अध्याय ७ – कार्याची निराकरण पध्दती

हा अध्याय दीर्घ असून, त्यातील सर्व विषय प्रत्येक मानवाच्या जीवनाशी व जन्माशी निगडीत आहेत. समितीच्या कार्याचा मूळ गाभा म्हणजे लोक-कल्याण. प्रत्येक मानवाचे कल्याण करावयाचे म्हणजे प्रत्येक मानवाचे दु:ख व त्याच्या अनेक प्रकारच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्या पूर्णतः दूर करून, ह्या जन्मातच नव्हे तर पुढील अनेक जन्मांत निरंतर सुख-शांती-समाधानाचा लाभ त्याला व्हावा, एवढ्यावर सीमित नसून त्याच्या पुढील पिढ्यांचेही कल्याण करणे इतका विशाल आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या दु:खाचा किंवा अडीअडचणींचा अभ्यास करणे केवळ अशक्य असल्याने तसे न करता, समस्त मानवाचा सखोल अभ्यास केल्यास, ज्या मूळ कारणांमुळे मानवी जीवनात दु:खे निर्माण होतात, अडीअडचणी उद्भवतात, अशा कारणांचा अभ्यास करणेच योग्य म्हणून समितीने मानवी जीवनाचा व मानवी जन्माचा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास केला. त्यालाच ‘जन्म-उत्पत्ती-मीमांसा’ व ‘जीवन-उत्पत्ती-मीमांसा’ असे म्हणतात. ‘मानवी जन्माचा अभ्यास केला’, हे एका वाक्यात मांडणे सहज शक्य असले तरी प्रत्यक्षात तसा अभ्यास करीत असताना वंदनीय दादांना ज्या दिव्य, प्रखर व असाध्य अशा सेवा-साधनांच्या दिव्यातून जावे लागले, त्या कोणाही मानवाच्या आवाक्यातील नसून, असे कार्य फक्त अवतारी पुरुषच करू शकतात, याचे प्रत्यंतर हा अध्याय वाचताना हरघडी येईल.

जीवाला जन्म घेण्यासाठी काही प्रयोजन असावे लागते. प्राप्त जीवनात पूर्वीच्या अपूर्ण कर्तव्यांचे पूर्णत्व हे एक निश्चित “कारण” असते. याबद्दलचे शास्त्रीय विवेचन करताना ज्या शब्दांचा अगर संज्ञांचा वापर केला आहे, त्या शब्दांबद्दल सामान्य मनुष्य परिचित असेलच असे नाही. म्हणून अशा वाचकांना हा अध्याय वाचणे रूक्ष अगर कंटाळवाणे वाटणे संयुक्तिक आहे. कारण अर्थ समजत नसतो म्हणून वाचन हे फक्त वाचनच होते. यास्तव विषयांशी पुरक अशी व अपरिचित शब्दांची थोडीशी माहिती देणे संयुक्तिक व उपयुक्त ठरेल.

निसर्ग तत्वाप्रमाणे ‘कारणा’ शिवाय कोणतीच घटना घडू शकत नाही. (कार्य-कारण-भाव)

सृष्टीतील प्रत्येक जीवास ‘उत्पत्ती-स्थिती-लय’, (जन्म-जीवन-अंत) या स्थित्यंतरातून जावेच लागते.

सृष्टीतील प्रत्येक घटनेत ‘देव-घेव’ चालू असते. काही प्राप्त करावयाचे असल्यास, काही सोडावेच लागते. कुठे वाढले तर कुठे तरी घट होत असते.

अशा देवाण-घेवाणात जेव्हढे सोडले असेल, तेव्हढ्याच तोलामोलाचे प्राप्त होत असते. जास्त नाही, कमी नाही कारण सतत ‘संतुलन’ राखणे हा निसर्गाचा गुणधर्म आहे. देवाण घेवाणात संतुलत्व नसणे म्हणजे कोठे तरी कमतरता असणे. त्या कमतरतेचे पूर्णत्व म्हणजे संतुलनासाठी सतत प्रयत्न चालू असणे.

स्त्री देहात गर्भधारणेनंतर, त्याची पूर्ण वाढ झाल्यावर, तो जीव स्वतंत्र अस्तित्वासाठी उत्सुक व अधीर असतो. तो जगतात येताच त्याचा जन्म झाला असे म्हणतो.

जन्माबरोबरच, अंतसमयाची नोंद ठरलेली असते. जन्मापासून अंतसमयापर्यंत करावयाच्या कर्तव्याच्या कालमर्यादेस जीवन असे म्हणतात.

कान, नाक, डोळे, जीव्हा व त्वचा या कर्मेंद्रियामार्फत बाह्य जगताची माहिती सतत प्राप्त होत असते व त्या माहितीचे ज्ञानेंद्रियाद्वारे, बुध्दिने केलेल्या पृथःकरण, विश्लेषण, तर्क इ.तून रुपांतर ज्ञानामध्ये होत असते. त्या ज्ञानातील सत्य-असत्यता बुध्दिवरील संस्कारावर (न कळत लागलेले वळण) ठरत असते.

प्राप्त झालेली माहिती मेंदूकडे योग्य त्या कप्यात संचित करण्यासाठी पाठविली जाते. मेंदू त्या संचित माहितीच्या आधारे, योग्य वेळी देहाला, क्रिया करण्यासाठी आज्ञा देत असतो. आज्ञेत हेतू (इच्छा-वासनारूपात) दडलेला असतो. अशी आज्ञा म्हणजे मनुष्याचे विचार. ते व्यक्त करण्याचे दोन मार्ग असतात, एक उच्चारातून अगर आचारातून.

हेतूच्या पूर्णत्वासाठी देह काही क्रिया करीत असतो. हेतू पूर्ण झाल्यास विचाराचे पूर्णत्व होते म्हणजचे विचार, उच्चार, आचार, क्रिया, कर्म अशा मालिकेची सुंदर गुंफण असते. क्रियेतून हेतू पूर्ण झाल्यास, एक कर्म पूर्ण होते .पण अपूर्ण कर्मे देहास अनुकूल अगर प्रतिकूल असू शकतात. अपूर्ण कर्मांची वलये, ज्या देहांतून विचार व्यक्त झालेले असतात अगर ज्या व्यक्तींसाठी असतात, अशा संबधीतांच्या देहाभोवती, पूर्णत्वासाठी, सतत फिरत असतात. पूर्णत्वाचा कालावधी हेतूच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

अशा अपूर्ण राहिलेल्या तीव्र स्वरूपाच्या कर्मांच्या पूर्णत्वासाठी परत जन्म घेण्यापर्यंतची वेळ येते, तशा जन्माला कर्मपरत्वे जन्म घेणे असे म्हणतात आणि तशा अपूर्ण कर्माला जन्मकर्म (ऋणानुबंध) असे संबोधले जाते.

अनेक जन्मांत, जर अशा अपूर्ण कर्मांचे पूर्णत्व होऊ शकले नाही तर त्या कर्मांच्या पूर्णत्वासाठी वारंवार घ्याव्या लागणाऱ्या जन्मास जन्मजन्मांतर (ऋणानुबंध) असे संबोधतात.

ज्या माता-पित्या पोटी जन्म घेतला असेल, त्या माता-पित्यांनी घेतलेल्या कष्टामुळे मनुष्याचा जन्म होतो. त्या कष्टाची फेड आपण कधीच करू शकणार नाही, म्हणून निसर्गानी त्यातून उतराई होण्याचा एक मार्ग ठेवला आहे. तो म्हणजे आपणही अपत्याला जन्म देऊन त्या उपकारातून (ऋणातून) उतराई होऊ शकतो. याचाच अर्थ निसर्गाचे सातत्य टिकविणे. माता-पित्याच्या अशा ऋणास मातृ-पितृ (ऋणानुबंध) असे म्हटले आहे.

जीवन जगत असताना अनेक प्रकारची व अनेक व्यक्तींशी देवाण-घेवाण करावी लागते. देवाण घेवाणात कधी पूर्णत्व होऊ शकते, तर कधी ते पूर्ण होऊ शकत नाही. देवाण घेवाण ही नातलग, मित्र, व्यवसाय अगर व्यवहारासंबंधीत व्यक्ती, शिक्षक, इत्यादींमध्ये होत असते. त्या व्यक्तीपरत्वे अपूर्ण ऋणांना इतरेजन (ऋणानुबंध) असे संबोधले जाते.

आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा शक्तिची सेवा-उपासना-साधना मनुष्य करीतच असतो. जेणे करून त्या शक्तितून काही चांगली, प्रभावी शक्ति प्राप्त करून वेगवेगळ्या प्रकारचा आनंद तो आपल्या जीवनात निर्माण करू शकतो. त्यात साहित्य-संगीत-कला, शास्त्र-संशोधन इ.चा समावेश असतो. अशा विविध कला विषयांत ईश्वरी अंश, तरल रूपात, आणि अव्यक्त अवस्थेत असतो. ती अव्यक्त अवस्था आपल्यात धारण होऊन आपल्यातून ती व्यक्त व्हावी म्हणून एखादा मनुष्य अशा विषयात तासंतास रममाण होऊन तिची सेवा-साधना-उपासना करीत असतो. म्हणजे ती अव्यक्त शक्ती (साहित्य-संगीत-कला-संशोधन) त्या साधकात धारण होते. तथापी अशा शक्तिपेक्षाही श्रेष्ठ शक्ति, म्हणजेच निर्गुण निराकार शक्ति. त्या अदृष्य शक्तिला कोणतेही नाव द्या त्या शक्तिच्या सेवेला देवादिकांची सेवा अगर पूजन असे पूर्वजानी संबोधले आहे. अशी सेवा जर अपूर्ण राहिली तर तशा अपूर्ण राहिलेल्या सेवेस देवादिक (ऋणानुबंध) असे म्हणतात.

मानवाच्या जन्मच अपूर्ण ऋणानुबंधांच्या पूर्णत्वासाठी असल्याने, असे हे पाच ऋणानुबंध अटळ असतात. त्यांच्या शास्त्रीय विवेचनास जन्म-उत्पत्ती-मीमांसा असे म्हणतात. एक प्रकारे गत जन्मात आपण जीवन कसे जगलो, याचाच तो आकृतीबंध असतो. प्राप्त जन्मात अपूर्ण कर्तव्ये पूर्ण करणे हे जरी जन्मांचे कारण असले, तरी प्रत्यक्षात मनुष्य जीवन जगत असताना, तो स्वतः निर्माण केलेल्या इच्छा-वासनेच्या पूर्ततेसाठी सतत प्रयत्नशील असतो. त्यापैकी बऱ्याच इच्छा-वासना, ज्या प्राप्त जन्म-कारणाशी निगडीत नसतात व त्या ईर्षा, स्पर्धा, तुलना इत्यादी मार्गानी निर्माण झालेल्या असतात, त्यात अपूर्ण राहण्याचे प्रमाणच अधिक असते म्हणजेच त्यांच्या पूर्णत्वाची जबाबदारी ही पुढील जन्माचे कारण बनते. निसर्ग नियमाप्रमाणे इतरांच्या सुखासाठीही प्रयत्नशील असावे याचे भान सुटलेले असल्याने गुंतागुंत वाढत असते. जीवनातील अशा विविध गुंतागुंतीचा अभ्यास करणे, त्यांची कारणे शोधणे, त्यांचे विमोचन करणे यालाच जीवन-उत्पत्ती-मीमांसा असे संबोधले आहे.

अशा विविध विषयांची मांडणी करताना पहिल्यांदा जीवनातील अडचणी, दु:खांची कारणे त्यांची परंपरा, अपयशांचे सातत्य अशा सर्व विषयांचे, निरनिराळ्या दृष्टीकोनातून सविस्तर विवेचन, या अध्यायात केले आहे. अडचणींचे प्रकार व त्या किती प्रकारे क्लेशकारक असू शकतात याचेही विवेचन केले असून, त्या कारणांचे विमोचन केल्याखेरीज जीवनात सुख, शांती, समाधान प्राप्त होऊ शकत नाही. याबद्दलचेही विवेचन वेगवेगळ्या पध्दतीने, निरनिराळ्या दृष्टीकोनातून करून सर्व सामान्यांना समजतील अशारीतीने मांडले आहेत. त्या कारणांचे विमोचन करण्यासाठी समितीने साध्या सुलभ, सोप्या निराकरण-पध्दती सिध्द केल्या आहेत. पण त्या अगोदर धर्मशास्त्राधारीत निराकरण पध्दती, त्या पध्दती सद्यःस्थितीत कशा कालबाह्य झाल्या आहेत अगर ते निरुपयोगी वा तोटकी पडत आहेत, किंवा सध्याच्या सामाजीक व्यवस्थेतील मनुष्य त्या पध्दती का अनुसरून विमोचन करून घेऊ शकत नाही याचेही बारीक सारीक तपशिलासह सविस्तर विवेचन केले आहे. म्हणून समितीने सुधारित व पुढील शेकडो वर्षापर्यत कार्यरत रहातील अशा साध्या, सोप्या, सुलभ, अल्पखर्चीक पण प्रभावी निराकरण पध्दती सिध्द करणे आवश्यक असल्याने, ते कार्य अंगिकारले. असे कार्य सर्व सामान्यांच्या तर नाहीच, पण साधकाच्या वा सिध्द पुरुषांच्याही आवाक्याबाहेरचे असते.कारण तशी साधना करीत असता, ती जीवावर बेतणी जाण्याची शक्यता असते.अशी प्रखर, दीर्घ साधना, साधकाला करावी लागते. समितीने अंगिकारलेल्या निराकरणांच्या सिध्दतेसाठी साधकाला इहलोक व परलोक यांचे ज्ञान व दोहोवर अधिकार असल्याशिवाय त्या सिध्द होऊ शकत नाहीत. तसेच साधकाचा एकमेव संकल्प असावा लागते, तो म्हणजे ‘लोक-कल्याण’ ! असा एकच संकल्प करून कार्य अंगिकारावे लागते. त्यासाठी आवश्यक असते, ती ईश्वरी प्रेरणा, अनेक संत-विभूतींचे सहकार्य व आशिर्वाद, देवदेवतांचे आशिर्वाद. तसेच अशा निराकरण पध्दती सिध्द करताना कोणत्या, किती व कशा प्रकारची विघ्ने येत असतात, याबद्दलचे दीर्घ विवेचन केले आहे. ते केवळ माहिती म्हणून दिलेले नसून बोध घेण्यासाठी आहे. पहिल्या भागात ज्या विषयांची प्रमुख्याने नोंद घेतली आहे तो विषय म्हणजे ऋणानुबंध, त्यांचे प्रकार, त्यांची देहातील धारणा, तो पुनःपुन्हा वाचावा.त्याचे मनन करावे म्हणजे ऋणानुबंधांचा व जीवनाचा खरा अर्थ हळू हळू कळायला लागेल.

निराकरणातून काय प्राप्त होत असेल, तर अडचणींचे निवारण होऊन पुढील जीवन-विकासाचा मार्ग सुकर होतो. त्यासाठी प्रथम धर्माचरणाची सवय लागावी लागते. ती शुध्द आचार-विचारावर अवलंबून असते. समितीतर्फे दु:ख निराकरणार्थ केल्या जात असलेल्या कामकाजात ‘निराकरण’ म्हणून योग्य, प्रभावी, पण साधी, सोपी सेवा सूचविली जाते. त्या साध्या, सोप्या सेवेतून हे महान कार्य होत असते. समिती केवळ ऐहिक सुखाचा विचार करीत नसून पारमार्थिक जीवन कसे जगता येईल याचा बोधही देत असते.

अडीअडचणींचे मूळ कारण म्हणजे, अपूर्ण कर्मे. ती देहापासून दूर करणे अगर त्यांचे पूर्णत्व करणे याचाच अर्थ त्या कर्मांचे विमोचन करणे. कर्मांचे विमोचन करणे जसे आवश्यक तसेच ऋणांना दूर करणे अगर त्यांचे पूर्णत्व करणे हेही तेवढेच आवश्यक असते.

त्यानंतर जन्मकर्म या विषयाबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. नंतर जन्मजन्मांतर हा विषय घेतला आहे. पुढे मातृ-पितृ, इतरेजन व नंतर देवादिक हे (पांच ऋणानुबंधांचे) विषय घेतले आहेत. त्याबद्दलचे विवेचन विविध प्रकारे, शास्त्राधारासह, त्यांच्या गुणधर्मासह, परिणामासह विस्तृतपणे केले आहे. त्या ऋणानुबंधातून कसे मुक्त होता येईल त्याबद्दलचे विवेचन आहे.(आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक) विमोचनानंतर देहाबाहेरील वलये विलीन झाल्याने, देह शुध्द (वलय-मुक्त) होतो. त्या पोकळीत धारण होण्यासाठी दीक्षा दिल्या जातात.कारण, दीक्षा (जीवन पध्दतीचे मार्गदर्शन) देहात धारण झाल्याखेरीज गुरुकृपाशिर्वाद प्राप्त होऊ शकत नाही.

पहिल्यांदा अडचणींच्या कारणांचा उहापोह केला आहे, त्यांची धारणा, त्यांची तीव्रता, त्याचे शास्त्रीय पध्दतीनुसार विमोचन कसे करावयाचे, त्या विधीबद्दल विवेचन आहे. दीक्षांची आवश्यकता, त्यांचे कार्य, त्यातून पुढील अवस्था कशा प्राप्त करता येतील हे सांगितले आहे.

पारमार्थिक उन्नतीची व्याख्या. दीक्षांबद्दल सविस्तर निवेदन. जीवन जगण्याचे विवेचन पिंड व ब्रम्हांड याचे विवेचन. त्यानंतर उत्पत्ति, स्थिती, लय या अवस्थांचे विवेचन आहे. गुरुपीठ, शक्तिपीठ बद्दलची सांद्र माहिती व विवेचन केले आहे.

एकेक विषय पुनःपुन्हा वाचून नीट समजल्यावर त्याचे मनन करावे. एक विषय आत्मसात करून घेऊन पुढील विषय घ्यावा.म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग सुकर होऊन जन्माचे सार्थक होईल.

ते विषय म्हणजे :-

१. अडचणींचे मूळ कारण असलेले दोष, म्हणजे पांच ऋणानुबंध.

२. त्या पाच ऋणानुबंधांचे विमोचन.तीन पध्दती (१) वंश-विमोचन (२) ऋणमोचन (३) कर्मविमोचन.

३. अडचणींचे निवारण झाल्यावर देहाची शुध्दता होताच, शुध्दतेचे सातत्य राखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाच दीक्षा.

४. गुरुतत्व, गुरूमार्ग, गुरुपीठ, शक्तिपीठ व गुरुमाध्यमाबद्दलचे मार्मिक विवेचनातून केलेला बोध घ्यावा.

५. पिंडी ते ब्रम्हांडी, प्रतिमा, लय-अवस्था याबाबतचा खुलासा शांतपणे पुनःपुन्हा वाचण्याने समजला जाईल. त्यातून जीवाचे तत्व व जन्माचे तत्व कळणे सोपे जाईल.

६. मानवी देहीक माध्यमाला ‘आकार’ देण्यासाठी सिध्द केलेली ॐ कार साधना,बद्दलचा उल्लेख.

काही वचने.

“आपल्या जीवनाचा पाया धार्मिक आचार विचारांच्या भूमिकेवर सुदृढ व्हावा, या सर्व हेतूनी साकार झालेले हे कार्य जगातील दु:खी लोकांच्या जीवनाचा उध्दार करण्यासाठी आहे”.

“समाजात केवळ देवदेवतांचे, धर्माचे भांडवल स्वतःच्या उपजीविकेसाठी निर्माण करून, जो गुरुमार्गाचा भास आज निर्माण होतो आहे, याची यथायोग्य ओळख करून घेऊन, तुम्ही योग्य काय व अयोग्य काय हे ठरवूनच या कार्य पध्दतीचा लाभ घ्यावा”.

“जन्माचे प्रधान कारण म्हणजे जीवनाची सार्थकता करणे”.

“त्यासाठी उच्च धर्म व उच्च जातीत जन्म मिळाला पाहिजे असे नाही व जन्म उच्च धर्म किंवा उच्च जातीत आला म्हणून आपण उच्च आहोत हे भासविणे हेही आज्ञानीपणाचे लक्षण आहे”.

“परंतु गुरुभक्ति ही जितकी चाखण्यास अमृतमय आहे, तितकीच ती आचरणात आणण्यास कर्मकठीण आहे. अशा गुरुभक्तित जेंव्हा तुम्ही विचलित होऊन केवळ आपल्या भक्तिचा आभास निर्माण करता, त्याला कोणत्याही शास्त्रात प्रायःश्चित्त नाही”.

कार्याची निराकरण पध्दती

या कार्यपध्दतीकडे पाहण्याची आपली भूमिका एवढीच आहे की, येथील साधक व नियुक्त सेवक हे केवळ परमपूज्य बाबांचे आपल्याच सारखे भक्त असून, आपल्यापेक्षा त्यांच्यावर परमपूज्य साईबाबांची कृपा अधिक झाली आहे; त्यामुळे हे आपल्या अडीअडचणी निवारण करीत आहेत. अशा ह्या संकुचित विचारांनी, ह्या कार्यपध्दतीने अंगिकारलेले जे लोककल्याणाचे कर्तव्य आहे, त्याची मूलभूत भूमिका आपण भक्तांना माहीत होत नाही व तत्संबंधीची माहिती करून घेण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न केला गेला नाही.

या कार्याची कार्यकेंद्रे आज दिल्ली, पुणे, कराड, पणजी (गोवा), इत्यादी ठिकाणी असून, त्या ठिकाणी या कार्यार्थ स्वतंत्र अशी जागा असून, नित्याने तेथे सकाळ-सायंकाळ पूजा-आरती होत असते. पण नित्याने होणारी पूजाअर्चा यामध्ये आपण भक्त किती सहभागी होता ? जेव्हा ‘कामकाज’ व त्याबद्दलचे दिवस व तारखा जाहीर होतात, तेव्हा ह्या सर्व कार्यकेंद्रावर उठण्या-बसण्याससुध्दा जागा पुरत नाही. पण नित्याच्या उपासनेच्या वेळी बोटावर मोजण्याइतकीच भक्तमंडळी उपस्थित असतात. आज ही कार्यकेंद्रे चालविण्यासाठी होणारा खर्च, याची अपेक्षा तुम्हां भक्तांकडून करण्यात आली नाही. याउलट तुम्ही कुटुंबियमंडळी सुखी व्हावीत हीच अपेक्षा विचारात घेऊन, या कार्यकेंद्राप्रीत्यर्थ होणारा मासिक खर्च करावा लागत आहे, याबाबत कदापिही खेद वाटला नाही. कारण एकदा आपण लोककल्याणाचे कार्य सेवा म्हणून हाती घेतल्यावर, ‘सेवा करणे’ हाच प्रधान विषय असतो. तेव्हा आपण भक्त गरीब अहात वा श्रीमंत आहात, हा विचार करुन निराकरणे होत नाहीत; तसेच आपल्या पै पैशाबद्दल, किंवा प्राप्त झालेल्या सुखाबद्दल अपेक्षाही नाही. या प्रत्येक कार्यकेंद्रावर सकाळी व सायंकाळी पूजाअर्चा विधी करण्याचा जो प्रघात तुम्ही उपस्थित नसलात तरी चालू ठेवला आहे, याचे कारण तुमच्या कल्याणार्थ तर आहेच, परंतु ज्या गुरुस्थानाचा आज आपण कृपाशिर्वाद घेत आहोत, त्याची फेड कर्तव्य म्हणून करावयास हवी, अशी जी शिकवण गुरुकृपाशिर्वादाने मिळाली आहे, तेच व्रत आजपर्यंत चालू ठेवले आहे.

