमध्ये आपण आपले सर्वस्व अर्पण केले आहे’ असे भासविण्याचा प्रयत्न देवाच्या बाबतीत व लोकांच्या बाबतीतही केला. देवाच्या बाबतीत तो केला असेल त्याचे प्रायःश्चित्त त्याचे त्यांना मिळेल. परंतु यांच्या बाबतीत लोकांचा जो विश्वासघात होतो, त्याला जबाबदार कोण ? परंतु मानवी जीवनात ज्ञान-अज्ञानाने घडणाऱ्या प्रत्येक कार्यकारणाला काहीतरी सूत्र हे निश्चित आहे, या सिध्दांताची प्रचीति असे लोक जाण्याने ताबडतोब येते. कारण या कार्यपध्दतीत काही भक्त-भाविकांची येथील उपस्थिती ही खरोखर इतकी दु:सह झालेली असते की, त्यांना ‘तुमच्या आचार-विचारामुळे येथील जुन्या किंवा खऱ्या भक्तभाविकांचे हितसंबंध याना धोका पोहोचत आहे’ हे सांगणे कठीण असते. अशा वेळी समितीला गुरुप्रसादाचा जो ठेवा मिळतो, तो असा की, या लोकांना काहीतरी निमित्ताने येथून जाणे भाग पडते आणि हेच प्रायःश्चित्त देवाधर्माच्या बाबतीतील खोटेपणाबद्दल त्यांना मिळते. कोणीही मनुष्य आपल्या क्षुद्र विचारांनी आपल्या जीवनाचे सर्वस्व नाश करण्यास कारण होऊन दुसऱ्याचेही करण्यात आनंद मानीत असतो. पण अशासाठी या जन्माची प्राप्ती झाली आहे का ? अशासाठी देवाधर्माच्या मार्गाचा अवलंब करीत आहात का ? अशासाठी देवाने तुम्हाला पै-पैसा द्यावा का ? अशासाठी देवाने तुम्हाला पै-पैसा द्यावा का ? हा विचार सूज्ञपणाने करणाऱ्यासच ईश्वर उपासक म्हणता येईल, या विचाराशी तुमचे न पटल्याने तुम्ही शंभर जरी गुरुपीठे बदललीत, तरी भेटणाऱ्या नवीन साधकासमोर आपले नवीन विचार प्रकट कराल. परंतु प्रत्येक ठिकाणी ईश्वर हा पहिलाच राहणार आहे. यापेक्षा जे आपले आचार-विचार,की जे दुसऱ्याचे कल्याण करण्यास असमर्थ आहेत, त्याने ‘ निदान दुसऱ्याचे वाईट होण्यास आपण कारण होऊ नये ‘ एवढी शिकवण प्रामाणिकपणे आत्मसात केली तर अन्य मार्गाने देवाची विटंबना करण्यापेक्षा खूप सार्थक होणार आहे.

जी भक्त मंडळी येथून हळूच जाण्यास कारण झाली, त्यांनी आपले कर्तव्य केले नाही, याबद्दल दु:ख वाटते. कारण जी समितीची भूमिका त्यांना पटली नाही, ती त्यांनी या कार्यातील जबाबदार सेवकासमोर मांडावयास पाहिजे होती. कदाचित जर अशी भूमिका लोककल्याणार्थ घातक असेल तर ती अशा सूचनांद्वारे बदलणे हे कर्तव्य समितीने मानले असते. परंतु तुमची भूमिका समितीच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याची नव्हती. याची प्रचीति म्हणजे तुम्ही या कार्यपध्दतीबद्दल बाहेर केलेला प्रचार ! पण त्याचाही कार्याला चांगलाच उपयोग झाला. कारण वारंवार अशा घडणाऱ्या प्रसंगामुळे समितीच्या कार्यसेवकांना खूप वाईट वाटले. ते अशामुळे की, ईश्वराबद्दलच्या भावनेची पूज्यता ही अमोल स्वरूपाची ठेव आहे. ही अमृतवाणी वारंवार गुरुपदेश म्हणून सांगितली गेली. यासाठी जी भक्तमंडळी निघून गेली, त्यांच्याबद्दल सद्गुरुंना अशी प्रार्थना केली की, ‘या कार्याचे कार्यकारण आपण आहात. आपली आज्ञा मान्य करणे हाच आमच्या नित्य धर्म असता श्रध्देने धर्माचरण व ईश्वरीभक्ती करणारी ही मंडळी यांचा बुध्दिभेद करून सन्मार्गावरील त्यांची निष्ठा कमी होण्यास, किंवा येथून ती जाण्यास आम्ही कारण झालो काय ?’ तर तत्संबंधी जे मार्गदर्शन झाले, ते शब्दांनी लिहिणे कठीण आहे. तरी तो गुरुप्रसादाचा ठेवा असल्याने भावी काळातील येणाऱ्या भक्तभाविकांच्या आचार-विचारावर निश्चित प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तो येथे लिहिणे योग्य होईल.

