अध्याय ९ – ॐ कार साधना

जगतात बऱ्याच व्यक्ती देवदैविक उपासना किंवा गुरुपरंपरेच्या मार्गाचा अवलंब वर्षानुवषे करीत असतात. पण अशा ह्या मार्गात आपणास जे काही निश्चितपणे प्राप्त करून घ्यावयाचे आहे, तत्संबंधीची जाणीवपूर्वक ओळख ही साधकाला मार्गदर्शनाच्या अभावी न झाल्याने, ह्या मार्गात वर्षानुवर्षे जीवनातील बहुमोल काळ व्यतीत करूनसुध्दा आपणास काय अवस्था प्राप्त झाली, याची जाणीव व्यक्तिशःहोत नाही व त्याचा लाभ इतरांना व्हावा असा सूज्ञ विचार जरी आला, तरी ह्या केल्या गेलेल्या साधनांची अनुभूती ही शब्दांनी सांगता येत नाही किंवा प्रत्यक्ष कृतीने दाखविता येत नाही. याचे कारण साधकाला साधनमाध्यमातून जे काही प्राप्त करावयाचे असते, ती प्राप्त अवस्था ज्या काया-वाचा-मन माध्यमांद्वारे करावयाची असते, अशा या माध्यमांचा प्राथमिक अवस्थेत यथोचित विकास होणे अत्यावश्यक आहे. ही काया-वाचा-मनाची विकसित अवस्था जेव्हा साधक आपल्या नित्य साधनेने प्राप्त करून घेतो, तेव्हा त्या साधकाला क्रमशः साधक-सिध्द-साध्य अशा अवस्था प्राप्त करून घेण्याचे कर्तव्य करावयाचे असते.

प्राप्त झालेल्या जीवनात कर्मकारणपरत्वे निर्माण झालेल्या अडचणी निवारणार्थ आपण भक्त काही ना काही प्रकारे देवदेवतार्जन करून किंवा गुरुमार्गदर्शनचा अवलंब करून, प्राप्त जीवनातील अडिअडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत असताना, काही साधनसेवेचा अवलंब करतो.अशा या साधनसेवा जरी अडिअडचणी निवारणार्थ आपण करीत असलो. तरी ह्या साधनमार्गाने अडिअडचणींचे निवारण करण्यापूर्वी आपले हे काया-वाचा-मन ज्या दोषांच्या हितसंबंधात व ऋणानुबंधात हितसंबंधित झाले आहे, अशा दोषांचे विमोचन झाल्याशिवाय अंगिकारलेल्या साधनसेवेत काया-वाचा-मनाने आपणास एकरुप होता येत नाही. त्यामुळे अंगिकारलेले  साधन व त्याची अनुभूती आपणास येत नाही. पण गुरुकृपेने जेव्हा ह्या दोषांचे व ऋणानुबंधांचे काया-वाचा-मनाशी असणारे हितसंबंध विमोचित म्हणजे अनुकूल होतात, त्यावेळी नित्याच्या सेवेत स्वाभाविकच काया-वाचा-मनाचे एकरुपत्व होण्याच्या क्रियेला आरंभ होतो. म्हणजेच काया-वाचा-मन हे करीत असलेल्या साधनेला धारण करते होते. ही अवस्था ज्या गुरुकृपाशिर्वादाच्या माध्यमाने प्राप्त होते, त्या अवस्थेस पारमार्थिक अवस्थेतील साधक अवस्था असे म्हणतात. केवळ मार्गादर्शनाप्रमाणे जपाची सेख्या .वाढविणे व साधनेच्या निमित्ताने देवापुढे दोन तास बसणे, म्हणजे साधन प्राप्त झाले असे नव्हे.

अशा साधक अवस्थेचा प्रारंभ होण्याची क्रिया प्राप्त होण्यापूर्वी, गुरुमार्गादर्शनाप्रमाणे जे दीक्षांत विधी व विमोचनादि विधी होणे अत्यावश्यक असते, त्याबद्दलची जाणीव जरी गुरुमार्गदर्शनाप्रमाणे अडिअडचणीत असलेल्या भक्तभाविकास झाली, तरी मानवी रुपामध्ये परमेश्वराचे अस्तित्व मानण्याबद्दलची श्रध्दा ही विकसित न होण्याने, जीवनारंभी जे विधी अत्यावश्यक असतात, अशांकडे दुर्लक्ष करून आपण भक्त अज्ञानाने रुढीपरंपरेच्या देवदेवतार्जनाच्या मार्गाचा अवलंब करून, प्राप्त झालेल्या बहुमोल जीवनाचा अपव्यय करतो. यामुळे जरी श्रीसद्गुरुंनी कृपावंत होऊन जीवनाबद्दलचे अभयदान दिलेले असते, तरी त्या कृपाशिर्वादाला धारण करण्याचे योग्य असे साधन ह्या काया-वाचा-मनाला प्राप्त होत नाही. यासाठी आपण अडिअडचणींचा अधिक विचार व विस्तार करण्यापेक्षा, प्राप्त जीवनात ज्या दोषपरत्वे अडिअडचणी निर्माण झाल्या आहेत त्या दोषांचे गुरुकृपाशिर्वादाने विमोचन करण्यासाठी सूचित केलेले जे साधन आहे, त्या साधनांशी काया-वाचा-मनाने अधिकाधिक कसे एकरुप होता येईल, याबद्दलची अहर्निश ओढ आपल्याला लागली पाहिजे.

गुरुमार्गदर्शनाप्रमाणे विमोचनादि विधी झाल्यावर आपण भक्तांस साधक अवस्था प्राप्त होते. अशा ह्या साधक अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी, ज्या काया-वाचा-मनाचे हितसंबंध दोषापासून व ऋणानुबंधापासून विमोचित झाले आहेत, असे हे काया-वाचा-मन जेव्हा गुरुमार्गदर्शनाच्या साधनेशी एकरुप होते व त्यासाठी जे नित्याचे साधन सूचित केलेले असते, असे साधन दीर्घकाळर्पंत जरी साधक अवस्थेत करावे लागले, तरी पुढची अवस्था म्हणजे सिध्द अवस्था ही प्राप्त होण्यासाठी अन्य काही साधना करण्याचा प्रयत्न आपण स्वतःच्या विचाराने आचरणात आणू नये. कारण गुरुकृपेने साधक अवस्थेचा लाभ आपण भक्तांस नकळत झाला आहे, ही गोष्ट जरी खरी तरी प्राप्त झालेली साधक अवस्था याबद्दलची जाणीव तुम्हा भक्तांना काया-वाचा-मनाने झाली आहे म्हटल्यावर, त्याच अवस्थेत परिपूर्णतः विकसित होण्याचे जे कर्तव्य आपण भक्तांवर आहे, त्याकडे  दुर्लक्ष करून जर आपण भक्तांना दुसऱ्या अन्य प्रकारच्या साधनसेवेचा अवलंब व्यक्तिशः काही विषयपरत्वे करण्याचे अंगिकारलेत, तर साधक अवस्थेनंतरची सिध्द अवस्था प्राप्त होण्यास कदाचित् हा जन्मही पुरणार नाही.

साधनेतून जेव्हा आपणास साधक अवस्थेचा लाभ करून घ्यावयाचा असतो, अशावेळी साधकाने प्रथमतः महत्वाची जबाबदारी अशी विचारात घ्यावयास पाहिजे की, जे साधन आपण अंगिकारले, त्या साधनात आपले काया-वाचा-मन परिपूर्णत्वाने सामावण्यास जो विलंब लागेल, त्याचा आस्थापूर्वक विचार करून, जे साधन अंगिकारले आहे त्या साधनेतून ऐहिक जीवनार्थ आपणास काय काय प्राप्त करावयाचे आहे, याबद्दलचे विषयपरत्वे विचार बाजूस ठेवले पाहिजेत. त्याचप्रमाणे करीत असलेल्या साधनेतून अजून काही अनुभूती म्हणजे मनःशांती मिळत नाही म्हणून काही काळपर्यंत केलेले साधन सोडून देऊन, नव्या साधनाचा अंगिकार करु नये. कारण साधनेतून जे साध्य करावयाचे आहे, ती मनःशांती तुम्हा भक्तांचे काया-वाचा-मन हे जोपर्यंत विषयरुप आहे, तोपर्यंत अनुभवास येणार नाही. यासाठी साधक अवस्थेची प्राप्ती ही देवदैविक किंवा गुरुमार्गात फार महत्वाची व जबाबदारीची आहे. अशा अवस्थेत अन्य विषयपरत्वे जरी हे जीवन भिन्नाभिन्न इच्छाअपेक्षा साकार होण्याच्या मार्गाचा विचार करीत असले, तरी अंगिकारलेल्या साधनेला काया-वाचा-मनाने एकरुप करून, जर आपण योग्य आकार दिला, तर अंगिकारलेल्या साधनेतून मनःशांती प्राप्त करण्याचे  उद्दिष्ट साकार होईल.

याचा अधिक स्पष्ट अर्थ असा की, आपण भक्तांच्या प्राप्त जीवनात ज्या प्रकारचे सुखसमाधान प्राप्त झाले आहे, तशा ज्या इच्छाअपेक्षा असू नयेत असा अर्थ नाही, पण ज्या इच्छाअपेक्षा आपण भक्तांना जीवनात साकार व्हाव्यात अशी इच्छा आहे, त्या इच्छांबद्दलची अपेक्षा आज आपण अज्ञानाने साधन मार्गामध्ये करीत असतो. कारण इतरांना प्राप्त झालेले सुख आपल्या पाहण्यात किंवा अनुभवास येत असल्याने, तशा प्रकारच्या सुखाची अपेक्षा आपल्या अनुभवास आलेल्या इतरांच्या सुखाकडे पाहून आपण करतो. पण असा अवस्थेत आपण गुरुभक्त सूचित केलेल्या साधनसेवेशी जर एकनिष्ठ राहू तर अशावेळी आपल्या न कळत आपणास जो लाभ होतो, त्याचा आस्थेने विचार करावयास पाहिजे.

आपण दैनंदिन जीवन व्यतीत करीत असताना, आपल्या ह्या काया-वाचा-मनाने जो आचार-विचार विषयपरत्वे, कारणपरत्वे व कार्यपरत्वे करतो, ही क्रिया आपल्या न कळत ह्या देहिक माध्यमातून होत असते व अशावेळी ह्या क्रिया होण्यास आपल्या जीवनातील बहुमोल असे कर्म खर्ची पडत असते. विमोचनादि विधी झाल्यावर आपल्या ज्या कर्मपरत्वे आपणास जीवन व्यतीत करावयाचे आहे, ते कर्म अनाठायी खर्च होता कामा नये. याचे प्रधान कारण म्हणजे साधक अवस्थेत साधनेपरत्वे तुमचे काया-वाचा-मन जे कर्मातील व ऋणानुबंधातील दोषांमुळे दोषास्पद होते, ते दोषांपासून मुक्त झाल्याने आज आपणास साधक अवस्था प्राप्त झाली. त्याचप्रमाणे जे प्राप्त जीवनातील कर्म तेही अनुकूल झाले. आता अनुकूल झालेले कर्म हे पुढील सिध्द व साध्य अवस्थेसाठी अत्यावश्यक असल्याने, हे जे कर्म व काया-वाचा-मन साधक अवस्थेत गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त जीवनाची सार्थकता करण्यासाठी पोषक झाले आहे, त्या काया-वाचा-मनाला व कर्माला पुढील अवस्थेचा लाभ करून देण्याचे कर्तव्य करावयाचे आहे म्हटल्यावर, आपण भक्तांच्या जीवन परिसरात असणाऱ्या सुखाबद्दलच्या अपेक्षा ह्यांची पूर्तता होण्यासाठी, जर आपण भक्त करीत असलेली साधना व जीवनाला पोषक असणारे कर्म, हे सुख प्राप्तीसाठी खर्च कराल, तर साधक अवस्थेनंतरच्या सिध्द व साध्य या अवस्था प्राप्त होण्यासाठी सिध्दता, प्राप्त झालेली कारणदीक्षा व आपले देहिक माध्यम या दोन्हीत असूनही आपण भक्त ते प्राप्त करू शकणार नाही.

आपण भक्त जीवनातील अडिअडचणीपरत्वे सुखशांतीच्या शोधात ह्या गुरुमार्गाचा अवलंब करते झालात. तत्पूर्वी आपल्या प्राप्त जीवनातील कर्मपरत्वे असणारे दोष, जीवनात दु:ख तथा अशांतता निर्माण करीत होते. असे दोष निवारण होऊन, प्राप्त जीवनातील प्राप्त कर्तव्यार्थ असणारे कर्म जरी दोषरहित झाले, तरी पूर्वीच्या अनेक जन्मपरत्वे आपल्या प्रत्येक जे भिन्नाभिन्न विषय आचार विचार आले व गेले, अशा आचारविचारपरत्वे  असणारे विषय, आज अंशरुपाने प्राप्त जीवनातील कर्मात अस्तित्वात असतात. अशा विषयपरत्वे आपल्या न कळत जर आपण साधक अवस्था प्राप्त झाल्यावर इतरांच्या सुखाबद्दल याचक असू व करीत असलेल्या नित्याच्या साधनेचा हितसंबंध, ह्या अंशमात्र विचारांशी जर आला, तर हे अंशमात्र विचार साधनेपरत्वे प्रखर होण्याची जी शक्यता आहे, ती टाळणे साधक अवस्थेतील भक्तांचे आद्य कर्तव्य आहे. अशासाठी सुलभ,सोपा व हितकारक असा मार्ग, म्हणजे इतरांच्या सुखा-शांती-समाधानाबद्दल इच्छाअपेक्षा विचारात न घेता, ‘मी करीत असलेल्या साधनेची उतराई झाली की, मला गुरुकृपेने न कळत अपेक्षित सुख प्राप्त होईल’, हा आत्मविश्वास आपल्या ठिकाणी असावयास पाहिजे.