आपण सर्व भक्तभाविक कुटुंबवत्सल जीवन व्यतीत करीत आहात. आजच्या परिस्थितीत तुम्हाला जरी देवाबद्दल, धर्माबद्दल, शुध्द आचारविचाराबद्दल, उपासना साधनेबद्दल, आस्था निर्माण झाली तरी ती करण्यासाठी योग्य जागा, योग्य वेळ, योग्य प्रकारचे वातावरण, योग्य आचारविचार यांचा अभाव असल्यामुळे ती करता येत नाही. अशामुळे साहजिकच नित्याने धर्माचरण व देवतार्जन जे तुमच्या हातून घडणे अत्यावश्यक आहे ते घडत नाही. याबद्दल आस्थापूर्वक विचार करुन, ह्या सर्व कार्यकेंद्रांच्या जागा भाडय़ाने घेण्यात आल्या असून, तेथे सर्व सोयी, म्हणजे स्नानादि विधीपासून आपणास आरती, जपजाप्य, पारायण, प्रार्थना इत्यादी व ती आपल्या वेळेप्रमाणे करण्याची सोय ठेवूनसुध्दा, तुम्हाला त्याचा लाभ करुन घेणे अवघड वाटते. केवळ कार्यार्थ सेवा करावयाची असा जर उद्देश असता, तर ह्या सर्व दिवशी कोणाही भक्ताच्या घरी वास्तव्य करुन हे कार्य करता येण्यासारखे आहे. यासाठी एवढा खर्चिक खटाटोप करावयाचे कारण नाही. आपल्या जीवनातील अडीअडचणी निवारण व्हाव्यात, आपल्या जीवनाचा विकास व्हावा, आपल्या मुलाबाळांना योग्य अशा धर्माचरणाची सवय होऊन, त्यांच्या जीवनाचा पाया धार्मिक आचार- विचारांच्या भूमिकेवर सुदृढ व्हावा, या सर्व हेतूंनी साकार झालेले हे कार्य जगातील दु:खी लोकांच्या जीवनाचा उध्दार करण्यासाठी आहे. ते केवळ ह्या कार्यातील प्रमुख साधक व नियुक्त सेवक यांच्यासाठीच नसून, ते आपल्या सर्वांसाठी आहे. आपण जरी आपल्या अडीअडचणी निवारण व्हाव्यात ह्या भूमिकेतून या कार्याकडे पहात असलात, तरी हे कार्य तुम्हा भक्तांना ‘संकटग्रस्त’ म्हणून संबोधित नाही. कार्यकेंद्रावर आपण उपस्थित झाल्यावर आपल्या सुखदु:खाची विचारणा आदराने व पूज्य भावनेने विचारात घेऊन, तुमच्या ऐहिक व कौटुंबिक अडचणी आपल्याच आहेत, अशा विचाराने श्रीसद्गुरुकृपाशिर्वादाने तुमच्या हिताची ही कार्यपध्दती कार्यान्वित करण्यात आली आहे. या कार्याचा पाया उभारण्यास जरी श्रीसद्गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला आहे, तरी ह्या कार्याचा विशाल विकास आज गेल्या अनेक वर्षात जो झाला आहे, तो आपण भक्तांची ह्या कार्यार्थ जी श्रध्दा आहे, त्याचे प्रतिक व प्रचीती आहे. हा एकप्रकारचा शुभाशिर्वाद असून, जी निष्ठा आपण ह्या कार्यार्थ व्यक्त केलेली आहे, त्याचे विस्मरण कधीही होणारे नाही. यासाठी आपल्याबद्दल आज जो आपलेपणा व आपल्या सुखदु:खात सहभागी होण्याची भूमिका, ज्या कार्याने अवलंबित केली आहे, अशा कार्यार्थ सर्वस्वाने एकरुप होऊन, आपण सर्व भक्तांनी प्राप्त जीवन हे केवळ ऐहिक जीवन म्हणून विचारात न घेता, ‘मला माझ्या जीवनात पारमार्थिक जीवन प्राप्त करण्याचे आद्य कर्तव्य करावयाचे आहे’, हे विसरता कामा नये. आज आपण भक्तांच्या जीवनात आपले आप्त, इष्टमित्र असा सर्व परिवार नित्याने आहे. त्यापैकी कुणालातरी आपल्या जीवनाबद्दल एवढी निरासक्त आसक्ती आहे काय ? याचा जर विचार केला, तर आपणास आपले म्हणून म्हणण्याची ही जी कार्याची निरपेक्ष भूमिका सद्गुरुकृपाशिर्वादपरत्वे अंगिकारलेली आहे, ती तुमच्या जन्मदात्या आईवडिलांप्रमाणे तुमच्या पालनपोषणार्थ नित्याने तुमच्यासमोर हात जोडून उभी आहे. असे असता समाजात केवळ देवदेवतांचे, धर्माचे भांडवल स्वतःच्या उपजीविकेसाठी निर्माण करुन , जो गुरुमार्गाचा भास आज निर्माण होतो आहे, याची यथायोग्य ओळख करुन घेऊन, तुम्ही योग्य काय व अयोग्य काय हे ठरवूनच या कार्यपध्दतीचा लाभ घ्यावा.

या कार्यपध्दतीत केली जाणारी जी निराकरणे देवदेवतांशी संबंधित आहेत, त्यांचा लाभ आपल्याला आपल्या जीवनात कृपाशिर्वाद म्हणून घ्यावयाचा आहे. असा कृपाशिर्वाद आपण घेतल्यावर, त्याचा यथोचित लाभ आपणास कां होत नाही ? याचे कारण आपल्या देहिक माध्यमाच्या बाहेर जी प्रतिकूल वलये आहेत, त्या वलयांची धारणा कुटुंबातील दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या इच्छावासनापरत्वे असते. अशा या इच्छावासना सात पिढीपर्यंतच्या असून, त्या इच्छावासनांची वलये आपण प्राप्त केलेल्या कृपाशिर्वादावर आघात करुन, जीवनात ज्या ऐहिक इच्छा आपण भक्तांच्या असतात, त्या म्हणजे विद्या, संपत्ती, संतती व दीर्घायुष्य; या प्राप्त करण्यासाठी एक तर दीर्घ काल लागेल किंवा ही वलये विमोचित करण्याचे साधन जर आपल्याला प्राप्त झाले नाही, तर ह्या अपेक्षा आपल्या हयातीत पूर्ण होत नाहीत. अशी ही जी क्रिया वातावरणातून इच्छा-वासनेच्या रुपाने आपल्या देहाशी एकरुप होत असते, ती वलये तुमच्या जीवनापासून मुक्त करुन, घराण्यातील ज्या व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत व ज्यांच्या इच्छावासना इहजगताशी वलय रुपाने कार्य करीत आहेत; अशी ही वलये विमोचित करणे व मुक्तावस्थेस किंवा उच्चावस्थेस न गेलेले मृतात्मे यांना सद्गती देण्याचे जे साधन या कार्यपध्दतीत आहे त्यास ‘वंशविमोचन’ असे म्हणतात.

वंशविमोचन हा शब्द उच्चारल्यावर आपल्याला अर्थ एवढाच लागतो की, आपल्या जीवनातील व घराण्यातील जे दोष आहेत, त्यांचे विमोचन सद्गुरुंनी करुन द्यावे. असा अर्थ सूज्ञपणाने आपण लावला तरी हे साधन प्रथमतः प्राप्त करणे हेच साधक अवस्थेतील साधकाला अत्यंत कठीण आहे.

याशिवाय हे साधन जरी प्राप्त करता आले, तरी त्याचा लाभ जगातील सर्वांना देण्यासाठी व जीवनांत जे दोष आहेत त्यांचे निवारण होण्यासाठी साधकाला फार कष्ट आहेत. या कार्यपध्दतीत दरवर्षी हा जो विधी करण्यात येतो त्याचा लाभ आपणास सहजासहजी घेता येत आहे; म्हणून हे साधन सोपे आहे असे समजू नये. या कार्यपध्दतीत हे साधन व त्याची प्राप्ती जी गुरुकृपाशिर्वादाने झाली आहे, तत्पूर्वी अशा दोषांच्या निवारणार्थ काही साधने नव्हती काय ? तर आजही अशा दोषांपासून तुमच्या कुटुंबियांना मुक्त करण्यासाठी धर्मशास्त्राप्रमाणे काही विधी सांगितलेले आहेत. ते म्हणजे होमहवन, जपजाप्य, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, याशिवाय नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, बाजपेय यज्ञ, त्रिपिंडी, नागबळी, याशिवाय पिंपळाला प्रदक्षिणा, औदुंबराला प्रदक्षिणा किंवा काही दानधर्म; पण ही सर्व धर्मकृत्य विधी म्हणून करण्यात येतात. जीवनातील दोषनिवारणार्थ जेव्हा गुरुकृपाशिर्वादाची प्राप्ती होत असते, त्या साधनांनी व शास्त्राने सांगितलेला विधी यामध्ये जमीन अस्मानाएवढा फरक आहे. दोषनिवारणार्थ जेव्हा गुरुकृपाशिर्वादाची प्राप्ती होत असते, त्या साधनांत गुरुसामर्थ्याचा समावेश असतो. म्हणजे हे साधन एखाद्या अस्त्र किंवा शस्त्र याप्रमाणे प्रभावी असते. जेव्हा हे साधन म्हणजेच सद्गुरुंची शक्ति दोषनिवारणार्थ कार्य करते, तेव्हा ह्या दोषांची वलये तात्काळ दूर होतात. पण जो विधी आपण वैयक्तिकरीत्या करता तो धार्मिक विधी करीत असताना प्रथमतः या दोषांचा उच्चार संकल्पविधीने करावा लागतो. वास्तविक कोठलाही धार्मिक विधी हा संकल्पयुक्त करावा लागतो असे शास्त्र आहे; हे जरी खरे तरी जे दोष वलयरुपाने आहेत पण जे माध्यमात धारण झालेले नाहीत, अशांचा देहमाध्यमातून वाणीद्वारा जेव्हा उच्चार केला जातो, तेव्हा ही वलये जी देहाबाहेर असतात ती देहाशी एकरुप होतात. अशासाठी दोषनिवारणार्थ जेव्हा आपण एखादा धार्मिक विधी करतो, तेव्हा दोषांचा उच्चार वाणीने करु नये. कारण जेव्हा तुम्ही विधी करावयास बसता, तत्पूर्वी ह्या प्रखर दोषांचे दुष्परिणाम तुम्ही आपल्या जीवनात पूर्वी अनुभवलेले असतात. असे असताना त्याचा जेव्हा वाणीमाध्यमातून उच्चार करता, तेव्हा ह्या दोषांपैकी अर्धेअधिक दोष हे तुमच्या देहिक माध्यमाशी एकरुप होतात. दोषनिवारणार्थ उच्चारलेल्या संकल्पानंतर ह्या दोषनिवारणार्थ ज्या इष्टदेवता आवश्यक आहेत त्यांची स्थापना करण्यात येऊन, पूजनादि विधी झाल्यावर, प्रधान कृत्यास म्हणजे होमहवनास सुरुवात होते. शास्त्रपरत्वे होमहवनादि विधी होऊन, जरी पूर्णाहुतीचा संकल्प पुरा झाला, तरी या विधीपरत्वे तुमच्या जीवनातील दोषापैकी फक्त पन्नास टक्के दोष जे तुमच्या बाहेर वातावरणात आहेत, त्यांचे विमोचन होते. पण या विधीला आरंभ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वाणीने तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल जो उच्चार केलात, त्यामुळे ते पन्नास टक्के दोष तुमच्या माध्यमांमध्ये शिल्लक राहून, हे राहिलेले दोष जर तुम्हाला कळले नाहीत, तर केला गेलेला जो विधी आहे, त्याचे फळ फक्त पन्नास टक्के मिळून, राहिलेले पन्नास टक्के दोष तुमच्या घराण्यातील भावी पिढ्यांच्या जीवनात पुनश्च कर्म करण्यासाठी कार्यान्वित होतात. तोपर्यंतच्या काळात पुन्हा एका पिढी नंतर कुणी व्यक्ती दिवंगत होऊन पुन्हा वातावरणात पितृत्रयी म्हणजे पिता, पितामह व प्रपितामह व मातृत्रयी ही निर्माण होते. असे हे दोषांचे कार्य कालपरत्त्वे अबाधित राहून, तुमच्या घराण्याचा जो ऱहास होतो तो पिढ्यानपिढ्या राहून एक पिढी अशी जन्मास येते की, ना विद्या, ना संपत्ती, ना संतती ! अशासाठी या कार्यपद्धतीत हा विधी गुरूद्वारा करण्यात येतो. कारण हा विधी करण्याचा अधिकार गुरुंना दिल्यावर, ही वलये गुरुंच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या वाणीतून जरी असा दोषांचा उच्चार झाला तरी गुरुमाध्यमापासून दूर राहतात. म्हणजे शंभर टक्के वलये तुमच्या माध्यमाबाहेर राहून, कृपाशिर्वादार्थ हा जो विधी केला आहे त्याचा लाभ आपल्याला आज ना उद्या शंभर टक्के होत असतो.

हा विधी करण्यासंबंधी पूर्वीच्या शास्त्रपरत्त्वे असे सांगण्यात आले आहे की, हे विधी जर राहत्या जागेमध्ये करण्यात आले तर आपण राहात असलेल्या जागेची वास्तू दुषित होते. व जर कुणी अज्ञानाने हा विधी आपल्या राहत्या वास्तूत केला तर पुनश्च त्या राहत्या जागेची वास्तुशांत करावयास हवी. ह्यासाठी पूर्वीच्या शास्त्रांनी हे विधी करण्यासाठी जी तीर्थक्षेत्रे सांगितली आहेत ती म्हणजे रामेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, नरसोबाची वाडी, त्र्यंबकेश्वर, मध्यप्रदेशात ॐकारेश्वर, उत्तरभारतात प्रयाग, काशी, गया आदि ठिकाणीच हा विमोचनाचा विधी वैदिक व याज्ञीक अशा गुरुजनांच्या कडून करून घ्यावयास हवा.

हा विधी व्यक्तिगत कुटुंबाला करण्यास बराच खर्च व प्रवास खर्च सोसावा लागतो. तरीसुद्धा हा विधी पूर्णतः हितकारक होईल असे कोणास निश्चित सांगता येत नाही. हा विधी कुटुंबकल्याणाच्या हिताचा असल्याने तो करण्याकडे दुर्लक्षही करून चालत नाही. यासाठी गुरुमार्गात सद्गुरुकृपाशिर्वादाने त्याची तरतूद झाली आहे म्हटल्यानंतर प्रत्येक भक्तभाविकाने याचा आस्थापूर्वक विचार करून दरवर्षी करण्यात येणाऱ्या या विधीत सहभागी व्हावे. हे साधन प्राप्त करणे किती असाध्य आहे याबद्दल चार शब्द वर लिहिलेलेच आहेत. या वर्षी परमपूज्य बाबांच्या आज्ञेप्रमाणे श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे हे हवनविधी जे यथासांग करण्यात आले होते, त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या वेद-वैदिकांनासुद्धां या विधीबाबत आश्चर्य वाटले. ह्या विधीची सांगता झाल्यावर न कळत त्यांच्या वाणीतून असा उच्चार निघाला की, ‘लोककल्याणाच्या हितार्थ इतके प्रखर साधन प्राप्त करून आपल्या भक्तांच्या भवितव्याची तरतूद आज तरी कलियुगात कुणी केली आहे असे आम्हास वाटत नाही.’ हा अभिमान व्यक्तिगत नसून, या कार्याला लाभलेला हा जो गुरुकृपाशिर्वाद आहे त्या कार्याचा हा अभिमान आहे, असे मनमोकळेपणे सांगण्यास अभिमान वाटतो.

हा विधी व तो करण्यामागील सद्हेतू आपण भक्तभाविकांना वर निवेदन केलाच आहे. ह्या विधीत भाग घेतल्यावर कार्यपद्धतितील मार्गदर्शनाप्रमाणे सर्व भक्तभाविकांना असे सांगण्यात येते की, दरवर्षी भाद्रपदात जो पितृपक्ष येतो, त्यावेळी कोणत्याही तिथीला किंवा सर्वपित्री अमावास्येला श्राद्धपक्षादि करू नका. पण या मागील सद्हेतू अनेकजणांना अजूनतरी परिचित झाला आहे असे वाटत नाही. तुमच्या घराण्यातील सात पिढीतील दिवंगत व्यक्ती इहजगताशी आपल्या इच्छावासनांपरत्त्वे व ऋणानुबंधपरत्त्वे हितसंबंध जोडून आपल्या इच्छावासनांचीच केवळ पूर्तता करीत असतात असे नव्हे, तर त्यांची जी मरणोत्तर जीवनानंतर प्राप्त झालेली अवस्था आहे, त्या अवस्थेपरत्त्वे त्यांच्या इच्छावासनांमधून निर्माण झालेली वलये यांचा समावेश तुमच्या जीवनामध्ये होऊन, तुमचेही काया-वाचा-मन हे दूषित होते. म्हणजे केवळ त्यांच्या ज्या इच्छावासना ह्या इहजगताशी आहेत, त्यांचेच विमोचन होते असे नव्हे, तर ज्या वासनायुक्त अवस्थेत ते असतात, त्यांना उत्तम लोक प्राप्त करून देण्यासाठी हा वंशविमोचन विधी होतो. त्यानंतर त्यांच्या स्थिती अवस्थेत स्थित्यंतर होऊन ते उत्तम लोक प्राप्त करते होतात. अशावेळी पुनश्च आपण या दिवंगत व्यक्तींच्या ऋणानुबंधात आहोत असे मानून श्राद्धपक्षादि विधी केले, तर वंशविमोचनानंतर प्राप्त झालेली उत्तमावस्था यापासून या दिवंगत व्यक्तींना तुम्ही पुनश्च कनिष्ठ अशा अवस्थेमध्ये आवाहन करता. अशा आवाहनामुळे जरी वंशविमोचनविधीपरत्त्वे त्यांना उत्तमलोक प्राप्त झाला असला तरी, वार्षिक श्राद्धपक्ष काळात तुम्ही त्यांना जे आवाहन पिंडदान करून करता, त्यामुळे पुन्हा त्यांना उत्तम अवस्थेत सहजासहजी जाता येत नाही.

वरील प्रकार धार्मिक आहे म्हणून तो ‘श्राध्दपक्ष’ या नांवाने संबोधला जातो. तसाच प्रकार जो आज समाजात ‘प्लँचेट’ या नांवाने संबोधला जातो, त्यामध्ये आपल्या अडीअडचणी व त्यासंबंधीची प्रश्नोत्तरे विचारण्यासाठी मृतात्म्यांना आवाहन करुन बोलविले जाते. हे प्लँचेट करण्यास जरी आजूबाजूच्या लोकांना गंमत वाटत असली, तरी ज्या व्यक्ती हे करण्यास उपस्थित असतात, त्या मध्ये एखादी व्यक्ती अशी असते की, तिचे देहिक माध्यम ह्या मृतात्म्यांना प्रवेश करण्यास खूपच अनुकूल असते. अशा अनुकूल असणाऱ्या माध्यमाच्या ठिकाणी हा मृतात्मा प्रकट झाल्यावर, ज्या व्यक्तीत तो प्रकट होतो त्या व्यक्तीची इच्छित जीवनाची अपेक्षा कार्यान्वित होण्यास याचा अडथळा निर्माण होतो. एवढेच नव्हे तर ज्या कोणी मृतात्म्याला मरण प्राप्त होण्यापूर्वी जी व्याधि, जो रोग,जो आजार झाला असेल, त्याच प्रकारची व्यथा या माध्यमाला प्लँचेटमुळे होते. असा आजार झाल्यावर जरी आपण डॉक्टरी सल्ला घेतला व वैयक्तिक तपासणी केलीत, तरी झालेल्या मूळ रोगाचे परीक्षण डॉक्टरांनाही करता येत नाही. अशामुळे आपला पैसा अनाठायी खर्च होतो एवढेच नव्हे तर शारिरीक हानी सुध्दा होते.

प्रत्येक मानवाला भूत-भविष्य काळ हा त्याच्या कर्मपरत्वे असतो व तो कर्माधिन असल्यामुळे त्याचे कार्य हे कर्मपरत्वेच होत असते. अशावेळी कर्मबंधनामुळे एखादी इच्छा अनुकूल करुन घेणे जेव्हा अवघड होईल, तेव्हां ते प्रतिकूल कर्म अनुकूल करून देण्याचे सामर्थ्य पूजनादि विधीत किंवा साधकाच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. याउलट तुम्ही वेगळ्या मार्गाने प्लँचेटवर या मृतात्म्यांना बोलावून जे आपल्या आयुष्याला ‘भूत’ आहेत अशांना प्रश्न विचारता. परंतु त्यांनाही जन्मप्राप्तीचेवेळी याच भूत – भविष्यकाळातून जावे लागले असल्याने, त्यांनाही कर्मपरत्त्वे दु:ख भोगावे लागत होते. तेव्हा सूज्ञपणे असा विचार करा की, ज्याचे सामर्थ्य किंवा अधिकार भूत भविष्य बदलण्याचा आहे, तोच तुमच्या अडचणींचे निवारण करू शकतो. अन्यथा या मृतात्म्यांना विचारलेल्या प्रश्नांची साक्ष म्हणजे सुख – शांति ही तर प्राप्त होत नाहीच, किंबहुना त्यांच्या इहलोकावर येण्याने तुमचे देहिक माध्यम ते त्यांचे वास्तव्यस्थान होऊन, तुम्ही आपल्या बहुमोल अशा आयुष्याचा नाश करण्यास कारणीभूत होता. तरी श्रद्धेने आपण ज्या श्राद्धपक्ष विधीचा समावेश धार्मिक विधी म्हणून आपल्या जीवनात करता, हा विधी म्हणजे प्लँचेटप्रमाणेच एक प्रकार आहे. असा हा विधी एका दोषापासून तुम्हाला मुक्त करून दुसऱ्या दोषाची निर्मिती करतो. अशा दोषाला विधी म्हणून म्हणता येईल काय ? यासाठी या कार्यपद्धतीकडे सखोल अभ्यासाने व शास्त्रशुद्धपद्धतीने या दोषपरिहारार्थ जे साधन ‘वंशविमोचन’ म्हणून प्राप्त झालेले आहे, असे अमोलिक साधन अन्य ठिकाणी तुम्हाला अनुभविण्यास मिळणार नाही.

या वर्षी दुसरा एक महत्त्वाचा विधी प्रथमतः या कार्यपद्धतीत करण्यात आला; त्या विधीस ‘ऋणमोचन विधी’ असे म्हणतात. हा विधी वंशविमोचन विधी इतका सोपा व सुलभ असा नाही. यासाठी साधक माध्यमाच्या ठिकाणी हा विधी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपली दैविक शक्ति ही काही काळ जतन करून ठेवावी लागते. कारण हा जो ऋणमोचन विधी आहे तो प्राप्त जन्मांत ज्या देहिक माध्यमातून आपण जीवन व्यतीत करतो त्या देहात जे पाच ऋणानुबंध म्हणजे जन्मकर्म, जन्मजन्मांतर, इतरेजन, मातृपितृ व देवादिक असे असतात त्यांच्याशी संबंधित आहे. हे ऋणानुबंध अनेकवेळा एकमेकांस अनुकूल – प्रतिकूल असे असतात. त्यामुळे तुम्ही जीवन व्यतीत करीत असताना तुमच्या कुटुंबाबद्दल ज्या काही इच्छा अपेक्षा असतात त्यांची फलप्राप्ती होण्यास हे ऋणानुबंध अडथळा निर्माण करतात. त्यांचे ऋणमोचन करावयाचे म्हणजे त्या ऋणानुबंधांना एकमेकांशी अनुकूल करून देऊन, त्याशिवाय जन्मजन्मांतरपरत्त्वे या ऋणानुबंधामुळे जर काही दोष प्राप्त जीवनात इतरांच्या जीवनाकडे पाहून निर्माण केले असतील, तर ते दोषही विमोचित करावयाचे असतात.

या पुढील महत्त्वाचे निवेदन म्हणजे तुम्ही ज्ञान – अज्ञानाने जे श्राद्धपक्षादि विधी करीत होता त्याबद्दल असून, आपण भक्तांना उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा व कारण दीक्षा अशांचा लाभ गुरुकृपेने झाल्यावर, पुढील काळात तुम्ही श्राद्धपक्षादि विधी व त्याच प्रमाणे तीर्थक्षेत्री घराण्याच्या दिवंगत व्यक्तींना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून श्राद्ध, त्रिपिंडी, नारायण-नागबळी आदि विधी करू नयेत, असे सूचीत करण्यामागील कारण योग्यप्रकारे आपण भक्तांनी विचारात घेतले नाही. असे सुचविण्याचे प्रधान कारण म्हणजे ह्या तुमच्या घराण्याच्या दिवंगत व्यक्तींना मरणोत्तर जीवनानंतर सद्गती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य ह्या श्राद्धपक्षविधींमध्ये नाही. श्राद्ध या शब्दामध्ये मूळ शब्द ‘श्रद्धा’ असा असून ज्या घराण्यातील व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत व ज्यांच्या ऋणानुबंधातील हितसंबंधाने आपण जन्माला आलो आहोत, त्या व्यक्तींच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचे कर्तव्य आपण भक्तांस करावयाचे असते. अशी त्यांच्या बद्दल उतराई होण्याची श्रद्धा जर आपण भक्त वर्षानुवर्षे श्राद्धपक्षादिविधी करून पिंडदान देण्याने व्यक्त करीत असाल, तर अनेक कालपर्यंत हे विधी करूनही ह्या तुमच्या घराण्याच्या दिवंगत व्यक्ती सद्गती प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. म्हणून आपण भक्त जेव्हा अडीअडचणींच्या कारणपरत्त्वे प्रश्नार्थ ह्या गुरुमार्गाकडे आलात, त्यावेळी प्रथमतःच तुम्हा भक्तांना कारण दीक्षा देण्यात आली नाही. याचे कारण तुम्हा भक्तांना प्राप्त जीवनात प्रापंचिक कर्तव्याची पूर्तता व जीवनाची सार्थकता करावयाची आहे व ज्या कारण दीक्षेपरत्त्वे हे दोन उद्देश आपण भक्त प्राप्त करून घेणार आहात, अशा कर्तव्याआड प्राप्त जीवनातील अन्य कोणतेही कारण येऊ नये, अशासाठी आपण भक्तांच्या कल्याणार्थ व हितार्थ वंशविमोचन, कर्मविमोचन व ऋणमोचन हे विधी कारण दीक्षेपूर्वी करण्यात आले. ते एवढ्याचसाठी की, जन्माचे प्रधान कारण म्हणजे जीवनाची सार्थकता करणे, हे कारण ज्या कारण दीक्षेपरत्त्वे सिद्ध होते, अशा कारण दीक्षेच्या आड तुम्हा भक्तांच्या जीवनातील किंवा कुटुंबातील कोणतेही अन्य कारण येऊ नये, अशी तुम्हा भक्तांच्या कल्याणाची योजना व सार्थकता ज्या उपासनेत आहे त्याच उपासनेला कारण दीक्षा असे म्हटले आहे.