जो भक्तभाविक येथून गेला, तो खऱ्या अर्थाने गेला नसून, वाईट प्रचार करण्यासाठी तरी त्याला या कार्यपध्दतीची आठवण होतच आहे. म्हणजे या कार्यपध्दतीत जी मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी तत्वपरंपरा सांगितली आहे, तिचे बीज त्यांच्या ठिकाणी सदैव वास करतेच आहे. या तात्विक विचारसरणीस मानण्यासाठी त्याला जी आडकाठी आहे, ती त्याच्या विशुध्द आचारविचारांची व व्यसनी इष्टमित्रांची ! तो जाण्याने काय गेले हे अभ्यासणे सेवकांचे आद्य कर्तव्य आहे व त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी त्याची जाणीवसुध्दा होता कामा नये. प्रथमतः अशा भक्तभाविकांचे जीवनातील सुखासमाधानाबद्दलचे अज्ञान गेले. कारण त्यांनी आपल्या जीवनात परोपकाराची व्याख्या ही ‘भरपूर पैसे देणारी कामधेनू आहे‘ अशी केली होती. त्या व्याख्येप्रमाणे त्याला पैसा मिळण्याचे साधन येथे उपलब्ध करता आले नाही. कारण व्यसनाने, अविचाराने, खोटेपणाने, स्वार्थसाधूपणाने, दुसऱ्याला बुडविण्याच्या हेतूने स्वतः दु:खास कारण झालेल्यास परमेश्वर या विचारास पुनःश्च आशीर्वाद देत नाही व ज्याच्या अंगी हे गुण वर्षानुवर्षे मुरले आहेत, अशाला ते बदलता येत नाहीत. म्हणजे समितीच्या कार्यपध्दतीतून त्याच्या इच्छा, वासना पुऱ्या होत नाहीत. याचा अर्थ असा भक्तभाविक समितीचे कार्य ईश्वरी कृपेने चालले आहे हे मानीत नाही. तर अशी कार्याबद्दलची त्याची स्वार्थी, सुखाबद्दलची कल्पना त्याच्या बरोबर गेली.

‘मी इतरापेक्षा श्रेष्ठ आहे’ असे वाटणारा त्याचा अहंभाव गेला. कारण त्याने स्वतःच्या जीवनाबदल अशी काही स्वप्ने रंगविलेली असतात की, इतरांना तो ‘प्रतिपरमेश्वर आहे’ असे वाटावे. या शास्त्राबद्दलची चार पुस्तके वाटून ध्यान, धारणा, समाधी, नवविधाभक्ती यांची पोपटपंची पुढे करून ‘मला सर्वानी मोठे म्हणावे’ अशी भावना असते. पण अशा पुस्तकी ज्ञानाने बनलेला ईश्वरभक्त किती सहनशील असू शकतो याची परीक्षा होण्यास वेळ लागत नाही. कारण ज्याने खऱ्या ईश्वरभक्तीच्या मार्गाचा अवलंब केला आहे, त्याला मान-अपमान, ज्ञान-अज्ञान हा भेदच जाणवत नाही. तर सेवाधर्म हेच एक कर्तव्य त्याच्या समोर असते. अशी सहनशीलता त्याच्या ठिकाणी नसते. त्याला आपल्या गुरुबंधूच्या धक्क्याने आपली समाधी भंग पावली आहे, याचे सोंग करावेसे वाटते. वास्तविक ज्याची विचाराने आणि भावनेने ईश्वराशी तादाम्यता झाली आहे, त्याला कोणाच्या स्पर्शाचे कोणाला वाकडे का असावे ? तर ही अहंभावाची भूमिका की, ‘मी इतरांपेक्षा जास्त श्रेष्ठ प्रकारचा भक्त, भाविक, उपासक आहे’ हे दाखविण्याचा प्रयत्न असतो ! पण हाही प्रयत्न सफल होत नाही. कारण अशा स्वतःला इतरापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या उपासकाचेच जीवनाबद्दलचे प्रश्न जास्त असतात. म्हणजे येथे येऊन जीवन हे सद्गुरुचरणी अर्पण केले नाही, तर ते अशा प्रकारच्या अहंभावाचा विचार हा लोककल्याणाच्या कार्यास केंव्हाही घातकच असतो. कारण लोककल्याण म्हटले की ‘सर्वांच्या ठिकाणी परमेश्वराला पाहण्यास शिकले पाहिजे’ ही शिकवण समिती देते. तेव्हा असे अहंभावी भक्त गेले हा समितीच्या कार्यास उपकारच आहे.