असा गुरुमार्गदर्शनाबद्दलचा अढळ विश्वास आपल्या ठिकाणी निर्माण करण्याचे प्रधान कर्तव्य एव्हढ्यासाठी विचारात घ्यावयाचे की, जी सिध्द अवस्था म्हणून आपण म्हणतो, अशा अवस्थेत आपण भक्तांनी आपल्या जीवनातील कर्म अन्य विषायाधीन न करता, जीवनात ज्या अपेक्षित सुख-शांती-समाधानाचा अभाव आहे, अशांची पूर्तता करण्यासाठी करीत असलेली साधना व गुरुकृपेने अनुकूल झालेले आहे, ते कर्म हे खर्ची पडता कामा नये. कारण जे कर्म आपणास आज अनुकूल झालेले आहे ते कर्म अंतापर्यंत व पुढील जन्मांची तरतूद करण्यासाठी विचारात घ्यावयाचे असे म्हटल्यवर, ह्या प्राप्त जीवनातील कर्माला जर आपण भक्त ‘गुरुकृपा’ हा प्रधान विषय निर्माण करून देते झालात, तर प्राप्त जीवनात प्राप्त झालेली सुख संपत्ती याचा लाभही सुख-शांता-समाधानाने घ्याल. एव्हढेच नव्हे, तर जीवनात अकस्मात् आलेल्या संकटातून जेव्हा संकटमुक्त होण्याची वेळ येईल, अशावेळी अशा गुरुरुप केलेल्या कर्माचा लाभ होऊन, आपण भक्त ते संकट निभावून नेऊ शकू. त्याचप्रमाणे जे कर्म आपल्या प्राप्त जीवनात गुरुरुप होईल, ते कर्म पुढील जन्मांत जीवनारंभापासूनच गुरुमार्गात सहभागी होण्याची क्रिया भवितव्यात प्राप्त होणाऱ्या काया-वाचा-मनाला सहजलीलया प्राप्त करून देईल. अशा तऱ्हेने प्राप्त होणारी ही गुरुकृपा जरी प्राप्त झालेल्या जन्माला सार्थक करण्याचे कारण प्राप्त करून देती झाली, तरी जे कर्म गुरुकृपाविषयरुप झाले आहे, असे कर्म, सिध्द अवस्थेत आपण इतरांच्या कल्याणार्थ गुरुकृपाशिर्वाद म्हणून उपयोगात आणण्याचा परोपकार ह्याच जन्मात ‘साधनसेवा काहीच नसता’ करु शकता.

पूर्वी तुमच्या घराण्यात अनादि रूढीपरंपरा अनुकरण पध्दतीने करुन, त्या विधीस तुम्ही ज्ञान अज्ञानाने कुलधर्म-कुलाचार म्हणून म्हणत होतात. त्याशिवाय तुमच्या ज्ञान अज्ञानाने उपासतपास, जपजाप्य, व्रतवैकल्ये आदि मार्गाचाहि अवलंब करीत होतात, पण तुम्हा भक्तांना कारणदीक्षेचा लाभ करून  दिल्यानंतर, त्या दीक्षांपरत्वे तुम्हा भक्तांना नित्याची साधनसेवा म्हणून जी सेवा सूचित केली आहे, अशा सेवेचा लाभ तुम्ही घ्यावयास पाहिजे, असे आग्रहाने सूचित करण्यामागील महत्वाचे कारणही भक्तांनी सूज्ञपणाने विचारात घ्यावयास पाहिजे. ह्या साधक अवस्थेची निश्चितता ज्यावेळी आपल्याला अनुभवास येईल, त्याक्षणी तुम्ही् अंगिकारलेले साधन हे सिध्द होण्याच्या अवस्थेला आरंभ करील.

आपण भक्तांस प्राप्त जीवनात ज्या देवादिकांचा व गुरुकृपाशिर्वादाचा लाभ होण्याने सुख-शांती-समाधान प्राप्त करावयाचे आहे, अशी अवस्था कृपाशिर्वादपरत्वे प्राप्त होण्यास तुम्ही भक्तभाविक असमर्थ होतात. याचे कारण तुम्हा भक्तांच्या हितार्थ गुरुकृपाशिर्वादाचा लाभ जो दीक्षांतविधीपरत्वे होत असतो, त्या दीक्षा घेण्याचे कर्तव्य विचारात योग्य प्रकारे न घेतल्याने, प्राप्त जीवनात ज्या कृपाशिर्वादाची आवश्यकता आहे, अशा कृपाशिर्वादाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हा भक्तांना नानाविध प्रकारच्या विधीमार्गाचा अवलंब करावा लागत असे. असे देवदेवताप्रीत्यर्थ करावे लागणारे विधी  याबद्दलची शास्त्रशुध्द ओळख तुम्हा भक्तांना नसल्याने हे विधी त्या इष्ट देवदेवतांच्या भक्ताकरवी किंवा पूजकाकरवी करून घ्यावे लागत होते. असे विधी करण्याबद्दल तुमच्या ठायी जरी त्या इष्टदेवतेबद्दल नितांत आदर आहे व होता, तरी जे धर्मकृत्य तुम्हा भक्तांना ज्या माध्यमाकरवी करावे लागत होते, त्या मध्यस्थांच्या ठिकाणी तुमच्या विधीची शास्त्रशुध्द सांगता करण्याची पूज्यता व आदर नसल्याने, तुम्ही करीत असलेला विधी जो कुटुंबकल्याणार्थ करीत होतात, अशा विधीचा योग्य तो प्रतिसाद तुम्हाला न मिळाल्याने, तीच तीच धर्मकृत्य्, तुम्ही भक्त वर्षानुवर्षे केवळ एक अनुकरण म्हणून करण्याची प्रथा कुटुंबात निर्माण करते झालात.

तुम्हा भक्तांच्या भवितव्याचा जर विचार केला तर हे अंगिकारलेले अनुकरण पध्दतीचे विधी, तुम्हा कुटुंबियांच्या कल्याणार्थ तुमच्या भावी पिढ्यांच्या ज्ञानअज्ञानाने त्यांच्या हातून योग्य प्रकारे घडतील, या बद्दलची शक्यता फारच थोडी आहे. त्यामुळे श्रीसद्गुरुंनाच तुमच्या भावी पिढ्यांच्या कल्याणाची जबाबदारी जाणविल्याने, ह्या विधीकृत्यातून तुम्हा कुटुंबियांना मुक्त करुन, तुम्हा कुटुंबियांच्या कल्याणार्थ ज्या कृपाशिर्वादाची नितांत गरज आहे, तो कृपाशिर्वाद प्राप्त करण्याचे सामर्थ्य व साधन म्हणजे कारण दीक्षा, हिचा तुम्हाला लाभ करून देऊन, आज तुम्हास जी साधक, सिध्द व साध्य ही अवस्था गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त करावाची आहे, त्या साधक-सिध्द अवस्थेपरत्वे तुम्हा भक्तभावकांना अन्य कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीमाध्यमातून कृपाशिर्वादाची प्राप्ती करून घेण्याचे प्रयोजन या पुढील जीवनात शिल्लक राहिले नसून, आपण भक्तभाविकांना जी नित्याची साधना सूचित केली आहे, त्या साधनेतच तुमच्या घराण्याच्या इष्टदेवदेवता व त्यांच्याप्रीत्यर्थ करावे लागणारे विधीपूर्वक औपचार यांचा यथायोग्य समावेश केला आहे.

अनेक भक्तभाविकांना वाचनादि मार्गाचा अवलंब करून किंवा अधिकारी व्यक्तीच्या सत्संगतीमध्ये जाऊन असे ऐकावयास मिळते की, प्राप्त जीवनाची सार्थकता करणे म्हणजे पारमार्थिक होणे किंबहुना परमार्थप्राप्ती करणे. या विषयपरत्वे अशा व्यक्ती प्राप्त जीवनात प्रापंचिक कर्तव्ये करणे ह्या अवस्थेस क्षुल्लक मानून, आपण काही तरी वेगळ्या  प्रकारच्या जीवनाचा लाभ करुन घेतो आहोत अशा गूढ विचाराने, इतरांच्या आचार विचारांशी एकरूप न होता, आपल्याच आचार-विचाराने ठरविलेल्या मार्गाचा अवलंब करुन, ह्या मार्गपरत्वे इतरांच्या ठिकाणी व स्वतःच्या ठिकाणी अशांतता निर्माण करतात. वास्तविक जीवनाची सार्थता करणे ही अवस्था स्पष्टपणे समजून न घेतल्याने, अंगिकारलेल्या साधनेत त्यांना जे साध्य व्हावयाचे असते ते साध्य होत नाही. प्राप्त जीवन हे प्रापंचिक कर्तव्याची पूर्तता व प्राप्त जीवनाची सार्थकता करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिले आहे. पण ज्या प्रापंचिक कर्तव्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती कर्तव्ये यथासांग न होण्याचे कारण प्राप्त जीवनाची अविकसितता व अनेक दोषपरत्वे जीवनाशी हितसंबंध झालेले ऋणानुबंध होत. पण जेव्हा गुरुकृपेने जीवनाची सार्थकता करावयाची आहे असे समजते, अशा वेळी आपण काहीतरी आगंतुक विषयाचा विचार करु लागतो. वास्तविक शास्त्रशुध्द पध्दतीप्रमाणे जीवनाची सार्थकता याचा अर्थ असा की, अंगिकारलेल्या साधनेने हे काया-वाचा-मन ईश्वरमय वाचारांशी एकरूप करणे ! अशा अवस्थेत जे आपण भक्त साधनेपूर्वी ‘कर्माधीन’ असता, ती अवस्था बदलून आपण ‘कर्म अधीन’ या अवस्थेत येता. त्याशिवाय प्रापंचिक कर्तव्ये व पारमार्थिक अवस्थेचा लाभ होण्यास ज्या ऋणानुबंधातील दोषपरत्वे अडथळा होतो, ते दोष गुरुकृपेने विमोचित होतात. ह्या काया-वाचा-मनाच्या ठिकाणी भिन्नाभिन्न विषयपरत्वे कार्यान्वित होण्याची क्रिया ज्या शक्तिद्वारे होत असते, त्या म्हणजे देहिक शक्ति व आत्मिक शक्ति होत. पण असा दोन भिन्नाभिन्न शक्तिंचे कार्यही जीवनाला पोषक अशा विचारांशी एकरुप प्राप्त करून देत नाही.अ शा वेळी दीक्षांत विधी माध्यमातून तुमच्या काया-वाचा-मनाचे व देहिक-आत्मिक शक्तिंचे एकरुपत्व व्हावे म्हणून, जो दीक्षांत विधी करण्यात येतो तो म्हणजे प्रत्यक्ष गुरुशक्तिचा देहाशी एकरुप होण्याचा संबंध होय. अशा विषयाचा लाभ झाल्यावर, काया-वाचा-मन व देहिक-आत्मिक व गुरुशक्ति यांचे एकरुपत्व  होऊन प्रापंचिक कर्तव्यार्थ जे जीवन प्राप्त झाले आहे, ती कर्तव्ये निर्विघ्नपणे पार पाडण्याचे सामर्थ्य देहिक माध्यमास गुरुकृपेने प्राप्त होते.

अशा अवस्थांचा लाभ करून देणे व प्राप्त झालेली अवस्था निरंतर स्वरुपामध्ये टिकविणे, ही अवस्था म्हणजे प्राप्त जीवनाची सार्थकता होय. पण अनेक भक्त हा विषय केवळ वरच्यावर व अनुमान पध्दतीने अभ्यासित असल्याने, प्रापंचिक जीवनाकडे दुर्लक्ष करुन जीवनाचे सार्थक करावयाचे आहे असे समजतात. त्यामुळे सद्गुरुंनी आपणास जी अवस्था प्राप्त करून दिली आहे, तिचा दुरुपयोग होऊन, इतरांपेक्षा काही वेगळ्या प्रकारची कार्य योजना विचारात घेऊन, अशा व्यक्ती स्वतःच्या विचाराने ठरविलेले कार्य आपल्या हातून होत नाही, म्हणून दुखी असतात किंवा तळमळतात. पण प्राप्त जीवन ज्या सद्गुरुकृपाशिर्वादाने विकसित झाले आहे, त्या अवस्थेप्रमाणे आपली प्रापंचिक कर्तव्ये नि:स्वार्थ, निरपेक्ष बुध्दिने करून ज्या जीवनाची सार्थकता गुरुकृपाशिर्वादाने झाली आहे, असे जीवन पुढच्या जन्मासाठी आपल्या बरोबर घेऊन जाणे, ह्या अवस्थेचा लाभ होणे म्हणजेच जीवनाची सार्थकता होय !

अशा अवस्थेचा लाभ ह्या जन्मात गुरुकृपाशिर्वादाने साधकाला घ्यावयाचा असतो. असा लाभ ज्या देहिक माध्यमाने साधकाला अनुभवावयाचा आहे, त्याने साधन हे जरी गुरुकृपाशिर्वादाने सिध्द आहे, तरी ते साध्य करण्यासाठी प्राप्त जीवनातील काया-वाचा-मनाचा प्रथमतः विचार करणे अत्यावश्यक आहे. यासाठी साधनारंभी साधनेला पोषक अशा साधनांचा जो सुविचार मार्गदर्शन म्हणून सांगितला आहे, त्याचा आस्थेने विचार करावयास पाहिजे.

जीवनाच्या सार्थकतेबद्दल इतके स्पष्ट विवेचन जरी आपण भक्तांना करण्यात आले आहे, तरी प्रापंचिक कर्तव्ये नि:स्वार्थ  व निरपेक्ष बुध्दिने करावीत असे जे सुचविले आहे, याचा अर्थ बहुतांशी भक्तांना न समजल्याने, प्रापंचिक कर्तव्ये याचा अर्थ असा लावण्यात येतो की, आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो आहोत व त्या कुटुंबाशी आपली जी नाती हितसंबंधपरत्वे आहेत, त्यांच्यासाठी जे काही कर्तव्य करावयाचे असते त्यास आपण ‘प्रापंचिक कर्तव्ये’ असे संबोधितो. पण ही इतरांसाठी आपल्या हातूनहोत असलेली कर्तव्ये व्यवहारपरत्वे असल्याने, त्या कर्तव्यास ‘व्यावहारिक कर्तव्य’ असे म्हणावे लागेल. प्राप्त जीवनात जी नित्याची व्यावहारिक कर्तव्ये ह्या काया-वाचा-मनाच्या माध्यमाद्वारा आपण करतो, अशी ही काया-वाचा-मनाची  जी देहिक अवस्था आहे, या देहिक अवस्थेचे कार्य ज्या देहपरत्वे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, बुध्दी, मन अशा यंत्रणेने होते, ही जी यंत्रणा आपल्या न कळत कार्य करीत असते, त्या यंत्रणेस ‘प्रापंचिक अवस्था’ असे म्हटले आहे. अशी ही अवस्था गुरुकृपाशिर्वादाने विकसित झाली आहे म्हटल्यावर, ती विकसित अवस्था कालकालांतरापर्यंत जतन करण्याच्या कर्तव्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने ह्या माध्यमाचा वापर जेव्हा आपणास व्यावहारिक जीवनपरत्वे करावयाचा आहे, तेव्हा प्राप्त झालेली विकसित अवस्था जतन करण्यासाठी, आपण भक्तांनी जास्तीतजास्त नि:स्वार्थ, निरपेक्ष विचार आपल्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. तरच विकसित झालेली अवस्था ही स्वार्थाच्या पोटी अन्य विषयाधीन न होता, कर्तव्यपूर्ततेच्याच विषयाइतकी कार्यक्षमता ह्या देह माध्यमातून होत राहील.

