गुरुप्रसाद

श्री. साई आध्यात्मिक समितीच्या तीन ग्रंथापैकी एक ग्रंथ, “साधन पत्रिका” ही संकेतस्थळावर दर्शविलेली आहे. आता दुसरा ग्रंथ “गुरुप्रसाद” हा प्रदर्शित होत आहे.

या ग्रंथाचे महत्व थोडक्यात असे सांगता येईल की, समाजातील सध्याची परिस्थिती, ना देव मानणारी आहे की, भौतिक सुखासिनता भोगून समाधानाने जीवन जगणारी आहे. समाजातील प्रत्यक्ष परिस्थिती पहाता असे दिसते की समाज एकीकडे उच्च प्रतिची सुखासिनता जरूर भोगतो आहे, पण त्यातून मानसिक समाधान प्राप्त करू शकलेला नाही. तो ना देव मानतो, ना त्याला देवत्व कोठे दिसते.अ शा परिस्थितीत “ज्ञान” प्राप्त करून ते ग्रहण केल्यास सध्याचेच नव्हे तर पुढील पिढींना जीवन जगण्याचा निश्चित मार्ग समजून आपला व आपल्या वंशाचा उध्दार होईल.

या ग्रंथातील अनुक्रमणिका पाहिल्यास त्यातील विषय हे नित्य-जीवन जगण्यास उपयोगी असून त्यातील ज्ञानाची व्यापकता लक्षात येईल.कांहींना असे वाटण्याची शक्यता आहे की, त्यातील विवेचन हे एका विशिष्ठ धर्मासाठी वा वर्गासाठी आहे. पण तसे नसून त्यातील “ज्ञान“ सर्व समावेशक आहे व निरंतर सत्य आहे. जगातील कोणत्याही जातीतील, पंथातील, धर्मातील मानव, आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा शक्तिची पूजा, साधना, आराधना त्याच्या परंपरेनुसार वा सोयीच्या मार्गाने करीतच असतो. त्यांच्या उपासनेतील तपशिलात फरक असू शकेल, पण तत्व हे तत्वच असते. कारण ज्ञान हे एकच असते. फक्त त्याप्रत जाण्याचे मार्ग विविध असू शकतात.

जागतिक स्तरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास असे दिसेल की, कोणत्याच देशातील मनुष्य आज सुखा-समाधानाने जगत नसून तो सतत मानसिक तणावाखाली वावरत आहे व जगतो आहे. अशी सध्या परिस्थिती असल्याने प.पू.साईनाथ महाराजांनी वंदनीय दादांना आज्ञा केली की, “जगाला सुखी करण्यापेक्षा सुखाचा मार्ग सांग”. त्या आज्ञेचे पालन करून वंदनीय दादांनी प्रत्यक्ष अनुभव व अनुभूती घेतल्यानंतर हा “गुरुप्रसाद” ग्रंथ लिहिला आहे. ह्या ग्रंथाच्या माध्यमातून बहुमोल ठेवा मानवाला प्राप्त झाला आहे. त्यातील ज्ञान सर्व मानवासाठी असून त्याला भौगोलिक सीमांचे बंधन नाही, तसेच जात-धर्म-भाषा इत्यादिंचे बंधन नाही.

अशा ह्या बहुमोल ग्रंथाचे वाचन, मनन, शांत चित्ताने करून प्रत्येकाने आपले जीवन साकार करावे, अशी जगद्गुरुचरणी प्रार्थना.

।।  महत्वाची सूचना  ।। 

१. “गुरुप्रसाद” हा अमोल ग्रंथ श्री साई आध्यात्मिक समिती आपल्या हाती सहर्ष देत आहे.

२. हा ग्रंथ आधुनिक “गीता” असून आपण नित्यनियमाने त्यातील किमान एक परिच्छेद वाचून त्याचे मनन केल्यास जीवनाचे सार्थक होईल.

