अध्याय ७ पारमार्थिक उन्नतीसाठी आयुर्वेदाची आवश्यकता
आजपर्यत तुम्ही अनेक शास्त्रांचा अभ्यास केला असेल व कालांतरानेही कराल. परंतु ही शास्त्रे शिकण्यामागे शारीरिक संवर्धन व मानसिक समाधान कितपत लाभू शकेल हे ठरविणे कठीण आहे. कारण ज्या ज्या शास्त्रांची पूर्णता तुम्ही कराल, त्यामागे एक ‘आर्थिक प्राप्ती भरपूर व्हावी व ऐहिक सुख भरपूर लाभावे’ एवढाच उद्देश ठरविलेला असतो. स्वतःच्या कष्टाने मिळविलेला पै-पैसा , त्याचे समाधान लाभण्यासाठी शरीर हे जीवनाचे माध्यम आहे. ते शरीर निरोगी, निर्व्यसनी रहाण्यासाठी शरीरशास्त्राबद्दल तुम्हाला ज्ञान झाले नाही, तर त्या शरीराची हानी निरनिराळ्या व्यसनांनी-अविचारांनी होईल व अशा निर्बल झालेल्या शरीरास जरी भरपूर पै-पैसा किंवा गुरुकृपा किंवा उपासना मार्गातील उन्नती लाभली तरी ते सुख क्षणिक स्वरूपाचे असेच ठरणार आहे. याशिवाय आज जीवनात सध्या डोकेदुखीसाठी तुम्हाला घरगुती औषधोपचार माहीत नाही. अशामुळे क्षणोक्षणी तुमचा पै-पैसा परदेशी औषधासाठी व्यर्थ खर्च होत आहे. या जीवनातील उणीवा दूर करण्यासाठी जसा अन्य निराकरण पध्दतीचा अभ्यास केलात की, ज्यात दु:खाच्या कारण-मीमांसा काय असू शकतात हे तुम्हाला समजले. आता ह्या निराकरण पध्दतीने तुम्हाला तुमच्या शरीराचे संवर्धन करण्यासाठी काय काय आचार-विचार निश्चित असावयास पाहिजेत हे समजेल. बऱ्याच भक्तभाविकांची ‘उपासना ही उपवासाने पूर्णावस्थेला जाते’ अशी कल्पना आहे आणि ती सिध्दता होण्यासाठी अविचाराने ते शरीराशी अन्य तऱ्हेने प्रयोग करीत रहातात. अशा शरीराच्या अस्वास्थामुळे उपासना मार्गातील कोणत्याही प्रकारची स्थिरता त्यांना राखता येत नाही. यासाठी प्रत्येक भक्तभाविकास सर्वसाधारपणे शरीरशास्त्राची ओळख शास्त्रीय पध्दतीने असावयास पाहिजे. यासाठी जो उपक्रम मार्गदर्शनार्थ चालू केला आहे, त्याचा फायदा प्रत्येक भक्त-भाविकाने घ्यावा.