ज्या देहिक अवस्थेतून साधना करावयाची असते, त्या देहिक अवस्थेत अंगिकारलेले साधन सिध्द होण्यस क्रमशः पाच स्थानातून जावे लागते. ती पाच स्थाने म्हणजे नाभी, हृदय, कंठ, ललाट व ब्रह्म अशी होत. प्राप्त जीवनात ही स्थाने पूर्वीच्या अनेक जन्मपरत्वे अनेक विषयांशी हितसंबंधीत आहेत व प्राप्त जीवनात जे अनेक विषय आपल्या इच्छाअपेक्षा म्हणून आपल्या जीवन परिसरात वास करीत आहेत, असे विषय त्या पाच स्थानातून कार्याव्नित होत असतात. असे हे विषय कार्यार्थ जरी पाच स्थानांचा अवलंब करून  कार्य करीत असले, तरी त्या विषयास योग्य प्रकारे कार्यान्वित करण्याचे सामर्थ्य देहिक अवस्थेत प्राप्त होत नसते. यासाठी जेव्हा आपण गुरुकृपार्वादाची अपेक्षा करतो किंवा तो प्राप्त करण्याचे साधन अंगिकारतो, अशावेळी ज्या पाच स्थानात हे विषय धारण झाले आहेत, त्या विषयांना कार्यान्वित होण्याची क्रिया सुलभपणे ह्या साधनशक्तिने प्राप्त होते. म्हणूनच आपण प्रापंचिक कर्तव्ये जेव्हा निर्विघ्नपणे पार पाडतो, तेव्हा “मला कृपाशिर्वाद लाभला आहे, म्हणून हे कार्य झाले”, असे म्हणतो. पण अशावेळी जो गुरुकृपाशिर्वाद आपण आपल्या जीवनाच्या सार्थकतेसाठी प्राप्त करतो, तो गुरुकृपाशिर्वाद विषयांची पूर्तता होण्याची क्रिया प्राप्त होण्यास जर खर्ची झाला तर प्राप्त जीवनाचे सार्थक म्हणजे पूर्णतःविकसित होणे, ही क्रिया होत नाही व आपल्या इच्छेप्रमाणे जरी सुख, समाधान प्राप्त झाले तरी त्या प्राप्त सुखात आपल्याला सुख-शांती मिळविता येत नाही. कारण अशा वेळी जरी देहपरिसरातील विषयांची पूर्तता झालेली असते, तरी देहिक अवस्थेची अविकसितता राहिल्याने सुखसंपन्न होऊनही आपण सुख-शांती-समाधानात नसतो.

कारण दीक्षेच्या हितसंबंधात, दीक्षेला पोषक असे मार्गदर्शन आपण भक्तांच्या वाचनात आलेच आहे. आता ह्या दीक्षेला जतन करण्यासाठी व पोषक असे कार्य प्राप्त होण्यासाठी, कोणत्याही अन्य साधनासेवेचा विचार आचार-विचारात न घेता, आपण भक्तांना गुरुआज्ञेप्रमाणे नित्याने ॐ कार साधना व श्रीसद्गुरुनामस्मरण तेही संथापध्दतीने नियमित करावयाचे आहे. ही आपणास सूचित केलेली ॐ कार साधना आपल्या देहिक माध्यमातून आपण करीत असताना या साधनेचा लाभ आपण घेण्यापूर्वी या ॐ कार साधनेची ओळख व त्या देहिक माध्यमाची ॐ कार साधनपरत्वे होणारी क्रिया ही शास्त्रशुध्द पध्दतीने आपण भक्तांना समजणे आवश्यक आहे. आपल्या नित्याच्या वाणीद्वारा आपण जेव्हा एखादा शब्द, नामास्मरण किंवा एखादे गाणे याचा उच्चार करतो, तेंव्हा त्या वाणीतून ध्वनीत झालेला शब्द हा उदात्त, अनुदात्त व स्वरित अशा अवस्थेतून ध्वनित होत असतो. ही अवस्था सूर, ताल व लय आदींनी जेव्हा सुसंबध्द असते, त्या अवस्थेलाच संथा असे म्हणतात. ही ॐ काराची संथा देहाच्या पाच माध्यमांद्वारा ध्वनीरूपाने व्यक्त करावयाची आहे. अशा वेळी स्वाभाविक स्थितीमध्ये आपली जी श्वसनक्रिया देहद्वारा होत असते, त्या श्वसनक्रियेला ॐ कारपरत्वे प्राणायाम करण्याची स्वाभाविक संथा प्राप्त करून दिली असता, म्हणजेच या श्वासउच्छवास क्रिया माध्यमातून ॐ कार साधना केली असता, देहिक अवस्था ही ॐ कारमय कशी होते याबद्दलचे वैद्यकीयदृष्ट्या शास्त्रीय विवेचन खाली दिले आहे. त्याचा अभ्यास साधकाने साधनेपूर्वी लक्षात घ्यावयास पाहिजे.

ॐ कार साधना ही एक श्रेष्ठ प्रकारची साधना असून, ती साधना करीत असताना रक्ताभिसरण व श्वसन क्रिया ह्या शरीराच्या दोन्ही घडामोडी समजणे अत्यावश्यक आहे. कारण गुरुकृपाशिर्वादाची धारणा आपल्या शरीरात कशा प्रकारे होत असते, याचे ज्ञान वरील दोन क्रिया  अभ्यासल्या असता आपणास सहजगत्या होते. नाथपंथाच्या परंपरेप्रमाणे आपण करीत असलेली साधनसेवा ही जीवनात संचित करावयाची नसून, ती आपल्या नित्याच्या आचरणाने पुढील जन्मांची व पुढील पिढ्यांची तरतूद करण्यासाठी ‘सेवन’ करावयाची आहे. अशा साधनसेवेच्या क्रियेचे कार्य रक्ताभिसरण व श्वसन क्रिया या माध्यमातून प्राप्त करावयाचे असते.

नाथपरंपरेप्रमाणे गुरुकृपाशिर्वाद हा रक्तात धारण होतो व हा गुरुकृपाशिर्वाद निरंतर टिकविण्यासाठी नाममात्र साधन हे गुरुकडून सूचित केले जाते. ॐ कार साधना व संथापध्दतीने गुरुनामस्मरण हे कारण दीक्षेनंतर दिलेल्या साधनापैकी होय. हे साधन संथा पध्दतीने म्हणत असताना ज्या ज्या क्षणी तेजाची धारणा रक्तामध्ये होत असते, त्या त्या क्षणी रक्तातील दोष बाहेर फेकले जाऊन, रक्तपेशींना शुध्दत्व प्राप्त होत असते. ज्या प्रमाणे रक्तातील दोषांचे वीर्यात किंवा स्त्रीबीजात रूपांतर होऊन ते दोष संततीमध्ये प्रवाहित होत असतात, त्याच प्रमाणे ॐ कार साधनेने रक्तात धारण झालेला गुरुकृपाशिर्वादसुध्दा वीर्यामधून किंवा स्त्रीबीजातून संततीकडे प्रवाहित होतो. अशाप्रकारे प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादाची टक्केवारी आपल्याकडे जरी पंचवीस टक्के असली तरी आपल्या संततीकडे पन्नास टक्के व पुढील पिढ्यात शंभर टक्के धारण होईल. तत्पूर्वी याबद्दलची शास्त्रीय माहिती असणे उपयुक्त होईल.

रक्ताभिसरणाचे मुख्य कार्य म्हणजे सबंध शरीराला रक्त पुरवठा करणे व शरीरातील इंद्रियांमध्ये तयार होणारी दूषीत द्रव्ये व वायू (कर्ब वायू किंवा Carbon dioxide) याचे उत्सर्जन करणे हे होय. या कार्यार्थ जी इंद्रिये काम करतात ती म्हणजे हृदय व रक्तवाहिन्या होत.

रक्त हे लाल रंगाचे जाडसर द्रव्य असून ते शरीरात चार ते पाच लिटर असते.रक्ताचं दोन मुख्य घटक आहेत –
१) द्रवरूपी पातळ पदार्थ, ज्याला रक्तद्रव (plasma) म्हणतात व
२) घनपदार्थ, ज्यात तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी व प्लेटीलेट्स यांचा समावेश होतो.

तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ असतो. या पदार्थाची विशेषता म्हणजे जो प्राणवायू किंवा आँक्सिजनशी लगेच संयुक्त होतो व जेथे प्राणवायू कमी असेल तेथे त्याचा पुरवठा करतो. पांढऱ्या पेशींचा गुणधर्म म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ति होय. प्लेटीलेट्स या रक्तातील अतियश सूक्ष्म पेशी असून, त्यांची रक्त गोठविण्याच्या क्रियेला (Clotting time) मदत होते.

हृदय ही आपल्या इच्छेच्या आधीन नसलेल्या स्नायूंची पिशवी आहे. हे रक्ताने भरलेले असून, याच्या आकुंचनामुळे रक्त साऱ्या शरीरभर पसरविले जाते. त्यामळे अभिसरण संस्थेतील हृदय हा एक मोठा पंप आहे. हृदय हे छातीच्या पोकळीत मधोमध असून, त्याच्या दोन्ही बाजुंना उजवे व डावे फुप्पुस असते. हृदयाची पोकळी एका उभ्या पडद्यामुळे उजव्या व डाव्या अशा दोन भागात विभाजित होते. त्यापैकी उजव्या भागात अशुध्द रक्त व डाव्या भागात शुध्द रक्त असते.हृदयाच्या पोकळीत उभ्या पडद्याप्रमाणे आडवाही पडदा असतो. त्यामुळे हृदयाच्या पोकळीचे चार कप्पे होतात. त्यापैकी वरील कप्यांना कर्णिका (Atrium) व खालील कप्यांना जवनिका (Ventricle) असे म्हणतात. याप्रमाणे हृदयाच्या पोकळीत वरच्या बाजूला उजवी व डावी कर्णिका व खालच्या बाजूला उजवी व डावी जवनिका मिळून एकंदर चार कप्पे असतात. उजवी कर्णिका व उजवी जवनिका त्याचप्रमाणे डावी कर्णिका व डावी जवनिका यामध्ये प्रत्येकी एक छिद्र व झडप असते. त्यामुळे उजव्या कर्णिकेतील रक्त उजव्या जवनिकेत व डाव्या कर्णिकेतील रक्त डाव्या जवनिकेतून कर्णिकेत जाऊ शकते पण ते जवनिकेतुन कर्णिकेत जाऊ शकत नाही.

श्वसनसंस्था :- नाक, घसा, श्वासनलिका (Trachea), श्वासवाहिन्या (Bronchi) आणि फुफ्फुसे (Lungs) हे श्वसन संस्थेतील निरनिराळे अवयव होत. आपण श्वास आत घेतो त्यावेळी प्राणवायुयुक्त हवा नाकावाटे श्वासनलिकेत जाते. या श्वासनलिकेचे दोन भाग होऊन यांनाच श्वासवाहिन्या म्हणतात. यापैकी प्रत्येकी एक श्वासवाहिनी उजव्या व डाव्या फुफ्फुसात प्रवेश करते. प्रत्येक फुफ्फुसामध्ये श्वासवाहिन्यांचे अनेक भाग होऊन, त्यांचे आणखी लहान लहान भाग होतात. अशा रितीने फांद्या फुटत फुटत शेवटी अतिसूक्ष्म फांद्यांच्या भोवती पातळ आवरणाचे वायुकोश (Alveoli) असतात. या वायु कोशाभोवती अतिसूक्ष्म अशा रक्तवाहिन्यांचे जाळे असून, त्यातून सतत रक्तप्रवाह चालू असतो.

रक्ताभिसरण :- प्रथमतः शरीरातील सर्व अशुध्द रक्त दोन महानीलांद्वारे (Veins) उजव्या कर्णिकेत (Right Atrium ) येते. तेथून ते उजव्या जवनिकेत (Right Ventricle )जाते. उजव्या जवनिकेतून ते एका रोहिणीद्वारे (Pulmonary Artery) फुफ्फुसात जाते. फुफ्फुसात ते वायुकोशाभोवतीच्या अतिसूक्षम रक्तवाहिन्यांतूनप्रवाहित होते. याच वेळी वायुकोशातील प्राणवायु वायुकोशाभोवतीच्या रक्तवाहिन्यातील रक्तात शोषला जातो व रक्तातील कर्बवायु (Carbon dioxide) वायुकोशात ओढला जाऊन, तो उच्छवासावाटे वातावरणात फेकला जातो. प्राणवायूने युक्त असे रक्त एका नीलेतून (Pulmonary vein) हृदयाच्या डाव्या कर्णिकेत (Left Atrium) येते. तेथून ते डाव्या जवनिकेत (Left Ventricle) जाते व तेथून महारोहिणीद्वारा (Aorta) सबंध शरीराला पुरविले जाते. रक्ताभिसरण होत असताना रक्तातील कोणतीही पेशी आपल्या स्थानावरून अभिसरण होऊन पूर्ववत् आपल्या स्थानी परत यावयास सर्वसाधारण तीन मिनिटे लागतात.