आता जे गेले, ते त्यांचे आचार विचार गेले, की जे येथील कार्यपध्दतीस केव्हाही पोषक नव्हते. कारण स्वतःच्या आचार-विचाराने इतरांना सुख, समाधान देण्यासाठी काया, वाचा, मनाने प्रयत्न करावा, असे बाळकडू त्याला कोणीही दिले नाही.’ खाना, पीना, मजा करना’ हा अर्थ जीवनात निर्माण केला असल्याने वेळी-अवेळी ऐहिक सुखासाठी आसवलेली त्याची इंद्रिये त्याला कधीही ईश्वरप्राप्तीच्या मार्गात स्वस्थ बसू देणार नाहीत. किंवा त्यासाठी तेही प्रयत्न करणार नाहीत  एका क्षणिक सुखासाठी खोटे बोलल्यानंतर ‘ते मी खरे बोललो’ हे दर्शविण्यासाठी त्याला आयुष्यभर खोटे बोलावे लागते. या त्याच्या मार्गात देव, धर्म, उपासना, नित्य आचार-विचार, यास कोठेही स्थान नसते. व वारंवार अशा संशयाने पछाडलेल्या त्याच्या वृत्तीची भूमिका बाह्य जगतात एखाद्याने आत्मबलिदान केले तरी ते खरे मानण्यास तयार नसते. या समितीच्या कार्यपध्दतीत वैयक्तिक कर्मविपाकाची जी साधना सांगितली आहे, तीत याच आचार-विचारांचा उच्चार करावयाचा आहे. हे करण्यासाठी मनाची तयारी होण्याचे भाग्य ज्यांच्या ठिकाणी नसते व ज्यांना ज्ञान-अज्ञानाने हातून घडलेल्या बऱ्यावाईट कृत्याबद्दल पश्चाताप होत नाही, त्याचे साहाय्य लोककल्याणास ‘साहाय्य’ म्हणून केव्हाही उपयोगी पडत नाही. तेव्हा अशा अर्थाची उपस्थिती करणारे भक्तभाविक यांचा बुध्दिभेद कोणीही केला नाही. कोणीही त्यांना फसविले नाही. कारण येथे येण्यापूर्वी त्यांची श्रध्दा, भक्ति, आत्मविश्वास व इतरेजनाबद्दल प्रेम हे पूर्णत्वाने नव्हते व आजही नाही, ते फसले ते त्यांच्याच भक्तिभावनेने, आचार-विचाराने ! कारण त्यांना आपल्याप्रमाणे अनेक सहाध्यायी निर्माण करणे, या कार्यपध्दतीत कठीण झाले.