अशा प्रकारची तरतूद आपण भक्तांच्या जीवनात गुरुकृपाशिर्वादाने केली आहे. त्यामुळे आपण असे म्हणाल की, जर आम्हा भक्तांच्या प्राप्त जीवनात निरंतर सुख – शांति – समाधान ह्याची गुरुकृपाशिर्वादाने तरतुद झाली आहे, तर वेळीअवेळी दु:ख तथा अशांतता का निर्माण होते ? तर याला महत्त्वाचे कारण म्हणजे असे की, जरी श्रीसद्गुरुंनी कृपावंत होऊन आम्हा भक्तांच्या कल्याणार्थ कृपाशिर्वाद दिला आहे, तरी त्या कृपाशिर्वादाशी आपण एकनिष्ठ राहून, प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादपरत्त्वेच आपल्या जीवनाचे सार्थक होणार आहे, अशी श्रद्धा आपण भक्त निर्माण करीत नाही. दुसरे कारण ज्ञान-अज्ञानाने नवससायास करून, काही अधिक सुखाची प्राप्ती लवकर होते काय ? याचाही अंदाज तुम्ही करते होता. त्याशिवाय जे श्राद्धपक्षादि विधी करू नका, कारण ह्या विधी ऐवजी तुमचे वंशविमोचनादि विधी केले आहेत, असे सूचित करूनही जेव्हा आपण हे विधी करता, अशा वेळी त्या दिवंगत व्यक्तींचा उच्चार ह्या श्राद्धपक्षादि विधीत पितृत्रयी किंवा मातृत्रयी म्हणून होत असतो, अशांना वंशविमोचनादि विधीपरत्त्वे सद्गती प्राप्त झाली आहे, हे जाणण्याचे सामर्थ्य तुम्हा भक्तांमध्ये नाही. म्हणून ह्या व्यक्तींना सद्गती प्राप्त व्हावी अशी इच्छा ठेवून तुम्ही जेव्हा हे विधी करता, अशा वेळी ते ह्या तुमच्या आवाहनाचा स्वीकार करू शकत नाहीत. त्यांच्याऐवजी अशा दिवंगत व्यक्ती की ज्यांना सद्गती प्राप्त झाली नाही, जे मरणोत्तर जीवनानंतर त्यांच्या इच्छावासनेपरत्त्वे इहजगताशी हितसबंधित आहेत व ज्यांचा तुमच्या कुटुंबाशी काहीही हितसंबंध नाही, असे मृतात्मे सद्गती प्राप्त करून घेण्यासाठी ह्या आवाहनाचा स्वीकार करून श्राद्धपक्षास उपस्थित राहतात व हे विधी तुम्हाकरवी झाल्यावर ते अदृश्यरुपाने तुमच्याच जीवनपरिसरात वावरत राहतात. ह्या कारणपरत्त्वे तुम्हास तुमच्या कुटुंबात दु:ख तथा अशांतता जाणवत असते. पण आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करून जीवनात कारण नसताना काय दु:ख किंवा अशांतता निर्माण करते झालो आहेत, याचा बोध करून न घेता, श्रीगुरुंनी जो कृपाशिर्वाद दिला आहे त्यातच काही अडथळा आहे, अशी अश्रद्धा तुम्ही निर्माण करता. गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आपण भक्तांचे जीवन गुरुरूप व्हावे अशी जर आपली खरोखर तळमळ व इच्छा असेल, तर आपण गुरुमार्गाशी इतके एकनिष्ठ व्हावयास पाहिजे की, जरी प्रतिपरमेश्वर आपणापुढे येऊन उभा राहिला व आपणास विचारता झाला की, “काय पाहिजे तो वर मागून घे”; तर तुमच्या मुखातून हेच उत्तर यावयास पाहिजे की, “मला काय पाहिजे व काय नको हे जाणण्याचे सामर्थ्य माझ्या गुरुंचे आहे व ते देतील त्यातच माझे निरंतर कल्याण आहे !” इतकी ठाम निश्चयी भूमिका जर श्रद्धाभक्तिपरत्त्वे तुम्ही भक्त जीवनात निर्माण कराल, तर प्राप्त जीवनात सुख-शांतिची अपेक्षा करण्याऐवजी, ‘माझ्या प्राप्त जीवनाचे सार्थक कशात व कोणत्या मार्गपरत्त्वे आहे ?’ अशीच विचारणा सदैव गुरुसन्निध बसून कराल.

अशा अवस्थेत जरी आपल्याला व्यक्तीशः ह्या साधनेतून पारमार्थिक अवस्थेचा लाभ झाला, तरी ज्या प्रापंचिक कर्तव्यार्थ आपण जन्माला आलो त्या कर्तव्याची पूर्तता करण्यास आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. साधन अवस्थेनंतर प्राप्त झालेल्या साधक अवस्थेमुळे जो काही महत्त्वाचा लाभ ह्या जीवनात होतो तो असा की, पूर्वी आपली प्रापंचिक कर्तव्ये ही करीत असताना ती कर्तव्ये निर्विघ्नपणे आपणास करता येत नव्हती. पण जेव्हा साधक अवस्थेत तुम्ही आपले काया-वाचा-मन साधनेशी एकरूप करता, तेव्हा हे देहिक माध्यम तुमच्या नित्य साधनेने ‘साधनामय’ होते. पण त्यामुळे तुमची प्रापंचिक कर्तव्ये ही निर्विघ्नपणे जरी तुम्हाला करता येऊ लागली, तरी ती कर्तव्ये पार पाडण्याचे कर्तव्य हे अंगिकारलेल्या देवादिकांच्या किंवा गुरुकृपाशिर्वादाच्या साधनेला करावयास भाग पाडू नये. कारण अशा त्या प्रापंचिक कर्तव्यार्थ नित्याने केलेली सेवा ही जर खर्ची पडेल, तर पुढील महत्त्वाची अवस्था म्हणजे साध्य अवस्था, ही अनेक जन्मपर्यंत मार्गदर्शन होऊनही साध्य होणार नाही.

वरील तीन अवस्था म्हणजे साधक – सिद्ध – साध्य ह्या प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट विचारात घेऊन अनेक साधक अनेक कालपर्यंत आपल्या इच्छेप्रमाणे देवादिकांच्या भिन्नाभिन्न उपासनांचा किंवा सेवेचा अंगिकार करतात. पण असा अंगिकार करूनही जेव्हा जीवनात अंशमात्रही या मार्गाचा बोध होत नाही, अशा वेळेला निराशेने आपल्या जीनाबद्दल विपरित अशी अनुमाने काढावयास सुरुवात होते. पण या मार्गारंभी प्रथमतः आपणास जे साधन करावयाचे आहे, त्याबद्दलची शास्त्रीय मीमांसा आपण भक्त मार्गदर्शन म्हणून कोणा अधिकारी व्यक्तीकडून समजावून घेत नाही. याशिवाय ज्या काया – वाचा – मनाने ही साधना करावयाची, त्या काया – वाचा – मनाचे हितसंबंध अनेक जन्मपरत्त्वे ज्या ऋणानुबंधाशी हितसंबंधित असतात, त्या ऋणानुबंधाची मुक्तता म्हणजे विमोचन हे जे अत्यावश्यक आहे, असे विमोचन गुरुकृपाशिर्वादानेच ह्या जीवनामध्ये विमोचनादि विधी करून, जर ह्या तीन साधनांचा अंगिकार केला, तरच प्राप्त जीवनात पारमार्थिक अवस्थेचा लाभ होतो.

आम्हा मानवांना इहजगतामध्ये जो जन्म पूर्वीच्या जन्मकर्म व जन्म-जन्मांतरपरत्त्वे प्राप्त होत असतो, अशा पूर्वीच्या जन्मकर्म व जन्मजन्मांतरात ज्ञानअज्ञानाने घडलेल्या पातक-प्रमादातील प्रखरतेपरत्त्वे पुनश्च जन्मप्राप्तीच्यावेळी या दोषांचे पूनर्जीवन होऊन ते यथोचित तऱहेने विमोचित होतील असा सारासार विचार जन्मजन्मांतराच्या ठिकाणी जन्मप्राप्तीपूर्वी निर्माण होतो व विचारपरत्वे जन्मप्राप्तीसाठी धर्म, जातपात इत्यादि विचारात न घेऊन, हे जन्मजन्मांतर आपल्याला प्राप्त कर्तव्य व प्रप्त झालेल्या जन्मातील दोष सुलभपणे विमोचित करता येतील अशा ठिकाणी जन्म घेण्यास कारणीभूत होते. ही जन्मजन्मांतरातील जन्मप्राप्तीसंबंधीची भिन्नाभिन्न अवस्था आपल्या वाचनात येत नसल्याने आपण ज्या धर्मात, ज्या जातीत, ज्या कुळात जन्म घेते झालो आहोत त्याचीच पूज्यता, श्रेष्ठता मानणे म्हणजे मोठेपणा प्राप्त झाला असे जे समजतो तसे नसून, प्राप्त झालेल्या जन्मपरत्वे कोणताही धर्म, कोणतीही जात, कोणतेही कुटुंब हे जन्मप्राप्तीसाठी सुलभ पणे प्राप्त झाले तरी प्राप्त जन्मात या जन्माचे सार्थक करण्याचे कर्तव्य करता येणे शक्य आहे. त्यासाठी उच्च धर्म व उच्च जातीत जन्म मिळाला पाहिजे असे नाही व जन्म उच्च धर्म किंवा उच्च जातीत आला म्हणून आपण उच्च आहोत हे भासविणे हेही अज्ञानीपणाचे लक्षण आहे.

आता ह्या हितसंबंधात जन्म प्राप्त झाल्यावर, प्राप्त जन्म ज्या धर्म, जात, कुळपरत्वे झाला आहे, त्याचा आस्थापूर्वक विचार करुन, त्या धर्मपरत्वे करावी लागणारी प्राप्त जन्मातील कर्तव्ये ही यथायोग्य तऱहेने करुन प्राप्त जन्माचे जे सार्थक केले पाहिजे, हे कर्तव्य सुज्ञ लोक विसरुन, इतर धर्मातील, इतर जातीतील, इतर कुटुंबातील व्यक्तींना प्राप्त झालेल्या सुख-शांति आदीचा लाभ आपल्याला झाला नाही म्हणून, ‘तसा जन्म आपल्याला प्राप्त झाला असता, तर अधिक सुखी झालो असतो;’ अशी वैचारिक खंत सतत बाळगत असल्याने ऋणानुबंधामध्ये कमतरता निर्माण होऊन, हे ऋणानुबंध अशा विचारपरत्वे विकसित न होऊन, कर्तव्यपूर्ततेच्या आड येण्याने अधिकच दु:खे निर्माण करण्यास कारणीभूत होतात.

जन्मकर्म ऋणानुबंध :- आपल्याला जन्मकर्मपरत्वे अन्न, वस्त्र, निवारा व तोही गरजेपेक्षा अधिक प्राप्त होऊनही त्या प्राप्त सुखात कसा आनंद मानता येईल, याचा विचार न करता जेव्हा तुम्ही आपल्यापेक्षा इतरांना जे सुख प्राप्त झालेले आहे त्यामुळे मोहित होऊन, आपल्याला प्राप्त झालेल्या सुख-समाधानाचा अनादर करता, तेव्हा मनाने असंतुष्ट असण्याची जी देहिक स्थिती कारण नसताना तुम्ही निर्माण करता, असे हे सुख प्राप्त होऊनसुध्दा सुखांत आनंद न मानण्यात जो दोष तुम्ही निर्माण करता, हाच दोष पुढे पुनश्च जन्मप्राप्तीच्यावेळी जन्मकर्मांत सामावला जातो व त्यावेळी हा दोष पुनश्च कार्यान्वित होऊन, जरी तुम्हाला सुख-शांति-समाधान प्राप्त झाले तरी त्या सुखाचा लाभ होऊ देत नाहि.

जन्मजन्मांतर ऋणानुबंध :- आज आपणास जो जन्म प्राप्त झाला आहे तो भिन्नाभिन्न ज्ञातीत, धर्मात असा असेल; पण असा जन्म प्राप्त झाल्यावरसुध्दा आपल्याला प्राप्त जन्माचे समाधान नसते, वेळोवेळी जेव्हा आपण जन्माला येतो, तत्पूर्वीच परमेश्वराने आपल्याला जन्मप्राप्तीनंतर कोणता धर्म, कोणती जात आपणास प्राप्त जन्माचे सार्थक होण्यासाठी योग्य आहे, हा विचार करुनच जन्म दिला आहे. तरीसुध्दा या जन्माबद्दल आपल्याला आदर न वाटून, आपण आपल्या सभोवार असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या जीवनातील सुख, शांति, संपत्ती, संतती पाहून, ‘मला अशांच्या पोटी जन्म आला असता तर मी किती भाग्यवान झालो असतो,’ असे उद्गार काढतो. वास्तविक तसा जन्म जर तुमच्या हितार्थ असता, तर तो जन्म परमेश्वराने नःसंकोच दिला असता. आता प्राप्त जन्माबद्दल अनादर करुन, दुसऱ्याचा जन्म अधिक चांगला आहे या चिंतनात बसून, ज्या चिंता आपण निर्माण करता, या चिंता पुढील जन्मात जन्मजन्मांतरात येऊन, पुनश्च जेव्हा आपण जन्माला येता त्यावेळी जरी सुख, शांति, संपत्ती, संतती आदि प्राप्त झाली, तरी सदैव आपण चिंताक्रांत असता. आनंदाच्या प्रसंगीही आपण चिंतेतच, संकटप्रसंगीही चिंतेतच व चिंताप्रसंगीही चिंतेतच. !

इतरेजन ऋणानुबंध :- आज जगतात आपण जन्माला आल्यावर आपणच या जगतात एकटे आहोत असे नाही. जेव्हा जीवनात प्रौढ अवस्था प्राप्त होते, त्यानंतर आपला जीवनाचा परिचय आपल्याशिवाय इतर अनेक व्यक्तींशी या जगतात होऊन, आपणही त्यांच्याशी इतरेजन असे होतो. अशा जीवनामध्ये आपल्याशी परिचित झालेले इतरेजन यांच्याशी तुमचे काही काळ प्रेमाचे हितसंबंध येतात व पुढे काही कारणापरत्वे ते दुरावले जातात. दुरावलेले हितसंबंध ज्या प्रसंगपरत्वे दुरावले त्या प्रसंगपरत्वे त्या व्यक्तींना आपण विसरून जाणे आपले कर्तव्य असते. ते दुरावण्यापूर्वी त्यांच्यासमवेत जे आनंदाचे सुखद क्षण आपण वेचलेले असतात, त्यांचे स्मरण आपल्याला चुकूनही होत नाही. पण ते दुरावल्यावर जन्मभर आपण त्यांच्याबद्दल अनादर, अपशब्द व अवहेलना करीत रहात असतो. अशाच दोषांमुळे पुनश्च जेव्हा तुम्ही जन्म प्राप्त करता, तेव्हा हे दोष इतरांकडे न जाता तुमच्या कुटुंबात तुम्हाला असे हानीकारक होतात की, जन्मदात्या आईवडिलांबद्दल, भावाबहिणीबद्दल प्रेम न वाटता, त्याच्या परस्परविरोधी विचार निर्माण होऊन संपूर्ण कुटुंब विस्कळीत होण्यास कारणीभूत होतात. यालाच भाऊबंदकीचे नाटक असे म्हटले आहे.

मातृपितृ ऋणानुबंध :- आज समाजात वडील व्यक्ती म्हणजे आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, उपासनेने वडील व साधना मार्गाने किंवा लोककल्याणाच्या सेवेत आपल्या जीवनाचा त्याग करुन लोकांचे हित व्हावे अशा योग्य विचाराने जे कोणी आयुष्य व्यतीत करीत आहेत अशा सर्वाबद्दल आदरभाव, पूज्यता व नम्रता असावयास पाहिजे. याउलट प्रौढ झाल्यावर आपले हात ज्ञानाने, संपत्तीने स्वर्गाला टेकले आहेत असा व्यर्थ गर्व निर्माण करुन, अशा वडील असलेल्या व्यक्तींची निर्भत्सना, अनादर इत्यादि आपण करीत राहतो. ह्या जीवनात आपल्याला विद्या व पै-पैसा इतरांपेक्षा अधिक प्राप्त झाला आहे, हा गर्व होऊन आपण आपल्यापेक्षा ज्यांना कमी-अधिक प्रमाणामध्ये ही सर्व सुखे प्राप्त झाली आहेत, अशांकडे तुच्छतेने पाहतो. वास्तविक हा दोष जरी देहामध्ये नसला, तरी जीवन व्यतीत करण्यासाठी जी साधने दिली आहेत, ती साधने म्हणजेच सर्वस्व मानून जो मनुष्य अहंकाराने हे जीवन व्यतीत करतो, त्याला ह्या दोषाचा त्रास पुढील जन्मात भोगावा लागतो. यासाठी आपल्या पेक्षा जे वडील आहेत, ते आपल्या मातापित्याप्रमाणे आहेत; ज्यांनी आपल्याला विद्यादान केलेले आहे, तेही आपले मातापिता हात; व इतर जे कोणी कर्तव्यबुध्दीने इहजगतात कार्य करीत आहेत, त्यांनाही आपण मातापित्याप्रमाणेच मानले पाहिजे. म्हणून वचनोक्ति अशी आहे की, ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव !’. या दोषांचा परिणाम पुढील जन्मात असा होतो की या व्यक्तीला जन्मदात्या आईवडिलांपासून तर सुख प्राप्त होत नाहीच, पण इतरांनाही आपण जरी विद्यावान, धनवान झालो असलो तरी आदरणीय वाटत नाही. परंतु अशा वेळी त्या व्यक्ती पुनश्च अभिमानाने असे सांगतात की, ‘माझे या जगात कोणाशी पटत नाही.’

देवादिक ऋणानुबंध :- प्रत्येक मानवाला ज्या ज्या धर्मपरत्वे इहजन्म प्राप्त होतो, त्या धर्मात परमेश्वराने जन्म देण्याची जी तरतूद केली आहे, त्याचा कार्यकारणभाव असा असतो की, पूर्वीच्या अनेक जन्मांतून आपण ज्या ऋणानुबंधांशी हितसंबंधीत असतो, त्याचे विमोचन योग्य धर्माचरणाने व्हावयास पाहिजे. अशाच ठिकाणी तो जन्म देण्यास कारणीभूत होतो. परंतु आज समाजात प्रत्येक धर्माबद्दल प्रत्येक धर्मियांची अशी भावना आहे की, आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत, तेवढाच धर्म उच्च व इतर धर्म बाटलेले धर्म आहेत. असा विचार करुन, सूडबुध्दीने या अन्य धर्मातील लोकांकडे पाहण्याची अपप्रवृत्ति आपण निर्माण करतो. प्रथमतः असे पहावयास पाहिते की, ज्या स्वधर्मात आपण जन्माला आलो आहोत, त्या धर्माप्रमाणे निदान दहा टक्के तरी आपले आचरण त्या धर्माला शोभेल असे आहे काय ? व ते जर नाही तर इतर धर्मांची निंदानालस्ती करणे हे माझे कर्तव्य नाही. आज समाजातील काही व्यक्ती देवधर्म, दानधर्म तर करीतच नाहीत, पण ज्यांना ते करण्याची आवड आहे, इच्छा आहे, पूर्वजन्मपरत्वे प्रेरणा होत आहे, अशांची निंदानालस्ती, चेष्टामस्करी व त्यांच्याबद्दल अविश्वासाचे भाव प्रकट करतात असे दिसून येते. वास्तविक देवाने, धर्माने, परोपकाराने किंवा दानधर्माने तुमचे कधीही वाईट केलेले नाही. असे असताना आपणास ज्या गोष्टीत प्रेम वाटत नाही पण ज्यांना त्यासंबंधी प्रेम, आदर, आपुलकी वाटत आहे, त्यांचा अनादर कुत्सित भावनेने न करता , ज्यांना जो मार्ग हिताचा आहे, तो त्यांनी धरावा; एवढाच विचार जरी तुम्ही केलात तरी इतराच्या हिताचे चिंतन तुम्ही केलेत असे म्हणता येईल. कारण इहजन्मात अशा प्रकारच्या आचार-विचाराने तुम्ही व्यतीत केलेले जीवन पुढील जन्मात तुमच्या वाट्याला येते; व जीवनात येणाऱ्या अडीअडचणीनिवारणार्थ जेव्हा तुम्हांला देवधर्म, धर्माचरण, गुरुभक्ति करण्याची इच्छा होते, तेव्हा हा ऋणानुबंध, ह्या तुमच्या इष्टकर्तव्यांत तुम्हाला एकरुपत्व प्राप्त करुन देण्यास, मनाची स्थिरता करुन देऊन मनःशांति निर्माण करण्यास अडथळा निर्माण करतो.

याशिवाय एक महत्वाचा विषय असा की, आज तुम्ही ज्या देवदेवतांची पूजा-अर्चा, जप-जाप्य, ध्यान-धारणा करता, त्यांचा कृपाशिर्वाद इहजन्मात व पुढील जन्मात प्राप्त होण्यास जो अडथळा आहे तो असा की, तुम्ही जेव्हा देवदेवतांप्रीत्यर्थ काया-वाचा-मनाने विचार व आचरण करुन, ज्या विधींची यथासांग सांगता करता, तो विधी देवदेवतांना अर्पण केल्यावर, पुनश्च त्याचा लाभ होण्यासाठी त्या देवतांच्या गुणप्रकृतिप्रमाणे तुमच्या देहिक माध्यमात त्या गुणांचा विकास व्हावयास पाहिजे. हे देवदेवतांचे गुण जर तुमच्या ठिकाणी विकसित झाले नाहीत, तर ती केली गेलेली उपासना तुम्हाला कृपाशिर्वाद म्हणून प्राप्त करण्यास हा जन्मही पुरणार नाही. कदाचित पुढील पिढीत जर कुणी व्यक्ती हे देवतांचे अनुकूल गुण प्राप्त करते झाले नाहीत, तर देवदेवतार्जन करुनसुध्दा तुम्हाला किंवा तुम्हा कुटुंबियांना त्याचा लाभ घेता येत नाही. असा लाभ तुम्हाला घेता यावा व जरी ह्या जन्मात तुम्ही केलेले देवतार्जन देवाला समर्पित केले असले तरी गुणांच्या अभावी तुम्ही केलेली सेवा तुम्हास प्राप्त होण्यास जो काही देहातील गुणांचा अभाव आहे, ते गुण नसतानाही या ऋणमोचनामुळे देवादिकांचा ऋणानुबंध तुम्हाला प्राप्त होतो.

अशा या पांच ऋणानुबंधातील दोषांमुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला व्यक्तिगत त्रास होईल असे नसून, त्या दोषांचे हितसंबंध कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहेत. हे हितसंबंध जीवनात स्थळ, काळ व वेळपरत्वे (म्हणजे, Space, Time, Limit याप्रमाणे) कार्य करतात. अशा अडीअडचणीनिवारणार्थ आज समाजात कोणीही साधक हे ‘आधिभौतिक’ निराकरण प्राप्त करता झाला असेल असे वाटत नाही. त्यामुळे काही भक्तभाविक की ज्यांच्या जीवनात अशा प्रकारचे दोष आहेत, ते त्यांना स्वतःला व ज्या बाहेरील साधकाकडे ते गेले, त्यांनाही माहित नसतात. मार्गदर्शनार्थ कार्यकेंद्रावर आल्यावर त्यांना हे आधिभौतिक निराकरण सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण होतो. कारण त्यामध्ये प्रथमतः असे निक्षून सांगण्यात येते की, ‘तुम्ही करीत असलेल्या सर्व देवदेवतांच्या उपासना, उपासतापास आदि बंद करा.’