संथा पध्दतीने नामस्मरण व गुरुशक्तीचा रक्तात आविष्कार :-
ज्यावेळी संथापध्दतीने नामस्मरणाचा उच्चार होतो, त्यावेळी नैसर्गिक प्राणायाम होत असतो. नेहमी श्वासोच्छवास हा मिनिटाला १८ त २० वेळा होत असतो. परंतु प्राणायामाने हे प्रमाण बरेच कमी होते. प्राणायामाच्या वेळी जेव्हा अतिशय मंदगतीने श्वास आत घेऊन तेव्हढ्याच मंदगतीने तो बाहेर सोडला जातो त्यावेळी नाडीचे ठोके मंद गतीने पडतात. कारण हृदयाचे स्पंदन मंदगतीने होते. ज्यावेळी नाडी मंद गतीने चालते, त्यावेळी रक्ताभिसरणाचा वेग (Velocity of Blood) मंदावतो ‘ॐ श्रीसाईनाथ नमः’ हे नामस्मरण संथा पध्दतीने होत असताना, निर्माण होणारा ध्वनि हा मध्यमापर्यंत नेऊन मंदस्वरात व मंदलयीत त्याचा लय केला व अशा सुसंबध्द पध्दतीने जर हे गुरुनामस्मरण म्हटले, तर एका नामस्मरणात तीन वेळा नैसर्गिक प्राणायाम होतो व ह्या ध्वनितून निर्माण झालेल्या लहरी आपल्या आसमंतात राहून पुनश्च आपण जेव्हा वरीलप्रमाणे प्राणायाम करतो, तेव्हा ह्या लहरी शरीरात धारण होऊन, त्याचा संबंध श्वासउच्छवास क्रियेशी येतो तेव्हा ह्या लहरी प्रकाशमान होऊन शरीरधारणेचा मुख्य घटक म्हणजे रक्त याच्या रक्तपेशीशी एकरुप होतात व प्रथमावस्थेत जी देहिक अशुध्दता काया-वाचा-मनात पूर्वकर्मातील व ऋणानुबंधातील दोषपरत्वे धारण झालेली आहे, त्याची शुध्दता होऊन काया-वाचा-मन हे ॐ कारमय होते. आपण जर हे नामस्मरण तीन मिनिटात पाच वेळा केले, म्हणजे जर प्रत्येक नामस्मरण छत्तीस सेकंदापर्यंत म्हटले, तर रक्तातील प्रत्येक पेशी प्रकाशमान होण्यासाठी, त्याचप्रमाणे पेशीतल्या अशुध्दतेचे उत्सर्जन होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला जातो व आपल्या देहिक व आत्मिक शक्तीला गुरुशक्तीचा कमाल पुरवठा होतो.

रक्तातील तांबड्या पेशीना कार्य करण्यासाठी जी शक्ति लागते ती सर्वसाधारणपणे अन्नरसातून पुरविली जाते. पण गुरुदीक्षेनंतर ॐ कार साधनेतून जी गुरुशक्ति रक्तात धारण होते, त्या गुरुशक्तिच्या माध्यमातून तांबड्या पेशीना कार्य करण्यासाठी शक्तीचा (Energy) पुरवठा केला जातो. यामुळे तांबड्या पेशींच्या कार्यासाठी साधकाची देहिक व आत्मिक शक्ति खर्ची पडत नाही. म्हणूनच ज्यावेळी सबंध शरीराला शक्ति पुरविण्याचे कार्य गुरुशक्ति करीत असते, त्यावेळी साधकाला शरीरधारणेसाठी अन्नाची जरुरी कमी प्रमाणात भासते. ॐ कार साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसा साधकाचा आहार कमी होत जातो. अशा वेळी साधकाने अट्टाहासाने, सवयीने किंवा आग्रहास्तव प्रमाणाबाहेर खाऊ नये. असे केल्याने अमूल्य अशा गुरुशक्तिचा  साधकाकडून विनाकारण अपव्यय होतो.

पूर्वीच्या काळी आपल्या देवदेवताप्रीत्यर्थ उपवास करण्याची पध्दत विचारात घेतली होती. त्याचे कारण ज्या शास्त्रीय पध्दतीतून सांगितले आहे, त्याचा आपण कधीच आस्थेने विचार न करता, उपवास म्हणजे काही वेगळ्या पदार्थाचे सेवन आपल्या इच्छेनुरुप करणे, अशा प्रथा आपण विचारात घेतली. शास्त्रीय पध्दतीप्रमाणे सर्वसाधारणपणे आपण जो नित्याचा आहार घेऊन, त्या अन्नपाणी सेवनामुळे जी देहिक शक्ति नित्याने निर्माण  करतो, त्यातील पन्नास टक्के शक्ति पुनश्च दुसऱ्या दिवशी जेव्हा अन्नसेवन करतो, अशावेळी खर्च होत असते. अशा ह्या नियमित अन्नसेवनाच्या कार्यात काही प्रसंगपरत्वे आपणास मिष्टान्न, जडान्न इत्यादी सेवन करावे लागले तर ते सेवन केलेले अन्न पचन होण्यास केव्हा केव्हा पंच्याहत्तर टक्के इतकीही शक्ति खर्च होत असते. याशिवाय नित्याने आपणास नोकरीधंदा व्यवसाय आदी करावयाचा असतो, अशा वेळी राहिलेली पन्नास टक्के शक्तीही खर्च होते. म्हणजे अन्नपचनार्थ पन्नास टक्के शक्ति व नोकरी-व्यवसाय आदि करण्यासाठी राहिलेली पन्नास टक्के खर्च पडल्यावर, प्राप्त जीवनात तुम्हा भक्तांना ज्या कृपाशिर्वादाची गरज आहे, असा कृपाशिर्वाद प्राप्त होण्यासाठी जरी देवदेवता तुमच्यापुढे उभ्या असतात, तरी देहिक शक्तीचा अपव्यय झाल्याने, देवतांनी दिलेला कृपाशिर्वाद धारण करण्यासाठी देहिक शक्तीचे अस्तित्व देहात जाणवत नाही. म्हणूनच करीत असलेल्या साधनसेवेत काया-वाचा-मनाने एकरुप होता येत नाही. यासाठी पूर्वीच्या काळापासून उपवास करण्याचे जे शास्त्रीय कारण होते, ते असे की, निदान आठवड्यातून एकदा तरी उपवास एवढ्यासाठी करावयाचा की, निदान त्या दिवशी तरी अन्नपचनासाठी खर्च होणाऱ्या देहिक शक्तीचा संचय व्हावा. पण उपवास म्हटला की, नेमके आपण त्या दिवशी आपल्या आवडीचे व जे रोजच्या आहारात नाहीत असे पदार्थ सेवन करुन, देहिक शक्तीचा अधिकच ऱ्हास करतो. अशी ही ‘देवासाठी’ म्हणून अज्ञानाने होणारी  सेवा कारणी लागत नाही. म्हणून तुम्हा भक्तांना उपवास बंद करा, असे मार्गदर्शनाच्यावेळी सूचित करण्यात येते. पण योग्य तो बोध भक्तभाविकांना होत नसल्याने, उपवास बंद करणे, म्हणजे फार मोठ्या पापाचे धनी होणे, अशा भावनेच्या आहारी जाऊन, खऱ्या गुरुकृपाशिर्वादाच्या प्राप्तीला आपण मुकतो.

आपण गुरुभक्त मार्गदर्शनाप्रमाणे जी साधना करीत असता, त्याचा अनुभव व अनुभूती येत नाही, अशा त्रस्त शंकेने दुसऱ्या काही विचारपध्दतीने सेवा करण्याचा प्रयत्न आपण जो करता, त्यापेक्षा ज्या मार्गपध्दतीने आपण करीत असलेल्या साधनेचा अनुभव व अनुभूती यावी अशी आपली इच्छा आहे, त्यासाठी जास्तीत जास्त आपले आचार विचार केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ठेवण्याचे कर्तव्य आपण विचारात घ्यावे.

गुरुमार्गात गुरुशक्तिचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तात केले जाते. या उलट हठयोगी ही शक्ति कायेशी एकरूप करतात. म्हणून जरी अनेक प्रकारचे चमत्कार हठयोगी करीत असले तरी त्यांना दु:खनिवारणार्थ पीडितांना आशिर्वाद देता येत नाही. जेव्हा गुरुशक्ति ही रक्तात धारण होऊन प्रवाहित होऊ लागते, त्यावेळी रक्तामधून तयार झालेली गुरुशक्तिची वलये (Vibration) साधकाच्या शरीरमाध्यमातून बाहेरील वातावरणात प्रवाहित होत असतात. यावेळी पीडित व्यक्तीला साधकाची दृष्टी, वाणी, हस्तस्पर्श, पादस्पर्श या माध्यमातून गुरुशक्तीचा लाभ होत असतो. तसा लाभ झाला म्हणजेच कृपाशिर्वादास किंवा दीक्षेस तो पात्र झाला असे म्हणता येईल. अनेक वेळा काही भक्तभाविक मार्गदर्शनार्थ आल्यावर, त्यांच्या अपेक्षीत वेळेपयंत त्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे सुख-शांती-समाधान आदिंचा लाभ झाला नाही, म्हणून त्या व्यक्ती अन्यत्र मार्गदर्शनार्थ जाऊन, सुखाच्या शोधात काही भिन्नाभिन्न उपासनांचा अंगिकार करतात. अशा वेळी प्राप्त झालेल्या सुख-शांतीचे कारण त्या करीत असलेल्या उपासनेशी जोडण्याचे त्यांचे अज्ञान हे अनुभवण्यास येते. कारण ज्यावेळी आपण भक्त प्रथमतः गुरुमार्गी होता, त्याचवेळी आपल्या हयातीत आपल्याला ज्या सुख-शांती-समाधानाचा लाभ पाहिजे आहे, अशा कृपाशिर्वादाचा लाभ श्रीगुरुंनी करून दिलेला असतो, पण त्या कृपाशिर्वादाचा लाभ जीवनातील दोषपरत्वे अनुभवास न येण्याने, जरी उपासनेचा मार्ग आपण भक्त बदलते झालात, तरी बदललेल्या मार्गाच्या दिशेतून आपल्याला सुख प्राप्ती झाले आहे असे म्हणता येणार नाही. कारण प्राथमिक अवस्थेत आपण निराधार होतात, अशावेळी ज्या सद्गुरुंनी आपल्या जीवनाला आधार दिलेला असतो, हा जरी आपण भक्तांना जाणवत नाही, तरी गुरुसामर्थ्याचा महिमा म्हणून असे म्हणता येईल की, तो शब्दरुपाने, दृष्टीरुपाने, स्पर्शरुपाने दिलेला आधार हा आपल्या हा जीवनात अक्षय स्वरूपात राहतो. त्या कृपाशिर्वादपरत्वे जेव्हा जीवनातील दोषांचे निर्मूलन होउन, आपल्याला आपल्या जीवनात अपेक्षेप्रमाणे सुख-शांती-समाधान लाभणे, ही अवस्था प्राप्त होण्यास जरी विलंब झालेला असतो,तरी ते कृपाशिर्वादाचे साधन हे पूर्वी आपण प्राप्त करते झालेले असतो. पण इतकी शास्त्रशुध्द जाणीव होत नसल्याने, नव्याने अंगिकारलेल्या सेवेचे हे फल आहे, अशा अज्ञानात प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादास उपकृत होण्याचे कर्तव्यही आपण विसरतो. वास्तविक आपण भक्तांना प्राप्त झालेल्या सुखात वाटेकरी म्हणून गुरुंचा कदापिही समावेश होत नाही. पण प्राप्त झालेले सुख ज्यांच्या कृपाशिर्वादाने प्राप्त झाले आहे, अशांच्याबद्दल पूज्य आदरांने त्यांच्या कृपेचे स्मरण करण्याचे कर्तव्यही आपण भक्त विचारात घेत नाही. म्हणून प्राप्त झालेले सुख हे जरी अपेक्षा पूर्ततेपलिकडे असते, तरी त्या सुखात स्वतःला समाधानी मानण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही.

रक्तात धारण होणाऱ्या गुरुशक्तिमुळे प्रकृतीस्वास्थ्यावरही चांगला परिणाम होत असतो. उदाहणार्थ, रक्तदाब किंवा हृदयविकार हे जे विकार होतात, त्या व्यक्तीच्या रक्तात कोलेस्टरोल (Cholestrol) नावाच्या पदार्थाचे प्रमाण वाढते व ते रक्तवाहिन्याच्या आतील बाजूस साचू लागते. यालाच अँथिरोस्वलेरोसिस (Atherosclerosis) असे म्हणतात. वरील प्रकारामुळे रक्तवाहिन्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाला अडथळा होऊन, रक्ताचा वाहण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे रक्त अनावश्यकरीत्या गोठू लागते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते व रक्तवाहिन्यांच्या आकुंचन पावण्यामुळे रक्तदाबासारखे विकार उद्भवतातत. रक्तात धारण झालेली  गुरुशक्ति जेव्हा प्रवाहित होऊ लागते त्यावेळी साचलेल्या कोलेस्टरोलवर तिचा आघात होऊन, रक्तवाहिन्यातून साचलेले कोलेस्टरोलचे थर दूर केले जातात व त्यायोगे रक्तवाहिन्या मोकळे होऊन, त्यातून पूर्ववत् रक्तप्रवाह चालू होतो. अशा प्रकारे रक्तात धारण झालेल्या गुरुशक्तिमुळे हृदयविकार व रक्तदाब आदि विकारापासून साधक दूर होतो.

आपल्या शरीरात अनेक प्रकारचे स्त्राव (Hormones) प्रत्यही तयार होत असतात. शरीराचे तपमान समतोल राखण्यापासून ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यापर्यंत अनेक प्रकारची कार्ये हे स्त्राव करीत असतात. या स्त्रावांचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास शरीराच्या समतोल कार्यपद्धतीत बिघाड होतो. ॐ कार साधनेत शरीरातील सुप्तावस्थेत असलेल्या स्त्रावांना चालना दिली जाते व जे स्त्राव कमी अधिक प्रमाणात प्रवाहित होत असतात त्यांना प्रमाणबध्द केले जाते. अशा रीतिने शरीरातील  हे असंख्य स्त्राव समप्रमाणात कार्यबध्द झाले की, शरीरसुध्दा प्रमाणबध्दतेने कार्य करू लागते.

