आत्मनिवेदन ग्रंथ भाग ४
“ॐ साधन सिध्दता यामध्ये ज्या पुण्य विभूतींचा आशीर्वाद आहे त्यांचा समावेश ह्या कार्यात आहे. तेव्हा त्यांची आज्ञा महत्त्वाची आहे”, असे प. पू. बाबांनी सांगितले. त्या दिवसाची व वेळेची मी वाट पाहात होतो तो सुदिन आला. त्या वर्षीची गुरुपौर्णिमा मुंबईस झाली. असंख्य लोक जमा झाले होते व मी आरती म्हणत होतो. ह्य़ापूर्वी मी आरत्या म्हटल्या असतील, त्या आरतीमध्ये देव होता पण देवत्त्व म्हणजे काय हे त्या दिवशी आरती म्हणत असताना समजले. आपण ह्या जगात आहोत का वेगळ्या जगात आहोत हे समजेना. आजूबाजूला भक्त होते व आरतीही म्हणत होते. पण त्या दिवशी आरतीमधील ‘आर्तता’ म्हणजे काय हे समजले.
आरती संपल्यावर तीर्थप्रसाद घेऊन लोक घरी गेले पण माझी स्थिती वेगळी झाली. कारण प. पू. बाबांची आज्ञा अशी झाली की “आज दिवसापर्यंत हे जग आपले नाही. नव्याने जगाची निर्मिती करावयाची आहे, त्यासाठी उद्यापासून सर्व केंद्रांवरील कामकाज तू बंद करावयाचे आहे व नवीन जगाला तू आरंभ कर. नवीन जग सोपे नाही हे मागाहून समजेल”.
तो दिवस गुरुपूजनाचा ता. ३० जून १९७७ हा होता. त्या दिवसापासून वेगळे किरण दिसू लागले, म्हणजे आपली दिशा भिन्न आहे हे कळले व आता ऐहिक जगातून पारमार्थिक जगात प्रवेश करावयाचा आहे, हा निश्चय केला.
पुढे पुण्यास आल्यावर नित्य साधना झाल्यावर राहिलेला वेळ खोली बंद करून विचार करू लागलो. पण मनाशी योजना कशी आखावी हे काही गणित निश्चित होईना. शेवटी नवरात्र उजाडले. देव बसविले व सकाळ सायंकाळ पूजा, आरती, साधना करत होतो. पंचमीच्या दिवशी पहाटे श्रीदेवीचे दर्शन झाले. पूर्वी एकदोनदा देवीचे दर्शन अगदी सौम्य व सुंदर असे पाहिले होते. पण त्या दिवशी देवीचे रूप अक्राळ-विक्राळ व रागीट दिसले म्हणजे ती श्री महाकाली असावी असे वाटले. दसऱ्याच्या दिवशी प. पू. बाबांचे मार्गदर्शन असे झाले की, “ती शक्ती आहे. तिची स्थापना तुला पुढे करावयाची आहे. त्या आधी आज जी शक्ती प्रसन्न झाली आहे ती लय आहे. तिला पचव म्हणजे मग मी सांगेन”.
त्याच दिवशी मी आजारी पडलो. अन्न पचेना. उलट्या होऊ लागल्या. शेवटी दवाखान्यात गेलो व आठ दिवसांनी परत आलो. विश्रांती घेऊन दिवाळी झाल्यावर गोव्याला आलो. तेथेही कामकाज बंद केले व ‘नियुक्त सेवकांनी कामकाज करावे’ अशी आज्ञा प. पू. बाबांची आहे, तिचे पालन सर्वांनी करावे असे मी सांगितले. पुढील कार्य जगाच्या हितासाठी मला करावयाचे आहे. तेव्हा मी कामकाज न करता जे कोणी सेवक आहेत ते करतील असे सांगून मी पुण्यास आलो.
जी परिस्थिती मी दसऱ्यापूर्वी अनुभवली होती त्याचे पडसाद उमटू लागले. शेवटी हताश होऊन प. पू. बाबांना विनंती केली की, जे कार्य आपणास करावयाचे आहे ते ह्य़ा जन्मात होईल की नाही ह्याची खात्री मी देऊ शकत नाही. अजून आरंभ झाला नाही तर मी आजारी पडलो व मरतो का जगतो अशी स्थिती माझी झाली. अशी अवस्था कोणाच्याही वाट्याला येऊ नये. झाले कार्य ह्याला मी हात जोडतो. असा विचार करत मी पुण्यास होतो, पण मी जरी गप्प बसलो तरी प. पू. बाबा गप्प बसले नाहीत. अशी आज्ञा झाली की “मी सांगतो आहे त्याचा फक्त विचार करू नकोस. सामर्थ्य मी देणार आहे. आजारी पडलास तरी मरणार नाहीस हे निश्चित आणि जर मरण आले तर कर्माने मरू नकोस. धर्माने मर. ह्यातच जीवनाची सार्थकता आहे. हताश होऊ नकोस. चोरसुध्दा चोरी करते वेळी हातात शस्त्र असल्यावर भीत नाही. मग तू का भितोस ?”
हे ऐकल्यानंतर निर्णय असा घेतला की शेवटपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत प. पू. बाबांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागणे आपले कर्तव्य आहे. ह्या आत्मविश्वासाने आजच्या दिवसापर्यंत मी उभा आहे.
यानंतर प. पू. बाबांचे मार्गदर्शन असे झाले – “यापुढील कार्य हे जगाला तारण्यासाठी असून त्यासाठी तारक मंत्र सिध्द झाला पाहिजे. तुला लहानपणी जो ॐ कार श्रीभैरवनाथांनी शिकविला आहे ही साधना जगाला पेलणारी नाही. कारण यात आचार, विचार व मग उच्चार आहे. आजचे जग स्वार्थासाठी बापालासुध्दा ‘बाप’ म्हणणारे नाही. मग ॐ चे पथ्य ह्या लोकांना कसे सांभाळता येईल ? तू जो ॐ कार शिकला आहेस ते लय तत्त्व आहे, म्हणजे नाद ! . ह्यातून नाद-सूर-स्वर ह्या क्रमाने साधना ही सोपी करणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रथमतः ॐ हा जो नाद आहे तो शब्दरूप व्हावयास पाहिजे. म्हणजे तो सर्वांना म्हणता येईल, यासाठी संक्रांतीपूर्वी तू नरसिंह सरस्वतीला भेटण्यासाठी वाडीला जा. कारण हा ॐ फक्त ह्या स्वामींपाशी आहे. त्याचा जन्म दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने झाला आहे. जन्म झाल्यावर आपली मुले रडतात. पण ह्याचा जन्म रडण्यासाठी नसून जगाला हसविण्यासाठी आहे व तुझ्याही बाबतीत दत्तप्रभूंनी तुझ्या वडिलांना आशीर्वाद दिला. तेव्हा तुझा जन्म झाला. इतकी साम्यता तुझ्या व स्वामींच्या जन्मामध्ये आहे. फक्त काळ वेगळा आहे. तेव्हा हा जो ‘ॐ’ कार त्याच्यापाशी आहे त्याची मागणी तू केलीस तरच प्राप्त होईल. नुसते ॐ असे म्हणून चालणार नाही व दुसऱ्याला प्राप्त होणेही शक्य नाही, यासाठीच तुला कामकाज बंद ठेवावे असे सांगितले. कारण ऐहिक प्राप्ती हे संन्याशाला विष आहे व जो ॐ कार ते जन्मतः घेऊन आले तो त्यांच्यापासून त्यांच्या कृपेशिवाय प्राप्त होणार नाही, यासाठी ऐहिक प्राप्तीचा लोभ ठेवलास तर ॐ काराच्या ऐवजी बोंबाबोंब होईल. हे लक्षात घेऊन वाडीला जा. आम्ही सर्व विभूती त्या दिवसाची वाट पाहू. तथास्तु तथास्तु तथास्तु ! ह्या जन्मात तू चिरंजीव होशील”
त्याप्रमाणे मी वाडीला गेलो. जाताना इच्छा ही होती की काम हे ह्याच वेळी व्हावे. पण ते काम सामान्य नव्हते. वाडीच्या हद्दीत गेल्यावर जी ॐ कार साधना मला स्वामींना मागावयाची होती, ते बाजूला राहून त्यांनीच मला असा प्रश्न केला की, “‘ॐ’ म्हणजे काय ? त्याचे स्वरूप पूर्ण ओळख व मग विचारणा कर. प्रथमतः ॐ म्हणजे काय हा प्रश्न विचारला आहे, त्याचे रूप पाहून घे. नुसता ॐ कार व त्याची साधना, असे म्हणू नकोस. ही वीज आहे. तेव्हा एका क्षणात आहे आणि नाही अशी अवस्था करून घेऊ नकोस. जरी तुझ्या पाठीशी विभूती आहेत तरी हा निसर्ग आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय पुढील पाऊल टाकू नकोस. तत्पूर्वी लोकांना काय सांगावयाचे हे ठरव. मात्र ‘पूर्णविराम’ होईतोपर्यंत मौन धरले पाहिजे. जगाच्या कल्याणासाठी ह्याची आवश्यकता आहेच पण तो प्राप्त करण्याचे गणित मी सांगेन. त्याप्रमाणे एक वर्षभर दर पौर्णिमेला इकडे ये. इथे उपस्थित झाल्यावर निसर्गाला जो सांभाळतो तो रूद्र याची प्रतिष्ठा करून त्याचा उच्चार होमहवनयुक्त विधीने केला पाहिजे. त्यासाठी एक वर्षभर जे ब्राह्मण लागतील ते नुसते वैदिक असून चालणार नाहीत तर ते याज्ञिक असावयास पाहिजेत. त्याप्रमाणे प्रथमतः तयारी कर, कारण ज्या ब्राह्मणांचा ह्या साधनेत समावेश होईल, त्यांनी ह्या कालावधीत फक्त घरचे देव यांची पूजा अर्चा करावयाची असून इतर कोणतेही विधी करावयाचे नाहीत. याचे कारण वाडीत जे ब्राह्मण आहेत त्यांचा पेशा भिक्षुकीचा आहे. त्यांना वर्षभर भिक्षुकी बंद ठेवावी लागेल. त्यांचा वर्षभरचा जो खर्च लागेल तो तू कर. ह्याप्रमाणे सर्वांना विचारणा कर. म्हणजे मग मी शुभदिवस तुला सांगेन. त्या दिवशी प्रथमतः तू व तुझे शिष्य ह्यांना कायिक व वाचिक प्रायश्चित्त घेणे भाग आहे”.
वरीलप्रमाणे सर्व पूर्वतयारी झाल्यावर प. पू. स्वामींनी आज्ञा दिली. त्याप्रमाणे साधनेचा आरंभ २२ डिसेंबर १९७७ रोजी झाला. त्यावेळी हवनास आवाहन ज्या देवदेवतांना केले होते त्या येणेप्रमाणे –
ग्रह-मंडळ, श्रीपंचमुखी-हनुमान, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती, श्रीमहाकाली, श्रीवास्तुदेवता, श्रीनवनाथ, आदी विभूती, ब्रह्मा, विष्णू, महेश व पंचतत्त्वात्मक देवता यांचा समावेश व मुख्य श्रीरूद्र, श्रीगणपती, आदी देवतांचे पूजन, अर्चन व शेवटी हवन व पूर्णाहुती. अशाप्रकारे, प्रत्येक वेळेला हवन ह्या विधीप्रमाणे होत होते व त्यानंतर अन्नदान द्रव्यदान हे् विधी होत होते.
याप्रमाणे पहिले हवन झाल्यावर पुढील योजनेचा नकाशा प. पू. स्वामींनी दाखविला व आज्ञा अशी केली की “हा नकाशा प. पू. बाबा व विभूतींना दाखव, कारण ह्या नकाशामध्ये तीन लोक आहेत. तेव्हा हे काम एकट्याचे नाही. आपण पूजनासाठी आवाहन करतो ते देवदेवतांना असते व सुपारी हे त्या देवदेवतांचे प्रतीक समजून सर्व विधी होत असतो. अशा विधींची सिध्दता शास्त्र, मंत्र व तंत्र यांनी युक्त असेल तर सिध्दता होत असते. तेव्हा जो नकाशा दिला आहे, त्याप्रमाणे पुढील पौर्णिमेपासून कार्याला सुरुवात कर. प्रथमतः ॐ कार साधना तू मागितलीस त्यावेळी मी ‘नाही’ म्हणालो होतो याचे कारण गेल्या ५०० वर्षांत अनेक लोक येऊन गेले. प्रत्येकाचा प्रश्न स्वतःचे कसे होईल ! परंतु परमार्थ जोडण्यासाठी ऐहिक सोडावे लागते हे कोणालाही माहित नाही. ऐहिक म्हणजे केवळ पै-पैसा नव्हे तर साधकाने आपले नाव निशाणी विसरावी लागते म्हणून मी ‘नाही’ म्हणालो होतो. पण तू जे काही मागितलेस ते स्वतःसाठी नाही. त्यात सर्व जगताचा उध्दार आहे म्हणून मी तयार झालो. तेव्हा मी जो नकाशा दिला आहे, हा आपण म्हणतो तसा नाही. हा नकाशा सिध्द करीत असताना आपल्या जीवनाची ‘नशा’ उतरली पाहिजे”.
वाडीहून पुण्याला गेल्यावर नंतर दिल्लीला गेलो. ह्या प्रवासात हा विचार करीत होतो की हा नकाशा म्हणजे काय असेल ? जगात पुष्कळ नकाशे पाहिले आहेत पण हा नकाशा काही वेगळा असेल असे अनुमान मी काढले, कारण त्याबाबात कल्पना किंवा तर्क करून उपयोगी नव्हते.