३. ग्रंथातील पहिला भाग हा आपण परंपरेने करीत असलेल्या देवदेवतार्जनाबद्दलचे शास्त्रीय वीसहून असून, त्याप्रमाणे आता आचरण वा अनुकरण करून नये; केल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी व्यक्तिशः राहिल. दुसऱ्या भागात आजच्या जीवनपद्धतीला सुटसुटीत व सुलभ असे योग्य ते मार्गदर्शन केले आहे. त्यात फक्त प्रार्थना व साधना (आरती व ॐ कार साधना) नित्यनियमाने करण्याचे सूचित केले आहे.

४. ज्यांना शक्य असेल त्यांनी नवरात्रातील खंडेनवमी रोजी या ग्रंथाचे पूजन करावे.

श्री साई आध्यात्मिक समिती, पुणे

Home

 

पुण्याहवाचन

आज जगात प्रत्येक मानवाला इहजन्मामध्ये सुख-शांती-समाधानाची उणीव आहे. भौतिक शोध लागून जी प्रगती झाली, ही प्रगती शास्त्राची झाली; पण मानवी जीवनाची प्रगती होण्याऐवजी ते गतीमान होऊन, जीवन हे सुखाच्या अभावी दु:खमय झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रयत्नशील आहे की, केव्हा आपल्याला सुख, शांती मिळेल. केवळ हा विचार करुन चालणार नाही. कारण आम्हा मानवांचे गणित जन्मापासून चुकले आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आपली अपक्रांती चालू आहे व आज अशी वेळ आली आहे की, आम्हा मानवांचे काय होणार ? शास्त्रज्ञ चंद्रावर गेले, पण स्वत:चा शोध अजून लागला नाही. जेव्हा आपला शोध आपणच घेऊ, तेव्हा सुख आहे की नाही हे समजेल. कारण सुखाच्या मागे कोण आहे, तर आपले संस्कार ! पण आजच्या जगात संस्कार हा विधिपूर्वक न करता, तो केवळ एक फॅशनेबल विधी झाला आहे. त्यामळे आम्हा मानवांचा जन्म बाराव्या दिवशी उदीत न होता, पुढे त्याचे बारावे करावे लागते ! अशामुळे जरी आपण सुखाची अपेक्षा केली, तरी सुख मिळत नाही. मग आपली बुद्धी जागी होते की, ‘सर्वांना सुख प्राप्त झाले आहे पण मला नाही’ व मग आपण शोधाशोध करु लागतो.

अनादिकालापासून आपले पूर्वज देवाला मानीत आले व आपल्या देवात प्रतिमा किंवा मूर्ती पूजनात आहेत. आपण जरी त्यांना ‘देव’ असे संबोधतो तरी ह्या प्रतिकांमधील देवत्व लयाला गेले आहे. कारण आपल्याला मंत्र, तंत्र व यंत्र यांचा उच्चार करता येत नाही. त्यामुळे देवाचे देवत्व अनुभविण्यास दीर्घकाळ लागतो व ही त्रिपुटी जर आपल्याला अवगत झाली तरच देवाचा ‘प्रसाद’ मिळत असतो. ‘देव’ म्हटल्यावर आपल्यापाशी भाव पाहिजे. नुसते पूजापाठ इत्यादि जे आपण करतो, ते कर्म आपल्याकरवी ‘औपचार’ म्हणून होते. त्या कर्माने काही इष्ट फल द्यावे असे नाही. देवाची प्रतिमा व तिची स्थापना आपल्या जीवनात चालती-बोलती व्हावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. केवळ पैसे देऊन दुकानातून आपण देवाची मूर्ती आणतो, म्हणून ती मूर्ती देवाची नाही. ती केवळ एका धातूची असेल. या व्यतिरिक्त त्यास अन्य अर्थ नाही. असा अनुभव मी स्वत: घेतला आहे. म्हणून प. पू. बाबांना अशी प्रार्थना कार्यारंभी मी केली होती की, येणारे जे भक्त आहेत त्यांच्या घरी एकतरी प्रतिमा असू दे की, ज्यामुळे त्यांचे जीवन सुखमय होईल. पण कार्यारंभी ‘प्रतिमा’ म्हणजे काय हे समजले नाही. आज कार्य करता करता छत्तीस वर्षे झाली व ह्या काळामध्ये जे काही गुरु आज्ञेचे पालन केले त्यामुळे आपल्याला तीन प्रतिमा – श्री साई शक-कारण-महाकारण ह्या देऊ शकलो.