अशा ह्या स्त्रावांना (Hormones) जर समतोल प्रमाणात कार्य करण्यास वाव मिळाला नाही, तर आपल्या नित्याच्या आचार-विचारात समतोलपणा हा आपल्याला राखता येत नाही. अशा वेळी आपल्या ज्ञान-अज्ञानाने आपल्या देहिक अवस्थेचा समतोलपणा बिघडल्याने कित्येकवेळा आपण अगतिक आचारविचारांच्या बळी पडतो व तदनंतर ज्ञानअज्ञानाने घडलेल्या कृतकर्माबद्दल पश्चाताप व्यक्त करतो. यासाठी जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे ‘विचारपरत्वे आचार व आचारपरत्वे विचार’ ही समतोल अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्या कर्माची आवश्यकता आहे, असे कार्य देहातील स्त्राव माध्यमातून होत असते व हे स्त्राव जीवनाला पोषक असे कार्य करतील, अशी धारणा साधनेद्वारा त्या स्त्रावानां करून द्यावी लागते. अशावेळी तुम्हा भक्तभाविकांत फार मोठा गैरसमज निर्माण होण्याची कारणे अनुभवास येतात. ती अशी की, ज्यावेळी तुमची देहिक धारणा समतोल नसते, अशावेळी निराकरणात ‘अमुक एक गोष्ट तू करू नकोस” असे सांगण्यात येते, तेव्हा आपण भक्तांना अशा तऱ्हेचे वागणे हे अवघड होते. यावेळी आपल्या ठिकाणी असे विचार निर्माण होतात की, आपण गुरुमार्गाच्या ‘आहारी’ गेलो आहोत. वस्तुतः गुरुमार्ग हा आहारी जाण्याचा किंवा होण्याचा मार्ग नसून, मार्गदर्शनाप्रमाणे देहिक अवस्थेचा इष्ट विकास करण्याचा मार्ग आहे. पण अशी देहिक अवस्था स्वाभाविक स्थितीत कार्यान्वित होत नसल्याने अशा तऱ्हेचे बंधन आपणास घालावे लागते. याचा बोध सूज्ञपणाने होत नसल्याने निराकरण म्हणून सांगितलेले बंधन आपण भक्त विचारात घेत नाही. अशामुळे ज्या स्वाभाविक अवस्थेचा समतोलपणा कृपाशिर्वादप्राप्तीला पोषक आहे, अशाचा  लाभ घेण्याच्या तर्कव्यास आपण दुरावतो.

ॐ कार साधनेत स्थळ, काळ व वेळ याला महत्व आहे. ही साधना करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळची, कारण यावेळेस मलमूत्र विसर्जन झालेले असते व त्यामुळे कफ, पित्त व वात हे शरीरात समप्रमाणात असतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या विश्रांतीमुळे देहिक शक्तित ताजेपणा  आलेला असतो. यामुळे देहिक व आत्मिक शक्ति समतोलपणे कार्य करीत असतात. सकाळच्या वेळेप्रमाणे संध्याकाळची वेळही साधनेला पोषक असते. पण ती पन्नास टक्केच पोषक असते. कारण अन्न सेवनानंतर ॐ कार साधना केल्यास त्यात एकाग्रता होऊ शकत नाही. अन्न सेवनानंतर पचनक्रियेला ताबडतोब सुरवात होत असते. म्हणजे अन्न खात असतानाच तोंडामध्ये जी लाळ तयार होते, त्या लाळेमुळे अन्नाची प्राथमिक अवस्थेतील पचनक्रिया चालू होते. पचन क्रियेमध्ये देहिक शक्ति प्रवाहित होते व साधनेसाठी आत्मिक शक्ति प्रवाहित करावी लागते. म्हणूनच देहिक व आत्मिक शक्तिचा समतोवपणा असेल तरच साधनेत साधनेत एकाग्रता होते. याशिवाय एकाग्रता होण्यासाठी रक्तप्रवाह हा मेंदूकडे प्रवाहित व्हावा लागतो, पण अन्न सेवन केलेले असेल तर या अन्नाच्या पचनासाठी शरीरातील रक्तपुरवठा पचनेंद्रियाकडे केंद्रित होऊन, साधनेत मन एकाग्र होत नाही.

ॐ कार साधना करण्यासाठी सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ६ ते ७-३० ही वेळ हिताची आहे. याचे कारण हे साधनाकरीत असता या साधनमाध्यमाद्वारा आपणास आकाशतत्वाची अधिक धारणा करावयाची असते. सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर जेव्हा तेजतत्वाचा  अस्त होतो, अशावेळी निसर्गतः आकाशतत्व हे अधिक प्रमाणात पृथ्वीतत्वाकडे धारण होऊ लागलेले असते. याचे प्रत्यंतर म्हणून जर आपण आपल्या आसमंतातील झाडांचे निरीक्षण केले तर झाडांची पाने या आगमन झालेल्या आकाशतत्वाच्या दाबामुळे खाली लवलेली असतात. असे हे पृथ्वीतत्वाकडे धारण झालेले आकाशतत्व सूर्योदयाच्या वेळी तेजतत्वाच्या आगमनामुळे कमी होऊ लागलेले असते.अशा सकाळी व सायंकाळी साधना करण्याच्या वेळी एवढ्यासाठी लक्षात घ्यावयाच्या आहेत की, निसर्गतः आकाशतत्वाचा पुरवठा अधिक आहे, अशाच वेळी ॐ कार साधनेद्वारे आकाशतत्व धारण करण्याची क्रिया आपणास सुलभपणे प्राप्त करता येते. अशा वेळेला ‘ब्रह्ममुहूर्त’  असे म्हणतात. त्यामुळे वेळीअवेळी ब्रम्हकर्म करण्यास बसणे व त्यावेळेस ब्रम्हमुहूर्त म्हणणे हे अज्ञानीपणाचे आहे.

ॐ कार साधना करण्यासाठी ज्याप्रमाणे वेळेचे महत्व लक्षात घ्यावयाचे आहे, त्याचप्रमाणे ही साधना करताना बसण्यास दर्भासन, लोकरीचे आसन किंवा धूतवस्त्र घेणे अधिक हिताचे आहे. बऱ्याच वेळा आपण साधना करण्यासाठी चटई, पाट किंवा रंगीबेरंगी गालिचेवजा आसन घेतो, ते घेणे हिताचे नाही. साधनेस बसताना धूतवस्त्र म्हणजे धोतर किंवा सफेद लेंगा घेण्यास हरकत नाही. आज अत्याधुनिक शास्त्राप्रमाणे जी कृत्रिम धाग्याची वस्त्रे आपण परिधान करतो, त्यामुळे ॐ कार साधनेत निर्माण झालेल्या लहरी ह्या कृत्रिम धाग्यापरत्वे, शरीरात धारण होण्याच्या क्रियेत अडथळा होतो. म्हणून ती वस्त्रे साधनेच्या वेळी न वापरणे अधिक हिताचे होय.

आपण भक्तांनी अनेक प्रकारच्या साधनांचा अवलंब गुरुमार्गदर्शनाप्रमाणे व ऐच्छिक म्हणून आजपर्यंत केलात, पण ह्या साधना माध्यमातून आपण भक्तांना कदापिही काया-वाचा-मनाचे एकरुपत्व अंगिकारलेल्या साधनेशी झाले आहे, याची अनुभूती अनुभविण्यास मिळाली नाही. याचे कारण आपण ज्या साधनांचा विचार पारमार्थिक अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी करीत होतात, तत्पूर्वी प्राप्त झालेले देहिक माध्यम व त्याची निसर्गपरत्वे कार्यपध्दती काय आहे हे वैद्यकीय शास्त्राप्रमाणे विचारात घेतले नाहीत. प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाच्या इष्टकार्यार्थ आपण काया-वाचा-मन हे विचारात घेतो. ही ह्या प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाची स्थूल अवस्था होय. पण ह्या स्थूल माध्यमाची अंतर्गत कार्यरचना जाणणे महत्वाचे आहे, असा विषय आपल्या अभ्यासात किंवा अनुभवात न आल्याने अंगिकारलेली साधनसेवा काया-वाचा-मनाने करणे म्हणजेच आपली साधक अवस्था, अशा विचाराने साधना प्राप्तीतून सिध्दता करणे एवढेच कर्तव्य आपण विचारात घेतलेत. देहिक माध्यमाची स्थूल अवस्था म्हणजे काया-वाचा-मन, हे नित्याने उच्चारलेले शब्द असल्याने, अंगिकारलेले साधन काया-वाचा-मनाशी एकरुप करणे, एवढीच साधना मार्गातील प्राप्ती, अशा अशा अनुभवाने जे आजपर्यंत आपण केलेत, त्यामुळे आपल्या जीवनातील सुख-शांती-समाधान प्राप्त करण्याचे साधन जरी आपण विचारात घेतलेत, तरी त्या अंगिकारलेल्या साधनांचा वर्षानुवर्षे अंगिकार करुनही, देहिक अवस्थेचा विकास योग्य प्रकाराने आपण करू शकला नाहीत. प्राप्त झालेल्या देहिक अवस्थेचे जे सूक्ष्म कार्य आहे ते देहाबाहेर नसून, देहाच्या अंतर्गत रचनेत सामावले असल्याने त्याचा हितसंबंध आपल्या नित्याच्या साधनेशी अधिक आहे, असा सूज्ञ विचार कोणीही आपणास न करुन दिल्याने, बाह्य देहाच्या स्थूल अवस्थेतील कार्यरचनेवरच आपण भक्तांनी नियंत्रण करण्याचा आपण भक्तांनी प्रयत्न केला. याचा स्पष्ट खुलासा म्हणजे ज्या देवदेवतांच्या कृपाशिर्वादास पात्र होण्याची पात्रता आपणास प्राप्त करावयाची होती, ती प्राप्ती होण्यासाठी व्रतवैकल्ये, उपासतपास, जपजाप्य इत्यादी बंधने ह्या स्थूल देहावर लादून, अंगिकारलेल्या साधनेला लिध्द करण्याचा प्रयत्न आपण केलात. पण जेव्हा क्रमशः गुरुकृपाशिर्वादाने आपणास हे दीक्षांत विधी देण्यात आले, त्यापैकी उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा व अनुग्रह दीक्षा ह्या दीक्षा देण्याचे प्रयोजन म्हणजे ज्या काया-वाचा-मनाने आपण नानाविध साधनांचा अंगिकार केलात, त्या साधना आपण करीत असताना, साधना ही जरी गुरुकृपाशिर्वादाने सिध्द होत्या, तरी ज्या देहिक माध्यमातून म्हणजे काया-वाचा-मनाने त्या धारण करावयाच्या होत्या, ते देहिक माध्यम अविकसित असल्याने, ह्या दीक्षापरत्वे प्राप्त होणारा परमानंद आपण भक्त अनुभवू शकला नाहीत. यासाठी आपण भक्तांना पुढील अवस्थेच्या दीक्षा म्हणजे गुरुदीक्षा व कारण दीक्षा ह्या देण्यात आल्या. यापैकी गुरुदीक्षा ही जी आपण भक्तांना देण्यात आली, तत्पूर्वी आपल्या काया-वाचा-मनाची शुध्दता अन्य दीक्षापरत्वे झाल्यावरच, ह्या शुध्दता प्राप्त झालेल्या काया-वाचा-मनास गुरुदीक्षेशी एकरुप करून, तुम्हा भक्तांची पारमार्थिक अवस्थेतील साधक अवस्था सिध्द करण्यात आली.

यापुढील महत्वाची अवस्था म्हणजे सिध्द अवस्था. ही प्राप्त होण्यास जी कारण दीक्षा कारणीभूत झाली, याचे प्रधान कारण देहिक अवस्थेच्या काया-वाचा-मनाशी नसून, देहाच्या सूक्ष्म अवस्थेशी हितसंबंधीत आहे. ती सूक्ष्म अवस्था आपल्या न कळत देहाच्या अंतर्गत रचनेत कार्यान्वित होत असते. त्याच्या हितसंबंधात आपण जरी ज्ञान-अज्ञानाने जाणत नसतो, तरी त्याचे अस्तित्व आपल्या नित्याच्या आचारविचारातून अनुभवास येण्याने, आपली प्राप्त जीवनातील देहिक अवस्था किती अविकसित आहे हे अनुभवास येते. असे अनुभवास येणारे आचारविचार हे स्वभावधर्माप्रमाणे इतरांच्या हितार्थ किती आहेत व सवयीप्रमाणे आपण त्यांचा नित्याने वापर किती करतो आहोत, हे आपण कधीच जाणते होत नाही. यासाठी प्राप्त झालेल्या साधक अवस्थेत साधकाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जी अवस्था गुरुकृपाशिर्वादपरत्वे प्राप्त होऊन, काया-वाचा-मनाचा जो विकास झाला आहे, त्या अवस्थेचा अनुभव हा अनुभवणे व पूर्वीच्या सवयीपरत्वे लागलेली सवय इतरांच्या अनुभवास न येईल याची दक्षता बाळगणे  हे होय. म्हणजेच पर्यायाने साधक अवस्था प्राप्त झाली असे म्हणता येईल.

आता सिध्द अवस्थेची सिध्दता होण्यासाठी श्रीगुरुंनी कृपावंत होऊन देंव्हा आपण भक्तांना कारण दीक्षा दिली आहे, ह्या दीक्षेची ओळख अजूनही आपण भक्तांना पूर्णतः न होण्याने आपल्या आचारविचारात इतरांना सुखसमाधान देण्याचे जे कर्तव्य या कारण दीक्षेपरत्वे करावयाचे आहे, अशावेळी आपल्या नित्याच्या आचारविचार सवयीपरत्वे जे आचारविचार इतरांच्या जीवनात दु:ख तथा अशांतता निर्माण करीत आहेत,अशा आचारविचारांचा हितसंबंध कारणदीक्षा प्राप्त करते होऊनही आपण पूर्वकर्माशी लावतो किंवा ‘जन्मजन्मांतरातील इतर काही दोषपरत्वे माझ्या ज्ञानअज्ञानाने हे घडते आहे,’ असे स्पष्टपण सांगतो. अशावेळी सूज्ञ भक्तास अशी जाणीव व्हावयास पाहिजे की, वरील निवेदनात लिहील्याप्रमाणे पूर्वजन्मपरत्वे  असणाऱ्या दोषपरत्वे असणारे कारण जेव्हा अस्तित्वात नाही, अशी अवस्था प्राप्त होते, तेव्हाच कारणदीक्षा प्राप्त होते, म्हटल्यावर नित्याच्या सवयीपरत्वे जी आचारविचारांची देवाणघेवाण आपल्या अज्ञानाने होते, त्याचा हितसंबंध पूर्वजन्माशी जोडणे चूकीचे आहे. यापेक्षा आपल्या ज्ञान-अज्ञानाने आपल्या हातून घडत असलेले आचारविचार हे पूर्वीच्या सवयीपरत्वे आहेत, याचा विचार करून जर आपण भक्त इतरांना सुखसमाधान होईल अशा आचारविचारांशी एकरुप झालात, तरच प्राप्त जन्मात प्राप्त झालेली कारण दीक्षा आपण भक्तांनी गुरुकृपाशिर्वादाने ‘जतन’ केली असे म्हणता येईल.