शरीर निरोगी व निर्व्यसनी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची साधना होऊ शकत नाही. तेव्हा प्रातःकाली उठण्यापासून ते रात्रौ झोपण्यापूर्वीपर्यंतचा सर्व वेळ निश्चयाने खर्च करण्याची सवय लावली पाहिजे. अनेक लोक व्यसनांच्या इतके आहारी गेले आहेत की, त्यावेळी ते वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून ती व्यसनाची सवय पूरी करतील. परमार्थ प्रश्नावलीमध्ये एका प्रश्नात असे विचारले आहे की, स्वतःप्रीत्यर्थ होणाऱ्या फाजील खर्चातून काही बचत केलीत काय ? पण तसा सूज्ञ विचार करून स्वतःच्या कुटुंबाच्या उध्दारासाठी व्यसन सोडणार नाहीत. आज कित्येक कुटुंबातील मुलाबाळांची शिक्षणे या व्यसनापायी होत नाहीत. आणि अशा व्यसनाधीन माणसास सद्गुरुकृपा लाभली तरी तो समाधान मानू शकत नाही. कारण व्यसनापायी होणारा फाजील खर्च बाबांच्या कृपेने मिळणार नाही. त्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला जातो. तो म्हणजे सट्टा, आकडा, रेस इ. कारण अविचारांची कल्पना अशी आहे की, त्या मार्गाने एकदम पैसा मिळेल. म्हणजे पहिल्या कर्जामुळे अपुरा पडणारा पै-पैसा आणखी अपुरा होतो. मग जो कोंडमारा होतो, तो बायका-मुलांचा. पैसा नाही म्हणजे मुलांना शिक्षण नाही, खाण्यास सकस अन्न नाही. त्यामुळे शरीर निरोगी रहाणार नाही. औषधपाण्यास पैसा नाही. अशी संसाराची धुळधाण झाली की, मग दैवी मार्ग शोधून सुख शोधावयाचे. या मार्गात इंद्रियनिग्रह करावा लागेल व व्यसनासाठी पै-पैसा मिळणार नाही असे सांगितले की, स्वतःस भक्त म्हणविणारे लोक या मार्गास शिव्या देऊन देव-धर्म खोटा आहे, पै-पैसा असणारे लोक खोटे आहेत अशी विधाने करतात. पण अशांनी लोकांचे दोष पाहण्यात आपले आयुष्य खर्च करण्यापेक्षा त्याच्यापाशी पै-पैशाचे समाधान लाभण्यास त्यांनी जीवनाचा आदर्श काय ठरविला आहे तो पहावा. अशा निरनिराळ्या व्यसनांची सवय म्हणजे उच्च संस्कृतीचे लक्षण आहे अशी फोल कल्पना आज, समाजात रूढ होऊ पहात आहे. त्यामुळे विश्वविद्यालयात विद्यार्थी धूम्रपानाची घातक सवय लावून घेऊन बसला आहे. आजची ही पिढी कालांतराने भारताची, समाजाची आदर्श पिढी म्हणून येणार आहे. तेव्हा पुढील पिढीला यांचा आदर्श काय ? नुसती व्यसने, ऐहिक सुखांची तळमळ आणि ती पूरी होण्यासाठी चोरी, फसवेगिरी, लाच-लुचपत यांचा सुळसुळाट होणार आहे. ह्या भविष्योत्तर दृष्यांची कल्पना सहन होत नाही. यासाठी समितीच्या कार्यपध्दतीत हा विषय मुद्दाम अभ्यासासाठी घेतला आहे. तत्संबंधीचे मार्गदर्शन श्री. मधुअण्णा नानल करीत असतात.
बऱ्याच भक्तभाविकांची कल्पना अशी आहे की, चित्त स्थिरतेसाठी कांही व्यसने (गांजा, अफू, भांग इ.) करून जर साधना केली तर ती दीर्घकाल होते. असा प्रयोग करणारी बरीच भक्त मंडळी शारीरिक दुर्बलता करून बसली आहेत. व्यसनांनी चित्ताच्या स्थिरतेस लाभ होऊ शकत नाही. अशा अनेक घातक सवयी लागून मनुष्य खऱ्या सुखाला व आनंदाला मुकला आहे. म्हणून इंद्रियनिग्रह करण्याचे साधन जर काही असेल, तर सद्गुरुकृपा व तिचा जीवनावर होणारा संस्कार व हा निरंतर हवा असेल तर आहार-मीमांसा अभ्यासली पाहिजे. तरच आचार-विचार निश्चित रहातील. निरोगी व निर्व्यसनी शरीरसौख्य म्हणजेच जीवनाची खरी संपत्ती आहे. शरीर निरोगी राखण्यासाठी मित आहार व व्यायाम केला पाहिजे. बुध्दि व मन निरोगी राखण्यासाठी सद्गुरु उपासना केली पाहिजे. या दोन्हीचा योग म्हणजे जीवनातील खरे सुख होय.