कारण ह्या दोषांचा हितसंबंध आपणच असल्याने, त्या निवारणार्थ देवदेवतांचे कृपाशिर्वाद यशप्राप्ती करुन देऊं शकत नाहीत. यासाठी ज्या कोणा भक्तांना असे निराकरण सुचविण्यात येते, त्यांनी त्या क्षणी गुरुआज्ञा म्हणून अंगिकारलेली सर्व देवदेवतांप्रीत्यर्थची उपासना व परंपरेप्रमाणे करण्यात येणारी उपासना बंद करावी. कारण तुमच्या देहीक माध्यमात जे ऋणानुबंध प्रतिकूल असे आहेत, ते एकमेकांत अनुकूल होऊन, तुम्हाला कृपाप्राप्ती व्हावी यासाठी सद्गुरुआज्ञेने जे मार्गदर्शन करावयाचे असते. त्यासाठी तुमचे देहिक माध्यम कोणत्याही उपासनांच्या बंधनात असता कामा नये.

हे ऋणानुबंध स्थळ, काळ, वेळ यापरत्वे कार्य करीत असतात. याचा अर्थ असा असतो की, जी कुणी एक व्यक्ती जन्माला आलेली असते, तिचे जन्म गाव ही जरी जन्मभूमि असली तरी त्याची कर्मभूमि म्हणजे सुख, शांति, विद्या, संपत्ती हे त्या जन्मभूमिमध्ये नसते. अशा वेळी त्याची कर्मभूमि ही त्याच्या गावापासून शंभर ते पाच हजार मैल इतक्या अंतरा पर्यंतही असू शकते. यासाठी त्यांना मार्गदर्शन करताना अचूक निदान करावे लागते. जर एखाद्याची कर्मभूमि म्हणजे भाग्योदय दीडशे मैल उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल तर त्याप्रमाणे ते सूचित करावे लागते. यासाठी हे जे गणित सांगावयाचे असते ते कागदावर मांडून किंवा आपल्या बुध्दीमाध्यमातून आकडेवारीने ठरविता येत नाही. यासाठी साधकाला दिव्य ज्ञान व दिव्यदृष्टीची प्राप्ती असल्याशिवाय हे गणित समजत नाही व मार्गदर्शन म्हणून सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या मुलामुलींचे भाग्योदय आईवडिलांच्या प्रेमाच्या सावलीत उदित होत नसतात, अशा मुलामुलींना मार्गदर्शन करीत असतांना त्यांच्या भाग्योदयाचे स्थळ, दिशा आईवडिलांपासूनचे अंतर हे मार्गदर्शन सूचित करावयाचे असते.

काही वेळा जीवनात अशी काही आकस्मिक संकटे उद्भवणारी असतात, अशावेळी आईवडिलांपासून मुले-मुली, पति-पत्नीपासून पति किंवा पत्नी, इष्टमित्रापासून इष्टमित्र, यांच्या एकमेकाशी असलेल्या हितसंबंधातून ही संकटे निराकरण करावयाची असतात. पण ह्या भौतिक निराकरणाचा अर्थ सूज्ञ भक्तांना न समजून, सद्गुरुकृपाशिर्वादाच्या सामर्थ्याने आपल्या इहजन्मात काय प्राप्त होत आहे, ही जाणीव नसल्याने,हा आज प्राप्त झालेला गुरुकृपाशिर्वाद पुढील कोणत्याही जन्मात प्राप्त करावयाचा झाला तर अनेक जन्म वाया गेले तरी या कार्यपध्दतीतील ही सिध्दसिध्दांतपध्दती, सद्सद्विवेकबुध्दि भक्तांमध्ये कधीही निर्माण होत नाही. या निराकारण पध्दतीच्या बाबतीत अर्थ व तो ही इतका क्षुल्लक असा लावला जातो की, परमपूज्या बाबांच्या आज्ञेने आपल्याला काही काळ विभक्त किंवा वेगळ्या स्थळी किंवा वेगळ्या ठिकाणी रहावयास सांगितले होते. एवढा जरी अर्थ सूज्ञपणाने लावला तरी समाधान होण्यासारखे आहे. परंतु यापलिकडेही विचारांची अधोगती होऊन ज्या मुदतीपर्यंत एकमेकांना मारक असणारे ऋणानुबंध निवारण करण्यासाठी जे मार्गदर्शन केले जाते त्याचा गैरअर्थ भक्तांच्या भक्तीत, श्रध्देत जो विकल्प म्हणून उद्भवतो, तेव्हा असा खेद वाटतो की, ज्यांना जन्ममरणाच्या दारातून उध्दरण्यासाठी आलो, ते न करता त्यांना जर ते दु:ख प्राप्त करुन दिले असते तर निदान आपल्याबद्दल श्रध्दाही त्यांच्या सोबत गेली असती. पण एकदा जेव्हा आपण गुरुमार्गी होता व आपण जरी सर्वस्वाने गुरुंना आपले जीवन समर्पित करीत नाही, तरी गुरुंनी आपले सामर्थ्य आपल्या कल्याणार्थ समर्पित केलेले असते हे सूज्ञ भक्तांनी कधीही विसरु नये. विकल्प येणे हा मनुष्यजन्माचा जरी स्वाभाविक गुणधर्म असला, विकल्पाला प्रसंग व कारण यांचा आधार असावयास पाहिजे. निराधार, निराश्रीत असा विकल्प तुमच्या ज्ञानाची ठेव असे जर तुम्ही मानत असलात, तर पुनश्च तुम्ही तुमच्या हितार्थ निवारण केलेल्या संकटात सहभागी होण्याचे भाग्य मानता आहात असे मानावे लागेल.

तुम्ही मार्गदर्शनार्थ आल्यानंतर येथील कार्यपद्धती व मार्गदर्शनाप्रमाणे होणारे तुमच्या कुटुंबाचे हित पाहून तुम्हाला आपले जीवन कृतार्थ व्हावे व आपले आयुष्य ह्या कार्यार्थ व्यतीत करावे, असा जरी मोह वाटत असला, तरी ह्या परोपकार वृत्तीचा जो मोह तुमच्या ठिकाणी आहे, त्याची आर्तता खरोखरीच प्राप्त झालेल्या सुखपरत्वे की आपल्या अडीअडचणीनिवारणार्थ जो कृपाशिर्वाद मार्गदर्शक झाला आहे अशा परत्वे आहे, हे गुरु तत्काळ जाणतात. तुम्ही बाहेरुन कितीही गुरुभक्तीचा ओलावा आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केलात, तरी जे साधनामार्गात पूर्णावस्थेला पोहोचलेले साधक आहेत त्यांना तुमच्या ठिकाणी निर्माण झालेला ओलावा हा भास आहे, हे समजण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. यासाठी आपण जेव्हा गुरुदीक्षा किंवा अनुग्रह मागता तेव्हा ते अशा कार्यपध्दतीस कदापिही तयार होत नाहीत. कारण हा निरपेक्ष बुध्दीचा व परोपकराचा आलेला ओलावा ज्या परिस्थितीने आला आहे, त्याची जाणीव गुरुंना असल्याने, ही जीवन समर्पित करण्याची जी भूमिका हे भक्तभाविक व्यक्त करतात, त्यांना गुरुसान्निध्यांत राहूनही गुरुंनी आपल्याला कोणत्या भक्तिभावनेने सचैल स्नान घातले आहे याची जाणीव होत नाही. अशावेळी भक्तभाविकांनी स्वतःकडे पाहून, जरी आपल्या आयुष्यात आपण आपल्या स्वार्थासाठी इतरांना फसविले आहे तरी गुरुंना फसविण्याचे महापाप या जन्मात करुं नये. तुमच्या जीवनात ज्ञान-अज्ञानाने घडणाऱ्या प्रत्येक पातकप्र-मादाला धर्मशास्त्रांत व वेदशास्त्रांत प्रायश्चित्त सांगितलेले आहे. परंतु गुरुभक्ति ही जितकी चाखण्यास अमृतमय आहे, तितकीच ती आचरणात आणण्यास कर्मकठीण आहे. अशा गुरुभक्तीत जेव्हा तुम्ही विचलीत होऊन केवळ आपल्या भक्तिचा आभास निर्माण करता, त्याला कोणत्याही शास्त्रात प्रायश्चित्त नाही !

वरील निराकरणे ही ऋणमोचनाशी हितसंबंधित आहेत. यासाठी केवळ आपल्याला हा विषय समजावा म्हणून ती निवेदन केली आहेत. पण यापेक्षाही प्रखर असे साधन पुढे प्राप्त करावयाचे असून, त्यासाठी अनिश्चित काळापर्यंत गुरूसेवेमध्ये वेळ व्यतीत करून, ती जी प्राप्त करावयाची आहेत, ती तुमच्या व तुमच्या भावी कुटुंबियांच्या हितार्थ आहेत. अनेक घराण्यांत मुलेमुली जन्माला आल्यावर ती येतांना विद्या, संपत्ती , संतती घेऊन येतात. प्रौढ अवस्थेपर्यंत ज्या घराण्यात किंवा कुटुंबात ती जन्म घेती झाली आहेत, त्या कुटुंबाची भरभराट विद्या, संपत्ती, संतती आदींनी होते. पुढे प्रौढ अवस्थेनंतर जेव्हा ही मुलेमुली विवाहित होऊन परगृही जातात किंवा कुटुंबापासून विभक्त होतात, त्यानंतर त्यांच्या जन्मप्राप्ती मुळे कुटुंबात प्राप्त झालेली विद्या, संपत्ती, संतती ही त्या नवीन घराण्यामध्ये जाते व ज्या घराण्यात ते जन्म घेते झाले आहेत, त्या घराण्यातील अन्य व्यक्तींना ती प्राप्त करण्यासाठी जरी अति कष्ट करावे लागले असले, तरीही सुख, संपत्ती पुनश्च त्यांच्या वाटय़ला येत नाही. अशावेळी या कुटुंबातील व्यक्तींना विवाह करण्यास मनाई करणे किंवा स्वतंत्र राहण्यास मनाई करणे इत्यादि गोष्टी बंधन म्हणून घालता येत नाहीत. परंतु हा सुखशांतीचा तराजू दोन्ही कुटुंबात सारखाच कार्यान्वित व्हावा यासाठी या कार्यपध्दतीत हे साधन पुढील काळात प्राप्त करण्यासाठी या कार्यातील प्रमुख साधकाकडून गुरुआज्ञेने करावी लागणारी जी प्रखर सेवा असेल ती आनंदाने स्वीकारली जाईल, ती याचकरीता की, तुम्हा भक्तभाविकांच्या जीवनात ह्या दोषामुळे येणारी जी नकळत आपत्ती आहे, ती निवारण होऊन दोन्ही घराण्यात सुख, शांति, संपत्ती, संतती ही चिरकाल टिकून रहावी व पुढील भावी अपत्ये आणि तुम्ही कुटुंबिय यांनी सुख-शांति-समाधानात या जगतात आलेले आयुष्य व्यतीत करावे व अशी ही इच्छा सद्गुरुचरणी आम्ही व्यक्त करीत आहोत.

प्राप्त जीवनामध्ये आपणास सुख, शांति, संपत्ती, समाधान प्राप्त व्हावे, या अपेक्षेनेच आपण ह्या कार्याचा लाभ जरी घेतला असलात, तरी गुरुआज्ञेने या जगतात अशा कार्याची जेव्हा स्थापना होऊन ती कार्यान्वित होत असतात, त्या मागील सद्गुरुंचा हेतू असा असतो की, आम्हा मानवांना बहुमोल असे जे जीवन प्राप्त झाले आहे, त्या जीवनात केवळ ऐहिक विषयसेवनार्थ जीवन व्यतीत होऊ नये; तर प्राप्त झालेल्या जन्माचे यथार्थ ज्ञान होऊन, त्या जन्मपरत्वे जन्माला येण्याचे जे कारण ते कार्यान्वित होऊन, आपला प्राप्त जन्म याचे सार्थक व्हावे. ही योजना जरी कार्याचा प्रधान उद्देश असला, तरी तो प्राप्त करुन घेण्याची तळमळ येणाऱ्या भक्तभाविकात आहे असे अनुभवास न येता, उलट अधिक प्रश्नोत्तरे आपले आयुष्य अधिकाधिक समृध्द कसे होईल याच विषयाच्या चिंतनात हे भक्तभाविक या कार्याचा लाभ घेत असतात. आज ह्या कार्यपध्दतीतून आपण भक्तांना जे अडीअडचणीनिवारणार्थ मार्गदर्शन करण्यात येत आहे, हा कार्याचा मुळ उद्देश नसून, हे साधन केवळ लोकसंग्रहार्थ उपयोगात आणावे लागते. हे जरी खरे तरी प्रत्येक भक्ताने आपल्या जीवनातील कर्तव्य म्हणून, या कार्याचा जो प्रधान हेतू आहे, त्याचा लाभ जर सहजासहजी, काही एक प्रखर साधना न करता, घरबसल्या प्राप्त होत आहे, त्याचा आस्थापूर्वक जर विचार केला नाही तर भविष्यात या जगाच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण कुटुंबियांच्या जीवनाबद्दल असणाऱ्या आशा-अपेक्षा साकार होतील की नाही याचा विचार सुज्ञपणे आज करणे हाच भविष्योत्तर जीवनाच्या यशाचा पाया आहे.

आज पर्यंत आपण शेकडो भक्तांना गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त झालेल्या सिध्दसाऱधन पध्दतीप्रमाणे निराकरणे करुन मी माझ्या यथाशक्ती व यथाज्ञानाने आपणास सुखी करण्याचा प्रयत्न जरी काया, वाचा, मनाने व तन,मन, धनाने केला, तरी त्याचा मोबदला म्हणून मी आपणा सर्वांकडून काहीच अपेक्षा ठेवली नाही. परंतु ज्या सिध्दसाधन पध्दतीतील निराकरणाने आपल्या अडचणी निवारण होतात, त्या सिध्दसाधनपध्दती कार्यारंभी प्राप्त करण्यासाठी मला प्राप्त जीवनात खूपच त्याग करावा लागला, हे आपण भक्तांनी विसरता कामा नये. आपणास मार्गदर्शित केलेली निराकरणे ही मी माझा ऐच्छिक विषय म्हणून केली नसून, तशी ऐच्छिक निराकरणे ही मानवी जीवनातील दु:खनिवारणार्थ कार्यान्वितही होत नाहीत. निराकरणे ही ज्या सिध्दसाधनपध्दतीवर आधारलेली असतात, ह्य़ा सिध्दसाधनपध्दती पूर्णतः कृपाशिर्वादास प्राप्त झाल्याशिवाय साध्य होत नाहीत. याचा अर्थ निराकरण म्हणजे प्रश्नाबद्दलचे अचूक निदान किंवा कारण नव्हे तर निराकरण म्हणजे श्रीगुरुकृपाशिर्वादच असतो. पण तत्प्रीत्यर्थ आपण भक्तांच्या कल्याणार्थ जो कृपाशिर्वाद निराकरण म्हणून दिला आहे, त्याबद्दलची यथायोग्य आस्था, तत्संबधी आचार-विचारांची शुध्दता व तो जतन करण्यासाठी नित्याने मार्गदर्शन केलेली सेवा, ही करण्यासाठी आपण चुकुनही योग्य आचारविचाराने जीवनात तो ठेवा जतन करण्याचा प्रयत्न न करण्याने, महत्प्रयत्नाने प्राप्त झालेल्या ह्या सिध्दसिध्दांतपध्दती व निराकरणे यास आपल्या अयोग्य अशा आचारविचाराने जेव्हा मलीनता येते व त्यांची कार्यक्षमता उच्चारलेल्या शब्दाप्रमाणे होत नाही, तेव्हा आपण भक्त असा संकुचित विचार करता की, आता गुरुमाध्यमाचे सामर्थ्य कमी झाले आहे. वास्तविक साधकमाध्यमाचा महिमा असा आहे की, गुरुकृपाशिर्वादाला प्राप्त होण्यापूर्वी गुरुद्वारा या साधकाची योग्य ती परीक्षा झाल्यावरच तो कृपावंत होतो. गुरुकृपा ही अविनाशी व अक्षय अशी असल्याने, साधकाच्या जीवनात गुरुकृपेला तो अपात्र होतो किंवा कृपेत अंतर पडते, हे आपण भक्तांचे अज्ञान आहे. सिध्दसिध्दांत पध्दतीत जी मलीनता येत असते ती आपण भक्तांच्या अज्ञानी, अविचारी,असमंजस असा विचार-अविचाराने व गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आचार-विचार हे योग्य प्रकारे न केल्यानेच येत असते. अशा प्रकारची मलीनता जेव्हा श्रीसद्गुरुंना ह्या कार्यपध्दतीत भवितव्यात अडथळा निर्माण करणारी आहे असे वाटते, त्याचक्षणी म्हणजे गुरुपौर्णिमा १९७७ या दिवशी, मला आपण भक्तगणांना ह्या मार्गदर्शन करण्यास बंद करुन, पुनश्च ती सिध्दसाधने निराकरणार्थ सिध्द करण्यासाठी आज्ञा झाली. त्या आज्ञेप्रमाणे एक वर्ष सेवेत राहून जे हवनीय विधी करण्यात आले, ते मी माझ्या हितार्थ किंवा माझी पारमार्थिक उन्नती होऊन मला मोक्ष प्राप्त व्हवा या हेतूने केले नाहीत. भविष्योत्तर जीवनात आजपर्यंत घेतलेल्या निराकरणाचा लाभ तुम्हा कुटुंबियांना पिढयान्पिढ्या व्हावा, यासाठी ही सर्व सिध्दसाधने पुनश्च सिध्द करावी लागतात. आपण सर्व भक्तांची अशी श्रध्दा आहे की, एकदा कृपाशिर्वाद घेतला म्हणजे तो आयुष्यभर आपल्याला तारक होतो. पण हे केव्हा होईल ? तर गुरुआज्ञेप्रमाणे आपण त्यांचे पालन करीत असता, कोणत्याही विषयपरत्वे ह्या आज्ञेशी आपण प्रतारणा केली नाही, तरच हा आशिर्वाद आपण व आपल्या कुटुंबियांच्या भविष्योत्तर जीवनासाठी तारक ठरतो.

आज आपण भक्तांस प्राप्त झालेल्या जीवनात जेव्हा सुख, शांति, संपत्ती, दीर्घायुष्य आदींचा अभाव निर्माण होऊन, जीवन उपभोगण्यास ज्या वेळी असमर्थ होते, तेव्हाच या अडीअडचणीमागील कारणपरंपरा किंवा कारणमीमांसा व त्यांचे निराकरण करुन घेण्यासाठी, इकडे तिकडे साधकांच्या किंवा देवभक्तांच्या शोधात जाऊन याची विचारणा आपण करीत असता. पण आज दु:खाने असे म्हणावे लागते की, आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडीअडचणी या शास्त्रीय मीमांसेनुसार कुणी साधक जाणते होऊन त्याचे निवारण अल्प मूल्यामध्ये करत असतील असा माझा तरी व्यक्तिगत अनुभव नाही. कारण आपण भक्तांना वेळोवळी अडीअडचणीनिवारणार्थ अनेक साधकांकडे जावे लागते. त्यांनी केलेली निराकरणे ही आपण कार्यकेंद्रावर उपस्थित झाल्यावर जेव्हा सांगता तेव्हा असे अनुमान अनुभवास येते की, आपण ज्या साधकाच्या निराकरणाचा लाभ घेण्यासाठी गेला होतात, त्या साधकाची लोककल्याणाप्रीत्यर्थची भूमिका जरी मोठी असली तरी त्याप्रीत्यर्थ करावे लागणारे साधन व सिध्दता ही अगदीच बाल्यावस्थेतील आहे. पण त्यापेक्षाही काहीएक अवस्थांची प्राप्ती न होताही भूत, भविष्य, वर्तमान आदि तीन काळांना आपण जाणते आहोत असे समजून जे कोणी साधक भूत, भविष्य, वर्तमान आदि विषयाबाबत मार्गदर्शन करीत आहेत, या त्यांच्या मार्गदर्शनातील अज्ञानाचे कौतुक वाटते. कारण प्राप्त झालेला मानवी जन्म ही एक तर पूर्वजन्मातील निश्चित ठेव तरी असू शकेल किंवा पूर्वजन्मातील ऋणानुबंधातील दोषामुळे त्या जीवनाची अपूर्णता शिल्लक राहिल्याने पुनश्च जन्म प्राप्त करुन ते ऋणानुबंध पूर्ण करण्याचे कर्तव्य करावे लागेल. अशा जन्मजन्मांतर किंवा जन्मकर्मपरत्वे निर्माण झालेले दोष ह्या जीवनात जेव्हा दु:ख तथा अशांतता निर्माण करतात, त्यावेळी मूलतः या दोषांचा हितसंबंध केवळ कर्माच्या प्रतिकूलतेवर अवलंबून आहे असे विचारात न घेता, त्या कर्माच्या हितसंबंधातील दोषांचा हितसंबंध कोणत्या ऋणानुबंधाशी हितसंबंधीत आहे हे जाणण्याची द्दष्टी व ज्ञान साधकास असावयास पाहिजे व ते जरी जाणते झाले तरी ह्या दोषांच्या विमोचनार्थ त्यांच्या ठिकाणी सिध्दसाधन हे सिध्दावस्थेत असावयास पाहिजे, तरच या दोषांचे निश्चितपणे विमोचन होऊन भविष्यकाळ हा सुख, शांति, समाधानात व्यतीत होईल. केवळ अडचण निर्माण झाली आहे म्हणून त्याचा प्रतिकार करण्यासाठी मंत्र, तंत्र, यंत्र आदीचा उपयोग करुन जरी त्यापासून आपण आपले रक्षण करते झालात, तरी ह्या सर्व विद्यापरत्वे निवारण होणारी दु:खे ही क्षणिक असतात. कारण मंत्र, तंत्र, यंत्र आदि साधने व त्यात सामावलेली शक्ति हिचा क्षय कालपरत्वे होत असतो. त्यामुळे ज्या दु:खनिवारणार्थ आपण या मार्गाचा अवलंब केलात, त्यामुळे जरी क्षणात सुखाचा भास निर्माण झाला तरी निरंतर स्वरुपात त्या सुखाचा लाभ आपणास घ्यावयाचा होता, तो लाभ या क्षणिक सुखांच्या मोहाने आपण मिळविण्यास असमर्थ झालात. श्रीसद्गुरुकृपा प्राप्त करण्यास काया, वाचा, मनाने, नि:स्वार्थ, निरपेक्ष बुध्दीने व इष्ट संकल्पाने ती सेवा करावयास लागते. त्या सेवेचा लाभ केवळ अडीअडचणी निवारण होण्याइतकाच मर्यादित असू शकत नाही, तर त्याचा लाभ हा प्राप्त जन्मात होतोच पण त्याशिवाय कुटुंबातील पिढयान्पिढ्यांना व जन्मोजन्मी आपल्या जीवनोद्धारार्थ ही कृपा उपयोगी पडते. एवढेच नव्हे तर त्या कृपाशिर्वादाने प्राप्त जन्माचे यथायोग्य सार्थकही होत असते.

आपले प्राप्त जीवन याचा संबंध पाच ऋणानुबंधाशी हितसंबंधित आहे. ते पाच ऋणानुबंध म्हणजे देवादिक, मातृपितृ, इतरेजन, जन्मजन्मांतर व जन्मकर्म होत. हे ऋणानुबंधा पूर्वीच्या अनेक जन्मांशी हितसंबंधित असल्याने, प्राप्त जन्मांत आपले इष्ट सुख, शांति ही त्या ऋणानुबंधातील अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्या ऋणानुबंधात ज्ञान-अज्ञानाने सामावलेल्या पातक-प्रमादामुळे किंवा या ऋणानुबंधपरत्वे आपले इष्ट कर्तव्य जन्म प्राप्त झाल्या नंतर न करण्याने किंवा प्राप्त जन्मांत हे ऋणानुबंध जरी पंचभौतिक देहाच्या हितसंबंधात कार्य करीत आहेत, तरी त्या ऋणानुबंधांचा यथोचित विकास जर काया, वाचा, मनाच्या ठिकाणी न होऊन, ही देहिक माध्यमे विकसित अवस्थेप्रत नेण्याचे साधन प्राप्त झाले नाही, तर ह्या सर्व दोषपरत्वे प्राप्त झालेले जीवन, त्यातील इच्छा-अपेक्षांची पूर्तता ह्या जन्मात न होता, हे जग नाईलाजाने आपल्याला सोडून जावे लागेल.