दरवर्षी चैत्रापासून फाल्गुनापर्यंत काय कुलधर्म करावा व कोणते कुलाचार करावेत हा प्रश्न सर्वांपुढे आज आहे. हे विधी करण्यासाठी आपल्यापाशी पैसे नाहीत असे आपण म्हणत असलो, तरी चैनीसाठी आपल्याजवळ पैसे आहेत असे पहावयास मिळते. ब्राह्मणसुवासिनी जी जेवावयास पाहिजे, त्याऐवजी इष्टमित्रांसमवेत आपला आहार-विहार बिघडला आहे, याची दक्षता आपण ठेवीत नाही. तसेच, आपल्या वाडवडीलांनी ज्या घराण्यात आपल्याला जन्म दिला, त्यांचे ऋण फेडण्यासाठी तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करण्यासाठी आपल्यापाशी पैसे नाहीत ही सबब आपण सांगतो. पण दर महिन्याला नाटक-सिनेमा यासाठी आपला किती खर्च होतो, याचा आपण सूज्ञपणे विचार करीत नाही.

जन्माला येतेवेळी जे संस्कार आहेत, त्या संस्कारांना मानणे हा समाजात कमीपणा आहे, म्हणून आपण त्यांची टाळाटाळ करीत असतो व शेवटी आपले जीवन टाळ कुटीत असते. आज आपल्याला देव नको आहे. दु:ख झाल्यावर आपण ‘देवा’ म्हणून हाक मारतो, पण ‘ओ’ ऐकू येत नाही. कारण देव मानणे हा धर्म आपण विसरलो आहोत. म्हणूनच जगतामध्ये आज अशांती आहे. हा सर्व विचार करुन, पुढील पिढ्यांचे भवितव्य परमपूज्य साईनाथ महाराजांनी जाणले. मला आज्ञा देऊन मी करीत असलेले कामकाज बंद केले व ‘जगाला सुख देण्यापेक्षा सुखाचा मार्ग सांग’ असे सांगितले. त्यासाठी हा बहुमोल ठेवा “गुरुप्रसाद” लिहिला गेला. कारण आज जगाला त्याची गरज आहे. याशिवाय पुढील पिढ्यांना निश्चित मार्ग समजला पाहिजे. ह्या ग्रंथातील पूर्वार्धामध्ये गतकालातील आपले पूर्वज काय करीत होते या संबंधीचे विवेचन केले असून, उत्तरार्धामध्ये आपल्याला भवितव्यामध्ये काय करणे इष्ट आहे की, जेणे करुन आपल्या वंशाचा उध्दार होईल, याबद्दलचे मार्गदर्शन आहे.

वास्तविक, गुरुमार्गी झाल्यावर जे मार्गदर्शन गुरु करीत असतात. त्याप्रमाणे ‘वाकून’ त्याचे आचरण करणे म्हणजे कुलधर्म व कुलाचार आहे. भक्तांचे कल्याण व्हावे अशी इच्छा श्रीगुरुंची असते. म्हणून, सोप्यात सोपी सेवा ते आपल्याला सांगत असतात. पण काहीतरी निराळेपणाने वागणे म्हणजे गुरुमार्गी असा अर्थ आपण लावून तसे इतरांनाही भासवितो. पण हा अर्थ भविष्यामध्ये आपल्या अनर्थाचा पाया आहे. हे आपण विसरु नये.