ही देहिक अवस्थेची आचारविचारपरत्वे होणारी क्रिया जतन करण्याचे कर्तव्य कारणदीक्षापरत्वे आपण भक्तांनी विचारात घेतलेत, म्हणजेच आपणास प्राप्त झालेली साधक अवस्था ही पुढील अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी सिध्द झाली असे म्हणता येईल. यापुढील सिध्द अवस्था गुरुमार्गदर्शनाप्रमाणे ज्या  ॐ कार साधनेच्या मार्गातून धारण करावयाची आहे, ती धारणक्रिया जरी ॐ कार साधनेतून धारण होणार आहे, तरी ज्या देहिक माध्यमातून ही साधना सिध्द होणार, ती सिध्दता होण्याचे कार्य देहिक माध्यमाच्या सूक्ष्म अवस्थेचे अंतर्गत कार्य म्हणजे पचनक्रिया, श्वसनक्रिया व रक्ताभिसरण क्रिया ह्या तीन अवस्थेपरत्वे जे हे देहिक माध्यम कार्यरत होत असते, त्याचा विचार करणे हे महत्वाचे आहे. ह्या तीनही अवस्थांपैकी पचनक्रिया हिचीच जाणीव फक्त आपणास होत असते. ही जाणीव म्हणजे देहिक शक्तिपरत्वे जे कार्य आचारविचाराने आपण करीत असतो, अशा देहिक शक्तिची कमतरता निर्माण झाली की, आपणास भूक जाणवते. अशा वेळी आवश्यक त्या अन्नसेवनानंतर ही कमतरता जाणवत नाही. ही अन्नसेवनाची क्रिया केल्यावर, पचनक्रियेच्या कार्यातून सेवन केलेल्या अन्नाचे रुपांतर होऊन, त्याचे रक्तात रुपांतर होते व रक्ताभिसरणाचे कार्य सुरु होते. असे रक्ताभिसरण देहात होत असताना, रक्तात धारण झालेले अशुध्द वायु शुध्दिकरणासाठी श्वसनसंस्थेकडे पाठविले जाऊन, आपण नव्याने जो श्वासोच्छवास करतो, अशावेळी शुध्द हवेच्या श्वसनाने रक्तातील दोष बाहेर काढून, उच्छवास क्रियेने ते शरीराबाहेर फेकतो. अशी ही रक्ताभिसरणाची आपल्या नकळत होणारी जी क्रिया आहे, त्या नैसर्गिक क्रियेचे पुढील अतिमहत्वाचे कार्य म्हणजे आपल्या ह्या देहिक माध्यमाची उभारणी ज्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशा कोशांद्वारे झालेली आहे, त्या कोशांतील दोष विसर्जन करणे हे होय. असे कोश आज आपण भक्तांस जरी प्राप्त झाले आहेत, तरी पूर्वीच्या अनेक जन्मपरत्वे असणारे आपल्या जीवनातील विषय हे प्रत्येक जन्मात काही ना काही कारणपरत्वे आपण आपल्याबरोबर घेऊन येतो व त्या विषयपरत्वे ह्या कोशांचे ठिकाणी त्या विषयांची आसक्ति असते.अशी कोशातील विषयपरत्वे असणारी आसक्ति ही दोष म्हणून जीवनात आचारविचारपरत्वे प्रकट होऊन, इतरांच्या सुख-शांती-समाधानास  अपायकारक होते. म्हणून आपण भक्तांच्या हितार्थ वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन आदि विधी करण्यात आले. कारण हे दोष प्राप्त जन्मात ह्या शरीरातील पाच स्थानांशी निगडीत असल्यानेच, प्राप्त जन्मात जरी आपण काही ना काही प्रकारे साधनसेवा करीत होतात, तरी केली गेलेली साधनसेवा ह्या पाच कोशात धारण होत नव्हती. ती जर धारण होत असती, तर आपण भक्तांना सुख-शांती-समाधानाच्या  शोधात गुरुमार्गाकडे यावे लागले नसते.

प्राप्त जन्मात विमोचनादि विधीपरत्वे ह्या पाच स्थानांशी हितसंबंधीत असलेले दोष जरी गुरुकृपाशिर्वादाने निवारण झाले आहेत व वर सांगितल्याप्रमाणे आपण आता ह्या दोषांतून मुक्त झाला आहात, तरी अंशमात्र दोष हे आचारविचार सवयीपरत्वे अस्तित्वात आहेत, याबद्दलची दक्षता घेणे हे अतिमहत्वाचे कर्तव्य ह्या प्राप्त जीवनामध्ये आपणास करावयाचे आहे. कारण ह्या कोशांशी हितसंबंधित असलेले दोषांचे जरी विमोचन झाले आहे, तरी सूक्ष्म रूपाने असलेले ह्या दोषांचे वास्तव्य आपण भक्तांना आपल्या नित्याच्या साधनेतून शुध्द करावयाचे आहे, हे आचारविचारपरत्वे जर आपण लक्षात घेले नाही, तर करीत असलेल्या नित्य साधनेपरत्वे हे अंशमात्र असणारे दोष इतके प्रखर होतील की, एक दिवस ‘गुरुमार्ग हा धादांत खोटा आहे’, असे विचार मार्गामध्ये पंचवीस वर्षे राहूनही तुम्ही इतरांसमोर प्रकट कराल.

कारणदीक्षेपरत्वे सूचित केलेली ॐ कार साधना ही सर्वात श्रेष्ठ अशी साधना आहे. या साधनेचा संबंध ध्वनि-लहरी-ध्वनि-लहरी-प्रकाश अशा क्रियेतून साधकाला धारण करावयाचा आहे. यासाठी ॐ कार व गुरुनामस्मरण हे संथा पध्दतीने, म्हणजेच उदात्त, अनुदात्त व स्वरित आणि सूर, ताल व लय आदीनी सुसंबध्द असावयास पाहिजे. ॐ कार साधनेमध्ये ॐ काराचा उच्चार करते वेळी पूर्णतः श्वास घेऊन मुखाने ‘ॐ’ या शब्हाद्वारे ध्वनित करावयाचा आहे. अशावेळी जो ॐ कार आपल्या मुखाद्वारे ध्वनिरुप होईल, तो ॐ कार तोंडाने म्हणजे दोन ओठांनी न करता, जीभ व टाळा या माध्यमातून करावयास पाहिजे. अशा ॐ काराचा प्रारंभ मुखातून होत असता, घेतलेला श्वास हा जास्तीत जास्त मंद गतीने सोडून, ॐ कार हा शब्द मध्य अवस्थेत नेऊन, हळू हळू त्याचा लय करावयास पाहिजे. अशा पध्दतीने ॐ कार साधना करीत असता, तुमच्या आसमंतात ह्या ॐ कार ध्वनितून लहरी निर्माण होतात व पुनश्च तुम्ही जेव्हा ॐ कार करण्यास श्वास घेता, अशावेळी प्रथमतः ध्वनित केलेला ॐकार व त्यापासून निर्माण झालेल्या लहरी ह्या शुध्द हवेतून तुमच्या  श्वसन क्रियेद्वारा शरीरात धारण होऊन, फुफ्फुसाकडे जातात. फुफ्फुसातअशा असंख्य पेशी आहेत की, ज्यांची शुध्द हवा धारण करणे व शरीरातील अशुध्द हवा बाहेर फेकणे,  ही क्रिया अव्याहत चालू असते. आपण जेव्हा ॐ कार करता त्यावेळी निर्माण झालेल्या ॐ कार लहरी ह्या शक्तिस्वरूपाने श्वासद्वारे फुफ्फुसात जाऊन, तेथे असलेल्या शुध्द हवेला धारण करणाऱ्या पेशीद्वारा रक्ताशी एकरूप होतात व रक्तात धारण झालेल्या कर्मपरत्वे असणाऱ्या दोषांचे निर्मुलन करतात. रक्ताभिसरणाद्वारा ते रक्त जेव्हा देहातील पाच कोशांच्या ठिकाणी म्हणजे नाभीस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, ललाटस्थान व ब्रम्हस्थान या ठिकाणी जाते, तेव्हा केला गेलेला ॐ कार हा या कोशांमध्ये शक्तिस्वरूपाने धारण होतो. अशी ही साधना माध्यमिक अवस्थेतून नित्याने करीत असता, जो ॐ कार आपण वाणीने ध्वनित केलात, त्याच्या लहरींनी ह्या पाच स्थानांची शुध्दता करण्याचे कार्य पूर्णत्वाने केल्यावर, त्याच लहरी अनाहत तऱ्हेने शरीरातील ह्या पाच स्थानात ध्वनिरुपाने पुनश्च ॐ कार हा ध्वनी करतात. पण अशावेळी या धारण झालेल्या ॐ कारातील लहरी जेव्हा पाच स्थानांतून प्रकट होततात, तेव्हा या लहरींचा ध्वनी न होता, त्या लहरींचे रुपांतर प्रकाशात होते. ही अवस्था प्राप्त होणे हे अंतिम साध्य ॐ कार साधनेत सामावलेले आहे. अशा नित्याने केलेल्या ॐ काराचे रूपांतर जेव्हा साधकाच्या साधक-सिध्द-साध्य अवस्थेत प्रकाशमान होते, तेव्हा साधकाचे काया-वाचा-मन हे पूर्णतः शक्तिमान होऊन, त्याला प्राप्त झालेले  जीवन हे सहजलीलया तो इष्टकार्यार्थ कार्यान्वित करुन इतरांच्याही कल्याणासाठी काही कर्तव्य करण्याचे उद्दिष्ट जीवनाची सार्थकता म्हणून उपयोगात आणतो.

अशा या नित्याच्या ॐ कार साधनेत, आपण भक्तांना न्यास करण्यास सूचित केले आहे. आपल्या देहिक माध्यमात ज्या काही आधिव्याधि असतात, त्यासाठी आपल्याला काही ना काही प्रकारे औषधोपचार करून त्या दूर कराव्या लागतात.अशा आधिव्याधिपासून आपले काया-वाचा-मन निरोगी रहावे, म्हणून हे न्यास करावयाचे आहेत.अस्थि, मांस, मज्जा व त्वचा अशी जी शारिरीक धारणा होऊन हे शरीर आपणास प्राप्त होते, त्या प्राप्त शरीरातील हे घटक ॐ कार शक्तिने शक्तिमान व्हावेत व त्यात सामावलेले दोष किंवा आधिव्याधिपरत्वे होणारी व्याधि दूर व्हावी, यासाठी हे न्यास ॐ कारसाधनेत नित्याने करावयास पाहिजेत. ते करीत असता, दोन्ही हातातून ॐ कार शक्ति ही अस्थि, मांस, मज्जा व त्वचा या शरीरातील घटकात धारण होते.

न्यास पध्दतीने ॐ कार करीत असता आपण आपल्या दोन्ही हातांनी जेव्हा त्वचेवर स्पर्श करतो, अशावेळी आपल्या हातातून, देहामध्ये धारण झालेली ॐ कार शक्ति ही त्वचेद्वारा पुनश्च शरीरामध्ये पाठविण्याचे कार्य करावयाचे असते. आपणास अनुभवास येणारी त्वचा ही अनंत छिद्रांनी युक्त असून, त्या त्वचेचे एकंदर सात स्थर आहेत, त्यापैकी पहिल्या चार थरांतील छिद्रांद्वारा शरीरातील अपायकारक द्रव्य म्हणजे घाम याचे विसर्जन होत असते. या चार व पुढील तीन थरांमध्ये चरबीचा समावेश असतो. अशी चरबी कमी करण्यासाठी जरी आपण व्यायाम किंवा औषधोपचार करतो, तरी त्या अनावश्यक चरबीची स्निग्धता देहातून समुळ नष्ट होत नाही. पण ॐ कार साधनेपरत्वे जेव्हा आपण न्यास करतो, अशावेळी ह्या स्पर्शाद्वारे शरीरात धारण होणारी शक्ति ही चवथ्या थरापलीकडे जाऊन, अनावश्यक चरबीचे निमूर्लन होते. अशावेळी तेथे धारण होणारी शक्ति प्रकाशमान होऊन, या काया-वाचा-मनाला आतून व बाहेरुन पूर्णतः प्रकाशमान करण्याचे कार्य ॐ कार साधनेद्वारा होत असते.