मानवी जन्म परत्वे जेव्हा आपण भक्तभाविक अशा दोषांच्या हितसंबंधाशी संबंधित असा जन्म प्राप्त करते होऊन, अडीअडचणीपरत्वे जरी गुरुमार्गाकडे अडीअडचणीनिवारणार्थ आलात, तरी योग्य गुरुंचे सदैव योग्य असेच कार्य ह्या जगताच्या कल्याणार्थ चालू असते. जेव्हा आपण ह्या गुरुमाध्यमातून आपल्या अडीअडचणीनिवारणार्थ मार्गदर्शन घेता, त्यावेळी गुरुमाध्यमाचा सद्हेतू हा कदापिही अडीअडचणीशी हितसंबंधीत नसतो. त्यांना तुमच्यासारख्या भक्तांच्या प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक करुन, जन्मप्राप्तीचे जे कारण आहे ते या जगाच्या व तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सिध्द करावयाचे असते. यासाठी त्यांना तुमच्या कल्याणार्थ अपले जीवन सद्गुरुसान्निध्यात व्यतीत करावे लागते. त्या जीवनांत प्रत्येक क्षण हा गुरुआज्ञेप्रमाणे व्यतीत झाल्याशिवाय कोणतीही सिध्दसाधना सिध्दावस्थेस जात नाही. यासाठी गुरुमाध्यमाला काया-वाचा-मनातील ऐहिक विषय हे स्वतःच्या जीवनापासून दूर ठेवावे लागतात, याचा आपण सूज्ञ भक्तांनी विचार केला आहे काय ? ज्या गुरुमाध्यमाद्वारा आपण भक्तांचे जन्मोजन्मीचे ऋण फिटून, प्राप्त जन्म विकसित होऊन, आपण भक्त सुख, शांति, समाधानाच्या शिखरावर पोहोचणार आहात, ती माध्यमे, स्वतःच्या पूर्वपुण्याईने व गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त झालेली ठेव जेव्हा आपण भक्तांच्या कल्याणार्थ लोककल्याणाचा ठेवा म्हणून व्यतीत करतात, या त्यांच्या सद्हेतूत कदापिही आपण भक्तांकडून काही प्राप्त व्हावे असा ऐहिक लोभ न असता ‘पारमार्थिक लोभ तुम्हा भक्तांकडून असावा हे विनंती’ असे उद्गार त्यांच्या आत्मिक प्रेरणेने प्राप्त झालेल्या आचार-विचारात सदैव आपणास जरी अनुभवास येत असले, तरी आपले जीवन हे ‘लोभ’ या विषयाशी इतके हितसंबंधीत झाले आहे की, याचे उदाहरण म्हणजे जीर्ण झालेली वस्त्रेसुध्दा गोरगरीबांना फुकट देऊन त्याचा सदुपयोग आपण करुन न घेता, त्या वस्त्रावर दारावर येणाऱ्या बोहारणीकडून काही भांडे-कुंडे मिळेल काय या विचाराने ती जतन करता व अशा विचाराप्रत पोहोचलेली आपली जीवने गुरुमाध्यमाची परीक्षा घेण्यासही तयार असतात. अशावेळी सूज्ञ भक्तांनी एवढाच विचार करावा की, माझ्या कल्याणार्थ जी मला दिवसाकाठी एक तास देवादिकांची किंवा श्रीसद्गुरुंची सेवा सांगितरी आहे, ती मी माझ्या जीवनातील चोवीस तासापैकी एक तास तरी ‘त्याग’ या भावनेने करु शकतो काय ? असा त्याग आपण जरी करते झाला नाहीत, तरी अनादिकालापासून वेदवेदांतांनी व धर्मशास्त्रांनी श्रीसद्गुरु हे कृपाळु व दयावंत असतात असे गाईले आहे, त्याची अनुभूति ही कालकालांतरपरत्वे अनुभवास येतच असते.

प्राप्त जन्मातील ऋणानुबंधांशी हितसंबंधित असलेल्या दोषांच्या निवारणार्थ ज्या साधनपध्दतीने आज निराकरणे केली जात आहेत, त्या निराकरणपध्दतीत आजपर्यंत आपणास ज्यांचा लाभ करुन देण्यात आला ती निराकरणे म्हणजे ‘कर्मविमोचन,’ ‘वंशविमोचन,’ व ‘ऋणविमोचन’ ही होत. ही निराकरणे केवळ सूचित करुन त्यांची दोषपरिमार्जन कदापिही होत नसल्याने, आपण भक्तांस गुरुकृपाशिर्वादाचा लाभ आपल्या काया-वाचा-मनाला होऊन, हा पंचभौतिक देह, हे ऋणानुबंध विमोचित करण्यास समर्थ व्हावा, म्हणून श्रीगुरुंनी आपण भक्तांस ‘उपासना दीक्षा,’ ‘नामस्मरण दीक्षा,’ ‘ अनुग्रह दीक्षा’ व ‘गुरुदीक्षा’ आदि देऊन जरी कृतार्थ केले, तरी ह्या दीक्षाप्राप्तीनंतर आपण भक्तांनी आपले देहिक माध्यम पवित्र अशा आचार, विचार व आहार यापरत्वे, प्राप्त झालेल्या दीक्षांना अनुकूल कार्य करण्यास योग्य असे देहाचे शुध्दिकरण करावयाचे कर्तव्य न केल्याने, तो दोष पर्यायाने जेव्हा गुरुमाध्यमाकडे येतो, तेव्हा भक्तांच्या ज्ञान-अज्ञानाने घडलेल्या सेवेबद्दल गुरूमाध्यमास प्रायश्चित्त घ्यावे लागते. ह्या दीक्षांतपध्दती नाथपरंपरेत किंवा दत्तपरंपरेत अनादिकालापासून सूचित कलेल्या जरी असल्या, तरी नाथपरंपरेतील किंवा दत्तपरंपरेतील साधक म्हणविणाऱ्या कुणीही साधकाने त्याचा आस्थापूर्वक विचार करुन, स्वतः प्रायचित्त न घेता, आपल्या भक्तगणांनाच प्रायश्चित्ते दिलेली आहेत. आपण भक्त आज ज्या कार्यपध्दतीचा लाभ घेत आहात, त्या कार्यपध्दतीत दत्तपंथ, सुफिपंथ व नाथपंथ हे समावलेले असल्याने व त्यांची कार्यकारणयंत्रणा एकाच सिद्धसिद्धांतपद्धतीवर आधारलेली असल्याने,  साधकाला कितीही मोठे श्रेष्ठपद सिध्दावस्थेप्रत जाऊन प्राप्त झाले व त्या अवस्थेप्रमाणे समाजात त्याला नांवलौकिक व मोठेपणा जरी प्राप्त झाला, तरी प्राप्त केलेली साधने ही लोककल्याणार्थ एक तपापेक्षा अधिक मार्गदर्शनार्थ सूचित केल्यावर, पुनश्च ती साधने सिध्द करण्यासाठी प्रायश्चित्त घेऊन, ज्या निराकरणांचे संबंध देवादिकांशी आहेत, त्या त्या देवतांना आवाहनीत करुन, त्यांचा हवनीय विधी करावयास लागतो. यासाठी जी हवने श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे झाली, त्यांचा संबंध वर निवेदन केलेल्या शास्त्रीय मीमांसेशी आहे. ते करण्यामागे माझी केवळ व्यक्तिगत अशी ऐच्छिक भूमिका नव्हती. पुढील काळांत आपण भक्तगणांना आवश्यक असणारे सहाय्य आपणास सिध्दावस्थेत प्राप्त करुन देण्यासाठी, गुरुआज्ञेप्रमाणे ही सर्व सेवा करुन, गुरुपौर्णिमेस मी ती साधने गुरुदक्षिणा म्हणून श्रीगुरुंना समर्पित केलेली आहेत हेही आपण भक्तभाविकांस सांगण्यास आनंद वाटतो.

वास्तविक जन्मउत्पत्तीमीमांसेप्रमाणे प्राप्त जन्म हा पाच ऋणानुबंधांनी म्हणजे देवादिक, मातृपितृ, इतरेजन, जन्मजन्मांतर व जन्मकर्म यांनी जरी प्राप्त झालेला असतो, तरी हे पाच ऋणानुबंध एकमेकांना हितसंबंधित व पोषक असतात असे नाही. याशिवाय प्राप्त जन्मात, आपल्या जीवनातील ज्या काही इच्छाअपेक्षा आपण करतो, त्या साकार होण्यास हे पाचही ऋणानुबंध एकमेकांस जर अनुकूल असतील तर विद्या,संपत्ती, संतती, अन्न, वस्त्र,निवारा या ऐहिक गरजांची पूर्तता होऊनही, त्या प्राप्त झालेल्या जीवनाचाच केवळ लाभ घेणे म्हणजे जीवन, अशा विचारपरत्वे या व्यक्ती जीवन व्यतीत न करता, जीवनात देवादिक ऋणानुबंधपरत्वे या पंचभौतिक देहाच्या ठिकाणी काही सात्विक गुणाची अवस्था ही जन्मतःच आपल्या व जगताच्या हितार्थ आपल्या पंचभौतिक देहांत असते, त्याची जाणीव होऊन, ते गुण अधिक विकसित कसा करुन घेता येईल, तत्संबंधीच्या मार्गदर्शनार्थ ह्या व्यक्ती आपले जीवन व्यतीत करतात. पण अशा गुणांची ठेव ही जरी त्या व्यक्तींच्या देहिक माध्यमाच्या ठिकाणी उपजत प्राप्त झाली असली, तरी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी व योग्य गुरुकृपेच्या अभावी हे गुण जरी स्वतःच्या व जगत्कल्याणाच्या हिताचे असले, तरी त्यांचा यथोचित विकास होऊन, त्याचा लाभ स्वतःला व इतरांना न देताच आजपर्यंत अशा अनेक व्यक्ती प्राप्त जन्मासाठी व जगतासाठी काहीएक कार्य न करता दिवंगत झाल्या आहेत.

प्रत्येक मानवास पाच ऋणानुबंधपरत्वे जन्म प्राप्त होतो. त्याच ऋणानुबंधांपैकी जो एक प्रधान ऋणानुबंध असेल, तो जन्माचे कारण म्हणून जन्माला येतो. अशा अवस्थेचे उदाहरण द्यावयाचे झाले तर पाच ऋणानुबंधांपैकी जन्मकर्म, जन्मजन्मांतर, इतरेजन व मातृपितृ हे चार ऋणानुबंध म्हणजे आपण रहात असलेल्या घराच्या चार भिंती असतात, त्याप्रमाणे प्राप्त जीवनाचे आधार आहेत. या चार ऋणानुबंधांवर छत म्हणजे निवारा हा देवादिक ऋणानुबंध आहे. असे यथोचित जीवन जेव्हा आपणास प्राप्त होते, त्यावेळी जीवनाबद्दलच्या इष्ट अपेक्षा म्हणजे विद्या, संपत्तीपासून ते दीर्घायुष्यापर्यंत, या पूर्णावस्थेला जातात. पण जेव्हा ह्या चार ऋणानुबंधांपैकी केवळ एकच ऋणानुबंध अधिक प्रखर म्हणून जन्माला येतो, त्यावेळी खालीलप्रमाणे जीवनात अशांतता, दु:खे अनुभवास येतात. वास्तविक प्रपंच व परमार्थ ही जीवनाची दोन्ही अंगे संसारात स्त्री-पुरुषांनी एक विचाराने व एक आचाराने केली, तरच ती शोभायमान होऊन, त्यातील आनंद अनुभवास येतो. पण जर एखाद्या व्यक्तीचा प्रधान गुण हा ‘जन्मकर्म’ असेल, तर त्या व्यक्तीला खाणेपिणे, ऐषाराम याव्यतिरिक्त जीवनात देवधर्म, परोपकार, धर्माचरण आदि करण्याची चुकुनही इच्छा होत नाही. ज्याचा प्रधान गुण ‘जन्मजन्मांतर’ असेल, ती व्यक्ती प्रपंच व परमार्थ तितक्याच आस्थेने करीत असते. हे करण्यात त्यांना सुखही वाटत नाही व दु:खही वाटत नाही. कारण त्यांचे जीवन कर्तव्य म्हणून होत असते. ज्या व्यक्तीचा प्रधान गुण ‘इतरेजन’ हा असेल, त्या व्यक्तीचे जीवन हे अधिक प्रमाणात इष्टमित्र व सामाजिक समस्या यांचा विचार करण्यात जातो. पण चुकूनही बायकामुलांसाठी आपले काही कर्तव्य आहे, ही आस्था विचारात येत नाही. त्यामुळे ह्या व्यक्ती मित्रपरिवारात किंवा समाजात जरी नावारुपाला आल्या, तरी कुटुंबातील व्यक्तींकडे दुर्लक्ष झाल्याने, भविष्यात कुटुंबे निराधार होतात. ज्या व्यक्तींचा प्रधान गुण ‘मातृपितृ’ असेल, त्या व्यक्ती आपले हित अहित यांचा स्वतः विचार न करता, आईवडिल सांगतील हेच प्रमाण असे मानतात, किंवा काही व्यक्ती यांचे जन्मदाते आईवडिल जरी असले, तरी त्यांचे एकमेकांशी काडीमात्र सख्य नसते. याशिवाय या गुणातील महत्वाचा दोष म्हणजे, ज्या व्यक्तींना जन्मापासून भाग्यकारक दिवस आलेले असतात, ते त्यांचे जीवन मातापित्याच्या हयाती नंतर लयास जाते किंवा काहींचा भाग्योदय मातापित्यांच्या हयातीनंतर होत असतो.

ज्या व्यक्तींच्या जन्मांत ‘देवादिक’ हा गुण अधिक प्रखर व प्रधान असतो, अशा व्यक्ती सदैव देवदेवतार्जन, पोथीपुराण, नामस्मरण, कीर्तन आदीमध्ये आपला काळ व्यतीत करीत असतात; व हे करुनही समाधान झाले नाही, तर कोठल्यातरी तीर्थक्षेत्री जाऊन वास्तव्य करतात. ह्या त्यांच्या वास्तव्यात त्यांची भूमिका अशी असते की, देवाच्या आज्ञेने सेवेस राहिलो आहोत. अशावेळी वर्षानुवर्षे सेवा करुनही त्याचे फळ मिळत नाही. कारण देवादिक हा गुण जरी प्रधान असाला, तरी प्राप्त जन्मात कर्तव्यार्थ जे चार ऋणानुबंध बाकी आहेत, तत्संबंधीची कर्तव्ये न केल्याने, ह्या कर्तव्यपरत्वे करावी लागणारी कर्मे ही त्यांच्या तीर्थक्षेत्रातील वास्तव्यात त्यांच्या उपासनेआड येत असल्याने, अशा व्यक्तींना जन्माला येऊन, प्रपंच्याचे व परमार्थाचे अशी दोन्ही सुखे यांचा लाभ घेता येत नाही.

जन्माचे प्रधान गुण हे जे व्यक्तीशः असतात, त्याबद्दल वर मार्गदर्शन केले आहे. पण ह्या व्यक्ती विवाहित झाल्यावर ज्या स्त्रीशीं यांचा विवाह होतो, त्या स्त्रीचेही गुण वर सांगितलेल्या गुणपरत्वे भिन्नाभिन्न असतील, तर कुटुंबात सदैव दु:ख व अशांतता निर्माण होते. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती जन्मकर्म हा गुण म्हणून जन्माला आली असेल, व त्याची धर्मपत्नी ही जन्मजन्मांतर गुणाने प्रधान असेल, तर तिचे स्वाभाविक आचारविचार हे धार्मिक प्रवृत्तीचे व कुटुंबकल्याणार्थ पोषक व्हावे म्हणून देवदेवतार्जनाकडे कार्यान्वित झालेले असतात. पण हा तिचा देवधर्म आपल्या कुटुंबाच्या रक्षणार्थ व पोषणार्थ आहे, असा सूज्ञ विचार तिच्या पतीच्या ठिकाणी निर्माण न झाल्याने, पतीस आपली स्त्री देवधर्माचे अवडंबर माजवीत आहे असे वाटून, त्या स्त्रीचा उपजत असणारा गुण विकसित न होता, तिच्या विकासा आड तिचाच पती, जो जन्मकर्म हा गुण घेऊन जन्म घेता झाला आहे, तो येतो. यातील अधिक महत्वाची ओळख अशी की, अशा कुटुंबातील काही स्त्रियांना त्यांच्या कुलदेवतांचे संचार असतात. पण अशा स्त्रियांना आपल्या पतीला हा मार्ग रुचत नाही म्हणून इतरत्र कुटुंबियांचे घरी जाऊन, ही संचार अवस्था व्यक्त करावी लागते. याउलट दुसरी बाजू अशी अनुभवास येते की, पतीचा प्रधान गुण जन्मजन्मांतर व धर्मपत्नीचा प्रधान गुण जन्मकर्म, अशा वेळी पती हा स्वाभाविक देवधर्म करुन धर्माचरण करीत असतो. कारण त्यास प्रपंचातील कर्तव्याची जबाबदारी कृपाशिर्वादाने पार पाडावयाची असून, प्राप्त झालेल्या गुणांमुळे ह्या जन्माचे काहीतरी सार्थक व्हावे असे वाटत असते. पण जर पत्नीचा प्रधान गुण जन्मकर्म असेल, तर पतीने अंगिकारलेल्या देवादिकांच्या किंवा गुरुभक्तीच्या सेवेत ती सहकार्य न देता, विटाळातही त्याला अन्न सेवन करण्यास भाग पाडून, त्याच्या पारमार्थिक उन्नतीस हानी पोहचविते.

अशाच प्रकारची भिन्नाभिन्न गुणपरत्वे जन्माला आलेली मानवी जीवने ही जेव्हा एकत्र येऊन, ह्या विसंगत गुणांमुळे प्रपंचात परमार्थात दु:खाला कारणीभूत होतात; अशांना सूज्ञपणाने एवढेच सांगावयाचे आहे की, जरी आपण ह्या जन्मात प्रपंच करते झालात किंवा परमार्थ अंगिकारते झालात, तरी जोपर्यंत एकमेकांचे प्रधान गुण एकमेकांना पोषक होत नाहीत, तो पर्यंत दोन्ही अवस्थेतील कर्तव्ये ह्या जन्मात प्राप्त करुनही, त्याचा लाभ पुढील जन्मासाठी यत्किंचितही होऊ शकत नाही.

वरील विषयाचा आपणास परिचय करुन दिल्यावर, आपली महत्वाची जबाबदारी अशी की, ज्या गुणपरत्वे आपल्या कुटुंबात पती-पत्नीपासून ते मुला-बाळापर्यंत ही भिन्नता आहे, त्या गुणपरत्वे होणारे कार्य हे जरी एकमेकांना पोषक नाही, तरी त्यासाठी एकमेकांनी एकमेकांच्या गुणातील गुणदोष वेचित न बसता, जीवनाला ज्या महत्वाच्या गुणांचा आधार म्हणजे देवादिकांचा गुण, याच्याशी सर्वांनी एकरुप व्हावे. यासाठी तुम्ही भक्तांनी कुलदेवतांची, उपास्य देवतांची किंवा गुरुदेवतांची आराधना करावी.पण चुकूनही एकमेकास ही आराधना करीत असताना, परमेश्वरावर अधिक प्रेम, त्याच्या बद्दलची अधिक भक्ति, त्याच्या बद्दलचा अधिक नि:स्वार्थ भाव किंवा परोपकार का करावासा वाटतो, ह्या विचारपरत्वे त्या व्यक्तींच्या गुणांच्या विकासाआड येऊ नये. असे भिन्नाभिन्न गुण हे एका पातळीवर आणून, त्यांचा हितसंबंध देवादिकांशी जर गुरुकृपाशिर्वादाने जोडला गेला, तर आज जीवनात विचार-अविचाराने घडणारे अनेक क्षुल्लक प्रसंग व त्यापासून होणारा मनस्ताप किंवा आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तिपर्यंत आपल्या विचारांची दिशा, जी या भिन्नाभिन्न गुणपरत्वे होत असते, त्या विचारांना देवादिकांशी संबंधित केल्याने, तुम्ही बुध्दीने कितीही अविचार करते झालात, तरी त्या अविचारांना सामावून घेण्यासाठी, मनाचे सामर्थ्य हे अधिक झालेले आहे, हे अनुभवास येईल.

आपण भक्तांच्या अडीअडचणीनिवारणार्थ सुलभ व सोप्या अशा मार्गदर्शनपध्दतीतून, आपण सर्वाना प्राप्त जीवनात सुख, शांति, समाधान याचा योग्य तो लाभ व्हावा, या सद्हेतूने या कार्यास आरंभ झाला; व या कार्यपध्दतीतील मार्गदर्शन हे आचारविचारात आणण्यास जरी सुलभ पध्दतीने मार्गदर्शन करण्यात आले, तरी या साधनपध्दती प्राप्त करणे, हे गुरुमार्गात आपणास वाटते तितके सुलभ असे साधन नाही. कारण जरी एखाद्या व्यक्तीला आपल्या नित्य साधनेने किंवा उपासनेने गुरुकृपाशिर्वादाची प्राप्ती झाली, तरी प्राप्त झालेला गुरुकृपाशिर्वाद नेमका कोणत्या साधन माध्यमातून उपयोगात आणला असता आपण भक्तांचे कल्याण होईल, हे ठरविणे व प्रत्यक्षात त्याची अनुभूति येणे, हे एक दिव्य साधन गुरुमार्गात साधकाला विचारात घ्यावे लागते.

प्रत्येक मानवाचा जन्म हा अनादि जन्मांच्या कर्मपरंपरेतून उदित होत असल्याने, प्रत्येक जन्मात त्या मानवाच्या हातून कर्मक्षय व कर्मवृद्धी ही होत असताना, नकळत ऋणानुबंधांचे हितसंबंध त्याच्या जीवनाशी जोडले जात असतात. पुढे अनेक जन्मानंतर जेव्हा प्राप्त कर्मपरत्वे जो जन्म येतो, त्यापेक्षा जर ऋणानुबंधाची प्रखरता अधिक असेल, तर जन्माला अलेल्या व्यक्तींच्या भूतभविष्याचा आराखडा हा जरी राजयोग दर्शवित असला, तरी कर्मपरत्वे प्राप्त होणारी फले प्राप्त न होता, ऋणानुबंधपरत्वे प्राप्त झालेले दोष, हे भोगणे ह्या जन्मात भाग पडते.असे ऋणानुबंधपरत्वे असणारे दोष व त्याचे निवारण व्हावे म्हणून आपल्या घराण्यातील इष्टदेवदेवता याच्या प्रीत्यर्थ उपासतापास, नवससायास, व्रतवैकल्ये, होमहवन, जपजाप्य इत्यादि मार्गाचा अवलंब करुन, आपण सुखाची अपेक्षा करते झालो, तरी ह्या दोषांची प्रखरता इतकी प्रखर असते की, केले गेलेले देवदेवतार्जन याचे केवळ आपण स्मरण करण्याव्यतिरिक्त त्याचा उपयोग ह्या दोषांच्या निवारणार्थ होऊ शकत नाही.

अशामुळे अनंत काळपर्यंत देवदेवतांचा कृपाशिर्वादार्थ आधार घेऊन सुध्दा, आपण भक्तांची जीवने ही निराधार होत असतात. तेव्हा अशा दोषांचे योग्य कार्यपध्दतीने व मार्गदर्शनाने करुन घेणे, हा मार्ग जीवनारंभी जरी बिकट वाटत असला, तरी भवितव्यात तो निरंतर अशा सुखाची ठेव असतो. अशा प्रकारची जी साधने आहेत, या साधनांना शास्त्राने विमोचन असे संबोधले असून, त्यापैकी पन्नास टक्के साधन हे गुरुमार्गात साधकाला प्राप्त होत असते व या प्राप्त झालेल्या साधनाप्रमाणे जेव्हा आपण भक्त, आपल्या अडीअडचणीनिवारणार्थ ह्या साधकाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता, त्यावेळी विमोचनार्थ जे विधी सूचित करण्यात येतात, उदाहरणार्थ त्रिपिंडी, नारायण नागबळी, हे जरी विधी भिन्नाभिन्न तीर्थक्षेत्री करण्यासाठी सूचित करण्यात आले, तरी केवळ विधी करण्याने हे दोष निवारण होत नाहीत. कारण हा विधी करण्याचा विधी हा केवळ तीर्थक्षेत्री झाला आहे म्हणून त्याला फलप्राप्ती आहे असे नाही. हा विधी करणारी व्यक्ती, ही सर्वस्वाने गुरुरुप व गुरुअंकित असावयास पाहिजे व हे दोष निवारण करण्याचे सामर्थ्यही त्या साधक व्यक्तीत असावयास पाहिजे तरच ह्या दोषांचे विमोचन होऊ शकते. ह्या शास्त्रीय पध्दतीप्रमाणे आपण भक्तांच्या कल्याणार्थ एकवीस वर्षे जे वंशविमोचनादि विधी, ऋणमोचन विधी व गुरुदीक्षेपर्यंत दीक्षांत विधी करण्यात आले, त्यांची पूर्णतः सांगता ज्या विधीने करण्यात आली तो विधी म्हणजे, महारुद्र स्वाहाकार विधी होय.