शेवटी हा नकाशा स्वप्नात पाहिला. त्यावेळी आग्रा येथील हॉटेलात होतो. साधारण पहाटेचे ३ वाजले होते. त्यावेळी जगाचे गणित प. पू. सलीम बाबांनी सांगितले. “जग, किती अंशाचे आहे ?’ मी म्हणालो “३६० अंशात आहे”. “हे जग पाहिले तर महान आहे व लहान आहे. आपल्याला जी साधना सिध्द करावयाची आहे त्यासाठी महान जग उपयोगी नाही. लहान जग म्हणजे मिनीएचर असावयास पाहिजे. मुंबई ते गोवा हे अंतर ३६० मैल आहे, याचा अर्थ ३६०0 (अंश) आहे असे जमेस धर म्हणजे हे गणित सुटेल. ह्या ३60 मैलाचे ५ भाग कर म्हणजे जी सिध्दता करावयास आपल्याला स्वामींनी सांगितले आहे ती सिध्द होईल. त्यासाठी जे साहाय्य हवे ते ‘५ पीर’ करतील. ही साधना सिध्द करण्यापूर्वी २० वर्षे तू ज्यांना ‘५ पीर’ म्हणून संबोधित होतास व बऱ्याच वेळा प. पू. साईबाबांनी ‘‘तुझे ५ पीर काय म्हणतात ?” असे विचारले होते ती वेळ आता आली आहे. म्हणजे ह्या ५ केंद्रांना तू ५ पीर असे म्हण. ह्या ५ विभूती परलोकवासी होऊन शेकडो वर्षे झाली आहेत. ते ५ आत्मे जे ह्या जगतात ‘अवतार” म्हणून जन्माला आले होते व त्यांचे जीवन ईश्वरमय झाले, असे ५ आत्मे म्हणजे विभूती ही साधना सांभाळतील. असे ५ पुण्य आत्मे ह्यांची स्थापना स्वर्गलोकात कर व इहलोकात ह्या ५ पीरांना मुंबई ते गोवा ह्या 5 ठिकाणी उपस्थित करून उपासना सुरू कर”.
“ॐ कार ह्या विषयात अ, उ, म अशी तीन अक्षरे आहेत व प्रत्येक अक्षर तीन अंगानी युक्त आहे. ह्या तीन अक्षरांच्या ३ प्रदक्षिणा होतील. यामध्ये अ+उ=ओ, म्हणजे आपल्याला कोणी हाक मारली की आपण ज्याप्रमाणे होकार देतो त्याप्रमाणे आपल्या आत्म्याने अ + उ = ओ म्हणजे होकार दिला हे झाल्यावर मग म + १/२ मात्रा = अहं ब्रह्मास्मी, ‘मीच तो आहे’, अशा रीतीने ही सिध्दता होईल”.
“हे होण्यासाठी ॐ कार साधनेस जे भक्त उपस्थित होतात, त्यांनी वरीलप्रमाणे म्हणजे जी अंगे सांगितली आहेत त्याप्रमाणे उच्चार हा आस्थापूर्वक म्हटला गेला पाहिजे. ॐ कार साधनेत तीन अक्षरे म्हणजे तीन लोक आहेत व जगाच्या तीन अवस्था उत्पत्ती, स्थिती, लय आहेत. यांचा संबंध ‘उच्चार-मध्य-लय’ व ‘स्वर-ताल-लय’, यांच्याशी असून तीन लोक व तीन अवस्था मिळून ६ होतील, त्यापैकी ५ विभूती म्हणजे ५ केंद्रे व शिल्लक राहील १ साईनाथ यांनी मिळून ॐ ची निर्मिती करावयाची आहे व मग त्याची स्थापना करावयाची आहे. त्या निर्मितीस “शक्तिपीठ” असे म्हणतात. पण हे सगळे सांगितले, ते निर्माण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष किंवा नाहीतर जन्मसुध्दा पुरणार नाही, यासाठी ‘पथ्य काय’, असे तू विचारशील. तर यामध्ये स्थळ, काळ, वेळ यांचे अनुमान अचूक साधले गेले पाहिजे. एक तास आधी किंवा एक तास पुढे असे म्हणून सिध्दता होणार नाही. हे अनुमान समजण्यासाठी ऐहिक बंद करून १०० % पारमार्थिक अवस्था असली पाहिजे. जेव्हा एखादी अवस्था आपण सिध्द करतो तशी अवस्था मागे किंवा पुढे घडली असेल किंवा घडणार असेल ते कळले पाहिजे. यासाठी कुठल्याही लोभात पडू नकोस तरच कार्यसिध्दी होईल. हे काम तुझ्या एकट्याने होणार नाही. ज्याप्रमाणे पाऊस थेंबाथेंबाने भूतलावर येतो व मग त्याची नदी व सरोवर तयार होते त्याप्रमाणे प्रथमतः सर्वांना ॐ कार म्हणण्याची सवय करावयास पाहिजे. प्रथमतः ॐ काराचा उच्चार होणार नाही तर जो शब्द उच्चारला जाईल त्यातून ध्वनि निर्माण झाला पाहिजे. त्या ध्वनीतून लहरी निघाल्या पाहिजेत. अशी साधना सर्व केंद्रांवरील भक्तांनी करून ॐ कार म्हटला पाहिजे म्हणजे त्याचा अर्थ ‘अ’ हा सिध्द होईल”.
यानंतर साधनेचा भाग म्हणून ‘अ’ म्हणजे ॐ कार हा सर्वांना शिकविला व ध्वनि-लहरी-ध्वनि अशी साधना लोक करू लागले. त्यावेळी, “पहिले अक्षर ‘अ’ हे सिध्द करण्यासाठी तू वाडीला ये असे स्वामींनी सांगितले. त्यावेळी १९७८ सालातील गुरुपौर्णिमा होती. त्यावेळी अशी आज्ञा होती की, “मागील हवन विधीप्रमाणेच सिध्दतेची क्रिया करावयाची आहे. परंतु ह्यावेळी पौर्णिमे आधीचे दोन दिवस व नंतर तीन दिवस असे एकूण पाच दिवस व पाच रात्री वाडीत राहीले पाहिजे. ह्या पाच दिवसात वाडीची मर्यादा ओलांडता कामा नये. या शिवाय ह्यावेळी ज्या ऐहिक जीवनाचा लाभ तू लोकांना दिलास त्यासाठी जी साधनसिध्दता तू औदुंबर येथे केलीस त्याचा लाभ गुरुदक्षिणा म्हणून मला दे व मग तू ॐ कार साधना म्हणजे ‘अ’ याला सुरुवात कर. हे करीत असताना लोक तुझ्या दर्शनासाठी आले किंवा त्यांनी पूज्यभावनेने दिलेल्या गुरुदक्षिणेचा स्वीकार केलास तर पुढील साधनेत अडथळा निर्माण होईल याची दक्षता बाळग”.
त्यावेळी जे भक्तभाविक वाडीला आले होते त्यांनी दीक्षा घेतलेली होती व आतापर्यंत ह्या दीक्षेने ऐहिक लाभ त्यांना झाला होता. त्या दीक्षेच्या मोबदल्यात सर्वांना पुढील साधना याचा स्वीकार करावयाचा आहे त्यासाठी सर्वांनी घाटावर स्नान करून प. पू. स्वामींच्या पादुकांपुढे विडा, दक्षिणा व श्रीफल ठेवून हवनास उपस्थित राहावे अशी विनंती मी सर्वांना केली. त्यावेळेच्या आनंदाचे वर्णन करता येत नाही. सर्वांना काही हे दृष्य पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली नव्हती. पण मला जे दृष्य दिसले त्याचे वर्णन मी लिहितो आहे. सर्व भक्त गुरुजींच्या घरी जेव्हा आले तत्पूर्वी त्यांनी गंगेत स्नान केले होते. त्याचा परिणाम म्हणून काय दृष्य दिसले असेल तर सर्वाना स्थूल देह नाही. हे पाहून मला रडू आले. ह्या जगात जन्माला येऊन सर्वांना हे जग पाहण्याचा मोह अनावर होत असतो व ह्याच देहात इच्छा वासना शिल्लक राहिलेल्या असतात तो देह दिसत नाही. मग ह्या सर्वांना काय द्यावयाचे, असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहीला. तेवढ्यात गुरुजींची हाक मला ऐकू आली की, “दादा. तयारी झाली का ?” तेव्हा मी मूळ अवस्थेत येऊन ‘होय’ म्हणालो.
त्याप्रमाणे विधीचा आरंभ झाला. वेदमंत्रांचा ‘शब्द’ ऐकू येऊ लागला. जीवनात इच्छा अशी होती की केव्हा ना केव्हा असे मंत्र आपण ऐकू. आवड अशी होती की आपण खूप शिकावे, संस्कृतचा अभ्यास करावा. परंतु ईश्वराची इच्छा वेगळी होती त्यामुळे मला शिकता आले नाही, पण आजचा दिवस श्रीज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘सोनियाचा दिवस अमृते पाहिला’ तशी माझी स्थिती झाली. श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी व तेथील विद्वान ब्राह्मण हे ॐ कार साधनेला सिध्द झाले आहेत यापेक्षा जगात सुख काय आहे, असा विचार केला. ह्या जन्मात हे पुण्य आपल्याकडून घडावे, हा संकेत ईश्वराचा आहे तेव्हा प. पू. स्वामींनी आज्ञा दिल्याप्रमाणे १ वर्ष अथवा १२ वर्षे सेवा करू. जरी यात लोक सहभागी झाले नाहीत तरी प. पू. बाबांनी दिलेले घर विकू पण मागे फिरणार नाही असा विचार मनाशी केला व हवनास बसलो.
त्या दिवशी सर्व देवदेवतांचे पूजन केले. त्यावेळी पाटावर एकच देवी पाहिली, ती म्हणजे श्रीमहासरस्वती. म्हणजे प्रथम अक्षर ‘अ’ हे सिध्द होण्यास आरंभ झाला हे निश्चित झाले. अक्षराची ओळख ‘अ’पासून ‘ज्ञ’ पर्यंत आहे. ‘ज्ञ’ म्हणजे श्री गणपती. याचे दर्शन प्रथमतः ह्या हवनास झाले व अशी जाणीव झाली की पुढे आज्ञा होईल तेव्हा श्रीगजाननाचे दर्शन तुला घडेल.
पहिले हवन व दुसरे हवन यात फरक काय आहे ? वास्तविक पाहणाऱ्याला सारखाच विधी होता. पण पहिले हवन आम्ही तिघांनी केले. या दिवशी पुढील कार्याचा आरंभ झाला. त्यासाठी आम्ही तिघेही ऐहिक प्राप्ती करत नव्हतो. मी कामकाज बंद केले होते व दीपक व लक्ष्मणराव यांना पै-पैसा न मिळवता मला मदत करा असे प. पू. हाजी मलंगबाबांनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्या दोघानी नोकरी न करता आज्ञेचे पालन केले.
हवन झाल्यावर प्रथमतः गोव्यास गेलो. पहिल्या हवनानंतर दत्तजयंती होती. गोव्याला आल्यावर सुखटणकरांचे घर आहे त्या घरी काही एक मुदतीपर्यंत भिक्षा मागून आम्ही जेवण जेवायचे व साधना करावयाची हा क्रम चालू होता. त्यावेळी जरी आम्ही ॐ कार म्हणत होतो तरी ती साधना ॐ काराची नव्हती. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल ‘आई’, ‘बाबा’ वगैरे बोलू लागते तशा प्रकारची स्थिती सर्व भक्तांची होती. त्यावेळी ११ वेळा ॐ कार, ११ वेळा ।।श्री नवनाथायनमः।। व ११ वेळा ।।ॐ श्री साईनाथाय नमः।।. अशी साधना होती. ह्या साधनेतून कशाची प्राप्ती होणार आहे याचा मागमूस नव्हता. म्हणजे आपल्या जीवनाला आकार आला नव्हता. आपण जन्म घेतो तो जन्म कर्मासाठी म्हणजे ऐहिक सुखासाठी आहे, पण जन्माला येऊन पारमार्थिक जीवन प्राप्त झाले पाहिजे म्हटल्यावर पारमार्थिक जीवनाला आकार नव्हता. “ऐहिक जीवनात जशी १५ माध्यमे आहेत, तशी परमार्थात १५ अंगे आहेत, त्यांची ओळख मी मागाहून तुला सांगेन. तोपर्यंत हवनाची व्यवस्था तू कर. जन्माला येऊन पै-पैसा याची प्राप्ती भूषणावह नाही. ‘ॐ भवति भिक्षां देही’ असे जो मागतो, त्यावेळी परमार्थ सुरू होतो” अशी आज्ञा झाली.
आज्ञेप्रमाणे एकूण ९ पौर्णिमांना हवन झाल्यावर ९ पौर्णिमांची सांगता ही महारूद्र स्वाहाकारामध्ये झाली. ह्या ९ पौर्णिमांना वेगवेगळे अनुभव मी अनुभवू शकलो. कोणी म्हणतात अनुभव, कोणी म्हणतात प्रचिती, कोणी म्हणतात सांगता, म्हणजे काय हे उत्तर निश्चित सांगता येत नाही. म्हणजे साखर गोड आहे पण त्याचा अनुभव खारट का तुरट आहे असे सांगण्यापैकी आहे.
आज ‘आत्मनिवेदन’ लिहावे म्हणून आज्ञा झाली आहे म्हणून सर्व काही लिहिणे भाग आहे. ऐकताना हे खरे का खोटे आहे हा वाद आहे. ज्याप्रमाणे कोंबडी गेली जिवानीशी पण खाणारा म्हणतो कोंबडी वातड आहे, त्याप्रमाणे साधना सिध्द करणे हे सोपे नाही. मनासारखे सुख प्राप्त होण्यासाठी कर्म असून ते कर्मसुध्दा अधीन होत नाही तेव्हा साधना ही किती अवघड आहे याचा आढावा घ्यावा लागतो. असो.
त्याप्रमाणे पहिल्या पौर्णिमेला ‘अ’ ह्या अक्षराचा आरंभ केला. त्या दिवसापासून माझे शरीर झिजू लागले. त्याला कोणी आधीव्याधी असे म्हटले तरी तो आजार नव्हता. गुरुमार्गात आजार होणे हे गालबोट गुरुंना आहे म्हणून आचार हा महत्त्वाचा आहे. त्या आचाराची सवय मला नव्हती. ॐ कार साधना सिध्द करण्यासाठी आपला आचार हा पिंडाप्रमाणे आहे तो बदलून जेव्हा ब्रह्मांडाचा आचार शिकू लागतो, तेव्हा ह्या ९ पौर्णिमांमध्ये कितीतरी आजार झाले. औषधोपचार चालू होते, पण प्रश्न असा होता की दवा की दुवा, शेवटी मी शरण आलो की मला दुवा पाहिजे व मग दवा पाहिजे. शरीराचा धर्म आहेच व त्याला जगविणे भाग आहे. तेव्हा दवा हा आवश्यक आहे पण प्रथम दुवा हा पाहिजेच. त्याप्रमाणे आजपर्यंत साधना चालू आहे. जसे जसे आपण क्षितिजाजवळ गेलो की पुन्हा क्षितिज पुढे आहेच त्याप्रमाणे साधनेला अंत नाही. ती अनंत आहे म्हणून अंधकार नाहीसा होतो म्हणजे जगाचे अज्ञान दूर होते. आज शेकडो शोध लागले आहेत व पुढेही लागतील, पण जेव्हा आपण बोध घेऊ तेव्हा ह्या शोधामागे ‘साधना’ आहे हे समजेल. आपली साधना प्रापंचिक असून ईश्वराची साधना विश्वाची चालू आहे म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, ‘पसायज्ञान’, त्याऐवजी आपण म्हणतो की, ‘पसायदान’ म्हणजे पोटासाठी पाहिजे आहे. ज्या दिवशी आपण जगासाठी मागू त्या दिवशी आपण धन्य होऊ.
