अध्याय २ – कार्यपध्दतीस शास्त्राधार
या समितीस मानवाच्या कर्तव्याचा संसार त्याला जोडून द्यावयाचा आहे. देवाधर्माच्या नावावर संसार सोडून म्हणजे कर्तव्य सोडून ‘परमेश्वराचा शोध कर’ किंवा त्याच्या नावावर वाटेल ते कुकर्म करून ‘पुन्हा परमेश्वराचे नाव घेत बस’ किंवा ‘तीर्थयात्रा कर’ असे मार्गदर्शन करावयाचे नाही. यासाठी दु:ख निवारणार्थ सुचविलेल्या निराकरण पध्दतीमुळे तुम्हाला सुखाचे जीवन लाभू लागते व जीवनात काहीतरी अर्थ आहे, असे वाटू लागले. अशा वेळी प्राप्त झालेल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी काहीतरी ध्येयवाद तुम्हास निश्चित करावयास पाहिजे. परंतु तेवढीच चांगली गोष्ट करण्यास मनुष्य तयार नाही. दु:ख निवारणार्थ आत्मसात केलेल्या प्रसादाच्या अनुष्ठान पध्दतीमुळे तुम्ही सुखी झालात की तुम्हाला या प्रसादाच्या किंवा निराकरणाच्या शास्त्रीय मीमांसा किंवा आधार शोधण्यास प्रवृत्ती होते व मग त्या निराकरण पध्दतीस तुम्ही आपल्या इष्ट मित्र, ज्योतिषी किंवा या मार्गातला कोणी साधक यांना भेटून ‘काही शास्त्राधार आहे का ?’ हे शोधण्याचा प्रयत्न करता. परंतु तुम्हाला तसा शास्त्राधार मिळत नाहीत. याला एक कारण असे की, आजपर्यंत अशा मार्गाने लोककल्याण करण्यासाठी कोणीही साधक पुढे आलेला नाही. शिवाय हे जे सिध्द-साधक आहेत, त्यांच्या निराकरण पध्दतीत गरीब कुटुंबाच्या संसाराच्या परिस्थितीचा विचार केलेला नाही. म्हणून येथील शास्त्रपध्दतीत त्यांच्याजवळ शास्त्राधार सापडणार नाही. या समितीची प्रत्येक निराकरण पध्दत ही पूर्णत्वाने सिध्द केलेली असल्याने तो ‘गुरुप्रसाद’ आहे. गुरुप्रसाद कधीही शास्त्राधारात बसणार नाही. जसे सूर्य हा एकच आहे, चंद्र ही जसा एकच आहे, तद्वतच समितीच्या लोककल्याणार्थ सद्गुरुकृपेचा ठेवा हाही एकच आहे. दु:खनिवारणार्थ त्या पध्दतीप्रमाणे आचार-विचार ठेवणे हाच शास्त्राधार आहे. तुमच्या जीवनात निर्माण झालेली दु:खे याची शास्त्रीय कारणमीमांसा तुमच्यासमोर ठेवल्यावर त्याचे निवारण ज्या निराकरणाने होते ती म्हणजे तुमची नि:स्सीम भावना ! भावनेला शास्त्राधार असू शकत नाही. तेव्हा शास्त्राधार मिळत नाही म्हणजे ते शास्त्र खोटे ही कल्पना आहे. ते सत्य नाही. तरी सूज्ञ भक्तभाविकांनी असा विचार करावा की, ज्या मार्गाने आपले कल्याण होणार आहे, त्या मार्गाप्रमाणे आपले आचार-विचार ठेवल्यानेच तुम्ही सुखी होणार आहात. म्हणजे अशा सुखाचे शास्त्राधार तुम्हीच : — म्हणजेच समितीचे निराकरण !