अशी सहजासहजी प्राप्त न होणारी सिध्द-साध्य अवस्था  ॐ कार साधनेतून प्राप्त होण्याचे कार्य गुरुभक्तांना केवळ गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त होते. पण तत्पूर्वी पारमार्थिक विषयाबद्दल वाचनात व ऐकण्यात आलेल्या काही शब्दांचे अवडंबर ही ॐ कार साधना करीत असताना विचारात न घेणे हे बरे. ॐ कार साधना करण्याची पध्दती सूचित करीत असताना, ॐ कार हा क्रमशः नाभी, हृदय, कंठ, ललाट, ब्रह्म अशा पाच स्थानांतून स्वरबध्द पध्दतीने करावा. म्हणजे संगीत शास्त्राप्रमाणे सा रे ग म प ह्या स्वरांनी तो युक्त असावयास पाहिजे. अशावेळी आपण भक्तांच्या वाचनात आलेल्या वाणी प्रकारांचा आपणास शोध घ्यावासा वाटतो. तथापी परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी अशापैकी कोणत्या वाणीची मला प्राप्ती झाली याचा शोध भक्तभाविकांनी घेण्याचा प्रयत्न न करता, गुरुकृपाशिर्वादाने मला गुरुवाणी प्राप्त झाली आहे व प्राप्त झालेल्या वाणीद्वारा मला जगताच्या हितसंबंधाचे काही कार्य करावयाचे आहे, ह्या विचाराशी एकनिष्ठ रहावे. गुरुवाणीचा लाभ झाला आहे म्हटल्यावर,ह्या वाणीद्वाराच आपण भक्तांना इतरांच्या सुखदु:खाबद्दलचा विचार करुन, जी गुरुवाणी शब्दरुपाने आपल्याला प्राप्त झाली आहे, त्या शब्दशास्त्राने पीडितांना अभयदान देऊन, त्याच शब्दाच्या अस्त्रातून इतरांच्या जीवनातील दोषपरत्व निर्माण झालेले दु:ख दूर करावयाचे आहे. अशी ही गुरुशक्तीने प्रभावित झालेली वाणी जेव्हा आपणास प्राप्त झालेली आहे, तेव्हा नित्याच्या जीवनात कोणत्याही कारणपरत्वे एखादा शब्द-अपशब्द उच्चारीत असताना, तो कुणाही व्यक्तिला शाप म्हणून दिला जाऊ नये. तरच तो शब्द हा वरदान होईल, अशाच रीतिने त्याचा उच्चार करावा. ॐ कार साधनेपरत्वे व कारणदीक्षेपरत्वे पूर्णत्वास गेलेल्या काया-वाचा-मनाच्या कार्याला जो गुरुवाणीचा लाभ आहे, ती वाणी ‘आकाशवाणी’ प्रमाणे जर मानवी जीवनात मानवतावादाच्या कल्याणार्थ आपण भक्त उपयोगात आणाल, जर भवितव्यात पीडितांना आपल्या वाणीद्वारा दिलेले अभयदान हे आपणास प्राप्त झालेल्या गुरुकृपेचा ‘प्रसाद’ आहे असे अनुभवास येईल.

वाणीसंबंधी पोषक महत्वाचा असा स्पष्ट खुलासा आपण भक्तास केंला आहे. त्याचप्रमाणे करीत असलेल्या नित्याच्या साधनेतून काय प्राप्त व्हावे ? तर प्रथमतः मुक्तिसंबंधीचे तत्वज्ञान आपल्यासमोर येऊन, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणास कोणत्या मुक्तीच्या लाभ होणार आहे, ह्या विचारांचा खेळ आपल्या साधनामार्गात सुरु होतो. मुक्ती प्राप्त करणे याचा खरा अर्थ प्राप्त जीवनातून सुलभपणे मुक्त होणे असा आहे. पण आपण अंतापर्यंत मुक्त होण्याचा विचार कधीच करीत नाही. यासंबंधी एक उदाहरण द्यायचे झाले तर दुपारी आपण जेवताना आकंठ श्रीखंड खाल्ले असेल व संध्याकाळी जेवताना पुन्हा ‘शिल्लक आहे का ?’ म्हणून जर विचारणा केली, तर ही मुक्तावस्था नव्हे. मुक्तावस्था प्राप्त करणे म्हणजे प्राप्त झालेल्या ऐहिक सुखशांतीबद्दल समाधान वाटून, स्वेच्छेना निरिच्छ होण्याची धारणा काया-वाचा-मनाचे ठिकाणी निर्माण होणे. ही क्रिया अट्टाहासाने न करुन घेता, ती जर सहजलीलया प्राप्त झाली, तरच आपण मुक्ति या शब्दाच्या अलिकडे पलिकडे जावे.

माझ्या मते प्राप्त जन्मात गुरुकृपाशिर्वादाला पात्र होऊन ज्या ज्या काही ऋणानुबंधपरत्वे व दोषपरत्वे हा जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे व त्या ऋणानुबंध व दोषपरत्वे प्राप्त जन्मात ज्या सुखदुखांचा ‘कर्म’ म्हणून हितसंबंध शिल्लक राहिला आहे, त्या कर्माधीन अवस्थेचे जीवन गुरुकृपाशिर्वादाधीन होणे व प्राप्त जन्माच्या कर्तव्यर्थ व सार्थकतेसाठी आपल्या नकळत आपल्याला गुरुकृशिर्वादाचा लाभ होणे, ह्या इतकी श्रेष्ठ मुक्ति आणखी कुठली असेल असे मला वाटत नाही.

आपण भक्तांना यापूर्वी ॐ कार साधना ही पाच स्थानांतून म्हणजे नाभी, हृदय, कंठ, ललाट व ब्रह्म यातून पाच प्रकारांनी करण्यास सूचित केली व त्याप्रमाणे ती करुन, ध्वनि-लहरी-ध्वनि या क्रियेपरत्वे ॐ कार लहरी आपल्या आसमंतात आपण निर्माण करते झालात, तरी ध्वनित झालेल्या ॐ कार लहरींशी आपणास काया-लाचा-मनाने एकाग्र होता आले नाही. पण नित्याच्या साधनेत ह्या ॐ कार लहरींना धारण करण्याचे कार्य जेव्हा आपल्या देहिक माध्यमाला सुलभपणे प्राप्त करता आले, त्यानंतर दुसऱ्या अवस्थेत ॐ कार करीत असता, जो ॐ कार ध्वनि तुमच्या आसमंतात लहरी रुपाने निर्माण झाला, त्या ध्वनित झालेल्या ॐ काराशी काया-वाचा-मनाने एकरूप होण्याची क्रिया जेव्हा प्राप्त झाली, तेंव्हा नित्याच्या ॐ कार साधनेत व नित्याच्या आरतीत तुम्ही सहज एकाग्रता निर्माण करते झालात व त्यामुळे ॐ कारातील ध्वनि-लहरी-ध्वनि या अवस्थेचा लाभ घेते झालात. पण पुढे कारणदीक्षेपरत्वे हेच साधन करताना जरी पूर्वी प्रमाणेच तुम्ही  ॐ कार करीत असलात, तरी ह्या ॐ कार साधनेत पुढील प्रगती म्हणजे ‘ध्वनि-लहरी-ध्वनि-लहरी-प्रकाश’ या अवस्थेत सामावले गेलात. याठिकाणी प्रकाश या शब्दाचा अर्थ Light असा नसून Energy’ असा आहे. पूर्वी नित्य जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपली इष्ट कर्तव्ये करीत असताना, ती कर्तव्ये उत्साहाने होत नसत. त्याशिवाय जरी गुरुआज्ञेने साधना सूचित केली होती, तरी त्या साधनेकडे अधिक आस्थेने आपण पाहते झाला नाहीत. पण आता कारणदीक्षेपरत्वे तिसऱ्या अवस्थेची ॐ कार साधना आपण करीत असल्याने, ज्या ॐ कार साधनेतून हे कार्य काया-वाचा-मन म्हणजे देहिक माध्यम ॐ काररूप वाहवायास पाहिजे, त्या अवस्थेचा लाभ आता आपण भक्त अनुभवते झाल्याने, साधनेबद्दलची अनुभूती म्हणजे काय, हे समजण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गदर्शनाचा किंवा पुस्तकाचा आधार घेण्याचे उरलेले नाही.

ॐ कार साधनेतील पुढील दोन महत्वाचे प्रकार हे शब्दरूपाने आपल्या निवेदनार्थ लिहीता येणार नाहीत. कारण या पुढील दोन अवस्था गुरुमार्गदर्शनाप्रमाणेच  प्राप्त कराव्या लागतील व यासंबंधीचे मार्गदर्शन व या संबंधीचे मार्गदर्शन जिज्ञासू भक्तभाविकांना वेळोवेळी होईल. याचा लाभ जर आपण भक्तभाविकांनी ‘जीवनाची सार्थकता’ ह्या बहुमोल अशा विचाराने घेतलात, तर त्याचा इष्ट लाभ आपण भक्तांना होऊन, इतरांच्याही कल्याणार्थ काही सेवा करण्याचे कर्तव्य गुरुआज्ञेने आपणास झाले, तर त्या कर्तव्यार्थ तुमची गुरुमार्गातील साधक-सिध्द-साध्य ही अवस्था तुम्हा भक्तांना गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त झाली आहे, याची अनुभूति अनुभवण्याचे साधन प्रतेयक्षात तुम्हा भक्तांना अनुभवण्यास येईल.

ॐ कार साधना ही पाच प्रकारांची करावयाची आहे, हे वर सूचित केले असून, त्या साधनेस पोषक असे आचारविचार एवढ्याचसाठी विचारात घ्यावयाचे की, पांच ॐ कार प्रकारांपैकी पुढील तीन प्रकार ज्या साधनपध्दतीने करावयाचे आहेत, त्यांचा हितसंबंध वातावरणातील नैसर्गिक प्रकाशाशी आहे. आपल्या आसमंतात सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो शुभ्र प्रकाश दिसतो, ह्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असून, त्या सात रंगापैकी तीन रंग म्हणजे पिवळा, निळा व तांबडा यांचे एकरुपत्व होऊन हा शुभ्र प्रकाश झालेला असतो. आपले देहिक माध्यम म्हणजे काया-वाचा-मन हेही तीन रंगांनी युक्त असून जेव्हा ह्या तीन रंगाचे प्रमाण एकमेकांशी कमी-अधिक होते, अशा वेळी आपल्या आचारविचार पध्दतीत विषमता निर्माण होते, किंवा जेव्हा भिन्नाभिन्न विषयपरत्वे आपले आचारविचार त्या त्या विषयाधीन होतात, तेव्हा हे आचारविचारांच्या समतोलपणाचे कार्य ज्या तीन रंगाच्या माध्यमातून होते, त्या तीन रंगातील समतोलपणा हा विषम होतो व त्यामुळे नित्याचे जीवन हे कंटाळवाणे व त्रासिक बनते. अनेक वेळेला आपल्या अडिअडचणींचे हितसंबंध कशाशी व कोणत्या कारणपरत्वे आहेत हे न समजल्याने, आपण ज्योतिषशास्त्राच्या आधाराने जेव्हा अडिअडचणींचे निराकरण करुन घेण्याचा विचार करतो, अशावेळी बहुसंख्य ज्योतिषांकडून नवग्रहांच्या अंगठ्या किंवा लॉकेट्स वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक लोक अज्ञानाने हे नवग्रह परिधान करीत असतात. पण ग्रहांना धारण केल्याने आपल्या अडिअडचणी निवारण होतात किंवा अनुकूल होतात, इतके आपले ग्रहमान अनुकूल करून घेण्याचे साधन सहज व सोपे नाही.

ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्या ग्रहांची धारणा आपल्याला करावयाची असते, याचे मुख्य कारण म्हणजे वर सांगितलेल्या तीन रंगापैकी जो रंग आपल्यामध्ये कमीअधिक असेल, त्याचा समतोलपणा राखण्याचे कार्य या परिधान केलेल्या ग्रहपरत्वे होते, हे होय. आता आपल्या ठिकाणी ज्या या तीन रंगांची धारणक्रिया देह माध्यमातून होऊन, आपले आचारविचार समतोलपणे कार्यान्वित होतात, असे हे रंग आपल्या ठिकाणी कमी आहेत किंवा जास्त आहेत, किंवा हे तीनही रंग एकमेकाला पोषक नाहीत, हे अनुभवास येण्याचे साधन अगदी सोपे आहे. एखाद्या व्यक्तीस किंवा एखाद्या स्त्रीस अमूक एका रंगाचे वस्त्र परिधान करण्यात अत्यंत प्रेम वाटते. पण तोच रंग इतरांना आवडत नाही. एखाद्या स्त्रीस तांबड्या रंगाचे पातळ परिधान करण्यात खूप समाधान वाटते. अशावेळी ह्या स्त्रीच्या ठिकाणी ज्या रंगाचा जो समतोलपणा नसतो, तो हे वस्त्र परिधान करण्याने समतोल होतो. म्हणूनच नेसलेल्या वस्त्राबद्दल प्रेम वाटून ती व्यक्ती आनंदी असते. या उलट ज्यांच्या ठिकाणी या रंगाचा समतोलपणा आहे, अशांना भडक, गडद किंवा एका वस्त्रात अनेक रंगाचा समावेश झाला आहे असे वस्त्र आवडत नाही. अशी ही निसर्गपरत्वे देहाची विकसितता किंवा अविकसितता त्या त्या रंगावर अवलंबून आहे. अशा रंगाचा समतोलपणा निर्माण करण्याचे कार्य ॐ कार साधनेतून होत असते. ते म्हणजे ध्वनि-लहरी-ध्वनि-लहरी-प्रकाश होय. म्हणजे ही साधना नित्याने केल्यावर तुम्हा भक्तांच्या देहिक माध्यनाचे कार्य निसर्गतः ज्या तीन रंगांवर अवलंबून आहे, अशा रंगांना समतेलपणाने कार्य करु देण्याचे कार्य ॐ कार साधनेतून होत असल्याने, कुणीही भक्तभाविकांनी वेगवेगळ्या ग्रहपरत्वे अंगठ्या किंवा लॉकेट्स वापरण्याचा मोह ठेवू नये.

भक्ताला गुरुकृपाशिर्वाद प्राप्त झाल्यावर त्याच्या प्रापंचिक व पारमार्थिक जीवनात स्थित्यंतरे घडून येतात व त्याला विकसित अवस्थेची प्राप्ती होते. ही स्थित्यंतरे भक्ताच्या जीवनात कशी घडून येतात ही एक अभ्यासण्याजोगी बाब आहे व त्याचाच तक्ता पुढील पानावर दिला आहे.

आपल्याला सूर्योदयाचे वेळी किंवा सूर्यास्ताचे वेळी क्षितीजावर फिकट पिवळा असा रंग आकाशात प्रथमतः दिसतो, नंतर तो अधिक वाढून लालसर होतो व माध्यान्हाच्या वेळी तो शुध्द निळा असतो. अस्ताच्या वेळी पुन्हा अशीच क्रिया दृष्टोत्पत्तीस येते. हा जो बदल आकाशातील रंगात दिसतो, त्याचप्रमाणे ॐकार साधनेतील प्राथमिक अवस्थेतील विकसित अवस्था म्हणजे फिकट पिवळा रंग. पुढे त्याचे रुपांतर केशरी रंगात होऊन, पूर्णावस्थेच्या वेळी गर्द लाल असा प्रखर रंग आपल्या देहिक माध्यमातून प्रकाशित होऊ लागतो. आंबा हे फळ प्रथमतः हिरवे असते व परिपाक झाल्यावर त्यावर केशरी किंवा गर्द लाल रंग दिसू लागतो. तेव्हा त्या फळाचा परिपाक झाला आहे हे अनुमान अनुभविण्यास येते. त्याचप्रमाणे साधनेत आम्हा मानवांना निसर्गतः विकसित करण्याचे कार्य हे निसर्गाधीन असल्याने, आपले कर्तव्य म्हणजे गुरुआज्ञेने सूचित केलेल्या साधनेशी एकरुप होऊन ती साधना नित्याने करणे हे होय.