शेवटी ह्या ९ पौर्णिमेचा विधी यथायोग्य झाल्यावर आम्ही तिघेजण फत्तेपूर सिक्रीला गेलो. प. पू. सलीमबाबांचे दर्शन घेऊन पुढील आज्ञा काय आहे, असा प्रश्न विचारला. तो पर्यंत सर्व केंद्रावर ॐ साधना चालू होती. तेव्हा आज्ञा अशी होती की, “९ पौर्णिमेला हे होम हवन विधी झाले. त्यामुळे मूळ ॐ काराचे स्वरूप बदलले. ॐ काराचे मूळ-तत्त्व रवी आहे. तो सामान्य माणसाला पेलणार नाही. तेव्हा त्याचा प्रकाश चंद्रावरून घेतला पाहिजे. चंद्राची कला ही प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढणारी आहे. हा निसर्गाचा धर्म आहे. त्या धर्माप्रमाणे साधकाला जावे लागते. एकंदर ९ पौर्णिमांना आपण हवन केले. म्हणजे ९ मध्ये ३ भाग केले. हे तीन लोकांचे झाले. त्या प्रत्येक भागात उत्पत्ती, स्थिती व लय ह्या प्रमाणे ३ अवस्था एकरूप होऊन ब्रह्मांड म्हणजे ॐ कार होतो. इहलोकामध्ये जेव्हा लय अवस्था असते तेव्हा परलोकामध्ये उत्पत्ती असते व स्वर्गलोकात लय अवस्था असते तेव्हा इहलोकाची अवस्था उत्पत्ती असते. अशी ब्रह्मांडाची रचना आहे. हे तीन एकरूप झाले म्हणजे स्थिती अवस्था निर्माण होते. त्याची गरज जगताला आहे. आज सर्वत्र अशांतता आहे. घरी दारी शांती नाही म्हणून श्रीज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ‘तीन एकवटले’ म्हणजे त्या काळात जेव्हा ३ स्थिती एक होतील, ती अवस्था श्रीगुरुकृपेनेच होईल. यासाठी श्रीगुरुंना परमेश्वर मानून त्यांची पूजा, अर्चा करावी. परंतु गुरूंचे स्तोम किंवा थोतांड माजवू नये. पहिले चरण व मग शरण. ह्या दोन क्रिया आम्हा मानवांच्या हातून घडल्यावर तिसरे जग म्हणजे ‘मानवता’ ह्या युगाचा जन्म होईल. यासाठी पुन्हा वाडीस जावयाचे आहे. तेथे देव आहे पण दिसत नाही. फक्त पाऊले म्हणजे पादुका दिसतात. भक्ताने त्या चरणाला शरण जावे कारण त्या पादुकांमध्ये सर्व काही आहे. पाहिले तर सर्वकाही आहे, नाही तर काही नाही. जर प्रेम याचा अभाव असेल तर जन्म प्राप्त होऊनसुध्दा तो प्रेतवत् आहे. पुढील काळ अत्यंत कठीण आहे. तेव्हा प्रलयाची चाहूल नंतर लागून त्याचा उपयोग नाही. पाऊस पडतो आहे तेव्हा धान्य पेरावे. खाणारे मागून येतील. त्यांची वाट साधकाने पाहू नये”.
इतके मार्गदर्शन झाल्यावर मी पुण्यास आलो व मग वाडीस जाऊन तेथील विद्वान गुरुजी वे. मू. श्री. सोलापूरकर यांना भेटलो. पुढील आज्ञा श्रीमहारूद्र स्वाहाकार करावा अशी आहे, पण ह्याची जाहिरात होता कामा नये. ज्याची इच्छा असेल तो न बोलावता येईल, असे मी त्यांना सांगितले. ह्या विधीसाठी कशाची जरूरी आहे त्याची यादी घेऊन मी परत आलो व तयारीस लागलो. सर्वसाधारणपणे त्या गुरुजींनी सांगताना ‘हे शक्य असेल तर आणा’, असे लिहिले होते. पण जेव्हा वाडीला परत गेलो तेव्हा नेलेले साहित्य पाहून तेथील लोक असे म्हणाले की, ‘गेल्या १०० वर्षांत असा विधी ह्या क्षेत्री झाला नाही व खरोखरीच जगाच्या कल्याणासाठी असा विधी कोणी केला नाही’. अनेक विधी मनुष्य करतो. पण ते इतरांसाठी नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी. पण हा महारूद्र स्वाहाकार विधी जगासाठी होता व पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सर्व लोक स्वाहाकाराचा लाभ व लोभ घेत होते. शेवटच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे श्रीमहारूद्र स्वाहाकार पूर्ण झाला. ह्या दिवशी वाडीतील सर्व लोकांना महाप्रसाद व यथोचित द्रव्य देऊन मी पुण्यास आलो. त्यावेळच्या आनंदाचे वर्णन करता येत नाही.
नंतर प. पू. बाबांसमोर बसलो होतो. जसे एखाद्याला अचानक लाखो रूपयांची धनप्राप्ती होते तसे मला झाले. त्यावेळी प. पू. बाबा म्हणाले, “महत्प्रयत्नांनी तुला जी साधना प्राप्त झाली आहे तिचा विनियोग जगतासाठी व्हावयास पाहिजे. नाहीतर तुला ही साधना पचणार नाही. जरी तुझ्या माध्यमातून ही ॐ साधना प्राप्त झाली आहे तरी तिचे वाटेकरी तीन लोकांत व्हावयास पाहिजेत. म्हणजे वंशविमोचन हे काय आहे हे जगताला समजेल”.
हे ऐकून मी थक्क झालो. “जेवढे काम सोपे होते त्यापेक्षा अति अवघड कार्य आपणाला करावयाचे आहे ते समजून घे”, असे शब्द ऐकू आले. ‘९ पौर्णिमांना हवनादी विधी झाला आहे म्हणजे ‘अ’ अक्षर सिध्द झाले आहे. त्यापुढे ‘म’ पर्यंत जावयाचे आहे. तत्पूर्वी ‘उ’ अक्षर सिध्द करावयाचे नसून, ह्या तीन अक्षरांतील जो ‘अ’ प्राप्त झाला आहे त्याची प्रचिती भक्तांना आली पाहिजे. म्हणजे ‘म’ ची प्राप्ती होईल”. हे कोडे काही समजेना. ‘अ’ अक्षर सिध्द कर व ‘उ’ ची प्रचिती जगाला आल्यावर ‘म’ ची प्राप्ती होईल असे सांगितले व आपण ऐकले. ह्याचा अर्थ काय, हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहीला. दिवसामागून दिवस जात होते. पण उत्तर सापडेना. शेवटी गोव्याला गेलो व ‘यंदा श्रीनवरात्र गोव्याला कर’ अशी आज्ञा झाली. त्याप्रमाणे मी ह्या वर्षी गोव्याला नवरात्र करणार असे सांगितले
गोव्याला देवळांचा सुकाळ आहे, पण बोलके देव किती ? चालणारे देव किती ? व न बोलता न चालता कार्य करणारे देव किती ? असे प्रश्नांवर प्रश्न उभे राहीले. ह्या प्रश्नांनी वेडा होण्याची वेळ आली. जे कठीण होते ते आपण केले. त्यापेक्षा कठीण प्रश्न मार्गी लावायचा ही जबाबदारी आपल्यावर आली. जीवनारंभी आज्ञेप्रामाणे औदुंबरला गेलो. दुसऱ्यावेळी वाडीला गेलो व आज्ञा पालन केली. आता तिसऱ्या वेळी आज्ञा अशी की जे सिध्द केले आहेस त्याचे वाटे तीन लोकात कर, एवढे गणित समजले. पण हे गणित सामान्य नाही. त्याचा अर्थ ‘अगणित’ आहे. हे गणित शांततेने सोडवले पाहिजे. घाई केली तर फट्दिशी ब्रह्महत्या होईल व भूत आपल्या डोक्यावर बसेल. मी गुरुमार्गात आल्यावर शांत झालो. पूर्वी एवढा शांत नव्हतो. पण त्याहीपेक्षा शांत झाल्याशिवाय हे ‘अगणित’ सोडविणे शक्य नाही. गुरुमार्गात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणे म्हणजे गुरूमार्ग नव्हे. कारण हा मार्ग ब्रह्मांडाचा आहे व आपला जन्म पिंडात झाला आहे तेव्हा स्वाभाविक पिंडाप्रमाणे इच्छा होणे हा देहाचा धर्म आहे. तो घडू न देणे म्हणजे गुरुमार्ग. तेव्हा आज्ञा ही महत्त्वाची. म्हणजे गुरुंची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे हे ठरवून मी गोव्यास राहिलो.
“नवरात्रापूर्वी तू भक्तांसाठी संमेलन घे”, अशी आज्ञा झाली व “ते गोव्यात घे”. म्हटल्यावर जागा शोधू लागलो. पणजीची जागा पुरणार नाही म्हणून मग शिरोडा येथे देवीची धर्मशाळा पसंत केली. पहिले संमेलन सप्टेंबर १९७९ मध्ये झाले व त्याला ७५ भक्त हजर होते. विषय ‘जीवनउत्पत्ती’, असा होता. अशा रीतीने मुलाखती घेण्याची ती पहिलीच वेळ. पण हे संमेलन यशस्वीपणे पूर्ण झाले व आलेल्या भक्तांनी अशी विचारणा केली ‘पुन्हा केव्हा यावयाचे’ ? तेव्हा मी म्हणालो, “पुढचे पुढे पाहू”.
सर्व भक्त वेगळ्या आनंदात परत गेले व मी घरी परत आलो. पण आलेल्या दिवसापासून दसरा होईपर्यंत वेगळ्याच अवस्थेत होतो. त्यामध्ये खूप विचारांचे मंथन झाले की यापुढे जगाला काही वेगळा मार्ग सुचविला पाहिजे.
नवरात्रामध्ये पूजा, आरती, स्वतःसाठी मुलाखत, असे दिवस आनंदात गेले. त्यावेळी पुढची दिशा काय आहे हे कळले. — वाडीला ‘अ’ हे अक्षर सिध्द केलेले आहे. त्या अक्षराला जोड ‘उ’ ह्या अक्षराची पाहिजे, म्हणून ‘ज्ञान’ म्हणजे ‘उ’ तत्त्व. ह्यासाठी प्रथमतः संमेलन झाले. म्हणजे ‘उ’ ला आरंभ झाला. जर ‘उ’ म्हणजे ज्ञान हे शिकविले नाहीस तर लोकांना अ + ज्ञान असे प्राप्त होईल. तेव्हा नुसते ‘अ’ अक्षर सिध्द होऊन चालत नाही. ‘उ’ म्हणजे ‘ज्ञान’ ह्याचा लाभ झाला तरच मनुष्य सज्ञान होतो. ह्यासाठी दर वर्षी संमेलन घे. सकाळी व दुपारी ॐ साधना व मुलाखत असा क्रम ठेवून तू भक्तांना ज्ञानी कर. जीवनाबद्दलचे अज्ञान हा शाप आहे. सर्व साधकांनी आजपर्यंत हेच केले आहे व हे शास्त्र न समजता ॐ साधना लोकांना सांगितली आहे.
एकूण आठ संमेलने झाली. ह्या संमेलनात जो महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे शक्तिपीठ ! जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जन्म म्हणजे काय हे समजले पाहिजे म्हणजेच पिंडाची ओळख झाली पाहिजे. ह्यासाठी आठ संमेलने भक्तांसाठी घेतली गेली. ब्रह्मांड म्हणजे काय याची प्रचिती साधनेद्वारे समजली पाहिजे, याची शिकवण दिली गेली. नुसते ‘ब्रह्मांड’ असे म्हणून शाब्दिक विवेचन न करता त्याची प्रचिती आली पाहिजे. यामध्ये पिंडाची अंगे उच्चार-मध्य-लय व ब्रह्मांडाची अंगे, स्वर-ताल-सूर ही असून ही दोन्ही सिध्द झाल्याशिवाय ॐ निर्मिती होत नाही व अशी षट्कोनी आकृती तयार झाल्यावर शक्तीला आवाहन करावे लागते. म्हणजे प्रथमतः पीठ तयार पाहिजे. हे पीठ सहा अंगांनी युक्त आहे. ही सहा अंगे स्केलमध्ये म्हणावी लागतात. तत्पूर्वी पिंडाची शुध्दता झाली पाहिजे. त्यात एकही दोष राहता कामा नये. तरच पिंड तयार होतो व मग ब्रह्मांडाला आवाहन करावे लागते.
ह्याप्रमाणे नित्य साधना सर्व केंद्रांवर चालू होती. नवरात्रामध्ये श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती व श्रीमहाकाली यांचे पूजन मांडले होते. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की “आम्ही तीन शक्ती स्व-इच्छेने एकत्र येऊ व एकरूप होऊ, तेव्हा शक्तीपीठाची स्थापना होईल व ह्या शक्तीपीठात आमची त्रिभुवनात असलेली शक्ती एकरूप होईल तरच भवितव्यात ह्या जगाला सुख, शांती व समाधान याचा लाभ होईल. ह्या प्रमाणे आम्ही दसऱ्याला गुरुशक्तीमध्ये विलीन होऊ”, असे अश्वासन त्यांनी दिले व पुढे सांगितले की “भवितव्यात वेगळा मार्ग शोधून काढून त्याचे फल कोणालाही मिळणार नाही. कारण चालू काळात श्रीगुरु हाच परमेश्वर तुम्ही सर्वांनी मानला पाहिजे. आम्ही व गुरु हे वेगळे नाही. आज जगतात आम्ही देवदेवता व गुरु वेगळे आहोत असे अज्ञान भक्तांमध्ये आहे. त्यामुळे गुरुभेट होऊन व त्यांनी दीक्षा देऊन नराचा नारायण होण्यासाठी आशीर्वाद दिला आहे तरीसुध्दा जग अज्ञानाने देवाला शोधत आहे, पण भवितव्यात जगाला मार्गदर्शक असा एकच गुरुमार्ग शिल्ल्क राहीला असून त्या मार्गानेच जाणे हीताचे आहे”. असे आश्वासन सर्व देवदेवतांनी दसऱ्याला दिले म्हणून ‘श्रीसाईशक’ याची घोषणा दसऱ्याचे दिवशी केली.