या समितीच्या निराकरण पध्दती, गोरगरीबांच्या कल्याणार्थ आहेत. कारण बाह्य जगतात अशा निरनिराळ्या दु:खाचे निराकरण ज्या निरनिराळ्या मार्गांनी केले जाते, त्यात होमहवन, पूजा, पाठ, मंत्रानुष्ठान इ.चा समावेश असतो. त्यातील दैवी भाग किती असतो, हे येथील निराकरण पध्दतीवरून तुम्हाला अभ्यासण्यास मिळेल. प्रथमतः कुलधर्म, कुलाचार आजमितीपर्यत काही ना काही कारणामुळे न झाल्याबद्दल जे अनुष्ठान समिती सुचविते, ते अनुष्ठान शतचंडी हवनाइतकेच फलदायी आहे. पण प्रथमतः सांगितल्याप्रमाणे हे होम-हवनादी आजच्या परिस्थितीत किती लोकांना शक्य आहेत, हे अभ्यासूनच निराकरण सांगितले जाते. त्याचवेळी कुलस्वामीच्या नावे खोबऱ्याच्या वाटीत भंडारा किंवा गुलाल ठेवून पाच आठवडे कुलस्वामीच्या नावे ‘तो पूर्वेला फुंकावा’ असे सुचविले जाते. ही सोडवणूक परिस्थितीच्या विचाराने केली जाते. नाहीतर ज्याचे वरील कुलधर्म, कुलाचार राहीले आहेत, त्यांना अशा प्रकारे हवने करुन कुलस्वामी – कुलस्वामिनीच्या निवास्थानी जाऊन या ऋणातून मुक्त व्हावयास पाहिजे. एखादा श्रीमंत परिस्थितीतील मनुष्य तेही करण्यास तयार होईल. परंतु श्रीमंती ही वर्षानुवर्षे टिकणारी नसल्याने केव्हातरी त्याला या मार्गाचा अवलंब करावाच लागेल. या अनुष्ठानपद्धतीत ‘तुम्ही आपल्या देवदेवतांच्या दर्शनास जाऊ नका’ असे सूचित करावयाचे नाही. जाण्यास हरकत नाही. परंतु परिस्थितीने जाणे झाले नाही तर कुलधर्म, कुलाचार राहू नयेत हा हेतू आहे. ज्या लोकांना वडिलोपार्जित कुलधर्म, कुलाचार (नवरात्र) माहित नाहीत, अशांनी नवरात्र महोत्सवाच्या वेळी या अनुष्ठान पध्दतीप्रमाणे नवरात्र बसवावे. मानवी जीवनाच्या सद्यःस्थितीचा विचार करुन अशी अनुष्ठानपध्दत आपल्याला कोणीही सांगणार नाही. कदाचित आपल्याला असे वाटत असेल की, पुष्कळ देवधर्म केला की, मनुष्य लवकर सुखी होतो. हे खोटे आहे. जे करणे आवश्यक आहे, तेवढेच निश्चयाने करण्याने दु:खाला कारण झालेली ऋणे मुक्त होतात. दैवी उपासनेच्या साध्यतेसाठी सूज्ञ भक्तभाविकांना अन्य शास्त्र, शास्त्राधार किंवा गुरुआज्ञा शोधण्याचे कारण नाही. याला आधार असा की, तीच पध्दत शेकडो भक्तभाविकांनी अनुभवुन प्रचिती घेतलेली आहे. तेव्हा प्रचिती यापेक्षा मोठा शास्त्राधार कोणताही नाही.
या समितीच्या या निराकरण पध्दतीत जे पितृविमोचन व वैयक्तिक कर्मविपाक निराकरणे आहेत, त्याला बाह्य जगतात खूपच शास्त्राधार आहेत.आणि त्याप्रमाणे कित्येक जण करण्यासही तयार होतात. परंतु ही दोन्ही निराकरणे तुमच्याजवळ असलेले चार पैसे खर्च करुन होतील, असा भरवसा बाह्य जगात देत असतात व आपण ते मान्य करुन ते करण्यास प्रवृत्त होता. त्या शास्त्राधारात या पितृविमोचनाबद्दल तीर्थयात्रा, त्रिस्थळी पिंडदान व देवधर्म सांगितलेला आहे. पण त्याबद्दल हा सर्व विधी व्रतस्थ राहून करण्यानेच हे दोष मुक्त होतात हे सांगितले आहे. आज प्रत्येक जण व्रतस्थ राहण्याशिवाय बाकीचे विधी ज्ञान-अज्ञानाने करीत आहे. आज आम्ही व्रतस्थ राहण्याच्या कितीही गप्पा मारल्या, तरी ते सत्य न पटण्यासारखे आहे. कारण मुळात धोतरच जर नेसता येत नाही, तर व्रतास आरंभ कसा होईल ? तेव्हा समितीच्या या निराकरण पध्दतीत या दोषपरिहारार्थ जे निराकरण सांगितले जाते, त्यात वैयक्तिक उपासनेला विशेष महत्व आहे. कारण तुमच्या वाडवडिलांच्या इच्छा, वासना, शास्त्राधार, एखादा भिक्षुक, एखादे तीर्थक्षेत्र, पाच रुपये दानधर्म व पिंडदान करुन त्या वासनांपासून तुमचे वाडवडिल मुक्त होणार नाहीत. कारण आज समाजात रूढ झालेले विचार हे इतके हीन आहेत की, त्यांच्या खाण्याच्या वासनेने मनुष्य ‘जगू शकत नाही’ असे विधान करतो. या खाण्याच्या वासना म्हणजे मांसाहार. ज्या लोकांना मांसाहार निषिध्द आहे, अशी तुम्ही मंडळी तीर्थयात्रा करुन येताना किंवा आल्यावर जे तुमच्या वाडवडिलांनी केले नाही ते तुम्ही करता. मग या तीर्थयात्रा, शास्त्राधार आणि पिंडदान यांचा उपयोग काय ? जसे आज तुम्ही एखाद्याला काही रक्कम कर्ज म्हणून दिली आहे व कोणी तुम्हास असे सुचित केले की ते येणे तुम्ही विसरून जा, तर प्रामाणिकपणे ते विसरून जाणे तुम्हास शक्य आहे का ? याचा विचार करुन आपल्याला त्रास होत आहे, म्हणून वाडवडिलांच्या ऋणाने मुक्त होणे कितपत हितावह आहे ? यासाठी समितीच्या निराकरण पध्दतीत ज्याला या त्रासापासुन मुक्त व्हावयाचे आहे त्याच्यासाठी गुरुप्रसादाचे लेणे आहे. पण ते आत्मसात करीत असता प्रामाणिक विचाराने उपासना सेवा करणे हा शास्त्राधार सांगितला जातो. नुसते तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने ‘वाडवडिलांच्या ऋणातुन मुक्त हो’ असे अन्य पोकळ शास्त्राधाराने सांगितले जात नाही.