‘गुरुप्रसाद’ ही श्रीगुरुंची भेट आहे. प्रत्येक कुटुंबाने ही श्रीगुरुभेट आधुनिक ‘गीता’ आहे असे समजून, तिचा स्वीकार केला पाहिजे. पुढील काळात ती जतन करुन, भावी पिढ्यांना सज्ञान करणे यापेक्षा अधिक पुण्य ते काय ?

आपला सेवक,

दादा भागवत.

 

।।  श्री मंगलाचरण  ।।

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकज स्मरणम्

वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयती विघ्नानाम्       ।।

या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना            ।।

या ब्रम्हार्च्चुतशंकर प्रभुतिभः देवै सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती नःशेष जाडय़ाप हा   ।।

मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरीम्,  यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम्

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तम्, देवी सरस्वती चैव ततो जयमुदिरयेत          ।।

वसुदेव सुतं कंस चाणुर मर्दनम्, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरूम्

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः! गुरूदेव परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः       ।।  

श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ! पुंडलिकवरदा हरि विठ्ठल   ।।

पार्वतीपते हरहर महादेव ! सीताकांत स्मरण जयजय राम  ।।

सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय !

श्रीगुरूदेव दत्त ।। सदानंदाचा  येळकोट ।।

सच्चिदानंद सद्गुरू श्रीपंत महाराज की जय,

श्रीगुरूदेव दत्त ।।

।।  श्री शक्तीपीठ प्रार्थना ।

आम्ही गुरूभक्त श्री जगद्गुरू साईनाथ महाराज यांचे चरणी भक्तीभावनेने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत्कल्याणासाठी “गुरूशक्तीपीठाची स्थापना” करून दिली आहे, त्या शक्तीपीठाची सेवा विनम्र भावनेने, श्रध्दा, भक्ति, निरपेक्ष, नःस्वार्थ बुध्दीने करून जे कोणी ह्या जगतात दुखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू.

जगतात आम्हां मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख,  शांती , समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना.

।।  दैनंदिन प्रार्थना  ।।

 हे भगवंता,  नारायणा,  आमच्या कुटुंबाच्या उध्दाराकरिता ज्या दिव्य, पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अहर्निश झटत आहेत, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हां सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न होवो. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतींना बळी पडून, आळसामुळे अथवा अज्ञानामुळे, आमच्या मनांत त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील, अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील,  किंवा त्यांच्या उपदेशाविरूध्द कृती घडली असेल, त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आमच्या कुटुंबात सदैव सुख, शांति, समाधान व परस्परांविषयी जिव्हाळय़ाचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करोत व तसेच तुझे विषयीची अचल निष्ठा आमचेपैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहो. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजिलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्यही घडत राहोत, तेणे करून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हांवर सदैव संतुष्ट राहोत व तुझीही आमच्या कुटुंबावर अशीच  अखंड कृपादृष्टी राहील असेही घडून येवो.

हे प्रभो, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्यकर्म अहोरात्र पाळण्याची सुबुध्दी दे. पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हांपैकी काही व्यक्ती आज जरी सुख भोगीत असूं,  तथापि,  ‘पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने ह्याच जन्मी अति प्रयत्नाने करावी’ अशा  तऱ्हेच्या तुझ्या नित्य शुध्द वाचेने तू जगाला जो धडा घालून दिला आहेस, त्याला अनुसरून आणि उपकाराची फेड अपकाराने न होईल अशीच बुध्दी, हे दयाघना, कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे, एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे.

अध्याय १.  कार्य व कार्याची भूमिका.
अध्याय २. भक्तभाविकांची कार्यार्थ भूमिका.
अध्याय ३.  घराण्यातील कुलधर्म.
अध्याय ४.  पूजनादि विधी व तिचे महत्व.
अध्याय ५.  कुलाचार, कुलोपासना.
अध्याय ६.  उपास्य दैवते व करावयाची उपासना.
अध्याय ७.  कार्याची निराकरण पध्दती.
अध्याय ८.  प्रार्थना – साधना व त्यातील वेदवेदांत.
अध्याय ९.  ॐ कार साधना.
अध्याय १०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व.