‘श्रीसाईशक’ या शकाचा आरंभ १९८१ साली दसऱ्याला झाला व त्याची खूण म्हणून श्रीसाईशक मुद्रा (प्रतिमा) छापून सर्व भक्तांना पूजनासाठी दिली व अजूनही देत आहोत. ही प्रतिमा किवा मुद्रा म्हणजेच देव ! कारण आज जे देव आपल्या पूजनात आहेत त्या देवदेवतांच्या प्रतिमा पूजनात ठेवण्याची आपली इच्छा असूनही भवितव्यात त्या मिळणार नाहीत. यासाठी त्या तीन प्रतिमांमध्ये तिन्ही शक्तींचा समावेश झालेला आहे व याहून वेगळा देव आहे असे मानून आपण भक्त वेगळे होऊ नका. ज्या अर्थी देवदेवांनीच असे ठरविले की आपण एकत्र येऊन एकच शक्ती ह्या जगाला तारणारी निर्माण झाल्याशिवाय ह्या जगाला सुख, शांती लाभणार नाही तेव्हा सूज्ञांनी असा विचार करावा की आपल्याच अज्ञानाने आपले जीवन दु:खमय होणार आहे. तुम्हाला सुख लाभावे म्हणून तुमच्या जन्माआधीच ही योजना देवांनी केली आहे. ती प. पू. साईबाबा व दादा यांनी निर्माण केली नसून ही योजना २५०० वर्षांपूर्वीची आहे म्हणजे जे शक्तीपीठ आज आपल्याला दिसते आहे त्या शक्तीची स्थापना श्रीनाथांनी केली आहे तेव्हा ही शक्ती अनादी-अनंत आहे व त्या शक्तीची सेवा करणे हा आम्हा मानवांचा धर्म आहे.
आज जगात पुष्कळ धर्म असून त्यापरत्वे कर्म त्यांचे तत्त्वज्ञान न समजण्यापलीकडे आहे व आज जगतात परिस्थिती अशी आहे की जगण्यासाठी धर्म कोणता ? तेव्हा प. पू. साईबाबांनी म्हणजे श्री दत्तप्रभूंनी अवतार घेऊन असा सिध्दांत मांडला की ‘साई’ म्हणजे ‘मानवता’ हाच आजचा श्रेष्ठ धर्म आहे व ह्या धर्माला साधना कोणती तर ॐ साधना ! हाच उपाय जन्माला येण्यासाठी व तरण्यासाठी असून त्याप्रमाणे वागणे म्हणजेच मोक्ष व मुक्ती. श्रीसाईशक प्रतिमेवर जे प्रतीक आहे, ती दोन पावले आहेत, याचाच अर्थ मोक्ष व मुक्ती. ह्यापेक्षा अधिक गरज कशाचीही नाही.
जी आठ संमेलने घेतली गेली त्यामध्ये अशी शिकवण दिली गेली की जीवन म्हणजे काय ? व जन्माला येऊन केवळ सुख भोगणे व देवाला अधिक सुख मागणे हे अज्ञानीपणाचे असून जीवनाचे कार्य अधिक काही आहे व ते मिळविण्यासाठी आम्ही मानवांनी सदैव प्रयत्नात राहणे म्हणजे जीवनाची सार्थकता आहे. अशा प्रकारे हा ज्ञानयज्ञ होऊन ८ व्या संमेलनात शक्तीपीठाचे आवाहन केले गेले व त्यानंतर परवरीला ‘साईधाम’ बांधण्यासाठी भूमीपूजन पाडव्याला केले गेले. त्या काळापर्यंत ॐ साधनेतील जो ‘उ’ म्हणजे ज्ञान होणे म्हणजे काय हे सर्वांना समजले होते, त्यामुळे सर्वजण उत्साही होते.
शक्तीपीठ म्हणजे काय ? ज्याप्रमाणे देवदेवतांच्या प्रतिमा व टाक असतात किंवा जीवनात अडचण आली म्हणजे देवतांचे यंत्र करतात तसे शक्तीपीठ आहे काय अशी विचारणा पुष्कळांनी केली. पण त्यावेळी खुलासा केला नाही. कारण जेव्हा साधक एखादी साधना सिध्द करतो त्यावेळी ते साधन सिध्द होईपर्यंत साधकाने मौन धरावे लागते. आपल्या मुलाला किंवा पत्नीलाही सांगता कामा नये. कारण सिध्दता होण्यापूर्वी साधनेचा उच्चार केला गेला तर त्याचा परिणाम काय होईल ते सांगता येत नाही. साधनेपूर्वी संकल्प करावा लागतो. तो संकत्प सिध्द झाल्याशिवाय इतरांना सांगितला तर विकल्प होतो. म्हणून साधकाने ही खबरदारी सांभाळली पाहिजे. त्याप्रमाणे शक्तीपीठाची स्थापना होईतोपर्यंत नित्य साधना भक्तांनी चालू ठेवावी अशी विनंती सर्व केंद्रावर भक्तांना केली होती. त्या मुदतीमध्ये गोवा ते मुंबई अशी पाच केंद्रे गणिताप्रमाणे जमेस घरली होती पण अनेकांनी नाना तऱ्हेचे प्रश्न व शंका विचारल्या की “वं. दादा मुंबईला का येत नाहीत व सारख्या गोव्याला भेटी चालू आहेत !”
शक्तीपीठाची स्थापना होईतोपर्यंत मला स्थळ, काळ, वेळ आदी गणित सांभाळावयाचे होते. पण त्यावेळी गेल्या २० वर्षांपासून येणारे अनेक भक्त यांचा प्रश्न असा होता की “आम्हाला वं. दादांना त्रास द्यावयाचा नाही. फक्त एकच प्रश्न विचारावयाचा आहे”. तो प्रश्न इतका सामान्य असावयाचा की “मुलीचे लग्न केव्हा होईल ? मुलाला नोकरी आहे पण चांगली नोकरी केव्हा मिळेल ?” हे प्रश्न जरी मी सोडविले असते किंवा नसते तरी काही नुकसान झाले नसते. पण मी जे कार्य प. पू. बाबांच्या आज्ञेने हाती घेतले होते, ‘ते कार्य यथोचित चालू आहे का’ ? याबद्दल कोणीही विचारणा केली नाही. याबद्दल दु:ख वाटते, कारण तुमच्या जीवनात पुढे-मागे प्रश्न निर्माण होतील पण प. पू. बाबांची कृपा आपल्या पाठीशी आहे असा विश्वास आल्यावर मी कामकाज बंद केले व दुसऱ्या साधनसिध्दतेच्या कामाला लागलो तेव्हा आपल्या पाठीशी कृपा आहे, आपले प्रश्न प. पू. बाबा व वं. दादा पाहून घेतील असा विश्वास तरी आपण निर्माण करावयाचा होता. मला जे काम प. पू. साईबाबांनी सांगितले होते ते कार्य २५०० वर्ष थांबले होते. तुमचा प्रश्न वैयक्तिक होता, पण प. पू. बाबांचा प्रश्न जगासाठी होता. गुरुमार्गात शेकडो भक्त येतात व शेकडो जातात. ‘सबूरी’ कोणी ठेवायची आहे हा प्रश्न आहे. कारण आज गुरूमार्ग हा कामापुरता मामा असा होऊन बसला आहे, पण अशी अवस्था भक्ताची होऊ नये व त्यामुळे पुढील कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आधीच सर्व भक्तांच्या सुखाची सोय प. पू. बाबांनी केली होती ती म्हणजे ‘तीन प्रतिमा’. ह्या प्रतिमा भक्तांना दिल्यानंतर शक्तीपीठाचे आवाहन केले. या आवाहनात तुम्हा भक्तांना काही करावे लागले नाही. फक्त तीन प्रतिमांचे मूल्य तुम्ही भक्तांनी दिले आहे. पण मला प्राप्त जीवनाला मुकावे लागले असते यापेक्षा अधिक लिहीणे योग्य नाही.
साईधामची योजना चालू होती, त्या काळात मला अशी अशी आज्ञा झाली की “ॐ मध्ये तीन अक्षरे म्हणजे तीन शक्ती ह्या त्रिभुवनात ज्या आहेत त्यापैकी दोन सिध्द झाल्या आहेत व ‘म’ म्हणजे तिसरे अक्षर सिध्द करावयाचे आहे त्यासाठी तू तयार रहा”. नेहमीप्रमाणे मी गोव्याला होतो. त्या दिवशी आरती व नित्य साधना झाल्यावर आज्ञा अशी झाली की “उदईक सकाळी तू रत्नागिरीला जा, गेल्यावर पुढील आज्ञा होईल त्याप्रमाणे तू कर”. त्याप्रमाणे मी इतर भक्तांसमवेत रत्नागिरीला गेलो. तेथे आपले केंद्र होतेच. तेथे दुपारी एक भक्त जे आपल्याकडे येत होते, त्यांनी “सायंकाळी माझ्या घरी या व आरती करा” अशी विनंती केली व ते आपल्या गावी गेले. सायंकाळी त्यांच्या घरी गेलो व आरती झाली. सर्व भक्तांनी तीर्थप्रसाद घेतला. मी प. पू. बाबांसमोर बसलो होतो, तेवढ्यात त्या गावचे देवस्थानचे मालक जे आरतीला आले होते त्यांनी विचारणा केली की “मला एक प्रश्न विचारावयाचा आहे. आपली परवानगी असेल तर विचारणा करणार”. तेवढ्यात प. पू. बाबा म्हणाले “हा प्रश्न सामान्य नाही म्हणून खोल विचार कर. ह्या गावची स्थिती बिकट आहे. हा प्रश्न एकाचा नाही तर पंचक्रोशीचा आहे” म्हटल्यावर मी जागा झालो. तोपर्यंत माझी स्थिती वेगळी होती. पूर्वी ज्याप्रमाणे पुण्य विभूतींचा संचार होत होता त्याप्रमाणे माझी अवस्था झाली.
तेव्हा आलेल्या देवस्थानच्या मालकांना मी काही प्रश्न विचारले की, “इतके पुरातन देवालय असून त्या देवाची कृपा समस्त गावकऱ्यांवर नाही. त्यामुळे गावाची भरभराट होत नाही. सर्वजण कष्ट करीत आहेत पण त्याचे फल मिळत नाही. याचे कारण मूळ जे देवस्थान आहे त्या ठिकाणी देव नाही. मला दिसत आहे एक देऊळ व दोन देव, असे का ? तेव्हा त्या देवळाचा काही इतिहास माहिती असेल तर सांगा”. तेव्हा ते म्हणाले, “पहिली इथे लक्ष्मीनारायणाची मूर्ती होती. पुढे काही अंतरावर एक गाव असून तेथील देवळात देव नव्हता, त्यासाठी त्या गावातील लोकांनी आमच्या देवळातील मूर्ती चोरून नेली व त्या मूर्तीची स्थापना आपल्या गावी केली. तेव्हा आमचे देऊळ ओस पडले. काही वर्षांनी पेशवे यांना असे समजले की रत्नागिरीजवळ शिरगाव आहे. त्या ठिकाणी एक बांधलेले देऊळ असून ते देऊळ ओस पडले आहे. पेशव्यांची भक्ती गणपतीवर होती त्यामुळे त्या देवळात जो गणपती आज आहे त्याची स्थापना पेशव्यांनी करून देवस्थानासाठी काही देणगी दिली व आपण ज्या घरात बसला आहात ती वास्तूही पेशव्यांनी दिली आहे”. असा इतिहास मला माहित आहे. पुढचे काय ते आपण पहा.”
हे ऐकून मी रत्नागिरीला आलो. दुसऱ्या दिवशी केंद्रावर आरती केली. पुष्कळ लोक दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मी त्या लोकांना न भेटता एका खोलीमध्ये बसून होतो व माझ्या समवेत जे सेवक आले होते त्यांना, “कामकाज तुम्ही करा, मी खोलीत बसतो व कामकाज संपल्यावर मला भेटा” असे सांगितले. त्या खोलीत बसून मी ॐ साधना सुरू केली, परंतु पूर्वीसारखी साधना होईना. बराच वेळ बसून काही उत्तर सापडेना. मग आपल्या हातून काय घडले आहे याचा शोध घेऊ लागलो. शेवटी असे दृष्य पाहिले. डोळ्यासमोर शिरगावचे गणपतीचे देऊळ दिसू लागले व त्या देवळात गणपतीला एक स्त्री म्हणत आहे की “माझे देऊळ सोड. तुझी येथे गरज नाही. जेथून आलास तिकडे जा. आज अनेक वर्षे लोक दु:खी आहेत त्यांना सुखी कर”. हा आवाज स्त्रीचा आहे, तेव्हा ती स्त्री सामान्य नसून प्रत्यक्ष लक्ष्मी-नारायण आहे हा पुढे सर्व खुलासा झाला. जे दृष्य मी पाहिले होते ते कधीही पाहिले नव्हते. प. पू. बाबांची प्रार्थना करून काय ‘आदेश’ आहे याची मी वाट पाहात बसलो. तेव्हा प. पू. बाबांनी असे सांगितले की “गोव्याला तुला सांगितले होते की उदईक रत्नागिरीला जा. तेथे गेल्यावर पुढील कार्यक्रम काय आहे हे समजेल. तेव्हा ॐ साधनेत जे ‘म’ तत्त्व म्हणजे गजानन हा कमी आहे. त्याची प्राप्ती होण्याची वेळ आली आहे. तेव्हा जे देऊळ लक्ष्मी मागत आहे ते तिला दे व गणपतीला आपल्याबरोबर घे. हा बालरूपी गणपती तुला सांभाळावयाचा आहे व ॐकारातील ‘म’ तत्त्व सिध्द झाल्यावर म्हणजे ‘म’ तत्त्वाची साधना सिध्द झाल्यावर शक्तीपीठाची स्थापना आपल्याला करावयाची आहे”. हा आदेश ऐकून मी थक्क झालो. देवांतसुध्दा भांडण आहे मग मानवाच्या हाडामासात जे कुभांड रूजले आहे त्याचा अंत लागणे शक्य नाही हे सत्य आहे.