समितीच्या कार्याचा हा एक आरसा आहे. प्रथमतः येथे आल्यावर तुम्ही जसे असाल, तसे तुम्हाला दाखविणे, हे समितीचे कर्तव्य आहे. त्या तुमच्या जीवनातील आचार-विचारांच्या बाजू स्वतःच्या जीवनात घातक व दोषास्पद आहेत, हे दाखविणे व त्या बदलण्याची सवय लावून घेणे हा भाग दुसरा ! या सवयीप्रमाणे ‘एकही प्रयत्न प्रामाणिकपणे केलात का ?’ असा प्रश्न विचारला तर सूज्ञ भक्तास त्याचे उत्तर शोधण्यासाठी देवादिकांची किंवा समितीची आवश्यकता नाही. तर असे आचार-विचार न बदलता पुनःश्च अन्य ठिकाणी जाऊन दु:खे दूर होतील का ? तुम्ही स्वतःस जितके फसविण्याचा प्रयत्न कराल, तितकेच दु:खाला कारण व्हाल. तर अशा आचार-विचारांनीयुक्त असलेल्या भक्तभाविकांचा बुध्दिभेद करण्यास कोणीही कारण झाले नाही, असे सांगितले गेले. समितीने लोककल्याणार्थ जी भूमिका केलेली आहे, तीत दहापैकी एकाला पटली नाही, तर त्यासाठी समिती आपले कार्य पटवू इच्छीत नाही. आजपर्यंतची समितीची पध्दत अशा त-हेने अभ्यासली गेली आहे की, एकाच्या सुखासमाधानासाठी विचार न करता ज्याच्यात नऊ लोकांचे हित आहे, तेच कार्य समितीचे आहे व जे कार्य दहापैकी नऊ लोकांना आपल्या जीवनातील ‘अमोल ठेवा’ असे वाटते व ज्यांचे श्रध्दास्थान हे नित्य उपासनेचे गुरुस्थान आहे, ती ही कार्यपध्दत एकट्याला फसवू शकते का ? याचा विचार ज्याचा त्यानेच करावा. हे मुद्दे लिहिण्यामागे कोणाही जून्या भक्तभाविकांची निंदा करण्याचा हेतू नसून ते मनमोकळेपणाने गेले नाहीत म्हणून समितीला आपली व गेलेल्यांची भूमिका तुलनात्मक दृष्टीने मांडणे भाग पडले.

ज्या भक्त-म़ंडळीचा विरोध ज्या ज्या काही कार्यकारणाने झाला तो समितीच्या कार्यपध्दतीच्या दृष्टीने खूपच हितावह झाला. त्यामुळे समितीस लोककल्याणार्थ जी तळमळ आहे व त्यांच्यासाठी ती व्यक्त करावयाची आहे, त्या समाजाचे अध्ययन भरपूर प्रमाणात करण्यास मिळाले. म्हणून या विरोधास समितीने ‘गुरुकृपा’ म्हणून मान्य केले आहे. आज आपण समितीकडून कितीही दूर असला, तरी समितीच्या या कार्यपध्दतीत वर्षातून ज्या ज्या वेळी गुरुपीठाचे उत्सव म्हणून साजरे होतात, त्या वेळी सामुदायिकपणे सर्व जुन्या भक्तभाविकांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान लाभावे अशी प्रार्थना केली जाते. समिती ही मातृप्रेमी आहे. मुलगा लहानाचा मोठा झाला, ज्ञानी झाला, कर्तासवरता झाला की, त्याला बाह्य जगताचे आकर्षण हे केव्हाही आईच्या प्रेमापेक्षा जास्त वाटू लागते. म्हणून तो विचाराने ‘आई’ म्हणून म्हणतो. पण जिने जन्मजन्माच्या ऋणानुबंधाचे ओझे आपल्या उदरी सांभाळले आहे, ती आई त्या मुलाच्या वार्धक्यातही ‘आई’ या भावनेनेच पहात असते. बाह्य जगतात तुमच्यासारख्या भक्त-भाविकांनी कार्याबद्दल काहीही उद्गार काढले तरी समिती आपलेपणा कदापिही विसरणार नाही. ज्या क्षणी आपल्याला या कार्यपध्दतीची ओळख होईल, त्या क्षणी त्या पूर्वीच्याच उत्साहाने आपण आपले सहकार्य इतर बंधुबांधवांच्या कल्याणार्थ देण्यासाठी समितीकडे यावे.