आपण भक्तांना ‘ॐकार साधना’ ही दीक्षा दिली आहे. तेव्हा आता गुरुनामस्मरणाव्यतिरीक्त कोणतेही अन्य मंत्र आपण न म्हणावेत हे इष्ट. कारण प्रत्येक मंत्राचा प्रारंभ ॐकाराने होत असतो व तोच ॐकार तुम्हा साधकांच्या जीवनात सिध्द झाला आहे म्हटल्यावर अन्य कोणत्याही मंत्राचा ॐकाराने प्रारंभ करून तो म्हणण्याचे कारण आता उरलेले नाही. फक्त नित्याने आपण भक्तभाविकांना ॐ कार साधना व सद्गुरु नामस्मरण एवढेच साधन करावयास सूचित केले आहे. हे साधन आपण भक्तभाविकांना आपल्या जीवनाची सार्थकता म्हणजे पारमार्थिक जीवन ही अवस्था पूर्णतः प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. हे सूचित केलेले इष्टकर्तव्य आपण आस्थेने व सुविचाराने अंगिकारल्यावर परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचे अन्य कारण कुठेही नसून, त्याचा निश्चित वास सदैव आपल्या ठिकाणी आहे ह्या जाणीवेस आपण भक्त पूर्णतः जाणते व्हाल.

आपण भक्तांस ज्या दीक्षांचा लाभ करून देण्यात आला आहे, त्या दीक्षांपरत्वे जी ‘साध्य’ अवस्थाआपणास प्राप्त करावयाची आहे, त्यासाठी ॐ कार साधना संथा पध्दतीने करणे व ह्या संथापध्दतीसंबंधीचे मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे. जगात इतरत्र ॐ कार साधनेबद्दल अनेक पुस्तके व मार्गदर्शने आपल्या ऐकण्यात व वाचण्यात जरी येत असली, तरी ॐ कार साधना गुरुमुखातून प्राप्त झाल्याशिवाय ती शब्दरुपच राहणार आहे. यासाठी कार्यकेंद्रावर तत्संबंधीच्या मार्गदर्शनार्थ जे सेवक नियुक्त केले आहेत त्यांना नियमित व योग्य वेळी भेटून, आपली साधना  बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

शास्त्रामध्ये ॐ कार म्हणजे ‘हिरण्यगर्भ’ असे संबोधतात. ती एक शक्ति आहे. तो शब्द नसून ‘ध्वनि’ आहे. ॐ कार साधनेची माध्यमे काया-वाचा-व मन ही आहेत. नुसता ॐ काराचा उच्चार अनेक वेळा करून त्याचा लाभ होच नाही व इतरांनाही तो करून देता येत नाही. ॐ काराची मूलभूत अंगे –

१) उच्चार, मध्य, लय
२) स्वर, ताल, लय
३) उच्चार, आचार, विचार
४) स्वर, सूर, नाद

अशी आहेत. ह्या अंगांनी ॐ कार केला असता, ‘सूर-नाद-निनाद’ ह्या अवस्थेचा अनुभव साधकाला येतो. ॐ कार साधनेमध्ये प्राथमिक अवस्थेत ध्वनि-लहरी-ध्वनि ही अवस्था प्राप्त होते व द्वितीय अवस्थेत ध्वनि-लहरी-प्रकाश (शक्ति, Energy) अशा अवस्थेचा अनुभव येतो.  ॐ कार साधना नियमित केली असता, खालीलप्रमाणे अवस्था साधकाला क्रमशः प्राप्त करून घ्यावयाच्या असतात.

ॐ कार साधनेत ‘न्यास’ केले असता, ज्याला आपण स्पर्श-संवेदना (Self-healing) म्हणतो, म्हणजे स्वतःला आरोग्य प्राप्त होण्यासाठी स्वतः स्पर्श संवेदना घेणे, याचा लाभ सहज करून घेता येतो. ॐ कार साधनेतील पाच न्यासद्वारे अनियमित देहिक क्रियेवर नियंत्रण करता येते. म्हणजे पचनक्रिया, श्वसनक्रिया व रक्ताभिसरण ह्या देहिक क्रियामधील कमी-अधिकपणा  दूर होतो व त्यायोगे आरोग्याचा लाभ होतो.

ॐ कार साधना ही संजीवनीप्रमाणे आहे. किंबहुना त्याहीपेक्षा श्रेष्ठ साधन आहे, हा माझा विश्वास आहे व काही कालापूर्वी ह्या साधनेची अनुभूती प्रत्यक्षात मी अनुभविली. वेदामध्ये ज्याचे वर्णन ‘नेति, नेति’ असे केले आहे, त्या अवस्थेचा अनुभव मी घेतला. आजपर्यंत साधक अवस्थेत कुणी हा अनुभव घेतला असेल नसेल, पण ‘जिवंतपणी मरण अवस्था’ अनुभवणे हा अनुभव केवळ ॐ कार साधनेने साध्य झाला असे म्हणता येईल. गेल्या काही वर्षांपासून सद्गुरु आज्ञेने जगत्ककल्याणासाठी काही साधना मी करीत होतो. हे सर्व भक्तांना विदित असून, ह्या साधनेची सांगता ‘शक्तिपीठ’ म्हणून गोवा येथे करण्यात आली. हे शक्तिपीठ म्हणजेच प्रत्यक्षात त्रिगुणात्मक शक्ति असून, ती भवितव्यात कार्यान्वित व्हावी असे साधन विचारात घेऊन, सर्व केंद्रांवरील भक्तांच्या समवेत ॐ कार साधना ही सेवा चालू केली असता, जे शक्तिचे आगमन माझ्या देहिक माध्यमाद्वारा झाले, त्याचा परिणाम म्हणून देहिक अवस्था ही निर्जीव झाली. त्यामुळे देहिक व्यवहार म्हणजे आचार, विचार व उच्चार ह्या तिन्ही माध्यामांचे कार्य होत नव्हते. वैद्यकीय शास्त्रात ह्या अवस्थेचे निदान ‘Cerebral Stroke’ म्हणून सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात अनुभव असा आला की, देहिक शक्तिचे कार्य होत नव्हते. तरी आत्मिक शक्ति हिचे अस्तित्व प्रमाणापेक्षा अधिक जतन केले असल्यामुळे, तिच्या प्रभावाखाली जी शून्य अवस्था प्राप्त झाली होती, त्यातूनच पुनश्च ॐ कार साधना ही अ, ऊ ,म म्हणून उच्चार करती झाली. त्यामुळे ह्याच जन्मी मी पुनश्च आचार, विचार, उच्चार करीत असून, पूर्वीप्रमाणे आपणा सर्वाना प्रेमाने भेटतो आहे. प्रत्यक्षात ही साधना प्राप्त होण्यापूर्वी, गेली पाच वर्षे मी भक्तभाविकांना भेटणे किंवा कामकाज करणे हे गुरुआज्ञेने बंद ठेवण्याचा हेतू असा होता की, पुढे जी साधना माझ्या माध्यमातून श्रीगुरुंनी करवून घेऊन जगाच्या कल्याणार्थ जे कार्य आम्हा सेवकांना भवितव्यात करावयाचे आहे, त्याची ही पूर्व तयारी होती. कारण जी शक्ति ह्या साधनेद्वारे प्राप्त करावयाची होती ती प्रचंड असून,अखंड विश्वाला व्यापून जी शिल्लक राहिली आहे अशी ती शक्ति ही शक्तिपीठांत धारण करण्यात आली. ह्या विश्वशक्तिचे वर्णन पुरुषसूक्तामध्ये केलेले आहे की, ‘समूमिंविश्वतोवृत्वाSत्यतिष्ठदृशांगुलम्’, म्हणजे विश्वला व्यापून ही शक्ति शिल्लक राहली आहे.

आता भवितव्यात आपण भक्तांनी काही प्राप्त करावयाचे आहे असे शिल्लक नसून, प्राप्त केलेली गुरुशक्ति म्हणजेच शक्तिपीठ होय ! त्याहीपेक्षा असे यथार्थ म्हणता येईल की, आपण भक्तांना ज्या प्रतिमा घेण्यास भाग पाडले व आपण त्या घेते झालात, त्याचा लाभ आपले कुटुंब व इतरांना होईल. नित्य नियमाने व आचार विचाराने सूचित केलेली ॐ कार साधना आपण करण्यामुळे ही सर्वश्रेष्ठ अशी संजीवनी भवितव्यात जगाचे भविष्य घडविणार असून, ती जबाबदारी आपण सर्व गुरुभक्तांवर आहे. गेल्या वर्षभरात मला कोणकोणत्या प्रकारे आजारपण, क्लेश निर्माण झाले याचा विचार न करता गुरुकृपेने जी महान दीक्षा म्हणजे, ‘महाकारण’ किंवा ‘ॐ कार साधना’ ही नित्याने करावयाची असून, तिचा संबंध विश्व-उत्पत्तीशी आहे. केवळ मानवी उत्पत्तीचा विचार यात केला नसून, ह्या ॐ कार साधनेत सर्व विश्वात जे जीव जन्माला येतात त्यांचा समावेश केलेला आहे. इतके विशाल व श्रेष्ठ असे तत्वज्ञान आपल्या नित्य साधनेत असल्यावर, धर्माचा किंवा जातीभेदाचा विचार करणे हे इतके हस्यास्पद आहे की, आपण ह्या विसाव्या शतकात सज्ञानी आहोत की अज्ञानी आहोत, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारावा.

एखादी साधना आपण मार्गदर्शनार्थ म्हणून दीक्षांत विधीने घेतल्यावर ती नित्यनियमाने व प्रामाणिकपणे होत आहे किंवा नाही हा विचार करुन त्याप्रमाणे जर साधना केली तर त्याचे फल आपण अपेक्षा करतो त्यापेक्षा शेकडो पटीने अधिक आहे. ॐ कार साधना यामध्ये ॐ कार नुसता वाचावयाचा किंवा म्हणावयाचा नसून, मार्गदर्शनाप्रमाणे संथा पध्दतीने (उदात्त, अनुदात्त व स्वरित) साधना केली तरच तिची फलप्राप्ती इष्ट असून, भवितव्यात इतरांनाही तिचा लाभ आपण देऊ. ॐ कार साधना ही वाणीद्वारा उदात्त, अनुदात्त व स्वरित अशी उच्चारली असता बाहेरील वातावरणात कंप तयार होतात. वाणीतून जेव्हा हा उच्चार होत असतो, तेव्हा ध्वनि-लहरी-ध्वनि येथपर्यंत पहिली अवस्था असून, पुढच्या अवस्थेत ध्वनि-लहरी-प्रकाश याचा लाभ जोडावयाचा आहे. अशी साधना झाली तरच अनुष्ठान किंवा साधना झाली असे म्हणता येईल. केवळ पहिल्या अवस्थेतील ॐ कार जर केला गेला तर ती साधना नसून, वेळेचा अपव्यय किंवा इतरांचे अनुकरण असा अर्थ होईल. तेव्हा निदान आठवड्यातून एकदा तरी आपण करीत असलेला ॐ कार बरोबर होतो किंवा नाही यासाठी केंद्रावर उपस्थित राहून, होणाऱ्या साधनेत ते पडताळून पहावे. नित्यनियमाने होणारे अनुष्ठान यामध्ये आपण उपस्थित झाल्यावर पाच मिनिटे स्तब्ध राहून ॐ काराची प्रार्थना करावी, म्हणजे मन एकाग्र होते आहे किंवा नाही हे पहावे. जो सेवक संथा सांगण्यासाठी उपस्थित असेल, त्याने सर्व उपस्थित भक्तांची साधना ही आपण करीत असलेल्या उच्चाराबरोबर होते की नाही हे पहावे व इतर करणारे सेवक यांनी स्वतःच्या इच्छेनुसार साधना न करता, आपण करीत असलेला उच्चार नियुक्त सेवकाप्रमाणे होतो किंवा नाही हे पहावे. अशी साधना आपण जेव्हा कराल तेव्हा वर सांगितलेली ॐ काराची दुसरी अवस्था ही अनुभविण्यास येईल व तिचा लाभ स्वतःला व इतरांना होईल. केवळ साधना किंवा अनुष्ठानास उपस्थित राहून लाभ होणार नसून, वर्षानुवर्षे आपण ॐ कार करतो आहोत असे व्यर्थ सांगण्याने आपण स्वतःचे नुकसान करणार आहोत

आज मानवी जीवनात काया-वाचा-मन हे समप्रमाणात कार्यान्वित होत नसून, केवळ मनाची गती व मनाचा खेळ जीवनात चालला आहे. यापेक्षा ज्या सोप्या अशा मार्गाचा अवलंब केला असता, ही तीन माध्यमे एकाच पातळीवर येऊन, समप्रमाणात जर एक झाली तर जीवनातील सुख, शांती, समाधान ह्या अवस्था बाहेर नसून, आपल्यातच आहेत हे अनुभवास येईल व आपण विश्वशांती निर्माण करु शकू, हा विश्वास आपल्यात निर्माण होईल. खऱ्या अर्थाने ज्या सुखाची अपेक्षा आपण करतो ते आपल्याजवळच असून, त्याचा शोध ज्याप्रमाणे मूळ विश्वउत्पत्तीचा उच्चार, विचार व आचार हा ॐ कारात असून, तोही आपल्या ठिकाणी आहे. तेव्हा ईश्वराचा शोध अन्यत्र घेण्यापेक्षा त्याची ओढ लागणे हे अत्यंत महत्वाचे व भवितव्यात प्रत्येक मानवाचे कर्तव्य असून, ह्या विश्वाचा जनक व पालक ॐ कार असून, ॐ कार साधनेची प्राप्ती परमपूज्य साईनाथ महाराजांनी करुन दिली आहे. त्या साधनेचा लाभ भवितव्यात प्रत्येक व्यक्तीने घ्यावा अशी तळमळीची इच्छा आहे. हीच गुरुकृपा होय !

>>अध्याय१०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व.

अध्याय ८ प्रार्थना – साधना व त्यातील वेदवेदांत.<<