त्या इष्टदेवीची संभावना करून मी गोव्याला श्रीगजाननासमवेत परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे आरती केली व साधनेत बदल केला. जे नामस्मरण-
।। ॐ श्रीसाईनाथाय नमः ।।
म्हणत होतो त्याऐवजी
।।ॐ नमः शिवाय।।
हे पंचाक्षरी नामस्मरण म्हणू लागलो व तशी विनंती सर्व कार्यकेंद्रांवरील भक्तांना केली. ।। ॐ नमः शिवाय ।। हे नामस्मरण शंकराला उद्देशून नाही. ‘म’ हे अक्षर लय तत्त्वाचा कारक आहे. लय म्हणजे शून्य अवस्था म्हणजे पूर्णत्व. ते प्राप्त होण्यासाठी ५ कोशांचा समावेश करावयास पाहिजे. यासाठी नाभीस्थानापासून ब्रह्मस्थानापर्यंत ॐ कार व नामस्मरण ही साधना केली पाहिजे. ज्यावेळी ही ५ स्थाने शुध्द होतील तेव्हा अ + उ + म = ॐ हे अक्षर सिध्द होईल. तेव्हा ॐ साधना संपली असे म्हणू नकोस. पुष्कळांना ॐ साधना म्हणजे काय हे समजत नाही व समजणे शक्य नाही. ज्याप्रमाणे आपली ताकद असेल तेवढे सागरात पोहावे. जसा सागराचा अंत लागत नाही तशीच ही साधना आहे.
ह्याप्रमाणे साधना चालू होती. माझ्या समवेत जे कोणी भक्त साधना करीत होते अशावेळी ह्या भक्तांना जरी विचारले असते की ‘अनुभव काय आला’ तर त्यांनाही सांगता येण्यासारखे नव्हते, पण मला वेगवेगळे अनुभव व प्रतिसाद मिळत होता. हे जरी खरे तरी जसे जसे दिवस जाऊ लागले व नियोजित दिवस जवळ येऊ लागला तसा मी भयभीत होऊ लागलो. कारण अमुक एक साधना ठरविली जाते तेव्हा ते शक्तीला आवाहन असते व ती शक्ती केव्हा प्राप्त होईल हे सांगता येत नसते. ही निसर्गाची ठेव आहे. अमुक वेळातच सिध्द होईल हे सांगता येत नाही. कारण ती कोणाची नोकर नाही. जो पाऊस पडतो तो निसर्गपरत्वे असतो. पण वेधशाळेलासुध्दा अचूक सांगता येत नाही की अमुक दिवशी पाऊस पडेल. त्याचप्रमाणे साधना आपल्या अधीन नाही, त्यासाठी साधकाला स्थळ, काळ, वेळ आदींनी सिध्द व्हावे लागते. निसर्गामध्ये पाऊस येण्यापूर्वी ढग येतात किंवा आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी सुवास येतो, तशी माझी स्थिती झाली, कारण पुढे शक्तीपीठाची स्थापना करावयाची होती व त्यासाठी साईधामचे काम अमुक दिवसात पूर्ण व्हावयास पाहिजे होते, म्हणून ती वास्तू केव्हा तयार होते इकडे माझे लक्ष होते. ‘साईधाम’ बांधणे सोपे नाही. एक घर आपल्या मनासारखे होत नाही. हे तर साईधाम तमाम भक्तांचे निजधाम होते. ही जबाबदारी साधी नव्हे. आज जी वास्तू बांधून झाली आहे ती जर बांधली गेली नसती, तर ज्या शक्तीचे आगमन होणार होते व तिची स्थापना शक्तीपीठ म्हणून करावयाची होती त्या ऐवजी माझा बळी ह्या शक्तीने घेतला असता. असे दिव्य शक्तीपीठ आहे. ‘शक्तीपीठ’ ही चार अक्षरे असली तरी त्यात ८ दिशा सामावलेल्या आहेत, म्हणजेच ‘जयजयकार’. ही साधना आपण सर्व भक्तांना केवळ श्रीसाईबाबांचे दास झालात म्हणून मिळाली. आपण एखाद्या वस्तूपदार्थाला गती देऊ शकतो, पण गतीला ‘प्रतिमा’ बनविणे हे इहजगतातच नव्हे पण स्वर्गलोकातही कठीण आहे. अशी साधना प. पू. बाबांनी आम्हा भक्तांना शिकविली आहे.
पुढे साईधामचे काम पूर्ण झाले व शक्तीपीठाची स्थापना चैत्रपाडव्याला करावयाची असल्याने सर्व केंद्रांवरील भक्तांना आमंत्रित केले गेले. प्रथमतः असे वाटले की साईधामची वास्तू सिध्द करण्यासाठी विद्वान ब्राम्हणांना बोलवावे. मग मागाहून लक्षात आले की आपली केवढी चूक की ‘साईधाम’ ही वास्तू बाबांची आहे. त्याचे ‘निजधाम’ व्हावयास पाहिजे. तेव्हा ही वास्तू ते स्वतःच सिध्द करतील. तेव्हा ह्या विचाराबद्दल प. पू. बाबांची क्षमा मागितली व ‘पणजी केंद्र’ हे साईधाममध्ये आले व ॐ कार साधनेची जी सांगता ‘म’ ह्या शब्दाने करावयाची होती, त्याची तयारी साईधाममध्ये साधनेद्वारा सुरू झाली.
रत्नागिरीला जाऊन आल्यावर आता निश्चित साधना सुरू झाली हे कळू लागले. जसा मुलगा झाल्यावर त्याचे कोडकौतुक आपण करतो, पण त्याला दाढी-मिशा आल्यावर तो प्रौढ झाला आहे असे आपण समजतो. त्याप्रमाणे आपली साधना प्रौढ झाली आहे असे वाटू लागते व ‘म’ तत्त्व कोठे साध्य होईल असा विचार मनात येऊ लागला – नरसोबाची वाडी, गोवा, रत्नागिरी(शिरगाव)का गोकर्ण ? कारण एकदा मी फिरावयास मांडवी पुलावर गेलो होतो. त्यावेळी अकस्मात् आकाशात ढग जमा झाले व विजा चमकू लागल्या. मी परत येतेवेळी एका भक्ताकडे थांबलो. खूप पाऊस व विजेचा गडगडाट झाला. त्यावेळी मी आकाशात जो विजेचा चकमकाट पाहिला तो ॐ कार स्वरूपात होता. त्यावेळी असे वाटले की ह्या ॐ काराची दिशा गोकर्णाला आहे. पूर्वी पुराणात रावणाने श्रीशंकराला प्रसन्न करून आत्मलिंग म्हणजे ब्रह्मांड मिळविले होते व त्याचे हरण श्रीगणपतीने केले. ते लिंग म्हणजे गोकर्ण. तेव्हा निश्चित ह्या ठिकाणी ते असेल असा तर्क मी शोधू लागलो. शोध हा गुरूमार्गात शाप आहे. बोध घेणे म्हणजे कृपाशिर्वाद घेणे म्हणून मी बोधाची आज्ञा काय आहे त्याची आतुरतेने वाट पाहू लागलो. पण ‘गोकर्णात जे आत्मलिंग म्हणजे ब्रह्मांड आहे त्याची १२ अंगे होऊन १२ स्थाने आहेत. ती आपल्याला नको आहेत. कारण ॐ साधनेत १२ अंगे आहेत तशीच आपल्याला प्राप्त झाली पाहिजेत. पण ती १२ अंगे स्वर, सूर यामध्ये एकरूप झालेली आपल्याला पाहिजेत. हे ‘म’ तत्त्व म्हणजे ‘वाणी’ ! ह्या तत्त्वामध्ये स्वर व सूर यांचा संगम व्हावयास पाहिजे तर येणाऱ्या भक्ताला १००% आशीर्वाद मिळेल. ‘हे तत्त्व गोरखनाथापाशी आहे. तेव्हा बत्तीस शिराळ्यास तू जा’ असे प. पू. बाबांनी सांगितले.
यापूर्वी मी दोनदा बत्तीस शिराळय़ास गेलो होतो. पण त्यावेळी नाथांचे देवस्थान आहे आपण पाहून येऊ म्हणून केवळ गेलो होतो. तरीसुध्दा त्या ठिकाणी गेल्यावर पूर्वीची स्मृती जागी झाली की ‘ह्या देवापाशी आपले पुढील कार्य अवलंबून आहे’, असे समजले होते व पुन्हा बोलावणे आल्यावर आपण येऊ असा विचार करून परत आलो होतो. पुन्हा एकदा कऱ्हाडला असताना श्रीनाथांचे बोलावणे आले की, ‘तू येऊन जा’. त्याप्रमाणे मी काही भक्तमंडळीं समवेत गेलो होतो. त्यावेळी सर्वांच्या वतीने एक श्रीफल श्रीनाथांचे पुढे ठेवून मी प्रार्थना करीत होतो. प्रार्थना करून मी डोळे उघडण्यापूर्वी तेथील पुजाऱ्याने मी ठेवलेले श्रीफल देण्यासाठी उचलले व माझ्याबरोबर आलेल्या एका भक्ताने माझ्यापुढे होऊन ते श्रीफल स्वतः घेतले. माझी प्रार्थना होण्यापूर्वी पुजाऱ्याने ते श्रीफल उचलले व त्या भक्ताने ते घेतले. हा अपमान किंवा प्रमाद घडला होता. मी डोळे उघडतो तोच लक्षावधी गांधीलमाश्यांचा तांडा त्या भक्ताकडे धावून आला व तो भक्त सैरावैरा इकडे तिकडे धावू लागला. आणखी जे भक्त होते ज्याना ‘माझ्य़ाबरोबर येऊ नका’ असे मी सांगितले होते, त्यांच्याही मागे ह्या माश्या लागल्या. कारण आज्ञा नसताना हे भक्त मागाहून आले होते. शेवटी मी व तेथील मठाचे महंत यांनी प्रार्थना केल्यावर ह्या माश्या शांत झाल्या. हा प्रसंग घडून आज काही वर्षे झाली, पण त्याचे महत्त्व मी आज लिहीत आहे. त्या केवळ माश्या नव्हत्या तर पुढील कार्य किती बिकट आहे याची जाणीव श्रीनाथांनी दिली. ती अशी की ‘जे कोणी भक्त ह्या मार्गाला अपात्र असतील त्यांना प्रथमतः सिध्द कर नाहीतर ‘कर्मरूपी माश्या’ ह्या लोकांचे चावे घेतील. तेव्हा ह्या भक्तांना ‘कर्म अधीन’ अशी अवस्था प्राप्त व्हावयास पाहिजे व त्यानंतर मी तुला बोलावणे करीन’.
जी साधना त्यावेळी केली जात होती त्या साधनेत कर्म अधीन व्हावे असा विषय नव्हता. फक्त कर्माचे विमोचन व्हावे असा आशीर्वाद होता, म्हणजे जे कर्म प्रतिकूल आहे त्या कर्मास अनुकूल करणे असे कार्य जीवनात व्हावयास पाहिजे. ही साधना सिध्द झाली. पण आता कर्म अधीन व्हावे यासाठी साधना सिध्द करावयास हवी होती, तरच त्याचे इष्ट फल ठरविता येईल असे म्हटल्यावर पुन्हा अवघड मार्ग शिल्लक राहिला आहे. तेव्हा काय करावे हे समजेना व हताश झालो. त्यावेळी संमेलने चालू होती व मग दिवस-रात्र – ‘अहं-त्वं-इदं’–असे शब्द कानाशी ऐकू येऊ लागले. पण म्हणजे काय ? याचा अर्थ समजेना. आज सगळ्यांना मी सांगू शकतो की ‘अहं-त्वं-इदं’ म्हणजे काय. पण त्यावेळी हे शब्द मला समजले नाहीत. मग इतरांना काय सांगणार ? हा प्रश्न होता. ज्याप्रमाणे स्थित्यंतर, स्थिती व अवस्था हे शब्द यांचा अर्थ नंतर समजला व मागे लिहिला आहे, त्याप्रमाणे वरील ‘अहं-त्वं-इदं’ याचा अर्थ समजावयाचा होता व समजला म्हणजे आपण सिध्द करू असा विचार मी करीत होतो. मग श्रीनाथांनी सांगितले की वरील अवस्था प्राप्त होण्यासाठी जे ‘भक्त’ आहेत, त्यांचे ‘सेवक’ व्हावयास पाहिजेत. ‘सोने घ्या’ म्हटल्यावर वेडेसुध्दा लोभाने ‘होय’ म्हणतील. पण ‘माती घ्या’ म्हटल्यावर कोण माती घेईल ? असा प्रश्न उभा राहीला. म्हणजे भक्त ह्या अवस्थेतून सेवक ह्या अवस्थेत स्थित्यंतर व्हावयास पाहिजे. तेव्हा मी तरी ‘सेवक’ आहे किंवा नाही अशी शंका येऊ लागली. आज आपण केवळ भक्ती करीत आहोत, म्हणून ‘भक्त’ आहोत असे नाही. मातीचे रूपांतर प्रथमतः लोखंडात व्हावयास पाहिजे, तेव्हा ह्या लोखंडाचे ‘सोने’ होईल. नुसती माती असून उपयोगी नाही. परीस हा लोखंडाचे सोने करतो, पण त्यावेळी माती ही लोखंड झाली पाहिजे. ‘लोखंड’ याचा अर्थ काय ? ‘लो-खंड’, म्हणजे लोक-कल्याणाच्या सेवेमध्ये खंड पडता कामा नये अशी धारणा जेव्हा भक्ताची होते तेव्हा त्याला ‘सेवक’ असे म्हणता येईल.
इतका विषय गोव्याला गेल्यानंतर समजला व ‘पुढचा मार्ग काय ? ’ म्हणून प. पू. बाबांना विचारले. त्यावेळी दीपावली होती. पाडव्याला केंद्रावर आरती झाली. भक्तांनी आजूबाजूला आरास केली होती व सर्वत्र पणत्या लावल्या होत्या. तेव्हा प. पू. बाबांनी विचारले की “ज्या सगळ्या पणत्या लावल्या आहेत त्यामध्ये पाणी किती आहे व तेल किती आहे ? व ज्या पणत्या पेटवल्या आहेस त्यापैकी शिल्लक किती आहेत हे मनाशी विचारून पाहा. मग पुढचे साधन मी तुला सांगेन. नुसती दीपावली असे म्हणून चालणार नाही तर ती आपल्याला पावली का ? हा विचार करावा लागेल”.