आजपर्यंत समितीने ज्या भक्तभाविकांना पितृविमोचनाने मुक्त केले आहे, त्यांच्या स्वार्थी विचारांचे कौतुक करावेसे वाटते. कारण या निराकरण पध्दतीत तुमच्या घराण्याच्या सात पिढीतील मृतात्म्यांना त्यांच्या जीवनातील राहिलेल्या इच्छा-वासनांमुळे जर सद्गती मिळाली नसेल् तर त्यांच्या इच्छावासनांपासून मुक्त होण्यासाठी आवाहन केले जाते. अनुष्ठान पध्दतीची सांगता झाल्यावर होम-हवन विधी करून तुम्हाला प्रामुख्याने तीन दोषातून मुक्त केले जाते व पुढे भावी जीवनात यांची श्राध्दपक्षे करू नका असे सुचविले जाते. कारण त्यांना त्यांच्या इच्छा-वासनापासून मुक्त केल्यानंतर पुन्हा श्राध्दपक्षांच्या निमित्ताने त्यांच्या इच्छा, वासना जागृत करू नका असे शास्त्रशुध्द आधाराने सांगितले जाते. परंतु त्यांना आपलीच मुले-बाळे काही परोपकार, लोककल्याण किंवा धर्म करीत आहोत, आणि तोही ‘आमच्या सद्गतिप्रित्यर्थ’ असे दिसल्याने असे मृतात्मे आपल्या इच्छा-वासनांपासून लवकर मुक्त होतात. परंतु आजपर्यंतचा भक्तभाविकांचा अनुभव असा आहे की, ‘श्राध्द करू नका’ एवढा वैयक्तिक स्वार्थाचा भाग बाबांची आज्ञा मानून मान्य करून घेतला आहे. परंतु त्यानिमित्त काहीतरी तद्निमित्त काहीतरी ‘परोपकार किंवा लोककल्याण करा’ ही आज्ञा दुर्लक्षिली गेली आहे. वास्तविक तुमच्या वाडवडिलांच्या इच्छा-वासनांपासून ते मुक्त होण्यासाठी समितीला जेवढी तळमळ आहे, त्यापैकी काही अंशमात्र तळमळ आपण व्यक्त करता. तेव्हा अशा पितृविमोचन करुन घेतलेल्या सूज्ञ भक्तभाविकांना असे सूचित करावयाचे आहे की, कालांतराने तुम्हाला श्राध्दपक्ष करण्यास मनुष्य मिळेल किंवा नाही ही शंका वाटते. परंतु ज्यांनी जन्मऋणानुबंध आपल्यापाशी बाकी ठेवला आहे व ठेवला जातो, त्यांच्याप्रीत्यर्थ असा परोपकार करा की, जो स्वतःच्या बुध्दीला पटेल. नुसते शास्त्रात सांगितले आहे म्हणजे ते बुध्दीला पटत नसूनसुध्दा शास्त्र म्हणून डोक्यावर घेऊन नाचावे, असे समिती कदापीही सूचविणार नाही. यासाठी तुमच्या जीवनातून कर्तव्य म्हणून व या वाडवडिलांच्या जन्मऋणानुबंधनातून तुम्ही मुक्त होण्यासाठी तुमच्या वार्षिक प्राप्तीतून कांही एक रक्कम (उदा. ५।, ११, २१ रु) आपल्या परिस्थितीनुसार एखाद्या गरीब, अनाथ विद्यार्थांच्या शिक्षणार्थ द्या. प्राचीन कालापासून विद्यादानासारखा धर्म किंवा परोपकार नाही. कारण अन्न दिले, वस्त्र दिले, दान दिले तर त्याची स्मृती निरंतर स्वरूपामध्ये टिकत नाही. परंतु विद्यादानाने पिढ्यानपिढ्या त्याची स्मृती दोघांच्याही जीवनात राहते. समितीच्या कार्यपध्दतीत या परोपकारास खूप महत्व आहे. तुम्हास बाह्य जगतात कोणाच्या शिक्षणार्थ ते देणे शक्य नसेल तर समितीच्या ‘अल्पबचत योजनेत ‘ गोरगरीबांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय सहाय्यासाठी ते पैसे द्या. समितीच्या मार्गदर्शनासाठी जे गरीब येतील, त्यांच्या मुला-बाळांसाठी ते पैसे खर्च केले जातात.