कर्मविमोचन :- प्राप्त जीवनातील अडीअडचणीनिवारणार्थ गुरुमार्गदर्शनार्थ आल्यावर, ज्या निराकरणपध्दतीने अडीअडचणींचे निवारण होऊन, खऱ्या अर्थाने भक्ति करण्याची योग्य ती शिकवण गुरुमार्गदर्शनाप्रमाणे मिळत असते, अशा वेळी ह्याच अडीअडचणी निवारण्याचे प्रयत्न ज्ञानअज्ञानाने, विचारअविचाराने पूर्वीही झालेले असतात. परंतु ह्या प्रयत्नांना यश न येण्याचे कारण म्हणजे, प्रयत्न ‘निराकरण’ नसून, निराकरणार्थ केलेला तो एक प्रयत्न असतो. पण गुरुमार्गात खऱ्या अर्थाने भक्ति करण्याची सतत आवड निर्माण झाल्यानंतर, जो अढळ विश्वासाने गुरुभक्ति करतो, पण चुकूनही उपासतापास, व्रतवैकल्ये, जपजाप्य हे पुनश्च करण्याचा विचार करीत नाही; हा जो बदल गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त होत असतो, त्यालाच कर्मविमोचन म्हणतात. परंतु गुरुमार्गात भक्तभाविक ह्या विमोचनाचा अर्थ अज्ञानाने असा लावतात की, पूर्वीच्या अनेक जन्मात ज्ञानअज्ञानाने घडलेल्या पातकप्रमादांचे विमोचन म्हणजे कर्मविमोचन. पण कर्मविमोचन हे साधन केवळ जन्मजन्मांतर व जन्मकर्म ह्यांच्याशी हितसंबंधित नसून, प्राप्त जीवनांत ज्या आचारविचारांचा आघात आपल्या नित्य कर्तव्याआड येत असतो, अशा वेळी तत्परतेने तसे न करण्याची जाणीव होण्याची क्रिया ज्या माध्यमातून होते, अशा माध्यमिक अवस्थेला कर्मविमोचन असे म्हणतात. ह्याचा अर्थ कर्मविमोचन ही साधना देवाप्रीत्यर्थ होणाऱ्या नित्य साधनेपेक्षाही अधिक जवळची असल्याने, दिवसाकांठी आपण आपले कर्मविमोचन गुरुकृपाशिर्वादाने किती करु शकलो, ह्याचा नित्याने आढावा घेणे, म्हणजे पुण्य संचय होय.

ऋणमोचन :- वरील दोन अवस्थांच्या हितसंबंधात जीवनातील प्रतिकूल अशा कर्मामुळे जो त्रास शारिरीक, मानसिक व आर्थिक अशा स्वरुपात होत असतो, यासाठी विमोचन म्हणून जे करण्यात येते, त्यामुळे कर्माची प्रखर प्रतिकूलता लयास जाऊन अनुकूलतेचा लाभ होत असतो. ऋणमोचन म्हणजे पूर्वीच्या जन्मात आपण एकमेकांचे ज्या काही कर्मकार्यपरत्वे ऋणी असतो असा हितसंबंध नसून, प्राप्त जन्मात आपण ज्या कुटुंबात जन्म घेते होतो, त्या कुटुंबातील आपली आप्तेष्ट मंडळी यांचे हितसंबंध नात्याने किंवा कर्मपरत्वे पूर्वीच्या जन्मात आलेलेच असतात असे नाही; पण या जन्मात एका कुटुंबछायेखाली आपण जन्माला आल्यामुळे, आपले देहिक नात्याचे हितसंबंध बहिणभाऊ, आईवडिल, मुलेमुली, नातवंडे इत्यादि विषय परत्वे जरी जोडला जात असला, तरी एका कुटुंबाच्या छायेमुळे जो जन्म प्राप्त होत असतो, त्यामुळे हे हितसंबंध देहिक स्वरुपात जरी आपणास नाते म्हणून जाणवले किंवा आपण विचारात घेतले, तरी पूर्वकर्मपरत्वे जो जन्म प्राप्त होतो, त्या प्राप्त जन्मात ह्या प्रत्येकांशी आपले हिताचे हितसंबंध कर्मपरत्वे असतीलच असे नाही. म्हणून अनेक कुटुंबात सख्ख्या बहिण भावंडात नात्याचे हितसंबंध अनुभवास न येता, अधिक विभक्तता अनुभवास येते. याचे कारण प्राप्त जन्मात केवळ देहाने नाते असून, हा स्नेहभाव किंवा आदर निर्माण होत नाही. यासाठी एकमेकांना पोषक अशा कर्माचे हितसंबंध जर जीवनाशी हितसंबंध म्हणून कार्यान्वित होतील, तर परस्परांबद्दलचा जिव्हाळा व आपलेपणा हा अनुभवास येईल. जीवनात असणारी अशी ही विसंगती गुरुकृपाशिर्वादाने निवारण होऊन, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आपले इष्ट कर्तव्य स्वतःच्या कल्याणार्थ व कुटुंबकल्याणार्थ जे वाव कृपाशिर्वादामुळे प्राप्त होतो, ह्या क्रियाकर्मास जी अवस्था कृपाशिर्वाद म्हणून कारण होते, त्यास ‘ऋणानुबंध’ असे म्हटले आहे. ऋणानुबंध याचा अर्थ एकमेकांशी एकमेकांचे देणे घेणे करण्याचा व्यवहार नसून, प्प्त्रा जन्मात प्रेमाने व कर्तव्याने जीवन व्यतीत करण्याचे कर्तव्य करणे असा आहे.

जीवनउत्पतीचे वरील शास्त्रशुध्द कारण समजल्यावर, आपणास ही गोष्ट स्पष्ट समजावयास पाहिजे की, अनेकवेळा कुटुंबातील मुलामुलींची नांवे ही मागील पिढीतील दिवंगत व्यक्तींच्या नावाशी हितसंबंध जोडून, त्याच व्यक्ती कुटुंबात पुनश्च जन्माला आल्या आहे असे समजून, त्याच त्याच नावाचे नामकरण विधी मुलामुलींच्या बाबतीत अनेकवेळा केले जातात. वास्तविक कुटुंबात जन्माला येणारा जीव हा आपल्या नात्याच्या हितसंबंधा मुळे जन्माला येतो असे नसून, जीवास जन्मप्राप्तीनंतर आपल्या जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करण्यास योग्य कुटुंब व काळवेळ, हा विचार करुन जन्मास यावयाचे असते किंवा पूर्वीच्या अनेक जन्मपरत्वे जी कर्मप्रवृत्ति शिल्लक राहिली असेल, त्या प्रवृत्तिप्रमाणे जीवास जन्म प्राप्त करणे भाग पडते. अशा अवस्थेत जन्माला येणारे जीव हे नात्याचे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या हितसंबंधाचे आहेत, हे समजून असे जे नामकरण विधी होतात, त्या व्यक्तींना भविष्यकाळात ह्या नामकरण विधीमुळे, ज्या दिवंगत व्यक्तींशी त्यांचा हितसंबंध अज्ञानाने जोडून दिलेला असतो, अशांच्या कर्मपरंपरेशी हितसंबंध आल्यामुळे, प्राप्त जन्मात जरी प्रतिकूल कर्माची धिक प्रखरता नसली, तरी ह्या नामकरणामुळे अनावश्यक कर्माचा हितसंबंध उदित होण्याने, त्या व्यक्तीस आपले जीवन नाममात्र व्यतीत करावे लागते. यासंबंधी तात्विक विवेचन आपण भक्तांना व्हावे म्हणून क्रमशः ह्या विमोचनासंबंधी जे निवेदन लिहिले आहे, ते अभ्यासण्यास महत्त्वाचे आहे.

या निराकरणपध्दतीत आपल्या प्राप्त जन्मात अडीअडचणी निर्माण होण्याचे जे दोष वरील कारणपरत्वे असतात, त्याचे ज्ञान सर्वसामान्यपणे अडीअडचणीत असणाऱ्या भक्तभाविकांना होत नसल्याने, आपण अडीअडचणीमध्ये आहोत म्हणजे कोणीतरी आप्ताने, इष्टमित्राने जादूटोणा, करणी किंवा काही भूतप्रेत आदि प्रकारांनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी आपण बहुसंख्य भक्तांची विचारधारणा असते. अशा दुबळ्या व संशयग्रस्त विचारांनी बाहेरील साधकांना आपण भक्तां कडून पैसे मिळविण्यास योग्य ती संधी आपणच अज्ञाने देत असतो. वास्तविक मंत्रतंत्र, भूतप्रेत आदि विद्या आज नाहीत असे नाही. परंतु त्यांचा वापर करणे हे सहजासहजी कोणासही प्राप्त होण्यासारखे साधन नसल्याने, केवळ आपल्या अडीअडचणींचे कारण समजू शकत नाही, म्हणून आपण विसंबून राहतो.

आपण भक्तभाविकांना योग्य ती मार्गदर्शनाची दिशा निराकरण म्हणून सूचित केल्यावर, आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ ज्या दीक्षा गुरुआज्ञेने दिल्या जातात, त्या दीक्षा म्हणजे उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा व अनुग्रह दीक्षा ह्या होत. ह्या तीन दीक्षांचा लाभ घेतलेल्या भक्तभाविकांना ‘उपासना’ दीक्षेत त्यांच्या इष्ट कुलदेवतेची उपासना सूचित करण्यात येऊन, आजपर्यंत त्यांच्या हातून न झालेल्या त्या देवदेवतांच्याबद्दलचा कुलधर्म कुलाचार, हा सोप्या पध्दतीने करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. ‘नामस्मरण’ ह्या दीक्षाविधीत काही एका निश्चित संख्येने आपण भक्तांनी नामस्मरण करावे व त्या नामस्मरणाचा उच्चार करण्यापूर्वी, काही एका इष्टसंकल्पाचा उच्चार करावा; ह्या पध्दतीने ही दीक्षा देण्यात येते. तिसरी दीक्षा ही ‘अनुग्रह’ दीक्षा. ही दीक्षा म्हणजे प्रत्यक्ष ज्या गुरुतत्त्वाचे आपण उपासक आहोत किंवा पूजक आहोत, त्या तत्त्वाशी आपण एकरुप झालो आहोत असे नसून, पुढे देण्यात येणाऱ्या गुरुदीक्षेची ही पूर्वतयारी आहे. अशी कार्यपध्दती असतानासुध्दा, ज्या भक्तभाविकांना या तीन दीक्षा घेण्याचा लाभ झाला आहे, अशांची श्रध्दा, विचारधारणा अशी आहे की, या तीन दीक्षा आपल्या जीवनात पारमार्थिक उन्नतीसाठी दिलेल्या आहेत किंवा ज्या देवदेवतांचे आपण पूर्वापार पूजनादि विधी केले आहेत व ज्या गुरुतत्त्वाला आज आपण गुरुस्थानी मानतो आहोत, अशांच्या दिव्य दर्शनासाठी, साक्षात्कारासाठी किंवा दिव्य ज्ञानासाठी या दीक्षा आहेत. अशी समजूत करुन घेऊन ह्या दीक्षापरत्वे होणारा जो लाभ आहे, तो कोणत्या कारणपरत्वे घ्यावयाचा आहे, हा सद्हेतू लक्षात न घेता, केवळ पारमार्थिक जीवनाचा जीवनारंभ झाला आहे असे भासवून, अनेक व्यक्ती आपली नित्याची इष्टकर्तव्ये बाजूस ठेवून, या उपासनेतून आपण काही विलक्षण प्राप्त करणार आहोत, म्हणून जीवनातील बहुमोल वेळ अधिकाधिक उपासना करण्यात खर्च करतात. वास्तविक मार्गदर्शनपध्दतीप्रमाणे ह्या तीनही दीक्षा, ह्यांचा हितसंबंध पारमार्थिक जीवनाचा लाभ जोडण्यासाठी, किंवा देवदेवतांच्या साक्षात्कार, दृष्टांतासाठी नसून, ह्या उपासनेचा हितसंबंध प्राप्त झालेल्या जीवनातील देहिक माध्यमाशी, म्हणजे काया, वाचा, मन ह्यांच्याशी आहे.

आज प्राप्त झालेले काया, वाचा, मन म्हणजे देहिक माध्यम; ह्याच माध्यमद्वारा प्राप्त जन्मात आपण भक्तांना ऐहिक जीवन व पारमार्थिक जीवन यांचा यथोचित लाभ करुन घ्यावयाचा आहे. पण असे प्राप्त झालेले देहिक माध्यम, ह्याचे अस्तित्व जरी आपल्याला जाणवत असले, तरी हे प्राप्त झालेले देहिक माध्यम पूर्वीच्या अनेक जन्मांतील ऋणानुबंधांशी हितसंबंधित आहे. अशा संबंधाचे हितसंबंध म्हणजे पूर्वीचे आपले अनेक जन्म, त्या जन्मपरत्वे ज्या ज्या काही कुटुंबात, ज्या ज्या काही धर्मात, ज्या ज्या काही देवदेवतांच्या ऋणानुबंधात आपण जन्म घेते झालो; असे वेळोवेळी घेतले गेलेले जन्म व आज प्राप्त झालेला जन्म, ज्याचा संबंध देहिक माध्यमाद्वारा कर्तव्य म्हणून व्यतीत करावयाचा आहे; अशा ह्या देहिक माध्यमाच्या परिसरांत असणाऱ्या हितसंबंधांच्या वलयांचा हितसंबंध, हा जरी प्राप्त झालेल्या काया, वाचा, मनाशी असला, तरी त्या सर्व ऋणानुबंधाना पोषक असे माध्यम म्हणजे आज प्राप्त झालेले काया, वाचा, मन हे जर असेल, तर प्राप्त जन्मात आपण ज्या काही सुख, शांति, समाधानाच्या अपेक्षा कराल, त्या पूर्णत्वास जाण्यास कोणत्याही कारणपरत्वे अडथळा निर्माण होणार नाही. पण आज प्राप्त झालेले देहिक माध्यम म्हणजे काया, वाचा, मन हे जर ह्या ऋणानुबंधास धारण पोषक नसेल, तर प्राप्त जन्मात ऋणानुबंधपरत्वे सुख, शांति, समाधान यांची तरतूद असूनही प्राप्त जन्म हा केवळ कष्ट करण्याशिवाय काहीही अधिक प्राप्त करु शकत नाही. अशी दोष परंपरा प्राप्त जन्मात ऋणानुबंधांशी व ऋणानुबंध हे प्राप्त जन्माशी असतील, अशा वेळी सुख, शांति, समाधान करण्यासाठी आपण भक्त जो प्रयत्न अहर्निश करता, त्यांस योग्य ती फलप्राप्ती होण्यासाठी, कृपाशिर्वाद म्हणून काही माध्यमांची आवश्यता असते. अशा माध्यमाचा आपण भक्तांना विनासायास लाभ करुन देणे, म्हणजे प्राप्त झालेले जीवनातील देहिक माध्यम हे ऋणानुबंधाशी अनुकूल करुन देणे, अशा ज्या साधनांचा कार्यभाग आपण भक्तांच्या कल्याणार्थ गुरुआज्ञेने करण्यात योतो, त्या साधनपध्दतीस ‘दीक्षाविधी’ असे म्हणतात.

ह्या तीन दीक्षांत विधींचा लाभ आपण भक्तांनी घेतल्यावर, ह्याचा संबंध देवदेवतांशी किंवा पारमार्थिक जीवनाचा लाभ किती झाला व किती होणार याच्याशी विचारात न घेता, आपण नित्याने, ज्या कुटुंबात ह्या दीक्षांत विधीपूर्वी आचाराने, विचाराने व वाणीने बोलत होतो, चालत होतो, त्या कुटुंबातील व्यक्तींना आपण घेतलेल्या ह्या तीन दीक्षांत विधीमुळे आपल्यात काय बदल झाला आहे, याची जाणीव होऊन, ही कुटुंबिय मंडळी आपल्याशी व आपण त्यांच्याशी आनंदाने कुटुंबवात्सल्याचा लाभ घेते झालात, तर परस्परांत जो हा स्नेहभाव निर्माण झाला, ह्या अवस्थेलाच “पारमार्थिक उन्नती” म्हणता येईल.

ह्या प्राथमिक अवस्थेतील तीन दीक्षांत विधींचा लाभ होण्याने, आपण भक्तांचे काया, वाचा, मन या देहिक अवस्थेस एकरुपत्व येते. त्यानंतर आपण भक्तांना ‘गुरुदीक्षा’ हा जो विधी दीक्षा म्हणून देण्यात येतो, त्या क्षणापासून आपले जीवन पारमार्थिक होण्यास आरंभ होतो. कारण ह्या तीन दीक्षांत विधींपूर्वी अनेक वेळेला असे अनुभवास आले असेल की, काया हे माध्यम जरी देवदेवतांचे किंवा उपासनेचे बंधन मानून देवापुढे बसले, तरी ही क्रिया करण्यास मनाची जी एकाग्रता त्या वेळेस असावयास पाहिजे, अशा वेळेस मन हे अप्रत्यक्षपणे अन्य विषयाधीन झालेले आहे असे आढळून येते. अशी ही भक्ति करण्याची खोटी क्रिया, यामध्ये आपण तत्वतः देवाची फसवणूक तर करतोच, पण अधिक आपण आपलीच फसवणूक करुन घेत असल्याने, जो वेळ दिवसाकाठी ईश्वरचिंतनात म्हणून खर्च केलेला असतो, हा देवदेवतांसाठी किंवा स्वतःसाठी खर्च न होता, तो अनाठाई खर्च होत असतो. पारमार्थिक उन्नतीचा पाया म्हणजे काया, वाचा, मनाची शुध्दता होऊन, त्यांचे परिपक्वत्व होऊन, देवास मारलेली हाक देवापर्यंत पोहोचणे व देवाची भाक [कृपा] आपणापर्यंत पोहोचणे; व ही क्रिया पूर्णत्वास जाणे ह्याचाच अर्थ ‘साक्षात्कार’ होय.

वरील उल्लेख केलेल्या व आपण भक्तांनी भक्तिभावनेने ज्या दीक्षांत विधीचा अंगिकार करुन, ह्या तीन दीक्षांत विधींतून आपल्या काया, वाचा, मनाची ऋणमुक्तता करुन, देहिक अवस्थेला विमोचित करुन, खऱ्या अर्थाने गुरुकृपाशिर्वादाला प्राप्त करुन, जीवनाचे सार्थक केलेत. अशा ह्या दीक्षांत विधींना भवितव्यात सिध्दस्वरुप प्राप्त करुन, ती परंपरा पुढील काळात दु:खी लोकाच्या कल्याणार्थ कार्यान्वित होण्याचा कार्यकारणभाव म्हणजे श्री महारुद्र स्वाहाकार होय.

आजपर्यंत अशा प्रकारचा स्वाहाकार विधी हा अन्यत्र झालाही असेल, किंवा यापेक्षाही मोठा विधी यापुढे केला जाईल; तरीसुध्दा हा विधी ज्या प्रधान संकल्पमाध्यमातून करावयाचा असतो, असा संकल्प केवळ जगतातील दु:खी लोकांच्या सुख, शांति, समाधानासाठी आहे असे जाहीर करुन, सुख, शांति, समाधानाचे फळ आपल्या वाट्यास येत नाही. कारण हा विधी करण्यापूर्वी, आपण भक्तांच्या अडीअडचणीतील ज्या प्रधान अडीअडचणी आहेत, यांची विस्तृत कल्पना ही स्पष्ट व्हावयास पाहिजे. प्राप्त जन्मात सुख, शांति, समाधानाच्या ज्या काही अपेक्षित इच्छा आहेत, त्या प्राप्त न होण्यास जी कारणे दोषपरत्वे आहेत, ते दोष जर जाणता जाणू शकला नाही, तर केला गेलेला संकल्प हा केवळ एक धार्मिक विधी, यापेक्षा महत्वाचा म्हणून आपण भक्तास लाभदायक होणार नाही.

वरील विमोचनावरुन आपण सूज्ञ भक्तांस असे अनुभवास येईल की, जीवनांत ज्या काही अडीअडचणी निर्माण झाल्या, त्यांच्या निवारणार्थ केवळ देवदेवतांवर त्याप्रीत्यर्थ धार्मिक विधी व आचरण करण्याने, आपणास किंवा आपल्या कुटुंबियास अपेक्षित ऐहिक सुखे या जन्मात प्राप्त होतील, असे शाश्वत कोणीही सांगू शकत नाही. याला कारण आपण भक्तांच्या जीवनातील सुख, शांति यांच्या आड येणारे जे दोष असतात, ते गुरुकृपाशिर्वादाने व निराकरणपध्दतीनें प्रथमतः अनुकूल करुन, त्या दोषपरत्वे असणारी त्या दोषांची जी सहज कर्मप्रवृत्ति असते, ती अनुकूल व्हावयास पाहिजे. अशी अनुकूलता प्राप्त झाल्याने जो भाग दोष म्हणून शिल्लक राहतो, त्याच्याच विमोचनार्थ पुढे गुरुआज्ञेने जे विधी होत असतात, त्यामुळे तुम्हा भक्तांच्या भवितव्याची तरतूद होत असते. पण आज साधक अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींचे अनुभव असे असतात की, त्रिकालज्ञानप्राप्ती व त्याप्रमाणे भूतभविष्य याबद्दलचे जीवनाबद्दलचे भविष्य सांगणे म्हणजे गुरुमार्ग. पण सूज्ञ भक्तांनो, जो खरा गुरुमार्ग आहे व ज्यास तो गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त झाला आहे, तो भूतभविष्य न सांगता भक्तांच्या न कळत त्यांचा भवितव्य घडवितो. हाच खरा गुरुभक्त होय, व अशा गुरुभक्तांचे कार्य भक्तभाविकांसाठी इतके परिपूर्ण असते की, भक्तांच्या प्राप्त जीवनापासून ते भवितव्यात प्राप्त होणाऱ्या अनेक जन्मापर्यंतची तरतूद, त्यांच्या जीवनात कृपाशिर्वादाने केली जात असते. पण याचा योग्य तो अनुभव घेण्याची जबाबदारी गुरुभक्तांची असली पाहिजे, हे गुरुभक्ताने विसरता कामा नये.

आपण भक्तांच्या कल्याणार्थ गेली कित्येक वर्षे हे जे कार्य मी अंगिकारले, ते कार्य केवळ एक जीवनातील ऐहिक विषय म्हणून नव्हे. प्राप्त जन्मात जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रत्येक मानवाला जो बहुमोल जन्म प्राप्त होतो, अशा प्राप्त जन्माची उतराई होण्यासाठी, त्या भक्तांस सर्वस्वाने आपल्या गुरुतत्त्वास शरण जावे लागते. एवढेच नव्हे तर सेवाकार्याचा कृतार्थ कार्यभाग पूर्णत्वाने प्राप्त करण्यासाठी जरी मरण पत्करावे लागले, तरी अशी दिव्यता स्वीकारण्याची निष्ठा परिपूर्णपणे भक्तांच्या ठिकाणी जर निर्माण होईल, तरच गुरु हा विषय प्राप्त करणे सुलभ आहे. याच मार्गदर्शनपध्दतीप्रमाणे गेल्या अनेक वर्षात गुरुकृपाशिर्वादाने जे आपल्या कल्याणार्थ योग्य असे मार्गदर्शन गुरुद्वारा गुरुआज्ञा म्हणून झाले, ती आज्ञा आपण भक्तांच्या जीवनांत कार्यपध्दती म्हणून साकार करण्याचा अल्प असा जो प्रयत्न झाला, त्यासच या समितीचे कार्य म्हणता येईल.

केवळ देवदेवतार्जन करणे व तासन्तास देवासमोर बसून, किंवा तीर्थक्षेत्री राहून, ‘मी देवाच्या आज्ञेप्रमाणे सेवा करतो आहे’, असे सांगण्याने, साधक अवस्थेतील श्रीगणेशा प्राप्त होणे अत्यंत बिकट आहे. साधकाच्या जीवनातील साधकाची अवस्था, याचे मोजमाप देवदेवतांसही करणे शक्य झालेले नाही. अशा अवस्थेत जेव्हा आपण भक्त, आपल्या जीवनातील इष्ट कर्तव्याची जाणीव विसरुन, जगातील कुणी एक देवभक्त आपणास विनासायास सुख, शांति, संपत्ती प्राप्त करुन देणार आहे, या आशेने इतस्ततः धांव घेत, ह्याजीवनातील बहुमोल असा काळ अनाठायी खर्च करुन, प्राप्तजीवनात सुख, शांति, समाधानाचा जो भास निर्माण करता, त्यामुळे स्वाभाविक देवाबद्दल, धर्माबद्दल, प्राप्त जन्मातील इष्ट कर्तव्याबद्दल असणारी श्रध्दा, याचा लय होत असतो. अशा अश्रध्देची जाणीव ही स्वतःस प्रथमतः व्हावयास पाहिजे. वास्तविक अशी अश्रध्दा निर्माण करण्यास देवधर्म कारणीभूत नसून, आपणच कारणीभूत आहोत. कारण आपल्या जीवनपरिसरांत आपल्याशिवाय इतरांना जे सुख, शाति, समाधान प्राप्त झालेले असते, ते अजून आपल्याला का प्राप्त होत नाही ही जाणीव विचारात न घेता, इतरांच्या प्प्त्रा झालेल्या सुखाचे अनुकरण करण्याकडेच आपली जीवने अधिक धाव घेत असतात.