पुढे ‘कर्म-अधीन’ ही अवस्था कशी प्राप्त होईल व त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मी विचार करू लागलो. त्यानंतर मी माझ्या गुरुबंधूंना घेऊन दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी ध्यानी-मनी नसताना ह्या प. पू. विभूतींचे आगमन झाले. त्या दिवशी पहाटे मी उठलो व कोणी तरी हाक मारीत आहे असा भास झाला. पुन्हा् झोप येऊ लागली पण ती झोप नव्हती. त्या गुंगीमध्ये मी जी समाधी पाहिली तशी जगात कोठेही नाही. कारण जगतात ज्या समाध्या आहेत, त्या समाध्यांवर चबुतरा बसविला आहे. हा चबुतरा दगड किवा संगमरवरी दगडाचा असतो. पण मला जे दर्शन झाले ती समाधी मातीची आहे व तशी जगात एकच आहे. ‘तेथे दर्शनार्थ, तू ये’. असा आवाज ऐकला. मग मी उठून स्नान, आरती वगैरे झाल्यावर सर्वांना घेऊन ह्या ठिकाणी गेलो, पण वाट सापडेना. विचारता विचारता एकाने सांगितले की “सरळ जा. उजव्या बाजूला वळा व मग डाव्या बाजूला वळा”. वास्तविक हे वाक्य कोणालाही सरळ वाटेल, पण मला ह्या वाक्यात काय गूढ आहे, हे समजले कारण मी दिल्लीला येण्यापूर्वी “कर्म-अधीन करून घे व मग मी बोलावीन” असे श्रीगोरक्षनाथांनी सांगितले होते, ते आठवले.
मग आम्ही सर्वजण त्या दर्ग्यात गेलो. तेथील मुजावराने ज्याप्रमाणे सांगितले होते तसे पूजासाहित्य आणविले व मनोभावनेने पूजा केली. त्यानंतर प्रार्थना काय म्हणावी असा प्रश्न निर्माण झाला कारण मुजावर जी प्रार्थना म्हणत होते ती प्रार्थना ऐहिक होती म्हणून मी गप्प बसलो. तेव्हा समाधीतून निरोप आला “तू ज्या कामासाठी आला आहेस ते ‘काम पूर्ण होईल असा माझा आशीर्वाद आहे’ तेव्हा तू परत जा. माझे कार्यातील आगमन नेहमीप्रमाणे नाही. थोड्या कालात हे साधन सिध्द व्हावयास पाहिजे. ज्याप्रमाणे देवाचा भंडारा असतो त्यात कोणीही येऊन जेवून जातात. त्यात भूक देवाची आहे का पोटाची आहे ह्याचा विचार कर. परलोकात जे आत्मे आहेत ते अगणित आहेत, तेव्हा प्रथमतः ज्यांचे विमोचन व दीक्षा झाली आहे अशा आत्म्यांना ही साधना सांग व मग बाहेरच्यांना. जे लोक परलोकवासी होतात त्यावेळी प्रेत दहन करण्यासाठी नेतात, त्या प्रेताचे तोंड समोर असते व दहन करून लोक मोकळे होतात. पण जो विधी शास्त्राने सांगितला आहे त्याला किंमत न देता नको ते विधी अज्ञानाने आपण करीत असतो, त्यामुळे आत्मा परलोकी गेला तरी कर्मातून त्याची सुटका होत नाही. वास्तविक ह्या विधीचा ऊहापोह करणे गैर आहे पण कर्माधीन होणे म्हणजे काय ही शंका विचारात घेतली जाते. मुख्य दहनविधी जो आहे, तो करण्याने पुढील मार्ग सुलभ होत असतो. म्हणजे जेव्हा पुन्हा जन्मप्राप्ती होते व ३ ऋणानुबंध जोडले जातात त्यावेळी गतजन्मातील हा शेवटचा संस्कार यथायोग्य होण्यामुळे पुढील जन्मी हे ३ ऋणानुबंध कर्माशी एकरूप न होता ते ‘कर्तव्य’ म्हणून जोडले जातात. हे कर्तव्य दानधर्म व देवाची सेवा करण्याने मोकळे होते. अन्यथा हे कर्तव्य म्हणून न राहता ‘कर्म’ म्हणून भोगावे लागते, यासाठी महारूद्र झाल्यावर जे वंशातील दोष विमोचन केले गेले त्याचे प्रायश्चित्त म्हणून श्री पंतांकडे ‘अन्नदान’ ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये आपल्याकडील भक्तांचे नावे काही रक्कम जमा केली गेली व बाकीची जबाबदारी प. पू, पंतांनी घेतली. याशिवाय जे आत्मे अजून कर्माधीन आहेत त्यांचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून तीन शेष आज पूजनात आहेत व ते पूजन ‘साईधाम’ मध्ये होत असून आज्ञा होईल तेव्हा ते बत्तीस शिराळा येथे विसर्जन करु,” असे प. पू. कुतुबुद्दिन बाबांनी सांगितले. त्याप्रमाणे सर्व भक्तांचे जीवन जे कर्माधीन होते ते कृपेमुळे कर्म-अधीन झाले व त्याची सांगता बत्तीस शिराळा येथे श्रीगोरक्षनाथांचे पवित्र क्षेत्री झाली. त्यावेळी मी जरी कऱ्हाडला होतो तरी आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये होतो. पण हा विधी पूर्ण झाला म्हणजे वंशविमोचन हा विधी पूर्ण झाला तरी अजूनही ह्या विधीचा त्रास केव्हा केव्हा होत आहे.
पुढे प. पू. नाथांच्या आज्ञेप्रमाणे साधनेत बदल केला. पूर्वी जी ॐ साधना सर्व भक्त करीत होते व नामस्मरण ज्या पध्दतीने करीत होते त्यामध्ये पाच स्थाने म्हणजे कोश यांचा समावेश होता. जेव्हा पाच स्थाने म्हणजे ५ कोश हे एकमेकांना पूरक झाले, त्यावेळी कंठस्थान याला प्रधान मानून त्याचा जो स्वर आहे त्या स्वरात सर्व साधना म्हटली गेली पाहिजे. देह व आत्मा म्हणजे पिंड व ब्रह्मांड यांची गती भिन्न आहे म्हणून श्रीपंतानी एका पदात म्हटले आहे की ‘गुरुविणे नाही गती’ म्हणजे गुरू असल्याशिवाय ही साधना प्राप्त होत नाही. पिंडाला निश्चित गती नाही, पण ब्रह्मांडाला गती निश्चित आहे. तेव्हा आपण करीत असलेली साधना पिंडाप्रमाणे होता कामा नये. जर आपण पिंडाच्या गतीप्रमाणे साधना करू लागलो तर प्रगती ऐवजी आपली अधोगती होईल. म्हणून आपण भक्तांना ह्याचे ज्ञान होणे आवश्यक आहे व त्याकडे बारकाईने पाहून साधना केली पाहिजे. जी साधना आपणास शिकविली आहे त्या साधनेच्या सिध्दतेसाठी जरी विलंब झाला तरी हरकत नाही, पण जे साध्य होईल ती दुसरी अवस्था आहे. पहिली अवस्था ‘साधक’ अशी होती. आता ‘सिध्द’ अवस्था जी प्राप्त झाली त्यासाठी आपणां भक्तांना काही तप किवा तपश्चर्या करावी लागली नसून केवळ गुरुमार्गाचा स्वीकार केलात म्हणून त्याचा लाभ आपणास झाला. अन्यथा ही अवस्था ह्या जन्मात प्राप्त होणे कठीण आहे.
जीवनारंभी श्रीभैरवनाथांनी “तबला शिकून घे, नाहीतर तुझ्या जीवनाचा तबेला होईल व मग म्हणशील की “देवाला भेटून जन्म व्यर्थ गेला” असे सांगितले होते. असा जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून पहिल्या अवस्थेत “ताल” सांभाळला पाहिजे, कारण जीवनात ताल सांभाळणे कठीण आहे व जेव्हा आपण २५ वर्षांचे होतो तेव्हा त्याला ‘गध्ये पंचविशी’ म्हणतात. कारण जीवनाचा ताल सांभाळणे कठीण होते. जे कंठस्थान आहे त्यात दोन आवाज आहेत. पहिला आवाज पिंडाचा आहे व दुसरा ध्वनी आत्म्याचा आहे. पिंडाने साधनेत जरी लक्षावधी नाम:स्मरण केले तरी परलोकात गेल्यावर त्या नाम:स्मरणाचे स्मरण राहात नाही. म्हणून मोजकीच साधना पण ती आत्म्याने केली तर ह्या जीवनाची उतराई होते. कारण त्याला उत्तर देण्यासाठी आत्मा असतो. पण पिंडाने जरी लक्षावधी जप केला तरी परलोकात जातेवेळी असे उत्तर मिळते की ‘खाली उतर’ म्हणजे ‘पुन्हा जन्माला जा’. ह्यासाठी सूज्ञांनी साधनेचे ज्ञान करून घेतले पाहिजे. ‘साधना’ हा तीन अक्षरी शब्द आहे. इहजन्मात ह्या तीनचा अर्थ समजला तर तीन लोकांची प्राप्ती सहज होते.
या साधनेमध्ये प्रथमतः उच्चार हा महत्त्वाचा आहे. सर्वांभूती आत्मा एकच आहे, पण जन्म प्राप्त झाल्यावर जे द्वैत आपल्याला दिसते हे अज्ञान आहे. ‘मी अमुक एकाचा आहे’ येथपासून द्वैत सुरू होते. जात-पात, धर्मपंथ, गुरूमार्ग व शेवटी देव यामध्ये आपला उच्चार मग आचार व त्याप्रमाणे विचार हे भिन्नाभिन्न होतात व झाले आहेत. जगात जे जीव आहेत त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असा हा नर आहे. त्या नराचा शेवटी नारायण होतो. पण केव्हा ? हे वाक्य नुसते म्हणून चालत नाही. आपल्या आचार-विचारात जर बदल झाला तरच ते सत्य होईल व ह्यासाठी एकच मार्ग ह्या जगात आहे व तो म्हणजे गुरुमार्ग ! ह्या मार्गात काय शिकवण आहे तिचा अभ्यास केला पाहिजे, हा मार्ग देव भेटण्यासाठी नाही. देव हा आपल्यापाशीच आहे. त्याची ओळख इतरांना होण्यासाठी आपले आचरण बदलले पाहिजे. ते बदलण्यासाठी काही मंत्र, तंत्र नाही. आपल्यापासून इतरांना दु:ख होते, त्याने जगाला आनंदी करावयाचे आहे असा विचार निर्माण केला तर त्यासाठी साधना आहे, म्हणजे मला इतरांकडून काय फायदा होईल असा विचार सोडून धनप्राप्तीचा हव्यास सोडला तर जगाला सुखी करता येईल. जोपर्यंत हा लोभ आहे तोपर्यंत हे जग आपल्यापासून अनेक योजने दूर आहे. मग नराचा नारायण न होता आपले रामायण होईल. यासाठी काही महामंत्र, महाभारत किवा रामायण वाचून न बघता ‘आपण कसे वाचू’ हा बोध घेतला पाहिजे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी प. पू. बाबांनी “आज्ञा” दिली म्हणून हे कार्य सुरू झाले व त्यावेळी जे भक्त कार्यात येतील त्यांचे प्रीत्यर्थ प्रार्थना लिहून दिली. ती प्रार्थना आपण सर्वजण सकाळी व सायंकाळी म्हणत आहोत. त्यावेळी ह्या प्रार्थनेचा अर्थ काय हे समजले पाहिजे. नुसती पोपटपंची आता नको आहे. त्या प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे मनन व चिंतन व्हावयास पाहिजे. त्यापैकी एक वाक्य आपण अभ्यासासाठी घेतले तर हा जन्म पुरणार नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’ पण अज्ञानाने आपण वाट चुकलो आहोत.
श्रीनाथपंथामध्ये एकच वाक्य आहे व ह्या वाक्यात सर्व काही आहे ते म्हणजे ‘अलख निरंजन’ ह्या दोन शब्दात दोन अर्थ आहेत-एक पिंड व दुसरे ब्रह्मांड व तिसरे आपण ज्यांनी ह्या दोन तत्त्वांना जोडले पाहिजे. हे जोडणे म्हणजेच ‘नाथपंथ’. नाहीतर अनाथपंथ आपल्या वाट्याला आलाच आहे.
इतके साधनेबद्दल सांगितल्यावर हे लक्षात येईल की जी साधना आपण करीत आहोत ती इतकी विशाल व विराट आहे की तिचा अंत लागत नाही, पण आपल्या पाठीशी अनंत आहे म्हटल्यावर साधनेची गोडी लागली पाहिजे. शास्त्रीय दृष्ट्या ह्या साधनेचा जर आपण विचार केला तर ह्या जन्मात आपण ‘जन्म’ घेऊन जन्माचे उतराई होऊ व इतरांचे कल्याण करू असा विश्वास प. पू. बाबांना आहे, पण आपल्याला नाही. बाहेरचे जग हे मृगजल आहे हे जेव्हा पटेल तेव्हा ‘जन्म वाया जाऊ नये’ याचा नितध्यास लागेल. पण आज प्राप्त जन्माची किंमत स्वतःला नाही व इतरांना नाही म्हणून जन्मभर चिंता करून शेवटी आपला जन्म चिता होणार – अशी नरजन्माची कहाणी आहे. यासाठी वारंवार गुरु अवतार घेतात व जे जे आपल्याला पोषक आहे ते सांगत असतात कारण हा जन्म वाया जाऊ नये.
तेव्हा श्रीनाथांनी ॐ साधनेचे गणित सूचित केले. हे जरी गणित अवघड आहे तरी साधकाला निश्चित साधनेचे फल मिळेल व याशिवाय आपण जी साधना ह्या जन्मामध्ये करीत आहोत ती साधना पुढील जन्मी आपल्याला समजेल. ह्या साधनेमध्ये संथा प्रमाणबध्द आहे व म्हणून ह्या साधनेचा लाभ इहजन्म व परलोकासाठी आहे. संथा म्हणजे संथपणे उच्चार, विचार व आचार. याचाच अर्थ प. पू, बाबांनी सांगितलेली सबूरी. आपण आंबा खाण्याची इच्छा व्यक्त करतो, पण अज्ञानामुळे कैरी खातो व ती आंबट आहे असे म्हणतो. ही चूक आपली आहे. आपल्या बागेतील आंब्याच्या झाडाची मालकी आपली आहे, पण फळे आपली नाहीत. जेव्हा निसर्ग ह्या कैरीला आंबा म्हणेल तेव्हा ते फळ गोड होत असते. त्याप्रमाणे कर्म आपले आहे, पण त्या कर्माचे फल देणे हा धर्म आत्म्याचा आहे. पण हे न समजल्याने ‘कर्मदशा आहे’ असे लोक म्हणतात. साधनेत जी अंगे सांगितली आहेत ती जर आपल्याला समजली तर साधना अंगावर येत नाही. ज्यावेळी आपण मार्गदर्शनाप्रमाणे साधना करू, त्यावेळी ती साधना ‘रंगातीत निजरंग रंगुनी’ अशी होते. चित्रकलेमध्ये तीन रंग आहेत व ह्या तीन रंगांचे सात रंग होतात म्हणजे इंद्रधनुष्य. पण हे सात रंग साधकाला समजले नाहीत तर काळा रंग तयार होतो. काळा रंग हा अशुभ आहे, पण साधना पूर्ण झाल्यावर त्याच रंगाचा पांढरा रंग होतो हा अनुभव येतो. यासाठी श्रीनाथांनी ॐ साधनेची अंगे १२ सुचविली व त्यापरत्वे साधना करीत असता ती प्रमाणबध्द व्हावयास पाहिजे.