वर सूचित केलेली परोपकाराची भूमिका की जीत देव आहे, परोपकार आहे, स्वार्थ आहे, नि:स्वार्थ आहे, ऋणमुक्तता आहे हाच शास्त्राधार समितीच्या कार्यपध्दतीचा आहे, हे नमूद करण्यास आजपर्यंची सद्गुरुकृपा कारण झाली असल्याने ‘समिती हे करीत आहे’ असा अहंकार व्यक्त करावयाचा नसून, समिती हे एक माध्यम आहे, म्हणजे आजपर्यंत आपण आलेले सर्वजण आहात. वरील परोपकारार्थ भूमिका जी आपणा सर्वांस समजाविली आहे, ते आपण सर्वजण आहोत. दु:खाच्या निमित्ताने सुखाच्या शोधार्थ निघाल्यावर सद्गुरुकृपेचा हिरा मिळाला आहे व त्याच्या प्रकाशात मानवीजीवनाच्या सार्थकतेचे आत्मस्वरूप पहावयास मिळाले आहे, तेव्हा ही समिती म्हणजे आपण सर्वजण आहात.आपणाप्रमाणेच जगातील इतराना सुख समाधान मिळावे, या भावनेची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही-आम्ही एकमेकांतील दुजाभाव, व्यक्ती महत्व, राग, लोभ, निंदा-नालस्ती हे सर्व सद्गुरु चरणी अर्पण करून एका आचार-विचाराने निश्चित होऊ या. हा या कार्य स्थापनेचा उद्देश आहे.यात कोणाही व्यक्तीच्या वैयक्तीक जीवनाचा स्वार्थ पुरा करावयाचा नाही. नित्य जीवनातील नोकरी, धंदा,व्यवसाय ही कर्तव्ये पार पाडून राहीलेला वेळ या कार्यपध्दतीच्या आश्रयार्थ आलेल्यांना द्यावयाचा आहे. तो देण्यासाठी तुमचे आचार–विचार भावनाशील व्हावयास पाहीजेत म्हणून देवधर्माचा व सद्गुरु कृपेचा लाभ जोडून त्याचा फायदा निरपेक्ष बुध्दीने जगाला देण्यानेच भविष्यकाळातील तो देवधर्म ठरणार आहे. भावी काळाच्या परिस्थितीचा पाया म्हणून तुम्ही आपले कर्तव्य कदापीही विसरू नका.
आज आपल्या समोर ठेवलेली ही साधन-पत्रिका कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यासाठी, लोकांना आपले करण्यासाठी किंवा ज्या शंकाकुशंका विचारात निर्माण होऊन जे लोक येथून गेले आहेत, त्यांना समाधान देण्यासाठी व जे येत आहेत त्यांना समितीची कार्यपध्दत इतर जगापेक्षा काही मोठी आहे हे भासविण्यासाठी लिहीलेली नाही. कालांतराने समाजात निर्माण होणारी विपन्नावस्था व त्यातून गुरु आज्ञेचे मार्गदर्शन म्हणून आपणासमोर ठेवली आहे. आज आपण ती वाचून कदाचित् हातावेगळी ठेवणार हे निश्चित आहे. परंतु समितीने ज्या भावनेने तुम्हाला आपले मानून तुमच्याकडे ती पाठविली आहे, तो ‘गुरुप्रसाद’ म्हणून पाठविला आहे. आपण आज जरी पै-पैशाने ‘जगाचे स्वामीत्व खरेदी करू शकु’ अशा भूमिकेत असाल, तरी हे अज्ञान चिरकाल टिकणारे नाही, हे जगाच्या इतिहासातील सत्य आहे. तुमच्या मुला-बाळांच्या जीवनामध्ये आजच्या तुमच्या ज्ञान-अज्ञानाची फळे त्यांना भोगावी लागणार. अशा वेळी जन्मऋणानुबंधनाच्या दु:ख कारण परंपरा काय असतात, हे समजण्यासाठी आजची ही ‘साधन-पत्रिका’ निश्चित उपयुक्त ठरेल. या विचाराने ही साधन-पत्रिका तुमच्या भावी पिढीच्या सुखदु:खाचा शास्त्राधार म्हणून जतन करावी.