वरील प्रकारच्या जुन्या भक्त-भाविक मंडळींशिवाय आणखी काही भक्त-भाविकांचे हितसंबध या कार्याशी आले, आज जरी ती मंडळी कोणत्या ना कोणत्या गैरसमजामुळे दूर गेली असली, तरी त्यांचे हितसंबध या कार्याच्या प्रारंभी आलेले आहेत, ते समिती कदापिही विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे आजही ती भक्तमंडळी कोणताही अहंभाव लक्षांत न घेता ती सेवा ‘कर्तव्य’ स्वरुपात देत आहेत, ही त्यांची नि:स्वार्थ बुध्दि, प्रेम म्हणजेच ‘समितीच्या प्रगतीचे पाऊल’ असे म्हणावे लागेल. प्रत्यक्ष कोणतेही कार्य नावास्वरूपास आल्यावर त्यामध्ये स्वतःचे जीवन व्यतीत करणारे पुष्कळ निघतात. परंतु काही जुन्या भक्त-भाविकांनी प्रथमतः या कार्याचा पाया जगाच्या निंदा, अपवादाला न जुमानता तयार केला. ही त्यांची कर्तव्याची जबाबदारी म्हणजे आज नव्याने येणाऱ्या भक्तमंडळींस जी कार्याची कार्यक्षमता दिसते ती होय. अशा भक्तभाविकांचा नवीन येणाऱ्या भक्तमंडळीना परिचय करून दिल्याशिवाय कार्य पुढे चालविणे हे ध्येय समितीचे नसल्याने त्यांची ओळख, त्यांची तशी इच्छा नसली तरी, करून देणे आवश्यक आहे. कारण त्यांनी आपल्या कर्तव्याचा अमोल ठेवा ठेवलेला आहे.

प्रथमतः या कार्याची जबाबदारी श्री वैद्य कुटुंब (४८६ रविवार पेठ, पुणे २) यांनी घेतली. दोन ते अडीच वर्षाच्या काळात त्यांनी आपल्या घरी हे कार्य चालवून आल्या-गेलेल्यास भरपूर सहकार्य दिले. त्याचप्रमाणे श्री.गुणे बंधू व कुटुंबीय (गिरणी बंगला, भिलवडी) यांनीही सहकार्याने या कार्याची जोपासना करण्यास वाव दिला. त्यानंतर या कार्याची ओळख मुंबईसारख्या शहरी होण्यास श्री रामभाऊ, श्री मुकुंदराव देसाई व भगिनी ही मंडळी कारण झाली. पुढील सर्व कार्यपध्दतीची निश्चितता श्री तांबे व श्री सरोजिनी तांबे या मंडळींनी स्वकष्टाने केली. त्याचप्रमाणे पुण्याच्या कार्यकेंद्राची निश्चितता करण्याचे कार्य श्री सीताबाई नाईक या कुटुंबीय मंडळींनी केले. आणखी नव्याने ज्या कार्यकेंद्राच्या स्थापना झाल्या आहेत, त्यात डॉ. नेरूरकर व श्री कोठारे बंधू यांचाही वाटा फार मोठा आहे. आज प्रत्यक्ष कार्यात ‘सेवक’ म्हणून जी भक्त मंडळी भाग घेत आहेत त्या मंडळींचाही भाग अमोल स्वरूपाचा आहे. सद्गुरुकृपेची आज्ञा हा या कार्याचा नंदादीप तुम्हा सर्वांच्या सुख, शांती, समाधानासाठी आहे. तो टिकविणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. सद्गुरुकृपेने तो अखंड तेवत राहून दशदिशांत मानवधर्माचा प्रकाश पडावा, या सद्हेतूने तुम्ही आपले सहकार्य, प्रेम, कर्तव्य यांची जबाबदारी पार पाडण्यानेच एकमेकांच्या जीवनातून सुख, शांती, समाधानाचे सूर बाहेर पडतील. यापुढे जे जे काही कार्यकारण जगताच्या हितासाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी करावे लागेल, त्यात आपापसातील मतभेद विसरून ते गुरूआज्ञेने आपण बंधुभावनेने, सहकार्याने व प्रेमाने करू या, अशी श्रीसद्गुरुचरणी प्रार्थना !

गेल्या काही वर्षात या समितीच्या कार्याशी ज्यांचे अगदी निकटचे हितसंबंध आले, व ज्यांना या कार्याबद्दल अहोरात्र तळमळ होती, ते ईश्वरी इच्छेने आपल्या सर्वांना सोडून श्री सद्गुरुचरणी विलीन झाले आहेत. त्यांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे.

कै. भास्कर नारायण भागवत, रामचंद्र गोपाळ नाईक, शंकरराव नाईक, डी. के .शहाडे, श्रीमती लाटकर, कीर्तने (पिता-पुत्र) वा. सी. मंत्री, बेटरवेट, शरद दुर्वे, वर्टी, हाटे, रा.अमृते, देऊसकर, ओगले, कोतवाल, पंडित (किर्लोस्कर ) या कुटुंबियांच्या दु:खात समिती सहभागी आहे.

<< अध्याय  ८ मासिक वर्गणी व अल्पबचत

>> अध्याय १० कार्यपध्दतीची ओळख