अशा या बिकट समस्या जरी कर्मपरत्वे प्राप्त झालेल्या नसतात, तरी आपणास प्राप्त जीवनाबद्दलचा योग्य बोध न होण्याने, ह्या जीवनाचा जो दीर्घकाळपर्यंत सुखाच्या स्वप्नामुळे अपव्यय होत असतो, त्यामुळे या समस्या योग्य गुरुकडे व गुरुमार्गाकडे गेल्यावरही, आपणांस योग्य तो कृपाशिर्वादाचा लाभ प्राप्त करण्यात अडथळा निर्माण करतात. जीवनांत आपण भक्तांनी प्रामुख्याने दोन गोष्टींची जाणीव ठरवावयास पाहिजे. ती म्हणजे एक तर आपल्या नित्याच्या उपासनेने आपले प्राप्त जीवन याचे ज्ञान करुन घ्यावयास पाहिजे; किंवा गुरुमार्गी झाल्यावर गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन गुरुंला समर्पण करावयास पाहिजे; तरच प्राप्त जन्माचे सार्थक काय हे अनुभवास येईल. पहिला जो मार्ग की, नित्य उपासनेतून आपल्या जीवनाचे ज्ञान करुन घेणे, हा मार्ग सर्वसामान्य माणसाच्या सामर्थ्यापलिकडे असल्याने, ही अवस्था ह्या जन्मात प्राप्त होईलच असे नाही. पण दुसरा मार्ग हा इतका सहज व सोपा असूनही, त्या मार्गात पूर्णत्वाने एकरुप होण्याचे कर्तव्य बहुसंख्य भक्त करीत नाहीत. याला जी कारणे आहेत ती गुरुकृपाशिर्वादाच्या सामर्थ्याइतकी नसूनही, त्याबद्दलचे भय, गुरुमार्गी होऊनही जात नाही. ह्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे अनेक भक्तभाविकांना ‘आपल्या घराण्यातील रुढी, परंपरा, धर्माबद्द्लच्या चालीरिती, कुलधर्म, कुलाचार, श्राध्दपक्षादि धार्मिक विधी, हे करु नका’ असे सांगूनही, ते करण्याचा मोह केवळ रुढीपरंपरा म्हणून सोडता आलेला नाही. अशा ह्या समस्या अनादिकालापासून आम्हा मानवांच्या जीवनात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, जरी गुरुकृपाशिर्वादाच्या सामर्थ्याने घराण्यातील दिवंगत सात पिढ्या व पुढे जन्माला येणाऱ्या सात पिढ्या ह्यांच्या अन्न, वस्त्र,निवारा ह्याची तरतूद करण्यासाठी गुरु साक्ष देत असले, तरी त्यांच्या कृपाशिर्वादाची ही साक्षात भेट स्वीकारण्याची साथ देण्याचे मनोधैर्य भक्तभाविकांत नसल्याने, प्रत्येक जन्मात व प्रत्येक पिढीत त्याच त्याच धर्मकृत्यांचा, संस्कारांचा व धार्मिक विधींचा पुनरुच्चार करणे व कर्मपरत्वे प्राप्त झालेले जीवन अधिक बिकट करणे, हेच एक आजचे जीवन आम्हा मानवाच्या वाट्याला आले आहे.

आपण भक्त आज ज्या गुरुकृपाशिर्वादाचा लाभ घेते झालात, हा लाभ होण्याचे भाग्य हे केवळ आज निर्माण झालेली जीवनातील अडचण म्हणून झालेला नसून, पूर्वीच्या अनेक जन्मापासून त्याच्याबद्दलचा नितध्यास हा अंशमात्राने निर्माण होत होत, आज पूर्णत्वाने गुरुप्राप्तीच्या दारात आपण सहजासहजी आला आहात. अशा वेळी विचार-अविचारांना, ज्ञान-अज्ञानाला बळी पडून, त्या दारातून प्रवेश करावयाचा की नाही, असा संशय निर्माण होणे, याच्याइतके दुसरे मोठे पाप असूच शकणार नाही. आजपर्यंतच्या माझ्या अनुभवशील व सिध्दसिध्दांत कार्यपध्दतीप्रमाणे तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ योग्य व आवश्यक असेच साधन व निराकरण सूचित करण्यात आल्याने, यापुढील काळात जर आपणास निरंतर सुख-शांति-समाधानाची भूक लागली असेल, तर ज्या रुढीपरंपरा ज्ञानअज्ञानाने तुम्ही अंगिकारुन त्याला धर्मकृत्य म्हणून संबोधता, त्या जर बाजूला ठेवल्यात तरच तुम्हां भक्तांना प्राप्त झालेला गुरुकृपाशिर्वाद म्हणजे काय याची जाणीव होऊन, भावी पिढ्यांनाही त्याचा लाभ होईल.

गुरूआज्ञेने जे विधी तुम्हां सर्वांच्या कल्याणार्थ झाले, ही तरतूद केवळ ऐहिक सुखप्राप्तीची म्हणून झालेली नसून, त्यामध्ये प्राप्त जन्मात पारमार्थिक सुखाचाही लाभ यथोचित व्हावा, या सद्हेतूने करण्यात आलेली असल्याने, आपण भक्तांनी यापुढील काळात मार्गदर्शनाप्रमाणेच देवधर्म, दानधर्म करणे हिताचे आहे. प्राप्त जन्मात जन्माचे सार्थक करण्याची इच्छा उतारवयात झाली, म्हणून अधिक काळ देवाला आळवण्याने जन्माचे सार्थक लवकर होईल, अशी अंधश्रद्धा विचारांत घेऊन, उठ बस देवाला हाका मारीत बसून, परमार्थप्राप्ती होणार नाही. गुरुमार्गात मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी साधन असते. कारण भक्तांच्या कल्याणार्थ किंवा उद्धारार्थ त्यास कोणते साधन लवकर फलप्राप्ती देईल तेच साधन सूचित केले जात असल्याने, त्या मार्गदर्शनावर अढळ निष्ठा ठेवून, आपल्या मनाने किंवा इतरांच्या सांगण्याने किंवा इतर संतवाङ्मय, धर्मग्रंथ वाचून ते ठरवू नये. अशाने करीत असलेली साधने ही सिद्ध नसल्याने, त्याचे फल कोणत्याच जन्मी अनुभवास येत नसते. पण गुरूमार्ग व गुरुमाध्यम हा सिद्ध अवस्थेचा साक्षात्कार असल्याने, त्यांच्या वाणीतून निघालेला शब्द हा वाक्याची जाणीव व प्राप्ती करून देतो; त्यासच सर्वस्त मानून जो त्याचा अंगिकार करील व त्याप्रमाणे आचरण करील, तोच भक्त गुरुपदी लीन होऊ शकेल.

वरील सर्व निवेदन आपण भक्तांच्या मार्गदर्शनार्थ एवढ्याचसाठी सूचित करण्यात आले आहे की, श्रीदत्तक्षेत्र नरसोबाची वाडी, येथे झालेल्या महारूद्र स्वाहाकाराची सांगता व त्याचा स्वीकार, श्री दत्तप्रभूंनी अत्यंत भक्तिभावनेने स्वीकारला आहे. ह्याची साक्ष देणे म्हणजे मी माझा व्यक्तिगत मोठेपणा आपणास सांगण्यासारखे होईल. पण आपण भक्तांस हे सांगण्यास मला अत्यंत आनंद वाटतो; ह्याचे कारण कार्यारंभी अडीच वर्षाचा काळ, मी श्रीदत्तसेवेत, श्री दत्तक्षेत्र औदुंबर येथे व्यतीत केल्यावर, त्यांच्या आज्ञेने कार्यार्थ जेव्हा त्यांचा निरोप घेऊन निघालो, तेव्हा त्यांच्या पायाशी एकच मागणे मागितले की, ‘आपण दिलेल्या कृपाशिर्वादाप्रमाणे हे कार्य माझ्या हातून निरपेक्ष व नःस्वार्थ बुद्धीने होऊ देत. आपल्या कृपाशिर्वादाने हे कार्य करीत असता इतरांच्याकडून मला मोठेपणा, नावलौकिक, आदि सामाजिक संपत्ती नको. माझे कार्य आपल्या कृपाशिर्वादाने मी यथायोग्य केले आहे व मी या जन्मांत आपल्या सेवेला उतराई झालो आहे, याची साक्ष आपणच द्यावयास पाहिजे’. ह्या इच्छेप्रमाणे महारुद्र स्वाहाकार विधीनंतर, मला श्री दत्तक्षेत्र नरसोबाचीवाडी येथील देवस्थान कमिटीकडून बोलाविण्यात येऊन, महाराजांच्या अंगावरील महावस्त्र अर्पण करण्यात आले. हा प्रसंग आपण जरी शब्दांत ऐकत असलात, तरी माझ्या प्राप्त जन्मातील गुरुभक्तीच्या सेवेचा हा ठेवा मला जो याच जन्मी मिळाला, ह्यांच्या इतके मोठे भाग्य ह्या त्रिभुवनात नाही, असा माझा संपूर्ण विश्वास श्री गुरुचरणी असल्याने, मी हे निवेदन आपण भक्तांच्या हितार्थ आज गुरूआज्ञेने आपणा सर्वांसमोर केले आहे. गोवा येथे ‘साईधाम’ वास्तू बांधण्यात येऊन, त्या वास्तूत ‘गुरुशक्तिपीठाची’ स्थापना करण्यात आली आहे, हे आपण सर्व भक्तभाविकांना विदित असून, ह्या शुभारंभास बरीच भक्तभाविक मंडळी उपस्थित होती. गुरुशक्तिपीठाची चिरप्रतिष्ठा गोवा येथील साईधाम वास्तूत करण्यात येऊन, त्या शक्तिपीठाची प्रतिके सर्व कार्यकेंद्रावर देण्यात आली आहेत, हे जरी आपण सर्व भक्तांना माहित आहे, तरी शक्तिपीठ स्थापनेचा शास्रोक्त विधी काय आहे, हे आपण भक्तांना माहिती करून देणे महत्त्वाचे आहे. केवळ मी आपल्या कल्याणार्थ काही विधी गुरुआज्ञेप्रमाणे साधनपरत्त्वे करतो आहे असा विश्वास ठेवून, प्रत्येक कार्यकेंद्रावर दिलेल्या शक्तिपीठाकडे आदराने जरी आपण पहात असलात, तरी गुरुमार्गात असे शक्तीपीठ स्थापन करण्याचा विधी किती कठीण आहे, हे आपणास स्पष्ट कळले पाहिजे.

आज आपण ज्या जगात रहात आहोत, ते जग ब्रह्मांडशक्तीचे एक प्रतिक म्हणजे ‘पिंड’ असून, जी ब्रह्मांडशक्ति त्रिगुणात्मक शक्तीने युक्त आहे, अशा ब्रह्मांडशक्तीतून ह्या पिंडाची म्हणजे पर्यायाने ह्या पृथ्वीची जोपासना, त्रिगुणात्मक शक्तीने म्हणजे उत्पत्ति, स्थिती, लय यांनी होत असते. याच पृथ्वीवर आपण मानव जन्माला येतो, म्हणजे त्या ब्रह्मांडशक्तीचाच एक अंश म्हणजे ‘पिंड’ आहोत. आपण जन्माला आल्यावर प्राप्त झालेले जीवन हे व्यतीत करण्यासाठी, आपणासही त्रिगुणात्मक शक्तीची धारणा ह्या काया, वाचा, मनामध्ये करावी लागते. ह्या त्रिगुणात्मक शक्तीपैकी ‘उत्पत्ति’ शक्तीच्या धर्मपरत्त्वे आपण जन्माला येतो. ज्या कायेला आपण धारण करून जन्म घेतो, त्या कायेत ‘स्थिती’ अवस्थेप्रमाणे स्थित्यंतरे होऊन, आपले देहिक माध्यम हे या जगाला जाणण्यासाठी समर्थ होते. अशा दोन शक्तींनी जरी मानवी देहाची धारणा होऊन, कर्मपरत्त्वे ते देहिक माध्यम कार्यान्वित होत असते, तरी त्या माध्यमातील अविकसितता, म्हणजे ह्या दोन शक्तींचे एकरूपत्त्व न होण्याने, ‘लय’ अवस्था ही धारण होत नाही. ज्या दोन अवस्थेपरत्त्वे आपण जन्म घेतो व देहिक माध्यमातून जीवन व्यतीत करतो, त्या जीवनाला व देहाला विकसित करण्याचे कार्य हे लय अवस्थेचे आहे. लय अवस्था म्हणजे अंत नसून, प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाचा पूर्णतः विकास म्हणजे, अनंत (Perfection) असा आहे. पण ही जन्मउत्पत्तिमीमांसा व तिचे कार्यकारण हे बहुजन समाजाला समजत नसल्याने, उत्पत्ति, स्थिति ह्या दोन अवस्थांपरत्त्वेच त्यांचे जीवन व्यतीत होत असते व ज्या प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक म्हणजे जीवनाला अनंतरूपी करणे, याऐवजी ह्या जीवनाचा अंत होऊन, पुनश्च जन्माला येण्याचे कारण आपणच ह्या जन्मात निर्माण करतो. अशी जी लय अवस्थेच्या अभावी आम्हा मानवांची जीवने आज जगतात जगत आहेत; अशांच्या जीवनात लय अवस्थेच्या अभावी जी पोकळी निर्माण झालेली असते; त्यामुळे जीवन हे समतोलपणे कार्यान्वित होत नाही. त्यामुळे आपल्या गरजेइतके सुख जरी प्राप्त झाले, तरी ते अनुभविण्यास आपण असमर्थ असतो.

गुरुमार्गाकडे किंवा देवादिकांच्या कृपाशिर्वादार्थ गेल्यावर, ज्या लय तत्त्वाचा अभाव आपल्या काया, वाचा, मनात आहे, ती धारण व्हावी, म्हणून गुरू किंवा देवादिक कृपाशिर्वादपरत्त्वे लय अवस्थेचे म्हणजे शक्तीचे संक्रमण आपल्या देहिक माध्यमात करीत असतात. पण ही लय अवस्था, भक्ताचे ठायी प्रथम भेटीतच संक्रमण करता येत नाही. कारण देहाभोवती विचार-अविचारांची वलये धारण झालेली असतात. अशी आपल्या नकळत धारण झालेली, आपल्या विचार, विकार, आचारपरत्त्वे जी वलये असतात, त्यामुळे कृपाशिर्वादपरत्त्वे जी लय शक्ति देहाच्या ठिकाणी धारण होणार असते, त्या शक्तीला आपले इष्टकार्य करण्यास अडथळा होत असतो. म्हणून वेगवेगळ्या दीक्षा वेळोवेळी देऊन, त्यापरत्त्वे सूचित केलेल्या साधनेतून दीक्षांतविधीपरत्त्वे गुरू भक्ताच्या देहाभोवती कवच निर्माण करतात व ह्या वलयाचा हितसंबंध देहाशी रहावा म्हणून, आवश्यक ती सेवा सुचवितात. अशा दीक्षांतविधीपरत्त्वे गुरुकृपाशिर्वादाचे कवच धारण होऊन, गुरू लय शक्तीचे संक्रमण करीत असताना, प्रतिकूल वलयांचा दुष्परिणाम प्राप्त होत असलेल्या कृपाशिर्वादावर होऊ नये, असा जो विधी किंवा अशी जी सिद्धसिद्धांतपद्धति, तिला ‘गुरुदीक्षा’ असे म्हणतात. केवळ एखाद्या व्यक्तीबद्दल पूज्यता वाटते आहे व त्या व्यक्तीबद्दलचा आदर आपण व्यक्त करतो आहोत, म्हणजे आपण गुरूमार्गी झालो आहोत व आपला दीक्षांतविधी झाला आहे असे नाही. भक्ताच्या इच्छेनुसार जे कार्य गुरु करीत नाही, पण जेव्हा गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आलेल्या भक्ताच्या आजच्या व पुढील प्राप्त होणाऱ्या जन्माचे अनुसंधान ज्या विधीपरत्त्वे प्राप्त करून देतात, ते गुरुमार्गात ‘अभिवचन’ असते. हे त्यांच्या वाणीतून निघालेले शब्द ही ब्रह्मवाणी म्हणून आपण भक्तांनी श्रवण करून, गुरूंच्याबद्दल शंभरटक्के विश्वास, श्रद्धा, भक्ती संपादन केली पाहिजे. केवळ कार्यकेंद्रावर सूचनापत्रे लावली जातात म्हणून अशा दीक्षांतविधींचा लाभ घेण्यास, आपण भक्तांनी अंधश्रद्धेचे व अज्ञानीपणाचे अनुकरण चुकूनही करू नये.

आज जगतात आपल्या सभोवार अशा काही व्यक्ती आपण पाहतो की, ज्यांना त्यांच्या अपेक्षेपलीकडे सुखसंपन्नता प्राप्त झालेली असते. अशा व्यक्तींना आपण नशिबवान म्हणून ओळखत असतो. पण अशी वस्तुस्थिती त्यांच्या जीवनांत असताना, तशा सुखाचा अभाव आपल्या जीवनांत कशामुळे आला आहे, याचा शोध किंवा बोध आपणास होत नाही. म्हणून ज्या व्यक्ती सुखसंपन्न आहेत त्यांचा इतरांनी हेवा केला, तरी त्यांच्या सुखसंपन्नतेत काहीही कमी होत नाहीं. याचे कारण असे की, पूर्वीच्या एका जन्मात त्यांना प्राप्त जन्माचा बोध कोणी ना कोणी तरी करून दिला असल्याने, ज्या लय तत्त्वामुळे प्राप्त झालेल्या जीवनाला पूर्णत्त्व येते, असे लय तत्त्व ह्या व्यक्ती जन्मोजन्मी जोडत्या होतात व जेव्हा पूर्णतः उत्पत्ति स्थिती ह्या अवस्थेपरत्त्वे ते जन्म घेतात, तेव्हा या दोन अवस्था लय तत्त्वांत विलीन झाल्या असल्याने, त्यांचा जन्म पूर्णतः लय अवस्थेचा असतो; व त्यांच्या इच्छेप्रमाणें ते ह्या जन्मांत सुखाचे वाटेकरी होत असतात. अशाच अवस्थेपरत्त्वे जे गुरुमाध्यम म्हणून ह्या जन्मांत आपल्याला भेटते, ते आपल्याप्रमाणे जरी मानवी देहाच्या रूपांत असते, तरी त्यांच्याही पूर्वीच्या अनेक जन्मपरत्त्वे, ते प्राप्त झालेली उत्पत्ति स्थिती अवस्था ही लय अवस्थेत विलीन करून, ज्या लय अवस्थेपरत्त्वे हे ब्रह्मांड पिंडाची जोपासना करीत असते, अशा ब्रह्मांडशक्तीशी ह्या व्यक्ती लय अवस्थेतून एकरूप झालेल्या असतात. अशामुळे इहजगतातील ज्या काही व्यक्ती ह्या लय शक्तीच्या अभावी दु:खीकष्टी असतात, अशांना आपल्या देहिक माध्यमातून लय शक्तीचा लाभ कृपाशिर्वादपरत्त्वे करून देऊन, त्यांची दु:खीकष्टी जीवने ही सुखावह करीत असतात. अशा अवस्थेतून जेव्हा हे कार्य होत असते, अशावेळी ब्रह्मांडशक्ति ही त्या गुरुमाध्यमाच्या ठायी अवतीर्ण होते, म्हणूनच त्यांना परमेश्वराचा ‘अवतार’ असे म्हणतात.

ब्रह्मांडशक्तीचे जेव्हा अशा रीतीने पिंडाशी एकरूपत्त्व होते, तेव्हा ते गुरुमाध्यम जगतातील दु:खीकष्टी लोकांचे जीवन सुखावह करण्याची साधने (निराकरणे) निर्माण करून, ह्या जगताला सुख-शांति-समाधानाची दिक्षा प्राप्त करून देत असते. असे हे अवतारकार्य ज्या मानवी देहाच्या माध्यमातून झालेले असते, त्या जीवनपरिसरांत ते ब्रह्मांडशक्तीचे वलय हे त्यांच्या अंतापर्यंत कार्य करते. पण जेव्हा ती व्यक्ती दिवंगत होते, तेव्हा ज्या देहिक व आत्मिक तत्त्वांच्या एकरूपत्त्वाने ब्रह्मांडशक्तीशी देहिक माध्यम म्हणजे पिंड जोडला गेलेला असतो, ती ब्रह्मांडशक्ति त्यांच्या अंतानंतर पुनश्च आपल्या ठायी निराकार होत असते. अशी ही पिंडाची व ब्रह्मांडाची देवाणघेवाण अनंतकाळापासून चालत आलेली असून, आजपर्यंत अनेक अवतारी पुरुषांनी पिंडाचें ब्रह्मांडाशी एकरूपत्त्व करून अवतारकार्य केले. पण त्यांच्या अंतापर्यंत केवळ ज्या लय-शक्तिमाध्यमातून त्यांनी ब्रह्मांडशक्ति इहजगताच्या कल्याणार्थ अवतीर्ण केली, ती ब्रह्मांडशक्ति पुनश्च आपल्या ठायी गमन करती होते. ह्या अवतारी पुरुषाचे लय तत्त्व ही क्रिया करण्यास जे समर्थ होते, ते आज इहजगतात प्रत्येक अवतारी पुरुषाची ‘समाधी’ म्हणून अस्तित्त्वात आहे. ह्या शक्तिमाध्यमाच्या सान्निध्यात आपण गेल्यावर, स्वाभाविकच आपल्यात असणारी लय तत्त्वाची कमतरता जरी भरून निघत असली, तरी तेथून आपण प्राप्त केलेल्या लय शक्तीचा विनियोग, ईश्वराशी हे जीवन जोडण्यासाठी आपण न करता, अधिकाधिक ऐहिक सुखाच्या आसक्तीने प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादाचा, म्हणजे लय शक्तीचा गैरवापर करते होत असतो.

जगद्गुरू श्री साईनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने वरील अवस्थांच्या परंपरेची जाणीव वेळोवेळी झाल्याने, ज्या लय शक्तीच्या म्हणजे कृपाशिर्वादाच्या माध्यमातून मी आज गेली अनेक वर्षे हे लोककल्याणाचें कार्य आपण भक्तांसाठी केले; ह्या ब्रह्मांडशक्तीची गरज भवितव्यात आम्हां मानवांना ह्या जगांत सुख-शांति-समाधान निर्माण होण्यासाठीं आहे; म्हणून ती शक्ति प्रतिकात्मक करण्यासाठी आपण भक्तांकरवी गेली पांच वर्षे ॐ कार साधना करवून घेऊन, त्या ब्रह्मांडशक्तीचे प्रतिक ‘गुरुपीठ’ म्हणून निर्माण केले. ह्या पीठाच्या स्थापनेपर्यंत श्रीसद्गुरूंचा कृपाशिर्वाद व आपण भक्तांचे सहकार्य हे पीठ स्थापन करण्यासाठी जरी कारणीभूत झाले, तरी मी ह्या विधीच्या सांगतेपर्यंत अत्यंत चिंताग्रस्त होतो. याचे कारण असे की, असे हे दिव्य करीत असतांना, ज्यामध्ये दिव्य शक्तीचा समावेश आहे, अशाला आवाहन करून, त्यांची चिरप्रतिष्ठा होईतोपर्यंत ही शक्ति प्रथमतः आवाहन करणाऱ्या साधकाचा अंत करून, त्याच्या भक्तांची जीवनेही उध्वस्त करीत असते. ही जाणीव यापूर्वी अनेक अवतारी परंपरेतील सत्पुरुषांना झाली होती; म्हणून त्यांनी ही सिद्धसाधना आम्हा मानवांच्या कल्याणासाठी केली नाही.