साधनामार्गात खूप लोकांना असे वाटते की ‘आपला विकास झाला आहे’, त्यामुळे असे लोक बोलताना, चालताना आपण जगापेक्षा वेगळे आहोत असे वागत असतात, पण ‘विकास’ याचा अर्थ ह्या लोकांना समजला नाही. विकाराची कास सोडली पाहिजे तरच आपला विकास होतो. हा एक अर्थ व दुसरा अर्थ असा की जीवनात जे काही विषय आहेत त्या विषयांना सोडून श्रीगुरूंची कास धरली म्हणजे आस ठेवली त्याचा विकास होतो. ज्याचा विकास झाला आहे त्याला हे सांगावे लागत नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवला हे सांगावे लागत नाही, त्याप्रमाणे आपल्या जीवनात अंधकार आहे तो जाऊन त्या ठिकाणी प्रकाश निर्माण झाला पाहिजे याचा अर्थ विकास झाला.
जरी नाथांनी ही दीक्षा सांगितली होती तरी “सामान्य भक्तांना ती शिकविण्यासाठी प. पू. पंतांची आज्ञा पाहिजे” असे प. पू. बाबांनी सांगितले. कारण “सामान्य जनांना शिकविण्याची साधना शब्दरूपात पाहिजे. तुला जी साधना श्रीभैरवनाथ, प. पू. गोरक्षनाथ व मागाहून श्रीनृसिंह सरस्वती यांनी शिकविली ती नादरूपात आहे. त्या नादाचे रूपांतर शब्दरूपात व्हावयास पाहिजे. याचा अर्थ ‘लहरी’ रूपामध्ये साधनेचा लाभ भक्तांना करून द्यावयाचा आहे. हे होण्यासाठी येणाऱ्या भक्तांची ‘लहर’ न सांभाळता आपण साधनेशी एकनिष्ठ राहावयास पाहिजे. जेव्हा कार्यारंभ झाला तेव्हा येणारे भक्त आपल्या सवडीप्रमाणे येत होते. त्यावेळी कार्यार्थ लोकसंग्रह करावयाचा होता. आता आलेल्या भक्ताची सवड न पाहता ‘सवय’ कशी लागेल त्याचा विचार करणे आवश्यक आहे, यासाठी ह्या थोर पुरूषाचा समावेश साधनेत करावयाचा आहे म्हटल्यावर महत्त्वाची तीन अंगे ब्रह्मांडाची व सहा अंगे पिंडाची – त्यांचा लाभ होण्यासाठी ह्या थोर पुरूषाचा आशीर्वाद पाहिजे”.
जेव्हा आज्ञा झाली तेव्हा प. पू बाबांच्या समोर पर्यायाने शक्तीपीठासमोर श्रीफल ठेवले व जो संकल्प सांगितला होता तो घेऊन बाळेकुंद्रीला पंतांकडे गेलो. ह्या वेळचे पंत व पूर्वीचे पंत हे वेगळे होते. त्या दिवशी मी बेळगावला सकाळी साधना करून विश्रांती घेत पडलो होतो. इतरत्र कोणीही नव्हते. अशावेळी झोप नव्हती तर ती ‘झेप’ होती. ह्यामध्ये श्रीगोरक्षनाथांचे बत्तीस शिराळे मी पाहिले व नाथ मला म्हणत आहेत की ‘मला पंतांकडे जावयाचे आहे’ तेव्हा मी म्हणालो की‘ह्यावेळी बेळगावला गाडी नाही. मग कसे जावयाचे’ ? त्यावेळी गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष कृती दाखविली की एक पाऊल शिराळ्यात व दुसरे बाळेकुंद्रीत आहे. हे दोघांमधील अंतर फार थोडे आहे. हा व्यावहारिक अर्थ झाला, पण मागाहून हे समजले की ही साधना इहलोकासाठी व परलोकासाठी आहे. म्हणजे पंतांनी इहलोकाची जबाबदारी घेतली आहे व परलोकाची जबाबदारी श्रीनाथांनी घेतली. म्हणून दोघांची भेट बाळेकुंद्रीला झाली आणि परलोकासाठी स्वामी आहेत असे साधन भवितव्यात घडवावयाचे आहे. म्हणून ॐ ची जी अंगे सांगितली आहेत त्याचा अर्थ पंतांनी जो सांगितला तो असा की पूर्वीच्या काळी वारकरी जे १२ वर्षे तीर्थयात्रा करत होते त्यावेळी वेळ भरपूर होता व आता वेळ थोडा आहे म्हटल्यावर आत्म्याची मुक्तता ‘वायुगमन’ म्हणजे विमानाने केली पाहिजे. येथे ‘वि-मान’ याचा अर्थ फार वेगळा आहे. आपण नेहमी विचार करतो की काय होईल व कसे होईल ? पण याचा शोध न घेता तू गुरूमार्गी झाला आहेस. तेव्हा काहीएक विचार न करता जे गुरु करत आहेत त्यात आपले कल्याण आहे, असा विश्वास निर्माण कर. ‘वि’- म्हणजे काही विचार न करता, गुरू जी आज्ञा देत आहेत ते ‘मान’ ! असे ‘विमान’ ह्या साधनेने हे जग सुखी होणार आहे. संतांची भाषा अशी आहे. त्यामध्ये जे विज्ञान आहे ते आपल्याला समजेल तेव्हा आपण धन्य होऊ,
ॐ कार साधनेत ९ अंगे आहेत. म्हणजे तीन देह आहेत व प्रत्येक देहात काया-वाचा-मन आहे. ह्या ९ माध्यमांनी ॐ साधना केली असता एकाच जन्मात ब्रह्मप्राप्ती होते. यासाठी तीन यज्ञोपविते आहेत. त्या प्रत्येक यज्ञोपवितात ३ दोरे आहेत. प्रत्येक दोरा ३ धाग्यापासून बनविलेला आहे. म्हणजे प्रत्येक यज्ञोपवितात ९ दोरे आहेत व तीन यज्ञोपविताचे २७ दोरे होतात. म्हणजेच २७ नक्षत्रे किंवा निसर्ग निर्माण झाला आहे. मराठीत जी म्हण “सूताने स्वर्गाला जावयाचे” ही म्हण खोटी नाही. तर ह्या म्हणीचा अर्थ समजला पाहिजे. असा बोध प. पू. पंतानी बाळेकुंद्रीला केला व त्यानंतर बेळगावला संमेलनामध्ये ॐ साधना ९ अंगाने शिकविली.
त्यावेळी एक भक्त जे शिराळ्यापाशी मांगले येथे राहतात व नित्यास शिराळ्यास जातात, त्यांच्याबरोबर श्रीनवनाथांना असा निरोप पाठविला की ‘जी साधना आपण दिली आहे ती करणे अतिशय अवघड आहे, त्यात एक जरी उच्चार चुकीचा झाला तर आपण सांगितलेली साधना फुकट जाणार आहे. तेव्हा आपणच जर कृपा केलीत तर ते शक्य आहे. बहुतेक भक्त आपल्याकडे येतात त्यांना ऐहिक पाहिजे आहे व ही साधना तर केवळ पारमार्थिक आहे. म्हणजे ऐहिक जीवनाचा संन्यास घ्यावयास पाहिजे. तरच पारमार्थिकाची प्राप्ती होईल. तेव्हा मी विचार करू लागलो की ‘आपण जन्माला आलो ते कार्य सुलभ व्हावे म्हणून व मीच जर साधना अवघड केली तर त्यास अपवाद होईल असे जग म्हणेल यासाठी आपण तिघांनी मिळून एक मार्ग सुचविलात तर सर्वांचे कल्याण होईल’.
त्याप्रमाणे पंतांचा निरोप आला की ‘सर्व भक्तांना इकडे घेऊन ये. मी व गुरुगोरक्षनाथांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जी साधना आपण करीत आहात ती कल्पना नसून प्रत्यक्षात ही साधना चैतन्यमय आहे. तेव्हा त्याची अनुभूती मिळावयास पाहिजे. कारण निसर्गामध्ये ऊन, पाऊस, थंडी हे ऋतुंचे कार्य चालू असते व आपण त्या वातावरणात वावरत असतो, त्यावेळी ह्या ऋतुंचा अनुभव आपल्याला अनुभवता येतो. तसेच साधनेमध्ये आहे. जे नित्याचे जीवन आहे त्यापेक्षा असे वेगळे जीवन की ज्या जीवनात जिवंतपणा आहे असे जीवन म्हणजे ‘साधना’. ती नित्यनियमाने केली पाहिजे, ती एकदम प्राप्त होणारी नाही. ऐहिक जीवन हे एका क्षणात भिकाऱ्याला लक्षाधीश करते पण पारमार्थिक जीवन हे जर अचानक प्राप्त झाले तर आपण कैलासवासी होऊ. यासाठी हा विषय शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घे, कारण तुला जेव्हा ॐ साधना श्रीभैरवनाथांनी शिकविली व तू शिकलास ते जग व आजचे जग हे वेगळे आहे. तू ज्यावेळी साधना शिकलास त्यावेळी ‘ज’ म्हणजे ‘जगत्जननी’ व ‘ग’ म्हणजे ‘गजानन’ असा अर्थ होता. आज ५० वर्षांत जग बदलले आहे. आजच्या जगाचा अर्थ असा आहे की ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे हे जग आहे. यामध्ये ‘ज’ म्हणजे जन्माला येणे व ‘ग’ म्हणजे गतीने वागणे-बोलणे हीच दोन भूषणे आज आम्हा मानवांची आहेत. त्यामुळे परमेश्वर आहे किवा नाही हा प्रश्न आहे, पण हे समजते केव्हा ? आपण जेव्हा ‘क’ व ‘ग’ ह्या बाराखड्या विसरू तेव्हा, जीवनाचा अर्थ काय आहे हे समजेल. जन्माला येऊन चार पुरूषार्थांची प्राप्ती करून घ्यावयाची आहे ते म्हणजे अर्थ, धर्म, काम. मोक्ष यांची प्राप्ती करून घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. जो कोणी जन्माला येतो तो स्वतःसाठी नाही. जन्माला येणे हे निमित्त आहे. एक जन्माला येऊन सज्ञान झाला तर ४२ पिढ्या सज्ञान होतील व एक जन्माला येऊन जर व्यर्थ गेला तर भावी पिढ्यांना त्याहीपेक्षा कमी प्रतीचा जन्म मिळतो. म्हणजे जन्म घेणे ही खाण आहे. त्या खाणीतून सोने किवा रत्ने निर्माण झाली पाहिजेत, पण हे जर समजले नाही तर — यामध्ये काहीही सापडत नाही.
गुरुमार्गात ज्या साधना आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत. नुसते ‘मी साधना करीत आहे’, असे म्हणून चालणार नाही. पहिली अवस्था म्हणजे जे नामी तत्त्व साधनेमध्ये आहे त्याची ओळख करून घेतली पाहिजे. उदाः – ‘श्रीराम’, ‘ॐ नमः शिवाय’, ह्या नाम:स्मरणामध्ये नामीतत्त्व कोणते आहे, हे साधकाला समजले पाहिजे. ‘नामी’ यामध्ये ‘ना’ म्हणजे ज्या देवाचे नाव आपण घेणार आहोत त्या परमेश्वराचे नाव व ‘मी’ म्हणजे स्वतः, असे नाम घेतेवेळी अहं, त्वं की इदं हे कळले पाहिजे. कारण जी नावे देवाची आहेत त्यात तीन अवस्था — उत्पत्ती, स्थिती, लय — आहेत. ह्या जर म्हटल्या गेल्या तर नामीतत्त्व सिध्द होते. नुसते संख्येने नाम:स्मरण म्हणून ते सिध्द होणार नाही. ह्यासाठी निर्गुण अवस्था पाहिजे व तिची म्हणण्याची संथा शिकली पाहिजे. पुष्कळांना असे वाटते की देवाचे नाव उठता-बसता घ्यावे, पण जे नाव आपण घेणार आहोत ते नाव चैतन्यमय असावयास पाहिजे व देहाचा धर्म काय आहे हे पाहिले पाहिजे. उदाः – आपल्याला एखादे फल-फूल याचे झाड लावावयाचे असेल, तर ते झाड जमिनीच्या पृष्ठभागावर लावले तर त्याला फुले-फळे येणार नाहीत तर ते झाड जमिनीत रूजले पाहिजे, म्हणजे त्या झाडाची वाढ होईल, अन्यथा ते झाड आपल्याला झाडून टाकेल. त्याप्रमाणे आपल्या नामीतत्त्वाचे बीज मनाच्या ठिकाणी रूजले पाहिजे, मग त्याला फुले व फळे येतील.
हीं ओळख झाल्यानंतर ‘नामीतत्त्व’ म्हणजे काय हे कळले. त्याचप्रमाणे हे की जी ॐ साधना आपण करीत होतो तो नुसता ध्वनी असून तो ॐकार नव्हे. एकमेकावर भांडे आपटले तरी ध्वनी होतो. ध्वनी काढण्यासाठी माध्यम पाहिजे व त्याला प्रवाहीत करण्यासाठीही माध्यम पाहिजे. अशी दोन माध्यमे पाहिजेत तर ध्वनी निघेल. त्या ध्वनीमधून लहरी निघतील व पुन्हा ध्वनी मिळेल असे गणित प. पू. बाबांनी सांगितले. एखाद्या अडाणी माणसाला गणित सांगितल्यावर तो जसा मूढ होतो त्याप्रमाणे मी झालो. कारण पहिला जो ॐ कार मी शिकलो तो ध्वनी नव्हता, तो ‘नाद’ होता ! तेव्हा ध्वनी व नाद यातला फरक काय आहे हे त्यावेळी पहिल्यांदा समजले. तो म्हणजे ध्वनी हा पिंडाचा आहे व नाद हा ब्रह्मांडाचा आहे हा बोध झाला. हे जग निर्माण झाले आहे.त्या जगाची निर्मिती ब्रह्मांडातून झाली आहे. तेव्हा ह्या जगाला सुखाचा मार्ग सांगून उपयोगी नाही तर ब्रह्मांडाची ओळख करून दिली पाहिजे.