आज हे स्थापन झालेले शक्तिपीठ शंभर टक्के ब्रह्मांडशक्ति म्हणजे लय अवस्था असून, जे कोणी ह्या लय अवस्थेच्या अभावी दु:खीकष्टी आहेत, त्यांच्या जीवनाला पूर्णत्त्व येण्यासाठी ही शक्ति कार्यान्वित होणार आहे. आजपर्यंत आपण पोथीपुराणे वाचली असतील. त्यात जगत्कल्याणासाठी वेळोवेळी देवदेवतांनी व सत्पुरुषांनी अवतार घेऊन ह्या जगाचे पालन केले आहे. ह्या देवदेवतांची स्थापना होऊन, ज्या लय तत्त्वांने मानवी कल्याणार्थ अवतीर्ण होऊन हे कार्य केले, त्यांची पीठे आज देवदेवतांच्या नावाने अस्तित्त्वात असून, त्यांच देवदेवता कालकालांतराने आपल्या घराण्याच्या ‘कुलदेवदेवता’ झालेल्या आहेत. अशी ही शक्तिपीठे जरी लय तत्त्वाचे अस्तित्त्व म्हणून अस्तित्त्वात आहेत, तरी त्या शक्तीचे जे इष्टकार्य आहे ते जतन करण्याची जबाबदारी विचारात न घेता, ह्या शक्तिपीठांच्या परिसरांत निषिद्ध असे धार्मिक विधी करून, ह्या पीठांच्या शक्तिकार्यात आज अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या कुटुंबिय मंडळींच्या इष्ट देवदेवता आहेत, त्यांच्या दर्शनार्थ ते कुटुंबिय जात आहेत; वार्षिक कुलाचार, कुलधर्म हाही करीत आहेत; तरीसुद्धा जीवनकल्याणार्थ इष्ट कृपाशिर्वादाचा लाभ जो आज होत नाही, याला कारण आपणच आहोत. देवदर्शनार्थ गेल्यावर त्या देवतेकडे काय मागावयाचे याचे ज्ञान नाही, म्हणून आपल्या जीवनात उणीवा आहेत त्या सुखांची याचना आपण करतो. याउलट असे व्हावयास पाहिजे की, दर्शनार्थ गेल्यावर त्या देवदेवतांची कृपा आपल्यावर व्हावी, अशी प्रार्थना किंवा याचना किंवा काही धार्मिक विधी व्हावयास पाहिजे. ही जाणीव होऊन जर आपण आपल्या घराण्याच्या देवदेवताप्रीत्यर्थ विधी केलेत, तर निश्चित् आपल्या जीवनातील समस्या दूर होऊन, आपल्याला इष्ट ते सुखसमाधान व शांति प्राप्त होईल. त्याचबरोबर त्यादेवतेचे कृपाशिर्वाद म्हणून आगमन झाले, म्हणजे लय शक्ति ही आपल्या कुटुंबात आपण प्राप्त करते झालात, की आपोआपच आपल्या घराण्यात विद्या, संपत्ति, संतति; सुख, शांति, समाधान यांचा जो अभाव आहे, हा दूर होऊन आपल्या नकळत आपली सत्प्रवृत्तीही जागी होऊन, पारमार्थिक सुखाचा लाभ घेण्यास आपण भक्त समर्थ व्हाल.

जगाच्या उत्पत्तिपासून आम्हा मानवांच्या कल्याणार्थ लय शक्तीने, अवताररूपाने वेळोवेळी अवतीर्ण होऊन, ह्या जगाचा जो सांभाळ देवदेवतांच्या शक्तिपीठमाध्यमातून केला होता, अशी जी शक्तिपीठे दक्षिण भारतापासून उत्तरभारतापर्यंत आम्हा मानवांच्या कल्याणार्थ आहेत, अशा शक्तिपीठांच्या दर्शनार्थ जाऊन, ज्या अनादिकालात ही शक्तिपीठे ज्या उद्देशार्थ स्थापन करण्यात आली होती, त्या उद्देशपरत्त्वे ह्या शक्तिपीठांची कार्यक्षमता आज दिवसपर्यंत कार्यरत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी मी स्वतः ह्या शक्तिपीठांच्या दर्शनार्थ गेलो असता, असे अनुभवास आले की, शक्तिपीठांत जरी अधिकारी व्यक्तींनी, लय तत्त्वाला आवाहन करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली होती, तरी त्या शक्तिपीठांच्या आसमंतात असमंजसपणे जे काही धार्मिक विधी झाले, त्यामुळे तेथील वातावरणात मलीनता निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या शक्तिपीठांचा लाभ जो शंभरटक्के व्हावयास पाहिजे, तो लाभ भक्तांना होण्यास एक तर विलंब होतो किंवा पुनश्च त्या शक्तिपीठातील शक्तीचा लाभ होण्यासाठी, तेच तेच धार्मिक विधी वर्षानुवर्षें करावे लागत आहेत. अशी ही एका काळातील सुवर्णभूमि की, जिचे रक्षण ह्या शक्तिपीठमाध्यमांतून होऊन, आम्हा मानवांची जीवने सुख, शांति, समाधानाने समृद्ध होत होती; त्याऐवजी आता ही शक्तिपीठे केवळ नावारूपानेच अस्तित्त्वात असून, त्या त्या ठिकाणीं त्या त्या घराण्यातील पिढ्या तेच तेच धार्मिक विधी करण्याचा पुनर्विधी करीत आहेत. असे असूनही जे कोणी केवळ क्षुल्लक असे ऐहिक सुख मागण्यास जातात, अशा ह्या त्यांच्या याचना पूर्णत्त्वास का जात नाहीत, असा विचार कोणीही अधिकारी व्यक्तीने न करता, उलट असे मार्गदर्शन करण्यात येते कीं, ‘त्याच तुमच्या शक्तिपीठाची (कुलदेवदेवता) आराधना तुम्ही व तुमचे कुटुंबिय यांनी करावयास पाहिजे’. निसर्गनियमाप्रमाणे चांगली अथवा वाईट अशी कोणतीही शक्ति, जिचे अस्तित्त्व जर ह्या भूमीवर असेल, तर तिचे स्पंद (Vibrations) साधक अवस्थेतील साधकास जाणवले पाहिजेत. पण जेव्हा मी दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत त्या शक्तिपीठांच्या दर्शनार्थ गेलो, तेव्हा मूळ शक्तीच्या शुद्ध स्वरूपातील स्पंदांची जाणीव न होता, संमिश्र अशा स्पंदांची जाणीव अधिक प्रखरतेने झाल्यामुळे, श्रीसद्गुरू साईनाथ महाराज यांना मी अशी प्रार्थना केली की, “गतकालात ज्या अवतारी परंपरेतील अधिकारी पुरुषांनी आपल्या जीवनाची बलिदाने देऊन, ही शक्तिपीठे आम्हा मानवांच्या कल्याणार्थ जी निर्माण केली होती, अशी शक्तिपीठे आज पूर्वीप्रमाणे कार्यरत नाहीत; ती पूर्वीप्रमाणे कार्यरत होण्यासाठी काहीएक उपाय आपण जर सुचविलात, तर भवितव्यात आम्हा मानवांच्या सुख-शांति-समाधानासाठी ही शक्तिपीठे पुनश्च जागृत होऊन, आम्हा मानवांच्या कल्याणाचे कार्य ती अव्याहतपणे कार्यान्वित करतील.” यासाठी श्रीसद्गुरूंनी असा कृपाशिर्वाद दिला की, “तू पुढे चल. तुझ्या इच्छेप्रमाणे मी कार्यसिद्धी करून देतो.” त्यांच्या आज्ञेप्रमाणे श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे मी व आपण सर्व भक्त उपस्थित राहून दर पौर्णिमेस रुद्रहवन केले व अकरा पौर्णिमेच्या हवनाची सांगता म्हणून महारुद्र स्वाहाकार करण्यात आला. अशावेळी अनेक भक्तांनी मला अशी विचारणा केली की, दरवर्षी कार्यकेंद्रावर जो हवनादि विधी करीत होतो, तो करावयाचा बंद करून आता नरसोबावाडी येथे हवनादि विधी करण्याचे प्रयोजन काय ? तर याचे शास्त्रोक्त निराकरण असे की, दरवर्षी कार्यकेंद्रावर गेली एकवीस वर्षे जे हवनादि विधी होत होते, ते आपण कुटुंबियांत जीवनातील दोषापासून आपली मुक्तता होण्यासाठी विमोचन म्हणून करण्यात आले. पण एक वर्षभर श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे जो हवनादि विधी होत होता, अशावेळी रुद्रशक्तीला, म्हणजे लय तत्त्वाला आवाहन करण्यात येत होते. त्याचे कारण आज भारतात जी शक्तिपीठे देवदेवतांच्या नावारूपाने अस्तित्त्वात आहेत, अशा शक्तिपीठांचे मूळ स्वरूप हे रुद्रदेवता असून, जी शक्तिपीठे गैर अशा विधीपरत्त्वे कार्यरत नाहीत, अशांना कार्यक्षम करण्याचे कार्य फक्त तीच शक्ति करू शकते, की ज्या शक्तीच्या माध्यमातून ह्या शक्तीचा उदय झाला आहे. यासाठी महारुद्र स्वाहाकार हा विधी आपण भक्तांच्या समवेत एवढ्यासाठी करण्यात आला की, जेव्हा एखादे आवाहन एखाद्या शक्तीला केले जाते, ती शक्ति धारण करण्याचे सामर्थ्य साधक अवस्थेतील साधकापाशी असावयास पाहिजे. अन्यथा अशी शक्ति जर आवाहन केली गेली व ती शक्ति धारण करण्यास साधकाची कार्यक्षमता नसेल, तर ती शक्ति इहलोकातील सुखशांति प्राप्त करून देण्याऐवजी, प्राप्त झालेल्या सुखशांतीच्या नाशास कारणीभूत होत असते. अशा आवाहनीत झालेल्या रुद्रशक्तिमुळेच सर्व भारतातील शक्तिपीठे ही पूर्ववत् जागृत होऊन, त्याची साक्ष म्हणून गोवा येथे झालेल्या दसऱ्यास, म्हणजे परमपूज्य जगद्गुरू श्रीसाईनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, ह्या देवता गुरुशक्तीत विलीन झाल्या.

याचाही अर्थ काही भक्तगणांनी असा लावला की, ज्या अर्थी ह्या देवदेवता गुरुशक्तीत विलीन झाल्या आहेत, त्या अर्थी इतःपर ह्या देवदेवतांची संभावना, आम्हां कुटुंबियांना करण्याचे कारण उरले नाही. तर ह्या देवदेवता गुरुशक्तीत विलीन झाल्या आहेत याचा अर्थ हा नसून, प्रत्येक घराण्याच्या ज्या देवदेवता आहेत, त्यांच्याप्रीत्यर्थ जो काही कुलाचार, कुलधर्म तुम्हीं करता, तो यदाकदाचित् ज्ञानअज्ञानाने पूर्णतः होत नसेल. त्या ऐवजी आपण गुरुभक्त होण्याने आपल्या घराण्याच्या देवदेवतांना तुम्ही विसरले अहात, असे अनुभवास येऊ नये, म्हणून ह्या देवदेवता गुरुशक्तीत एवढ्यासाठी विलीन झाल्या की, जरी तुम्ही दु:खनिवारणार्थ गुरुमार्गाकडे गेलात, तरी तुमची दु:खे निवारण्याचे कार्य हे लय शक्तितूनच, म्हणजे जी शक्ति गुरुकृपाशिर्वादापासून देवदेवतांपर्यंत कार्य करते, त्या शक्तितूनच होत असते. केवळ आपण आपल्या अज्ञानामुळे, गुरु व देवदेवता यांच्याबद्दलचा भेदभाव निर्माण करतो हे जे अज्ञान आहे ते प्रथमतः दूर केले पाहिजे.

आज प्रत्येक कार्यकेंद्रावर जे ब्रह्मांडशक्तीचे प्रतिक ‘गुरुपीठ’ म्हणून स्थापन झाले आहे, ह्या ब्रह्मांडशक्तीचे गुरुमाध्यमातून झाले असून, त्या शक्तीला ईहजगतात आम्हा मानवांच्या कल्याणार्थ अवतीर्ण होण्यास गुरुमाध्यम पोषक असल्याने, श्रीगुरुंनी ती त्रिगुणात्मक शक्ति हिचे ॐ कार साधनेत एकरुपत्व करुन, ती ब्रह्मांडशक्ति चिरप्रतिष्ठा म्हणून स्थापन केली आहे. पण ह्या स्थापन झालेल्या ब्रह्मांडशक्तीचा लाभ आपणास होण्यासाठी, आपण भक्तांची देहिक माध्यमे पोषक असतीलच असे नाही; म्हणून श्रीगुरुंनी ह्या शक्तिपीठाच्या स्थापनेपूर्वीच आपणास कारण, महाकारण व श्री साईशक अशा ‘तीन प्रतिमा’ देऊन, ह्या प्रतिमांद्वारे त्या पीठात ज्या त्रिगुणात्मक शक्तीचा समावेश झाला आहे, ती शक्ति आपल्या काया, वाचा, मनाच्या ठिकाणी धारण व्हावी, ही योजना पूर्वीच केलेली आहे व ही धारण झालेली शक्ति आपल्या ठिकाणी चिरकाल राहून आपल्या व कुटुंबियांच्या भवितव्याची पूर्तता केली आहे. ती अशी की, शक्तीपीठाची स्थापना होण्यापूर्वी आपल्या देहिक माध्यमातून ॐ कार साधना क्रमशः नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत पाच स्थानातून करवून घेऊन, ॐ काराव्यतिरिक्त ‘ ॐ नमः शिवाय’ म्हणावयास सांगितले, ते लय शक्तीला आवाहन होते. आवाहनीत झालेली शक्ति इतरांच्या कल्यणासाठी ब्रह्मरंध्रात धारण होऊन, जसे ब्रह्मांडाचे शक्तीपीठ तयार झाले, तसे पिंडाचेही शक्तिपीठ ब्रह्मरंध्रात तयार करण्यात येऊन, त्यामध्ये ब्रह्मांडाच्या शक्तिपीठांत जिचा समावेश आहे, अशा अवस्थेचा लाभ म्हणजेच ‘पिंडी ते ब्रह्मांडी व ब्रह्मांडी ते पिंडी’ हा होय.

वेद कालापासून आम्हा मानवांच्या कल्याणार्थ, लय शक्तीने नानाविधरुपाने इहजगतात अवतार घेऊन, आम्हा मानवांच्या जीवनाचा सांभाळ करण्याचे यथोचित कार्य अव्याहतपणे जरी चालविले आहे, तरी ह्या माध्यमाकडून कृपाशिर्वादाची प्राप्ती होण्यासाठी, वेदवेदांत किंवा पुराणात सोप्यातसोप्या अशा साधनमार्गाचा उल्लेख कोठेही न केला गेल्यामुळे, स्वाभाविकच देवादिकांच्या कृपाशिर्वादाला प्राप्त करण्याच्या साधनमार्गाकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले. श्रीजगद्गुरु साईनाथमहाराज यांच्या कृपाशिर्वादाने आपण भक्तांना आपल्या प्राप्त जीवनात सुख, शांति, समाधान आदींची प्राप्ती होऊन, प्राप्त जीवन हे भवितव्यासाठी पारमार्थिक व्हावे, अशी जीवनातील ही दोन कर्तव्ये म्हणजे ऐहिक व पारमार्थिक अशा दोन अवस्थांचा लाभ सुलभ मार्गाने प्राप्त करता येतो. अशी ही अमोलिक भेट गुरुकृपेने नव्याने उदयाला येणाऱ्या पिढ्यांना लाभली आहे याचा विचार सूज्ञपणे भक्तभाविकांनी करुन, आज समितीची कार्यकेंद्रे नियुक्त सेवकांकरवी कार्य करीत आहेत, अशा सेवकांना इतरांची सेवा करण्याचे सहकार्य आपण भक्तांनी द्यावयास पाहिजे.

आपण भक्तांना जी आज प्राप्त झालेली अवस्था आहे, ती प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आपण विचारात घेऊन, गुरुमार्गी झाला नाहीत. उलट जीवनांत अनन्य भक्तिभावनेने देवाला शरण जावे, ह्या कर्तव्याची उपेक्षाच आपण करीत आलो. पण ह्या आपल्या अज्ञानाबद्दल श्रीगुरुंनी आपण भक्तांची उपेक्षा न करता, ज्या अपेक्षांच्या शोधात आलात, त्या अपेक्षेच्या पलिकडचे सौख्य आज आपणांस प्राप्त करुन दिले आहे.

कृपाशिर्वादपरत्वे आपली काय काय स्थित्यंतरे झाली, हा नित्याने आढावा घेणे व त्या प्रमाणे सदैव वागणे हे फार महत्वाचे आहे. आपल्या नित्याच्या जीवनांत आपण जर नविन कपडे परिधान केले, तर ताबडतोब इतर व्यक्तींना त्याची जाणीव सहज होते. परिधान केलेल्या कपडय़ांबद्दल जसे काही सांगावे लागत नाही, त्याप्रमाणे आज आपण भक्तांस गुरुकृपाशिर्वादाचे जे बहुमोल असे वस्त्र जन्मोजन्मीपर्यंत लाभणार आहे, हे काही इतर व्यक्तींना दिसण्यासारखे जरी नसले तरी आपण कृपावंत आहोत म्हटल्यावर आपल्या आचारविचारातून प्राप्त झालेली कृपा ही इतरांना अनुभवास आली पाहीजे. या उलट कृपाशिर्वादापूर्वी जे आपले जीवन इतरांच्या बाबतीत व स्वतःबद्दल होते, त्याचा अनुभव स्वतःला व इतरांना आला, तर कृपापात्र होऊनही त्या कृपेची अवहेलना आपण आपल्या अज्ञानाने करीत आहोत असे सिध्द होते. असा अनादर नकळत आपण भक्तांच्या काया, वाचा, मनाने होत असतो, अशा वेळी कृपाशिर्वादात वृध्दी होण्या ऐवजी कृपाशिर्वादाचा क्षय होत असतो, हे आपण भक्तांनी सूज्ञपणे विचारात घेतले पाहिजे.

आता प्राप्त झालेल्या अवस्थेची जोपासना करण्याबद्दलचा योग्य असा बोध अनुभविण्यास आपणच समर्थ अहात. हा अनुभव प्रत्येक साधक, सेवक व्यक्तीने घेऊन आपले जीवन गुरुमय करावयाचे आहे. हे सर्व निवेदन व हे कार्य आजपर्यंत त्यांच्याच कृपाशिर्वादाचे फळ म्हणून आपण चाखले आहे. त्या फळाची अवीट अशी गोडी आपण भक्तांच्या काया, वाचा, मनाने जगतातील दु:खी मानवांच्या जीवनाला कृपाशिर्वादाचा आधार म्हणून लाभण्यासाठी श्रीसद्गुरुंनी आपणास सद्बुध्दी देऊन, हे श्रीगुरुंचे अवतार कार्य अजरामर करावे, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !

शक्तिपीठातील शक्ति व तिचे महत्त्वाचे कार्य आपण भक्तांस समजले पाहिजे. जीवनामध्ये संकटे आल्यानंतर आपण उपाय योजना करतो; परंतु काही कालानंतर जगतात निर्माण होणाऱ्या परिस्थितीपूर्वीच त्यासाठी कृपाशिर्वादरुपी उपाययोजना करणे, याला ‘तरणोपाय’ असे म्हणतात. अशी तरतूद ईश्वरी संदेशातून होत असते, मानवी बुध्दीतून नाही. परमपूज्य बाबांच्या कृपेने स्थापन झालेले ‘शक्तिपीठ’ याचा उल्लेख श्रीआद्यशंकराचार्यांनी ‘सौंदर्यलहरी’ ह्या ग्रंथात केलेला आहे. सृष्टीमधील वस्तुपदार्थाला आकार देणाऱ्या शास्त्राला भूमितीशास्त्र असे म्हणतात. जी विश्वशक्ति निर्गुण निराकार आहे, तिलाही मानवी कल्याणासाठी सिध्द करताना आकार द्यावा लागतो. त्या आकाराचे प्रतिक म्हणजेच ‘पृथ्वीतत्त्व’ होय. त्या मध्ये दोन त्रिकोण असून, त्यापैकी एक त्रिकोण पिंडाचे प्रतिक म्हणजे चेतना व दुसरा त्रिकोण ब्रह्मांडाची प्रतिमा म्हणजे चैतन्य आहे. प्रत्येक त्रिकोण एकशेऐंंशी अंश असून, असे दोन त्रिकोण मिळून तीनशेसाठ अंश होतात. ह्यामध्ये विश्वाचा समावेश आहे. जे जीव पिंड म्हणून जन्माला येतो, त्याला ब्रह्मांडात जाण्यासाठी म्हणजे इहलोक, परलोक व स्वर्गलोक यासाठी एक मार्ग असावा व जगात जन्माला आलेले जीव मानवतेच्या भावनेतून एकत्र येण्यासाठी एक प्रार्थना असावी, अशी परमपूज्य साईनाथमहाराजांची इच्छा होती. त्यासाठी आवश्यक असणारी ॐ कार शक्ति श्रीनृसिंहसरस्वतीस्वामींच्या रुपाने भूतलावर अवतीर्ण झालेली होती. ती शक्ति प्राप्त केल्यानंतर, त्या शक्तीमध्ये जगतात त्रिगुणात्मक रुपाने अस्तित्वात असलेल्या देवदेवता ह्या एकरुप झाल्या व मगच शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली.

आपण इहजगतात जन्माला आल्यानंतर जीवनाचे कार्य म्हणजे गणित समजणे आवश्यक असते. जन्माला येतेवेळी कर्माची बाजू शंभर टक्के असली, तरी त्या कर्मपरत्वे केवळ स्वतःला सुखाचा लाभ करुन घेणे हे इष्ट नाही. आज जे सुख आपल्याला नव्व्याण्णव टक्के कर्मपरत्वे मिळते, ते सुख एकाचेच नसून त्यात इतरांचाही समावेश आहे, हे आपण विसरतो. इहजन्मात सुख पंचवीस टक्के, शांति पंचवीस टक्के व मिळालेल्या सुखाबद्दल समाधान व नित्यसाधना मिळून पन्नास टक्के, असे जीवन असले पाहिजे. जीवनात सुखाचा प्राप्ती कितीही झाली तरी समाधानाची प्राप्ती होणे हे महत्वाचे आहे. कारण हेच समाधान पुढील जन्मात आपले ‘सत्कर्म’ होणार आहे. ही अवस्था साधनेमुळे प्राप्त होते. दैनंदिन पूजा, आरती म्हणजे सत्कर्म नव्हे. ती अंगे आहेत. अशा अंगांनी युक्त अशी क्रिया काया, वाचा, मनाने घडते तेव्हा ‘सत्कर्म’ जन्माला येते. म्हणजेच, समाधान ह्या अवस्थेचा आपल्याला लाभ होतो. ह्या समाधानात इतरांचाही समावेश करण्याने ते कर्म द्विगुणित होते.

मानवी देह ही भूमि आहे. ज्या कर्मपरत्वे जन्म व्यतीत होतो, ते कर्म धारण होण्यासाठी देहिक माध्यमाला आकार द्यावा लागतो. तसा आकार नसेल तर कर्म शरीरात धारण होऊन कार्य करु शकत नाही. अशा परिस्थितीला आपण संकट किंवा दु:ख म्हणतो. दैनंदिन पूजा, पोथीपाठ, जपजाप्य, तीर्थयात्रा हे औपचार असून, त्यांचे वलय देहाबाहेर राहते. ॐ साधना हा उपचार असून, तो देहात धारण होऊन काया, वाचा, मनाला आकार प्राप्त करुन देतो. म्हणजेच काया, वाचा व मन ह्यांची गति एक होते. अशावेळी ब्रह्मांडी ते पिंडी किंवा पिंडी ते ब्रह्मांडी ही अवस्था अनुभवास येते. ही अवस्था तत्त्वज्ञान म्हणून शाब्दिक माध्यमातून व्यक्त करावयाची नसून, ती अवस्था अनुभवास आली पाहिजे. याचाच अर्थ देह ह्या भूमीला भूमितीने आकार दिल्यानंतर आज मितीला म्हणजे, दैनंदिन जीवनात आपले कर्तव्य काय, याचा विचार केला पाहिजे. ‘कर्माची गति गहन आहे’ असे म्हणतात. पण ‘गहन’ म्हणजे काय व काया, वाचा, मन यांची गति जी वेगवेगळी असते, ती एक करुन त्यातून चौथी अवस्था प्रगट कशी करावी याचे गणित फक्त श्री साईबाबांना अवगत होते व आहे. आज आपण भक्तांच्या जीवनात, ही कार्यसिध्दी झालेली आहे. म्हणूनच ऐहिक सुखाचा अधिक लाभ आपल्याला न होऊनसुध्दा, आपण ‘समाधान’ ह्या अवस्थेचा लाभ आपल्या कुटुंबात प्राप्त करते झालेले आहात.

>>अध्याय ८ प्रार्थना – साधना व त्यातील वेदवेदांत.

अध्याय ६ उपास्य दैवते व करावयाची उपासना.<<