पिंडाची ओळख ही वस्तुपदार्थाने होते, पण ब्रह्मांडाची ओळख होण्यासाठी काय आहे ? हा प्रश्न दोन वर्षे माझ्यासमोर होता. शेवटी मी प. पू. पंतांना म्हणालो की “आपण सर्व दिलेत पण ‘तूप कशात आहे व कसे काढावयाचे’ हे जर सांगितलेच नाही तर आपली साधना व्यर्थ होणार”. त्यावेळी मी बेळगावला १५ दिवस होतो, पण काही थांग लागेना. शेवटी पंतांकडे गेलो. त्यांनी विचारणा अशी केली की, “ ‘साधना’ ह्या शब्दात दोन अर्थ आहेत. ते तुला समजले काय ? मग पुढचा मार्ग मी सांगेन. त्यासाठी तू गोरक्षनाथांना पत्र पाठीव व त्याचे उत्तर आल्या वर तू इकडे ये”. त्याप्रमाणे मी गोव्याला गेलो व गोरक्षनाथांना प्रार्थना केली की “साधनेमध्ये दोन अर्थ आहेत. ते काय हे सांगा”. तेव्हा त्यांनी सांगितले की “पहिला अर्थ असा की ज्याला काही इच्छा झाली आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो त्याला ‘साधना’ असे म्हणतात. ही साधना बहुतांशी लोक करीत असतात व शेवटी लाभ झाला की साधना सोडून देतात. दुसरा अर्थ असा आहे की ‘साधना’ मधील ‘सा’ म्हणजे इहलोक, ‘ध’ म्हणजे परलोक व ‘ना’ म्हणजे स्वर्गलोक. ह्या तिन्ही लोकांची ओळख जन्माला आल्यावर आपल्याला करावयाची आहे ती ओळख स्वर ह्या माध्यमातून करावयाची आहे. जेव्हा आपण आपली साधना ‘शब्दा’ने न करता ‘स्वरा’ने करतो तेव्हा ‘नाद’ ऐकू येतो. हा नाद म्हणजेच तिन्ही लोकांची प्राप्ती. याचा अर्थ ह्या तिन्ही लोकांचा जो सांभाळ करतो तो म्हणजे ‘नाद’ किवा ‘ब्रह्म’ असा साधनेचा दुसरा अर्थ आहे. एकूण सात स्वर आहेत. पहिले दोन इहलोकासाठी, पुढचे दोन परलोकासाठी, व राहीलेले तीन हे स्वर्गलोकासाठी आहेत. असे साधनेत सात सूर आहेत. ह्या सुरांनी भजन, आरती व नामस्मरण करू, तेव्हा ह्या तीन माध्यमांतून साधक सिध्द होतो व साधना ‘साध्य’ झाली असे म्हणता येईल. पण अजून जर ‘सा’ सापडत नाही तर आपल्याला देव भेटला आहे असे म्हणणे हा केवळ भास आहे”.
वरील बोध जेव्हा मला झाला तेव्हा मी आशा सोडली. कारण जी साधना म्हणून म्हणत होतो ती माकडचेष्टा असून ते अंग पिंडाचे आहे — ब्रह्मांडाचे नव्हे. यापेक्षा ह्या वाटेला न जाणे बरे, कारण वरील साधनेत जर काही चूक घडली तर सर्व साधना व्यर्थ गेली असे होईल. कारण दुधाची बासुंदी झाली येथपर्यंत सर्व सिध्द झाले, पण नकळत मिठाचा खडा जर दुधामध्ये पडला तर काय उपयोग ? म्हणून ह्या मार्गात ‘अवधान’ महत्त्वाचे आहे.
आपण अधिकारी झालो आहोत म्हणजे आपल्याला सर्व करण्याची मुभा आहे असे पुष्कळांना वाटते. त्यामुळे कार्यारंभी ‘विचार’ हे साधनेला पोषक असतात, पण शेवटपर्यंत ते टिकत नाहीत. कारण इतरांनी आपल्या साधक अवस्थेचा गौरव केला आहे, पण आपण कुठे आहोत हे लक्षात येत नाही. ही वेळ साधक अवस्थेत अत्यंत महत्त्वाची असून त्यावेळी साधकाने स्वतःला सांभाळले पाहिजे.
वास्तविक, आपल्या सभोवारचे जे जग आहे त्याला सतत उणीव आहे. तो याचक कधीही ‘मला अमुक प्राप्त झाले आहे’ असे म्हणून समाधानी होणार नाही. अशा वेळी साधकाने हे ओळखले पाहिजे की ‘हा हव्यास आहे, अभ्यास नव्हे’. कारण गुरुमार्गात समाधानी असणे याचा अर्थ आपला विकास झाला आहे व तो अभ्यासाने हे कळले पाहिजे, नाहीतर आपली साधना आपल्याला दुरावते. आपण एखाद्या धातूला आकार देतो. तो जर बिघडला तर ह्या जन्मात पुन्हा जोडता येत नाही. तद्वत साधनेने जो आकार प्राप्त होतो तो बिघडला तर ह्या जन्मात पुन्हा आकार येत नाही. म्हणून साधकाने साधनेमध्ये ‘अवधान अवस्था’ टिकविली पाहिजे. श्रीगुरू हे कोणाचे नोकर नाहीत. तेव्हा आपण गेल्याबरोबर ते आशीर्वाद देतील हे शक्य नाही. आपण गुरूंना भेटत असतो व ते आपल्याला भेटत असतात. ही जी भेट होते त्यावेळी आपण म्हणतो की ‘कृपा झाली’. पण श्रीगुरु आपल्याशी हसले, बोलले ती कृपा नव्हे. तर आपण गुरुमार्गी होतो त्यावेळी ते पाठीशी राहून अवलोकन करीत असतात. कारण जीवन हा पल्ला खूप मोठा आहे. तेव्हा ह्या जीवनात, ईश्वर केव्हा आहे, नश्वर केव्हा आहे, हे ते पडताळून पाहात असतात. आपल्या मनासारखे झाले की देव आहे, मनासारखे झाले नाही की नश्वर असा खेळ आपल्या जीवनात सदैव चालू असतो. अशा वेळी जे ‘गुरु’ आहेत ते मूर्खपणा करीत नाहीत तर कर्म अनुकूल करून देतात. त्या कर्माने सुख भोगावयाचे का गुरुमुख ओळखावयाचे हे स्वतःचे स्वतः ओळखले पाहिजे. त्यानंतर गुरूकृपा व त्यानंतर शुभाशिर्वाद असे दोन शब्द आहेत. ‘कृपा’ म्हणजे जी अडचण आहे ती निवारण करा, म्हणजे एकाच जन्माची तरतूद व शुभाशिर्वाद म्हणजे अनेक जन्मात आपण आपल्या गुरुंचे दास होणे असा अर्थ आहे.
वरील अर्थ ज्यावेळी भक्तांना समजेल त्यावेळी भक्त हा भक्ती करू लागतो. ‘सक्ती’ हा सोपा मार्ग आहे. हा सोडून, भक्ती ह्या कठीण मार्गाचे पाऊल आपण उचलतो, त्यावेळी आपल्याला हे समजेल की आपल्या विकासास आरंभ झाला. वि-कास ह्यामध्ये दोन शब्द आहेत. ‘वि’ म्हणजे विचार किंवा विकार. ह्या अवस्थेत विचार असेल तर ‘कास’ गुरूंची धरावी, कारण ‘कासव’ हे मंदगतीने चालत असते. पण आपल्याला जलद गतीने सर्व हवे असते. भक्त जे जे मागतो ते त्याला एका क्षणात हवे असते. पण तसे गुरूंनी दिले तरी त्याचा सांभाळ करणे अति अवघड आहे, यासाठी कासवाच्या गतीने गुरू देत असतात. जोपर्यंत आपला आचार व विचार हा उच्चाराशी एकरूप होत नाही तोपर्यंत साधना करणे भाग आहे, यासाठी जन्मही पुरत नाही. कारण ‘साध्य’ हे मागाहूनआहे. त्याआधी साधना ही श्रेष्ठ आहे हे आपण विसरतो. कारण नित्य मीठभाकरीच्या ऐवजी मिष्टान्न मिळाले तर बरे वाटते, त्या प्रमाणे काहीएक साधना न करता जर ऐश्वर्य मिळाले तर त्याचे अपचन होते व ऐश्वर्य लयास जाते. त्याप्रमाणे ‘साधना’ आहे. ही नित्य नियमाने करणे हे साधकाचे कर्तव्य आहे. जर साधनेला ‘नियम’ नसेल तर ती साधना होत नाही. गुरूमार्गात जी साधने असतात ती ‘नियमात’ बसवावी लागतात. जो नियम पिंडाला असतो त्याप्रमाणे आपण वागणे ह्य़ाला साधना म्हणता येणार नाही. ब्रह्मांडाला जो नियम आहे तो जर आपण शिकलो तर त्याला साधना म्हणता येईल. ह्यासाठी भक्तांच्या कल्याणार्थ गुरू हे, साधना नियमात बसवतात. म्हणजे त्याचा लाभ इतरांना होतो व होईल. ह्यासाठी जरी वेळ लागला तरी नियमांचे उल्लंधन साधकाने करू नये. जर नियमात साधना केली तर त्याचा लाभ अपेक्षेच्या पलीकडे असतो. जर नियम नसेल तर आपले आयुष्य व्यर्थ खर्च होते याचा विचार साधकाने केला पाहिजे”. असा गुरूपदेश प. पू. पंतांनी केला. त्याप्रमाणे गेली तीन वर्षे मी आटोकाट प्रयत्न केला आहे. जी बारा अंगे ॐ काराची आहेत त्यातील तीन अंगे जरी भक्तांनी आत्मसात केली व इतरांना शिकविली तरी प्राप्त जीवनाचे सोने होईल. ही तीन अंगे व ३ X ४ = एकूण १२ अंगे आहेत. पण ती सिध्द करण्यासाठी माझे प्राण पणास लागले व पुन्हा जिवंत झालो. पण अजून काही भक्त जागेवर जिवंत नाहीत याचे दु:ख वाटते. कदाचित् ही साधना फुकट आहे म्हणून तिची किंमत इतरांना समजत नाही. माझे शरीर सर्व रोगांनी पछाडले आहे, पण त्यांच्यावर मात करीत आहे ते केवळ ॐ कार साधनेमुळे ! त्याची प्रचिती आणखी काय पाहिजे ? स्वतःला रोग करून घ्यावयाचा व मग ‘साधनेमुळे तो बरा होतो का नाही’ हा अनुभव घ्यावयाचा व त्याची प्रचिती इतरांना सांगावयाची असा क्रम चालू आहे.
इहजगतात जन्माला आल्यावर त्याचे गणित समजणे आवश्यक आहे. जन्माला येतेवेळी कर्माची बाजू १००% असते व त्या कर्मपरत्वे इहजन्मात केवळ सुखाच लाभ घेणे हे ह्ताचे नाही. आज जे सुख आपल्याला प्राप्त होते ते पूर्वकर्मानुसार मिळते. ते सुख एकाचे नसून त्या कर्मात इतरांचा ही समावेश आहे हे आपण विसरतो व म्हणून श्रीगुरू हे कर्माचे गणित समजावून सांगत असतात. जीवनात सुखाची प्राप्ती २५%, शांतीची प्राप्ती २५% व समाधान + नित्य साधना मिळून ५०% असे गणित आहे. जीवनात कितीही सुखाची प्राप्ती झाली तरी समाधानाची प्राप्ती होणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण हे समाधान पुढील जन्मात आपले सत्कर्म होणार आहे. ही अवस्था साधनेमुळे प्राप्त होते.
मानवी जीवन
आकृती
सुख — ९०0 शांती — ९०0 समाधान + साधना — १८०0 म्हणजे परिपूर्ण जीवन ३६०0 (अंश) असून जे जीवन आपण कार्यान्वित करतो ते २७०0 (अंश) आहे व ९०0 (अंश) साधनेसाठी कर्म व्यतीत होणे म्हणजे ‘सत्कर्म’ होय. देवाची पूजा, आरती म्हणजे सत्कर्म नव्हे. ती अंगे आहेत. ह्य़ा अंगांनी युक्त अशी क्रिया जेव्हा काया करते त्यावेळी आपल्याला ‘समाधान’ ह्या अवस्थेचा लाभ होतो. म्हणजेच सत्कर्म जन्माला येते तेव्हा प्रत्येक क्रिया ही काया-वाचा-मनाने केली असता आपल्याला सुख, शांती, समाधान आदीचा लाभ होतो. नुसते सुख मागून मिळत नाही व समाधानही मिळत नाही यासाठी साधकाने ज्ञानी होऊन साधना करावयाची असते. नुसते ‘गुरूमार्गात बारा वर्षे आहोत’ असे म्हणणे चुकीचे आहे. गुरूमार्गाचे लक्षण काय ? हे समजणे आवश्यक आहे. इहजन्मात ऐहिक सुखांचीच प्राप्ती होणे हा सत्कर्माचा गैरवापर असून वास्तविक जे प्रतिकूल कर्म आहे त्याला अनुकूल करणे व जे अनुकूल झाले आहे त्या कर्माचा विनियोग जीवन साकार होण्यासाठी झाला पाहिजे. प्रातःकाली आपण जागे होतो, ती जाग झोपेतून उठविण्यासाठी नसून आपले जे अज्ञान असते त्यापरत्वे आपण तसे कर्म पुन्हा करू नये म्हणून देव आपल्याला उठवितो. आपण सकाळी केवळ चहासाठी उठतो पण ही ‘चाह’ देवासाठी आहे का पेयासाठी आहे याचा विचार करणे आपले इष्ट कर्तव्य होय ! प्रातःकाली आपल्याला देवाने उठविले आहे ही जाणीव झाल्यावर आपले कर्तव्य काय ? चोवीस तासांचा दिवस असतो. असे तास, दिवस, वर्षे संपतात व आपले जीवन क्षणभंगुर आहे हे शेवटी पटते पण त्याचा त्यावेळी उपयोग काय ? परंतु ही जाणीव झाली तरी हरकत नाही. जरी जीवनाचे सार्थक झाले नाही तरी जीवनाला आकार प्राप्त झाला आहे याचे समाधान मानले पाहिजे. कारण हाच आकार पुढील जन्मी आपल्याला प्राप्त होतो. ह्य़ा सर्व ओळी लक्षात ठेवून यातील जो गुरूमंत्र याचे स्मरण ठेवले पाहिजे. ह्य़ाच शब्दांना ‘ओवी’ असे म्हणतात. याचा अर्थ “सत्कर्म योगे वय घालवावे” असा आहे. त्या योगे जीवनाचा विकास असा होतो. ३ गती एक होऊन ४ थी अवस्था प्राप्त होणे म्हणजे ‘नराचा नारायण’ होणे ही अवस्था होय.